आहारचर्या : औषधी अन्नपदार्थ Print
alt
डॉ. शिल्पा जोशी , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अन्नाचे मूळ कार्य शरीराला ऊर्जा देणे आहे, पण अन्न हे आपल्या शरीरात औषधाचे काम करू शकते.
''Let food be thy medicine and thy medicine thy food''
हे आधुनिक औषधांचे जनक हिप्पेक्रेट्स यांनी म्हटले आहे. अन्नाचे सर्व घटक जसे प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवन सत्त्व- हे सर्वच आपल्या शरीराचे स्वास्थ्य राखण्यास मदत करतात. पण काही अन्नपदार्थ असे आहेत जे फार औषधी आहेत. संशोधनातून असे दिसून आले आहे, की एका विशिष्ट प्रमाणात या पदार्थाचे सेवन केले तर त्याने अगदी औषधासारखा गुण मिळतो. अशा सर्व औषधी अन्नपदार्थाना 'functional food's असे म्हणतात. या सर्व पदार्थामधील काही पदार्थाचा आपण पारंपरिकरीत्या उपयोग करीत आलो आहोत.

काही पदार्थ आपल्या भारतीय अन्न पद्धतींना नवे आहेत, पण या सर्व नव्या-जुन्या पदार्थाचे आपण रोजच्या स्वयंपाकात वापर करून त्याच्या गुणांचा फायदा घेऊ शकतो.
ओट्स हे धान्य आजकाल फार प्रचलित झाले आहे. त्याचे कारण की या अन्नपदार्थावर खूप संशोधन झाले आहे.
ओट्सचे नियमित सेवन केल्याने रक्तातील एलडीएल  कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, असे दिसून आले आहे. त्याचबरोबर हा पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण राखले जाते. ओट्स खाऊन खूप वेळ भूक लागत नाही त्यामुळे स्थूलता कमी करण्यासाठी हा पदार्थ अतिशय उपयुक्त आहे. दिवसभरात २०-२५ ओट्स (म्हणजे चार-पाच चमचे कच्चे ओट्स) घेतल्याने हे सर्व गुण दिसून येतात. या सर्व गुणांबरोबर ओट्स बद्धकोष्ट (constipation)  यावरही अतिशय गुणकारी आहे. साधारणपणे ओट्स दुधातून घेतले जातात. ज्यांना मधुमेह किंवा हृदयरोग असतो त्यांना दूध आणि ओट्सच्या मिश्रणात साखर घालता येत नाही. त्यामुळे हे पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो, पण ओट्स इतर वेगवेगळ्या प्रकारे खाता येतात. ओट्स पाण्यात शिजवून, गार करून ताकात किंवा दह्य़ातून घेता येतात. ओट्सचा उपमा करता येतो. ओट्स इडली, डोशाच्या पिठात घालता येतात किंवा गहू दळताना त्यात मिसळता येतात. ओट्स खाताना त्यात समान प्रमाणात ओट ब्रान घातला तर ओट्सचे गुण जास्त वाढतात. ओट ब्रान बाजारात मिळतो. ओट्स व ओट  समप्रमाणात घेऊन मग त्याला पाण्यात शिजवून आवडीप्रमाणे दूध, दही, ताक घालावे. ज्यांना ओट्स गिळगिळीत असल्यामुळे आवडत नाही त्यांना ओट्सची मिसळ बाजारात मिळते, जी अगदी कुरकुरीत असते. ओट्सऐवजी ओट मिसळही वापरता येते. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या करता Sugar free museli सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. ओट्सचा वापर आपल्या रोजच्या जेवणात करा, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.
