आहारचर्या : शाळकरी मुलांचा आहार Print

डॉ. शिल्पा जोशी, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलाच्या आहाराची काळजी पालकांना नेहमीच असते. सर्व आयांना वाटत असते की, त्याची मुले व्यवस्थित जेवत नाहीत. शाळकरी मुलांचे वय वाढीचे असते. या वयात मुलाची वाढ झपाटय़ाने होत असल्यामुळे त्यांना अन्नाची जास्त गरज असते. या कारणामुळे या वयात सर्व अन्नघटकांना फार महत्त्व असते. संतुलित आहार अशा वयात फार गरजेचा असतो.

पण या वयात मुलाचे अन्नात फार कमी लक्ष असते. त्याचे सर्व लक्ष खेळणे, टी.व्ही., इंटरनेट, व्हिडीओ गेम यांमध्ये असते. त्याचबरोबर टीव्हीवर, मित्रांबरोबर फास्टफूड खाणे याकडे असते. या कारणांमुळे त्यांना चिप्स, बिस्किटं, फास्टफूड यांबद्दल आकर्षण वाटते व त्यांना घरच्या जेवणात आनंद वाटत नाही. मग त्यांच्या आयांना त्याच्या आहाराची काळजी वाटणे साहजिक आहे. या वयात मुलांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी असते. शाळेत जाऊ लागल्यावर त्यांना संसर्गजन्य रोग जास्त होतात. जसे ताप, सर्दी-पडसे इत्यादी. त्याची प्रतिकारशक्तीही वाढण्यात आहाराचा सिंहाचा वाटा आहे. शाळेत संतुलित आहाराचे महत्त्व सांगितले जाते. बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थ्यांना हे माहीत असते. पण असा आहार कंटाळवाणा समजून तो पाठय़पुस्तकातच बरा असा समज होतो. त्यांना संतुलित आहार इंटरेस्टिंग करून देणे आवश्यक असते.
मुले अनुकरणप्रिय असतात. मोठे जसे करतील ते सर्व करायला मुलांना आवडते. मोठय़ांच्या आहार पद्धतीचे अनुकरण मुले करत असतात. जर घरच्या सर्व ज्येष्ठांनी चौरस आहार घेतला व मुलांना त्यांच्याबरोबर जेवण दिले, तर मुलांमध्ये हीच सवय लागते. जर मुलांसाठी नेहमीच वेगळे जेवण केले, तर त्यांना फक्त त्याच्या आवडीचे खायची सवय लागेल. म्हणून  मुलांना सर्वाबरोबर जेवू दिले पाहिजे व त्यांच्यासाठी ‘वेगळे’ आवडीचे जेवण करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर जेवताना टीव्ही, पुस्तके, कम्प्युटर बघणे टाळले पाहिजे. लहानपणी आवडीच्या सीरियल, कार्टून्स इत्यादी लावून पालक मुलांना जेवायला घालतात. त्याचे कारण असे की, मुले ते पाहण्यात मग्न झाली की मग काहीही व कितीही प्रमाणात खातात. ही सवय गैर आहे. त्यामुळे मुलांना आपले पोट कधी भरले आणि काय खाल्ले याचे समाधान मिळत नाही. अशा मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढते व लहान मुलांना स्थूलता झाली की मग त्यांना इतरही त्रास होऊ शकतात.
रोज साधे अन्न खायला मुले कंटाळतात. त्यामुळे त्यांना आठवडय़ातून एक-दोनदा काही तरी ‘खास’ आवडीचा किंवा बाहेरचा आवडीचा फराळ, चॉकलेट आणून देणे गैर नाही. पण हे रोजच्या रोज किंवा जास्त वेळ करणे बरोबर नाही.
मुलांमध्ये आहार संतुलित हवा, म्हणजे आहाराचे सर्व घटक योग्य प्रमाणात हवेत. घरी काही कारणांमुळे कोणी काही पथ्य करत असले तरी तसे जेवण मुलांना योग्य नाही. अगदी मुलांमध्ये स्थूलता असली तरीही त्यांना फॅट-फ्री, काबरेहायड्रेट- फ्री असे डाएट देणे टाळावे. स्थूल मुलांनाही वाढत्या वयात सर्व अन्नघटकांची गरज असते. जर सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात पुरवले गेले नाहीत तर त्यांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून त्यांना चौरस आहार देऊन, खेळाचे, व्यायामाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.
मुले, पालक व दूध ही दोन टोके आहेत. सर्व पालकांना वाटत असते की, मुलांनी दूध घ्यावे व खूप मुलांना दूध अजिबात आवडत नाही. त्यामुळे दूध पिणे हे मुलांना स्ट्रेसफुल होते. दुधामध्ये चांगल्या प्रतीची प्रथिने असतात व कॅल्शिअम असते. त्यामुळे दूध पौष्टिक आहाराचा घटक आहे. दूध घेत नसेल, आवडत नसेल तर त्याच दुधाचे दही लावून दही देऊ शकता. बऱ्याच मुलांना पनीर खूप आवडते. त्यांना दुधाऐवजी पनीरसुद्धा देता येते. दूध हे  दूध म्हणून पिणे आवश्यक नाही. त्याच्या आवडीप्रमाणे पदार्थ म्हणजे कस्टर्ड, मिल्कशेक इत्यादी करून किंवा लस्सी, फ्रूट-योगर्ट किंवा पनीरचे पदार्थ केले तरीही चालते.
