आहारचर्या : फास्ट फूड आणि स्लो फूड! Print

डॉ. शिल्पा जोशी ,रविवार,१० जून २०१२
फास्टफूड हा आजच्या काळात फार फॅशनेबल व रोजच्या वापराचा शब्द बनला आहे. फास्ट फूड हे आजकालच्या फास्ट जीवनाचे फास्ट जेवण! फास्ट फूड म्हणजे नक्की काय आहे? फास्ट फूड अशा अन्न पदार्थाना म्हणतात जे लवकर तयार करून त्वरित ग्राहकाला देता येते. पाश्चात्त्य देशांत फास्ट फूड म्हणजे असे जेवण ज्याला सहसा काटे, सुरी, चमचे याचे अवडंबर लागत नाही. चटकन विकत घेतले, हातात धरले व खाल्ले. गाडी चालवताना, चालता-चालता, कॉलेजमध्ये लेक्चर ऐकताना पटकन खाता येतील असे पदार्थ म्हणजे फास्ट फूड. हे विकण्यासाठी उपाहारगृह लागत नाही. रस्त्यावरच्या हातगाडय़ांवरसुद्धा विकता येते.
फास्ट फूडचा उगम रोम येथे झाला. या अन्नपद्धतीचा संबंध शहरीकरणाशी आहे. मागच्या शतकाच्याही आधी रोममध्ये ग्रामीण लोक रोजगारासाठी येत असे. त्यांना राहण्यासाठी फक्त एक खोली मिळत असे व त्यात स्वयंपाकघर नसे. त्याचबरोबर नोकरीच्या जागी कॅन्टीन किंवा उपाहारगृह नसे. अशा वेळेस हे कामगार हातगाडीवर विकणाऱ्या वस्तू खात असत. हे जगातील पहिले फास्ट फूड. पण त्या काळात रस्त्यावर शिजवलेल्या भाज्या, मासे, मांसाहारी पदार्थ, ब्रेड अशा गोष्टी मिळत, पण या प्रकारचे फास्ट फूड फक्त रोममध्येच मिळत असे.
जगभर फास्ट फूड अमेरिकेने प्रचलित केले. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकन वाहन उद्योगाची खूप भरभराट झाली. त्या काळात अमेरिकेतील पहिले ड्राइव्ह इन उपाहारगृह सुरू झाले. त्याच काळात पाच सेन्टला (तिकडचे पाच पैसे) हॅम्बर्गरसारखे स्वस्त व मस्त  अन्न प्रचलित झाले. त्यानंतर अमेरिकेहून ही फास्ट फूडची लाट जगभर गेली. आजसुद्धा अमेरिकेत जगातील सर्वात मोठा फास्ट फूड उद्योग आहे. फास्ट फूड म्हणजे बर्गर, पिझ्झा आणि फ्रेंच फ्राइस असा लोकांचा गैरसमज आहे. हे सर्व पदार्थ पाश्चात्त्य फास्ट फूड झाले. आपल्या देशातसुद्धा खूपसे असे पदार्थ आहेत जे फास्ट फूडमध्ये येतात. त्यात ‘चाट’ (भेळ, शेवपुरी, पाणीपुरी), तळलेले पदार्थ (वडापाव, समोसे, भजी), गोड पदार्थ (केक, पेस्ट्री, लाडू, वडी), फराळाचे पदार्थ (चकली, शंकरपाळी) इत्यादी. यातील खूपसे पदार्थ करून ठेवता येतात. काही पदार्थाना वेळेवर फक्त गरम करावे लागते व काहींना विशिष्ट प्रकारे मिसळले जाते, त्यामुळे हे ‘जलद’ खाता येतात.
फास्ट फूडचे वैशिष्टय़ म्हणजे ते लवकर तयार झाले पाहिजे व काही काळ ठेवता आले पाहिजे. यासाठी अन्न शिजवण्याची पद्धती म्हणजे ‘तळणे’ हे फार महत्त्वाचे आहे. तळलेला पदार्थ लगेच शिजतो व जास्त काळ टिकतो. जर काही पदार्थ तळलेले नसतील तर त्याला जास्त स्निग्ध पदार्थ घालून तयार केले जाते. आपल्या देशात जे पदार्थ गाडीवर केले जातात ते त्याच तेलात वारंवार तळतात. असे वारंवार तळलेले तेल हृदयाला फारच हानिकारक असते. त्याचबरोबर अन्न जास्त काळ टिकविण्यासाठी त्यात मीठ किंवा साखर जास्त प्रमाणात घातली जाते. त्याचबरोबर फास्ट फूडमध्ये सहसा भाज्या किंवा फळे नसतात. त्यामुळे या अन्न पदार्थातून कुठलेही जीवनसत्त्व किंवा खनिज पदार्थ मिळत नाहीत. भाज्या, फळे, कडधान्य नसल्यामुळे या अन्नपदार्थात चोथ्याचे प्रमाण नसते किंवा फारच कमी असते. आपल्या देशात खूपसे फास्ट फूड पदार्थ शाकाहारी आहेत. या पदार्थात डाळी, कडधान्य असे अन्नघटक नसतात. त्यामुळे या फास्ट फूडमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते. जरी काही फास्ट फूडमध्ये चिकन किंवा मासे असले तरीही ते तळलेले असतात व त्यामुळे त्याचे गुण कमी वा नाहीसे होतात.
