सोनं घ्या.. सोन्यासारखे व्हा.. Print

मेघना जोशी ,रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

शाळेतले रिकामे तास म्हणजे मुलांसाठी गमतीचा वेळ, पण शिक्षकांसाठी एक परीक्षा असते. गैरहजर शिक्षकाच्या जागी गेलेल्या शिक्षकाकडून मुलं अनेक मागण्या करतात. खेळायला जाऊ? गोष्ट सांगा ना.., भेंडय़ा खेळायच्या, गप्पा मारूया.. अशा एक ना अनेक मागण्या बाहेर पडतात.
मुग्धामॅमना आज सहावीच्या वर्गावर सलग दोन रिकामे तास होते, पण त्यांच्यासाठी मात्र हे तास परीक्षेचे नव्हते. कारण त्यांनी मुलांना भेंडय़ा खेळायला शिकवल्या होत्या. कधी स्पेलिंगच्या, कधी संस्कृत शब्दांच्या, कधी अर्थासह नावांच्या तर कधी वैशिष्टय़ांसह गावांच्या नावाच्या भेंडय़ा खेळताना मुलं इतकी रमून जायची की दोनच तास काय अख्खा दिवस दिला असता तरी चुटकीसरशी संपला असता.
सतत उत्साही, आनंदी, लाघवी अशा मुग्धामॅम वर्गात आल्याबरोबर मुलांनी गलका केला. ‘आज नावाच्या भेंडय़ा’ प्रस्ताव एकमुखाने आल्याने लगेचच सुरुवात झाली. एकावर एक नावे अर्थासकट सांगितली जाऊ लागली. जशी हर्षदा म्हणजे आनंद देणारी, वरुण म्हणजे पावसाचा देव, वीणा हे एक तंतुवाद्य अशी अनेकानेक नावं सांगताना मुलांची असलेली तयारी पाहून त्यांना आनंद होत होता. भेंडय़ा पुढे पुढे सरकत होत्या. इतक्यात एक जण म्हणाली आवडी- सर्वाना आवडणारी. आता साठा हळूहळू संपत आला होता. इतक्यात ‘न’ या अक्षरावर गाडी अडली. निलांबरी.. एक गट. ‘‘हं झालंय.. झालंय.’’- दुसरा गट. अशी अनेक नावं फेटाळली गेली. इतक्यात एक गट म्हणाला, ‘नकुशा’ म्हणजे नको असलेली. ‘चिटिंग, चिटिंग, मॅम असं नाव नसणारच, ‘चिटिंग चिटिंग..’ दुसरा गट म्हणू लागला. आता मॅमवर अंपायरचं काम आलं. ‘ऐका पाहू जरा’ म्हणत त्यांनी पुढे सुरू केलं. ‘‘अरे, ही चिटिंग नाहीए. काही घरांमध्ये मुली नकोशा असतात, नावडत्या होतात आणि त्यांचं नाव ठेवलं जातं नकुशा.’’ ‘‘पण हे अत्यंत चुकीचं आहे. मुलगी झाली म्हणून ती नावडती. मुलगी म्हणून तिच्यात अनेक कमतरता आहेत असं म्हणणं हेच मुळात चुकीचं आहे. सध्या आपण पाहतो की मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत.’’ ‘‘हो हो मॅम, मुली सैन्यातही असतात.’’- वरदा, ‘‘विमानही चालवतात’’- रफिक. ‘‘बरोबर आहे तुमचं अगदी. आजच नव्हे तर पुराणकाळापासून स्त्रिया युद्धात भाग घेत होत्या.’’ ‘‘खरंच!’’ एक आश्चर्ययुक्त कोरस.
