आहारचर्या : आहार आणि हृदयरोग Print

डॉ. शिल्पा जोशी - १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

हृदयरोग आजची वाढती समस्या आहे. पूर्वीच्या काळी हृदयरोग हा वृद्धपणाचा आजार म्हणून ओळखला जायचा, पण आजकाल तरुण वयात- तिशी-चाळिशीमध्ये हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकाराचा झटका, बायपास यांचे प्रमाण वाढले आहे. या सर्वाचे कारण काय? असे असण्याची अनेक कारणे असू शकतात. पण त्याचे एक मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव व दैनंदिन जीवनात वाढणारा तणाव इत्यादी.        
‘ट्रान्सफॅट’ या प्रकारचे स्निग्ध पदार्थ हृदयाला फार हानिकारक आहेत. बाजारात ट्रान्सफॅट साधारणपणे वनस्पती डालडा, मार्गारिन या पदार्थात असते. बहुतेक वेळेस अशा प्रकारचे पदार्थ घरी वापरले जात नाहीत, पण बाजारात जे फराळाचे पदार्थ, मिठाया, बेकरीचे पदार्थ- जसे खारी, बटर, केक, पेस्ट्रीज यात या प्रकारचे स्निग्ध पदार्थ वापरले जातात. त्यामुळे याचे सेवन कमी केले किंवा टाळले तरीही खूप प्रमाणात हृदयरोग टाळता येतो.
तेल कुठले विकत घ्यावे, हा प्रश्न सर्वाना पडतो. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची तेले उपलब्ध असतात. ग्राहकाला कळत नाही, कुठले तेल विकत घ्यावे. कारण प्रत्येक कंपनीचे लोक त्याचे तेल किती गुणकारी आहे व त्यात कोलेस्टेरॉल नाही म्हणून जाहिरात करत असतात. फार विज्ञानात न शिरता, ऑलिव्ह ऑइल, शेंगदाण्याचे तेल, राइसब्रन ऑइल, मोहरीचे तेल, कोनोला ऑइल ही हृदयाकरिता चांगली तेले आहेत. मात्र, ही तेले चांगली असली तरीही त्याचे सेवनाचे प्रमाण फार महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे महिन्याला माणशी ७५० ग्रॅम- १ किग्रॅ. एवढेच स्निग्ध पदार्थ वापरले पाहिजेत. स्निग्ध पदार्थात तेल, तूप, लोणी, क्रीम, नारळ, सुके खोबरे, दाण्याचा कूट येतो. त्यामुळे स्वयंपाक करताना याचा विचार करून पदार्थ केले पाहिजेत. जेव्हा स्निग्ध पदार्थ कमी करायचा असेल तर खाण्याच्या पदार्थाचे बेत काळजीपूर्वक करायला हवेत. खाण्याचा मेनू करताना सर्व पदार्थ वाफवलेले, साधे असले तर जेवण कंटाळवाणे होते. याउलट एखादा चवदार पदार्थ असला तर त्याबरोबर इतर साधे पदार्थ खाताना त्रास/ कंटाळा येत नाही. स्वयंपाक करताना/ ठरविताना याकडे खास लक्ष पुरवायला हवे. जरी आपण विरल तेल वापरले तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तेल फार वेळ गरम/ उकळवणे धोक्याचे ठरते. असे केल्याने तेलामध्ये रासायनिक बदल होतात व असे बदल असलेले तेल हृदयाला हानिकारक असतात. या कारणामुळे तळताना तेल कमी घ्या व उरलेले तेल वापरू नका.
हृदयरुग्णासाठी तेलाचा वापर करण्यासंदर्भात अनेक गैरसमजुती असतात. कुठल्याही तेलबियांत कोलेस्टेरॉल नसते व त्या मोजक्या प्रमाणात खाल्ल्या तर त्या हृदयासाठी फार गुणकारी आहेत. सर्व तेलबियांमध्ये बदाम व अक्रोड या तेलबिया हृदयरुग्णांकरिता गुणकारी आहेत.
मांसाहारी व्यक्तींना नेहमी प्रश्न पडतो की, हृदयरोगाचे निदान झाल्यावर मांसाहार घ्यावा की नाही? अंडी, मासे व चिकन यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण आहे, पण इतर मांसाहारापेक्षा कमी आहे. अंडय़ाचा फक्त सफेद भाग घेतला तर त्यात स्निग्ध पदार्थ व कोलेस्टेरॉल दोन्ही नाही. प्राण्यांचे अवयव जसे कलेजी, भेजा इत्यादी व कवचातील मासोळी- जसे खेकडे, शिंपल्या इत्यादी यात खूप कोलेस्टेरॉल असते व त्यामुळे त्याचे सेवन टाळावे. याचबरोबर मांसाहारसुद्धा करताना त्यात इतर स्निग्ध पदार्थाचा अतिवापर टाळावा. प्रत्येक मांसाहारी पदार्थात नैसर्गिकरीत्या स्निग्ध पदार्थ असतात. काही मांसाहार- जसे मासे यातील हे स्निग्ध पदार्थ फार गुणकारी असतात. यास ओमेगा ३ फॅट्स असे म्हणतात. अशा पदार्थामध्ये इतर पदार्थ घालून या नैसर्गिक पदार्थाचे गुण कमी होतात. मांसाहार करताना वाफवून, साधे परतून किंवा कमीत कमी तेल घालून त्याचा रस्सा करावा. तळून खाणे टाळावे.
भारतीय आहारात मिठाचे प्रमाण फार जास्त आहे. आहारातील मिठाचा संबंध रक्तदाबाशी आहे. अतिरक्तदाब  हृदयासाठी अपायकारक ठरतो. त्यामुळे हृदयरुग्णांनी आहारातील मीठाचा वापर कमी करणे आवश्यक आहे. जेथे मिठाच्या चवीची फार गरज नसते, तेथे मीठ घालणे टाळावे. उदा. सॅलड, पोळी, भात, उकडलेली अंडी, फळे इत्यादी. बाजारातून आणलेल्या पदार्थात फार मीठ असते. जसे वेफर, चिप्स इत्यादी. असे पदार्थ टाळावेत. त्याचबरोबर लोणची, पापड, चायनीज फूड, केचप इत्यादी वस्तूसुद्धा कमी कराव्यात.
पोटॅशियम असलेली फळे, भाज्या, डाळी, कडधान्ये हे रक्तदाब व हृदयरोगावर अतिशय गुणकारी आहे. जर काही इतर किडनीचे त्रास नसतील तर या गटातील सर्व अन्नपदार्थाचे सेवन भरपूर प्रमाणात केले पाहिजे. अन्नातील चोथा हा हृदयरुग्णांसाठी अतिशय गुणकारी आहे. या चोथ्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते व त्यामुळे हृदयरोग आटोक्यात ठेवता येतो. यासाठी साधा, सोपा उपाय म्हणजे भाज्यांचे सेवन वाढवणे. रोज दोन-तीन फळे खाणे व जास्त चोथा असलेले काही पदार्थ- जसे ओट्स, मेथीदाणा इत्यादी, यांचा स्वयंपाकात वापर करणे.
भरपूर भाज्या, फळे खाल्ली की आपणास लागणारे जीवनसत्त्व ‘बी’ मुख्यत: फॉलिक अ‍ॅसिड मिळते, जे हृदयरुग्णांना फार महत्त्वाचे आहे.
त्यामुळे हृदयरुग्ण घरी असला तर वेगळे जेवण करायची गरज नाही. आपला रोजचाच स्वयंपाक करावा, मात्र त्यात हे छोटे बदल केले तरी पुरे!