या कारणामुळे बऱ्याचशा फास्ट फूडला ‘जंकफूड’ असेही म्हणतात. ‘जंक’ म्हणजे अडगळीचे किंवा ‘फालतू’. फास्ट फूडमधून मिळालेली ऊर्जा ‘जंक’ असते. कारण या ऊर्जेबरोबर कुठलेही जीवनसत्त्व, प्रथिने, चोथा मिळत नाही. याच कारणामुळे 'Fast food kills taste' असे म्हटले जाते.
फास्ट फूड जरी जलद ऊर्जा देत असले तरी यामुळे स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे विकार होण्याची शक्यता वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच फास्ट फूड आपल्या देशात अस्वच्छ स्थितीत तयार केले जाते. त्यामुळे याचे सेवन केल्याने पचनाचे विकार, जसे कावीळ, टायफॉइड वगैरे होऊ शकतात.
फास्ट फूडचे तोटे लक्षात घेता १९८६ मध्ये इटलीत कालरे पेट्रिनी यांनी ‘स्लो फूड’ ही चळवळ सुरू केली. यात साधे, सकस व प्रांतीय अन्नपद्धतीवर भर दिला जातो. ज्या भागात जे पिकते, तेच खावे व त्यातून वेगवेगळ्या चवीचे पौष्टिक पदार्थ तयार करावेत. या चळवळीचा मुख्य उद्देश लोकांना फास्ट फूडचे तोटे समजावून सांगणे हा आहे. ‘स्लो फूड’ ही चळवळ बऱ्याच पाश्चात्त्य देशांत सुरू आहे.
आपल्या देशात पारंपरिक अन्नपद्धती ‘स्लो फूड’ सारखी आहे. आपल्या पारंपरिक अन्नपद्धतीत गोड, तळण हे फक्त सणासुदीलाच करतात. मोठे कुटुंब असल्यामुळे सर्वाना अगदी कमी प्रमाणात (पण पुरेसे)  मिळायचे. त्यामुळे पूर्वीच्या पिढीतील लोकांना मधुमेह, हृदयरोग वगैरे आजार असण्याचे प्रमाण कमी होते. ही दुखणी श्रीमंतांची दुखणी समजली जायची.
काही फास्ट फूड पदार्थ फार महाग नसतात. त्याबरोबर ते भरपूर प्रमाणात मिळत असते. उदा. वडापाव, बर्गर. त्याचप्रमाणे असे पदार्थ खाल्ले की, जेवल्याचे समाधान मिळते. पण ही मानसिकता आपल्याला बदलायलाच हवी. रस्त्यावर जितके वडापाव विकणारे लोक असतात तितकेच केळी, पेरू विकणाऱ्या गाडय़ा असतात. भूक लागली की, जंक फूड न खाता फळे खाणे कधीही चांगले. त्याने कदाचित मनाचे समाधान होणार नाही, पण शरीराची गरज पूर्ण होईल. शारीरिक हानीही होणार नाही. फळ किंवा तेलबिया खाल्ल्या की, अन्न घेतल्यासारखेच आहे, ही मानसिकता आपण तयार करायला हवी. आपल्या देशात ऋषीमुनी अशीच फळे, कंदमुळे खाऊन निरोगी व शतायुषी जगायचे.
यामुळे शक्य होईल तितके फास्ट फूड टाळा. फळे व भाज्या या निसर्गाने दिलेले फास्ट फूड आहे. ते त्वरित खाता येते. काटे-चमचे लागत नाहीत. पण काम स्लो फूडचे करते. त्यामुळे आता कधी वडापाव खावासा वाटला की आजूबाजूला बघा - फळांची गाडी तुम्हाला नक्कीच दिसेल!