‘‘हो तर, मला सांगा सध्या कोणता उत्सव चालू आहे.’’ ‘नवरात्रोत्सव’. ‘‘मॅम मी गरबा खेळायला रोज जाते.’’ भूमिका म्हणाली. ‘‘कित्ती मज्जा येते’’- ईशान. ‘‘हा नवरात्रोत्सव देवीचा उत्सव.’’ मॅम पुढे म्हणाल्या. ‘‘हा उत्सव सुरू होण्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला?’’ ‘‘सांगा ना मॅम, सांगा ना’’ गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून वर्गात एकत्र गलका. ‘‘भक्त प्रल्हाद माहिती आहे का तुम्हाला?’’ ‘‘आहे, आहे’’ सारा वर्ग. ‘‘त्याचा एक भाऊ होता अनुराध नावाचा. त्याच्या मुलाचं नाव महिषासुर. त्याला वर मिळाला की तू अजिंक्य होशील. हा वर मिळाल्यावर तो उन्मत्त झाला. त्याने सैन्य जमवून देवांशीच युद्ध मांडले. अगदी रात्रंदिवस. त्याने देवांनाच सळो की पळो करून सोडले. देव अगदी हीन-दीन झाले आणि ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवाने सर्व कथा ऐकून महिषासुराला मारण्यासाठी देवीची नियुक्ती केली. सर्व देवांनी आपली आयुधे देवीला दिली. ती हाती घेतलेली अष्टभुजा देवी तुम्ही पाहिली की नाही?’’ ‘‘हो तर, आमच्या घराशेजारच्या चौकातच आहे’’- नील. ‘‘आणि हो ती सिंहावर बसलीय!’’ ‘‘म्हणजे बघा ती किती शौर्यवान होती.’’ मॅम सांगू लागल्या, ‘‘खड्ग, बाण, मुसळ, गदा, चक्र यांसारखी शस्त्रे चालविण्यात ती वाक्बगार होती. त्यामुळे महिषासुराशी लढा देऊन तिने महिषासुराचा वध केला. म्हणूनच आपण तिला महिषासुरमर्दिनी असे म्हणतो. शुंभ-निशुंभ नावाच्या राक्षसांना ठार करणारी जगदंबा हीसुद्धा देवीच होती. म्हणजे अगदी पुराणकालापासून आजपर्यंत स्त्री रणरागिणीचं रूप धारण करू शकते आणि त्यात ती विजयीही होऊ शकते.’’
‘‘पण सरस्वती, ती कुठे लढली होती. मग तिचं पूजन का करायचं?’’ मानसी म्हणाली. ‘‘अगं सरस्वती ही विद्येची देवता आहे. तुम्ही सरस्वतीची मूर्ती नीट पाहिलीय का?’’ ‘‘हो’’ अनेक जण म्हणाले. ‘‘सांगा बघू तिचे वैशिष्टय़.’’ ‘‘तिच्या हाती वीणा असते.’-’ शिवा. ‘‘त्यातून मानसिक ताण व दृष्टिकोन यांचा सुंदर मिलाफ साधून आनंदनिर्मिती शिकता येते. पुस्तकही असतं हातात. यातून अभ्यासाचा मंत्र मिळतो. अभ्यास म्हणजे सराव. तिच्या हातातील माळ सरावाचं महत्त्व सांगते. तिचं वस्त्र पांढरं आहे. ते आपलं चारित्र्य शुद्ध असावं हे सांगतं. आणि ती कमळात बसलेली असते. त्यावरून असं लक्षात येतं की, कमळ चिखलात उगवलं तरी चिखल अंगावर माखून घेत नाही. त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला कितीही वाईट गोष्टी असल्या तरी आपण त्यापासून दूर राहायचं.’’