सोयाबीन या धान्याचा उपयोग दक्षिण-पूर्व आशिया, चीन, जपान या देशांत दिसून येतो. आपल्या देशातही आता सोयाबीन सर्वत्र उपलब्ध आहे. सोयाबीन जरी एक धान्य असले तरी त्यात प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत व या प्रथिनांचा दर्जा अगदी मांसाहारी प्रथिनांसारखा आहे. या गुणामुळे शाकाहारी व्यक्तींसाठी ही फार मोठी देणगी आहे. कारण इतकी प्रथिने दुसऱ्या कुठल्याही शाकाहारी पदार्थात नाहीत. प्रथिनांबरोबर सोयाबीनमध्ये चोथ्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे ओट्ससारखे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, रक्तातील साखर कमी करण्यास सोयाबीन फार उपयुक्त ठरते. सोयाबीनच्या सेवनामुळे हाडेही मजबूत होतात. दिवसाला २५ ग्रॅम सोयाबीन हे सर्व गुण आपल्याला देऊ शकते. सोयाबीन बाजारात अनेक प्रकारे मिळते- सोयाबीन धान्य, नगेट्स, सोया आटा, सोया मिल्क व टो-फू सोयाचे वेगवेगळे प्रकारे असल्यामुळे हे धान्य वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरू शकतो. सोयाचा वापर करताना फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सोयाबीन जर विकत आणून त्याचा वापर करायचा असेल तर आधी ते भाजून घेतले पाहिजेत. सोयाबीनच्या बाहेरच्या सालीवर 'trypsin inhibitor' नावाचा पदार्थ असतो. या पदार्थामुळे सोयाचे पचन होणे कठीण होते. यामुळे सोया खाल्ल्यावर बऱ्याच लोकांना अ‍ॅसिडिटी, गॅसेस,अपचन असे त्रास होतात. सोयाबीनचे दाणे विकत घेतल्यावर ते मंद आचेवर १५ ते २० मिनिटे भाजले पाहिजेत. असे केल्याने trypsin inhibitor चा नाश होतो व असे सोयाचे पदार्थ खाल्ल्यावर इतर पचनाचे त्रास होत नाहीत. सोयाबीनचे सेवन सुरू केल्यावर त्याचे प्रमाण हळूहळू वाढवावे. एकदम जास्त प्रमाणात सोया पचायला जड असतो. कमी प्रमाणात सुरू करून मग हळूहळू प्रमाण वाढविले पाहिजे. ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हा अन्नघटक फार प्रचलित झाला आहे. ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे  तल्लख बुद्धी, तीक्ष्ण नजर व सुंदर त्वचा हे सर्व गुण मिळतात. ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हे मुख्यत: खोल समुद्रातील माश्यांमधून मिळते.  पण शाकाहारी लोकांचे काय? त्यांच्या आहारात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड कुठून येणार? अळशी नावाच्या तेलबियांत  ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड चे प्रमाण खूप जास्त आहे. या कारणामुळे मासे व अळशी या दोघांनाही Functional food किंवा औषधी अन्न असे म्हटले आहे. अळशीच्या बियांना भाजून व कुटून त्याचा वापर करता येतो. त्यांना नुसते खाता येते, कणकीत घालता येते, त्याची चटणी करता येते व बडीशेपबरोबर मुखशुद्धी म्हणूनही सेवन करता येते. दिवसाला १० ग्रॅम अळशी घेतल्याने रक्तातील चरबी (Triglycerides)  कमी होण्यास मदत होते. पण अळशी खायला सुरुवात केली की, आहारातील तेल कमी करणे आवश्यक आहे. कारण अळशीतसुद्धा तेल आहे, जे गुणकारी आहे. जरी गुणकारी असले तरीही ते तेल आहे. जर आहारात तेलाचे प्रमाण वाढले तर स्थूलता वाढते. त्यामुळे अळशीच्या बिया खायला सुरुवात केली की, मग स्वयंपाकातील तेल कमी करणे गरजेचे आहे. मेथीदाणा हा आपल्या भारतीय आहाराचा घटक आहे. काही प्रांतात मसाल्यासारखा त्याचा वापर केला जातो, तर काही लोक त्याची भाजी, उसळ करतात. लाडूही केले जातात. मेथीदाणा हा मधुमेहावर गुणकारी आहे, असे संशोधनातून दिसून आले आहे. मेथीदाण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. दिवसातून पाच ते पंधरा ग्रॅम (एक ते तीन चमचे) मेथी गुणकारी आहे. आहारात मेथीचे प्रमाण हळूहळू वाढवावे. कारण सोयाबीनसारखी मेथी जास्त प्रमाणात घेतली तर अ‍ॅसिडिटी किंवा अतिसार (लूज-मोशन)चा त्रास  होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला अर्धा चमचा मेथी घ्यावी. मग त्याचे प्रमाण हळूहळू वाढवावे. ज्यांना शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी आहे म्हणजेच शेंगदाणे खाऊन पित्त होते, त्यांनी मेथीदाणा खाणे टाळावे. त्यांना मेथीमुळेही पित्त होऊ शकते. हे सर्व पदार्थ आपल्या घरात असतात .फक्त याचा उपयोग नियमित व योग्य प्रमाणात केला तर या अन्नपदार्थाचा उपयोग औषधासारखा होऊ शकतो.