प्रथिने मुलांना आवश्यक आहेत. कारण प्रथिनांमुळे वाढ चांगली होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. दूध व दुधाच्या पदार्थात प्रथिने असतात. त्याचबरोबर डाळी, कडधान्ये, तेलबिया व मांसाहार यांतसुद्धा प्रथिने असतात. मुलांच्या प्रत्येक मील-स्नॅकमध्ये प्रथिने असणे आवश्यक आहे. असे केल्याने त्यांची गरज भागवली जाते. उदा. नाश्त्यात जर पराठा, चपाती इत्यादी दिली तर त्याबरोबर उसळ, दही, पराठय़ात पनीर किंवा डाळीचे फिलिंग करावे. कणकेत बेसन, मुगाची डाळ इत्यादी घालून पराठे, थेपले, थालीपीठ इत्यादी करता येते. मधल्या वेळेच्या खाण्यात तेलबिया जसे शेंगदाणे, बदाम, अक्रोड िंकंवा चणे इत्यादी देता येते. हे पदार्थ नुसते आवडत नसतील तर त्याचे चिक्की, लाडू इत्यादी असे रुचकर प्रकार करून देता येतात. प्रथिनांचे सेवन करताना बरोबर कबरेदकेही दिली पाहिजे. असे केल्याने आहार संतुलित तर होतोच, पण प्रथिनांना त्यांचे काम करण्यास मदत होते. त्याचबरोबर अति प्रथिने खाल्ल्यामुळे मुलांना बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो, तो टाळता येतो.
फळे व भाज्या हे मुलांच्या आहारात फार महत्त्वाचे आहे. यातून जीवनसत्त्व, खनीज पदार्थ मिळतात व यामुळे अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर होण्यास मदत होते. फळे मुलांना आवडतात, ती मधल्या वेळेस खायला द्यावीत. पालकांना नेहमी डब्यात काय द्यावे याचा मोठा प्रश्न असतो. बिस्किट, चिप्स, वेफर्स, फराळाचे पदार्थ हे तब्येतीला चांगले नाहीत तर मग डब्यात द्यायचे काय? फळ! फळ खायला सोपे, न्यायला सोपे, पुष्कळशी फळे मुले लहान असताना स्वत: सोलून खाऊ शकतात, जसे केळे. डब्यातून मुलांना फळे दिली पाहिजेत, कारण असे केल्याने जंकफूड खाणे कमी होते. भाज्या खायला मुले कंटाळा करतात. भाज्या खाण्याची सवय त्यांना हळूहळू लावली पाहिजे. त्याचबरोबर मुलांच्या आवडीच्या पदार्थात वेगवेगळ्या भाज्या घालता येतात. उदा. पराठे वेगवेगळ्या भाज्यांचे करता येतात. कटलेट्समध्ये घालता येतात, पुलावमध्ये पालकाची प्युरी घालून हिरवा पुलाव करता येतो. असे प्रकार रुचकर लागतात व त्यातून भाज्याही खाल्ल्या जातात.
स्निग्ध पदार्थ मुलांच्या आहारात आवश्यक आहेत. कारण त्यातून ऊर्जा मिळते. त्याचबरोबर fatsoluble vitamins मिळतात. काही आवश्यक फॅट्स जसे omega 3 fatty acid सुद्धा स्निग्ध पदाथार्ंतून मिळत असतात. omega 3 fatty acid तल्लख बुद्धी व तीक्ष्ण नजरेकरिता आवश्यक आहे. मांसाहारी मुलांना माश्यांतून हे मिळते, पण शाकाहारी मुलांना अक्रोडमधून हे मिळू शकते. आहारात २-३ तुकडे अक्रोड येता-जाता खायला दिले तर मुलांना फायदा होतो. त्याचप्रमाणे तुपात कमी प्रमाणात का होईना  omega 3 fatty acid आहे. रोज थोडे तूप मुलांच्या आहारातील उणीव भरून काढते. पण तूप प्रमाणाबाहेर दिले तर स्थूलतेचे प्रमाण वाढते. त्या कारणामुळे दिवसभरात अर्धा-एक चमचा तूप देऊ शकता.
या सर्वात मुख्य गोष्ट ही आहे की, मुलांना आहाराबाबत माहिती करून देणे. आपण त्यांना रागवून काही पदार्थ खायला सांगण्यापेक्षा त्या पदार्थाचे फायदे त्यांना समजावले पाहिजेत. लहान मुलांना समजावले व त्यांना ते पटवून दिले तर हे ज्ञान त्यांना पुढील आयुष्यातील बरीच दुखणी टाळण्यास मदत करेल.