‘‘आता आम्ही सरस्वतीपूजनाच्या वेळी हे नक्की बघणार.’’ सर्व जण म्हणाले. ‘‘आणि त्यापासून धडा घेणार की नाही.’’ ‘‘हो तर.. नक्कीच.’’ पुन्हा एकदा कोरस. ‘‘मॅम, सरस्वतीपूजन म्हणजेच दसरा ना?’’ ‘‘माझ्या मामाकडे दसऱ्यादिवशी पाटीपूजन करतात.’’- चंदन म्हणाला. ‘‘हो बेटा, काही ठिकाणी दसऱ्याच्या आदल्या दिवशी पाटीपूजन करतात, तर काही ठिकाणी दसऱ्याचा दिवस हा छोटय़ा मुलांसाठी विद्यारंभाचा दिवस म्हणून पाटीपूजन करतात. पण दसऱ्याची गोष्ट मात्र रामायणातील आहे बरं का. तुम्हाला राम-रावणाचे युद्ध माहीतच आहे. राम-लक्ष्मणांनी लंकेवर हल्ला केला. रावणाने पळवून नेलेल्या सीतेला सोडवण्यासाठी ते युद्ध होते. ‘‘मॅम, राम-लक्ष्मणाबरोबर मारुती आणि वानरसेना होती ना, हुप्प!’’ वरदने वानरासारखे तोंड केलेले बघून सगळे हसले. हसण्याचा भर ओसरल्यावर मुग्धामॅम पुढे सांगू लागल्या, ‘‘अरे हो, होते तर. पण या युद्धाच्या वेळी काय झालं माहीत आहे, फार तुंबळ युद्ध झालं. रावणाच्या पक्षातील अनेक सैनिक मारले गेले. अगदी रावणाचा भाऊ कुंभकर्ण आणि रावणाचा पुत्र मेघनादही मारला गेला, पण रावण मरेचना. रामाला काय करावं ते सुचेचना. त्याने दुर्गादेवीची मदत घ्यायचे ठरविले. तिने श्रीरामाला रावणाचा वध करण्यासाठी काही मार्ग शिकविले आणि त्या मार्गाचा वापर करून रामाने रावणाचा वध केला. तो दिवस होता अश्विन शुक्ल दशमीचा. त्या दिवशी त्याचा विजय झाला म्हणूनच त्या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. त्याच विजय मुहूर्तावर शमीवृक्षाचे पूजन करून श्रीराम पुष्पक विमानात बसून अयोध्येला यायला निघाले. म्हणून विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाचे पूजन केले जाते आणि गावाच्या ईशान्य दिशेला सीमोल्लंघनही केले जाते. ‘‘पण माझी आजी तर म्हणत होती की आपटय़ाची पाने सोने म्हणून देतात,’’ रुचिका.
‘‘हो, त्याची गोष्ट आता थोडक्यात सांगते.’’ मॅम म्हणाल्या. देवदत्त ब्राह्मणाचा मुलगा कौत्स हा वरतंतु ऋषींकडे अध्ययनासाठी होता. अध्ययन पूर्ण झाल्यावर त्याने ऋषींना गुरुदक्षिणेबाबत विचारले. त्यांनी ती नाकारली, पण हा ऐकेचना. तेव्हा ते म्हणाले की, प्रत्येक विषयाच्या १० दशलक्षप्रमाणे १४० दशलक्ष सोन्याच्या मोहरा दे. कौत्स त्या मागण्यासाठी रघुराजाकडे गेला. रघुराजांकडेही त्या नसल्याने त्याने कौत्साला तीन दिवसांनी बोलावले. रघुराजाने देवांचा राजा इंद्र याच्याकडे मोहोरांची मागणी केली. इंद्राने संपत्तीची देवता कुबेराला फर्माविले की, रघुराजाला पाहिजे तेवढय़ा मोहरा दे. ते फर्मान ऐकून कुबेराने आपटय़ाच्या झाडावर मोहोरांचा वर्षांव केला. त्यातील १४० दशलक्ष मोहरा गुरूंना देऊन उरलेल्या कौत्साने अश्विन शुक्ल दशमीला नागरिकांना वाटून टाकल्या. म्हणून या दिवशी आपटय़ाचे पान सोने म्हणून देतात..
असं म्हणेपर्यंत तास संपला आणि मुग्धामॅम वर्गाबाहेर पडल्या. दोन दिवसांनी दसऱ्याच्या आदल्या दिवशी सहावीच्या वर्गात गेल्या. तेव्हा प्रत्येकाकडून सोनं म्हणजे आपटय़ाचं पान घेत आणि तसंच पान त्यांना परत देत ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखं व्हा’ असा आशीर्वाद प्रत्येकाला देता देता मॅम अगदी थकून गेल्या होत्या.