आहारचर्या - बीएमआर : शरीराच्या ऊर्जेचे मापक Print

डॉ. शिल्पा जोशी ,रविवार २२ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गाडी, मोटारसायकल घेताना आपला नेहमीचा प्रश्न असतो, ‘कितना देती है?’ याचं उत्तर देणाऱ्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जात असतात. जी गाडी कमी इंधनात जास्त किलोमीटर चालते, तिला अधिक उत्तम मानली जाते. शरीरसुद्धा गाडीसारखे यंत्र आहे. यात आपण अन्नरूपी इंधन घालून ही गाडी चालवत असतो. मग शरीराची गाडी ‘कितना देती है?’ हे कसे ओळखायचे.
आपण अन्न खाल्ले की, त्याचे परिवर्तन शरीरात ऊर्जेमध्ये होते. ही ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. शरीरात तयार झालेल्या ऊर्जेचा मुख्य भाग शरीराचे कार्य करण्यास वापरला जातो. हे कार्य म्हणजे हृदय चालविण्याकरिता, अन्न पचविण्यासाठी, मेंदूचे काम करण्यासाठी इत्यादी. अशा लागणाऱ्या ऊर्जेला बीएमआर म्हणजे ‘बेसल मेटाबोलिक रेट’ असे म्हणतात. ‘बीएमआर’ हे आपल्या शरीराला चालवायला लागणाऱ्या ऊर्जेचे मापक आहे. यात फक्त ‘जीवनावश्यक कार्य’ला लागणाऱ्या ऊर्जेचीच गणना होते. यात हालचाल, व्यायाम इत्यादी कार्याना लागणाऱ्या ऊर्जेची गणना होत नाही.
आपला ‘बीएमआर’ किती, हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. वयोगटाप्रमाणे ‘बीएमआर’ वेगवेगळा असतो. उदा. लहान शिशूच्या शरीराची वाढ फार पटकन/ लवकर होत असते, त्यामुळे त्याच्या शरीराला ऊर्जेची खूप जास्त गरज असते. म्हणून लहान बाळाचा ‘बीएमआर’ जास्त असतो. जसे हे बाळ मोठे होऊ लागते, त्याची वाढ कमी वेगाने होते, तसा ‘बीएमआर’ कमी होऊ लागतो. त्यामुळे नवजात शिशूला दर दोन तासांनी दूध पाजावे लागते, पण जसे वय वाढते, त्याची अन्नाची गरज व अन्न घेण्याची वारंवारता कमी होऊ लागते. जोपर्यंत शरीराच्या उंचीची वाढ होत असते तोपर्यंत ‘बीएमआर’ जास्त असतो. आपल्याला अन्नाची जास्त गरज असते. जसे जसे वय वाढते, आपली उंची वाढणे कमी-कमी होऊ लागते व आपल्या शरीराची ऊर्जेची गरजसुद्धा कमी होऊ लागते. अशा वेळी अन्नावर नियंत्रण ठेवले नाही तर ‘उभ्या’ वाढीऐवजी ‘आडवी’ वाढ होऊ लागते. या ‘आडव्या’ वाढीला आपण ‘स्थूलता’ असे म्हणतो. यासाठी जसे वय जास्त वाढते, तसेच अन्नावर जास्त नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
पुरुषाचा ‘बीएमआर’ स्त्रियांपेक्षा जास्त असतो. याचे कारण असे की, स्त्रियांमध्ये नैसर्गिकत: पुरुषांपेक्षा जास्त मेद असतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास पुरुषांपेक्षा जास्त आहे. जसे  शरीरात मेदाचे प्रमाण वाढते, तसा ‘बीएमआर’ कमी होऊ लागतो व आपली ऊर्जेची किंवा अन्नाची गरज कमी कमी होऊ लागते.
खेळाडू, बॉडी बिल्डर्स, खूप व्यायाम करणाऱ्यांचा ‘बीएमआर’ जास्त असतो. याचे कारण त्याच्या शरीरात मेदाचे प्रमाण कमी असते व स्नायूंचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे खेळाडूंची अन्नाची गरज जास्त असते. जसा खेळ किंवा व्यायाम वाढत जातो, तसे स्नायूंचे प्रमाण शरीरात वाढत जाते व अन्नाची किंवा ऊर्जेची गरज वाढते.
प्रत्येक गाडीचा इंधनाचा वापर वेगळा असतो. विकत घेताना आपण जी गाडी कमीत कमी इंधनात जास्त जास्त चालते, अशी बघून घेतो. त्यामुळे आपला इंधनाचा खर्च कमी होतो, पण शरीराचे मात्र वेगळे असते. जर आपले शरीर कमी इंधन वापरून चालत असेल तर मग ‘बीएमआर’ कमी असतो. मग अशा लोकांचे वजन लवकर वाढते. काहीजण म्हणतात की, ‘जर आम्ही  जास्त जोरात श्वास घेतला तरी आमचे वजन वाढते.’ याचे कारण ‘बीएमआर’ आहे. खूपजणांचा ‘बीएमआर’ आनुवांशिकरीत्या कमी असतो, त्यामुळे त्यांची अन्नाची गरज कमी असते. त्यामुळे जेवताना इतर लोक किती खातात, म्हणून मी पण खाईन, हे न बघता मला अन्नाची किती गरज आहे, हे बघणे जास्त गरजेचे आहे. जर काही प्रमाणात अन्न खाऊन आपले वजन वाढते तर त्याचा अर्थ इतक्या ऊर्जेची गरज आपणास नाही व अन्नाचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे.
काही आजारपण जसे खूप ताप येणे, संसर्ग होणे, शस्त्रक्रियेनंतर शरीराचा ‘बीएमआर’ वाढतो, कारण शरीरातील पेशी या काळात वेगवेगळ्या जीवाणूंशी शरीरात युद्ध करत असतात. या युद्धात आपल्या सफेद पेशीरूपी सैनिकांना जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे ताप बरा होऊ लागला किंवा कुठलेही संसर्ग बरे होऊ लागले की मग भूक लागायला लागते व सारखे खावेसे वाटते.
शरीरातील ऊर्जा खर्च करण्याचा दुसरा उपाय म्हणजे शरीराची हालचाल, व्यायाम, धावपळ इत्यादी. यातून आपण शरीरातील १५-२० टक्के ऊर्जा खर्च करू शकतो. खेळाडू आपल्या शरीरातील ५० टक्के ऊर्जा व्यायामावर खर्च करू शकतात. काही खेळ जसे पोहणे, फुटबॉल, हॉकी, अ‍ॅथलेटिक्स यांत फार जास्त ऊर्जा खर्च होते. यामुळे अशा खेळाडूंना जास्त ऊर्जेची किंवा जास्त अन्नाची गरज असते. आपण दैनंदिन जीवनात एका खुर्चीवरून दुसऱ्या खुर्चीवर बसणे एवढाच व्यायाम करत असतो. त्यामुळे आपली अन्नाची गरज खूप कमी होऊ लागते. आपला पारंपरिक आहार हा खूप शारीरिक काम करणाऱ्याचा आहार आहे. आपले पूर्वज शेतीत काम करत असत, नदीतून, विहिरीतून पाणी आणत असत किंवा घरी दळण करत असत. या व्यायामामुळे त्यांच्या अन्नाची गरज जास्त होती. आपण जेवताना आपली आजी खायची त्याप्रमाणे आपण खातो, पण कामे मात्र त्याप्रमाणे करत नाही. त्यामुळे आपल्या आजींना स्थूलता, मधूमेह, हृदयरोग असे आजार नव्हते किंवा कमी प्रमाणात होते व आपल्या पिढीला जास्त आहेत. त्यामुळे आजी रोज भातावर एक चमचा तूप घ्यायची म्हणून तुम्ही घेऊ नका. आधी आजी करायची ती सर्व कामे करा, मग आजीसारखे जेवा!
काही अन्नघटक असे असतात, ज्यांना पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. मग त्यांचे सेवन जास्त प्रमाणात केले तर अन्न पचवण्यात जास्त ऊर्जा खर्च होते व ऊर्जेची साठवण शरीरात होत नाही. असा अन्नपदार्थ म्हणजे ‘प्रथिने.’ त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांना ‘हाय प्रोटिन डाएट’ घेण्याचा सल्ला दिला जातो.
अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. जेम्स लेव्हिन यांनी असा शोध लावला की, आपण बरीचशी शारीरिक ऊर्जा ‘व्यायाम नसलेली’ हालचाल करून खर्च करू शकतो. काही लोक सकाळी व्यायाम करतात आणि मग दिवसभर खुर्चीत बसून असतात. अशा लोकांचे वजन कमी होण्यास त्रास होतो. संशोधनानुसार, छोटी छोटी हालचाल केल्याने वजन कमी होऊ शकते किंवा वजन वाढणे नियंत्रणात येऊ शकते. याला त्यांनी ‘Non Exercise Energy Thermogensis'
’ किंवा kNEATl असे म्हटले आहे. बेल वाजल्यावर दार उघडणे, स्वत:ची सर्व कामे स्वत: करणे यामुळे आपली बरीच ऊर्जा खर्च होते. त्यामुळे घरातील रिमोट कंट्रोल, कॉर्डलेस टेलिफोन वापरले नाही तरी आपली जास्त शारीरिक ऊर्जा खर्च होईल. जर टीव्ही चॅनेल बदलायचे असेल किंवा आवाज कमी-जास्त करावयाचा असेल तर रिमोट न वापरता ते स्वत: उठून करा, वजन नक्की नियंत्रणात राहील.