आहारचर्या - गर्भवती स्त्रियांसाठी आहार Print

alt

डॉ. शिल्पा जोशी , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील फार आनंदाचा काळ असतो. गर्भारपणात फार कमी कालावधीत स्त्रीच्या शरीरात मोठे बदल होत असतात. या काळात स्त्रीने आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडेलक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. तिच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा परिणाम हा थेट तिच्या पोटातल्या बाळावर होत असतो.
गरोदरपणात आहाराला फार महत्त्व आहे. आईच्या आहाराचा थेट परिणाम होणाऱ्या बाळाच्या वाढीवर, वजनावर होतो. या बरोबर आईच्या आहाराचा परिणाम बाळाची रोगप्रतिकारशक्ती आणि बुद्धी यावरही होत असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरोदरपणाच्या अगोदरचा स्त्रीचा आहारही फार महत्त्वाचा आहे. आजकाल तरुण मुली, सडपातळ दिसावं, म्हणून नाना प्रकारचे डाएट करतात. यात बऱ्याचदा डाएट स्वत:हून किंवा कोणाचे अनुकरण करून केले जाते. या प्रकारच्या डाएटला ‘फॅड डाएट्स’ म्हटले जाते. अशा डाएटमध्ये अन्नातील बरेचसे घटक नसतात. या कारणांमुळे या तरुण स्त्रियांमध्ये जीवनसत्त्व डी व ई, लोह, कॅल्शियम, प्रथिने व आवश्यक फॅटी अ‍ॅसिड आदींची कमतरता असू शकते. अशा स्त्रियांमधील कमतरतेचा परिणाम त्यांच्या गर्भारपणी त्यांच्या होणाऱ्या बाळावर होऊ शकतो. यासाठी तरुण मुली-स्त्रियांनी त्यांच्या आहाराकडे खास लक्ष द्यायला हवे. कोणत्याही कारणासाठी त्यांनी डाएट केले तर ते वैद्यकीय सल्ला घेऊनच करावे.
गरोदरपणात दोन जणांना पुरेल इतके खाव,े असे म्हणतात. पण खरं तर इतक्या जास्त अन्नाची गरज नसते. अतिजास्त आहार घेतल्याने या गर्भवती स्त्रियांचे वजन गरजेपेक्षा अधिक वाढते. फार जास्त वजन वाढले, तरीही गर्भारपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. थोडक्यात सांगायचे म्हणजे गर्भारपणात डाएट करू नये, पण अतिखाणेही गैर आहे. गरोदर असताना आहाराची गरज थोडी वाढते. आहार किती आणि कुठला घेतो, हे महत्त्वाचे ठरते. त्यासोबतच आहाराच्या गुणवत्तेकडेही लक्ष देणे इष्ट ठरते. आपण आपल्या आहाराची गरज काय खाऊन पूर्ण करतो, या गोष्टीला महत्त्व आहे. उदा. कबरेदकाची गरज गोड पदार्थ खाऊन किंवा बेकरीतील वस्तू खाऊन पूर्ण करण्यापेक्षा फळे, वेगवेगळ्या प्रकारची धान्ये खाऊन पूर्ण करायला हवी. किंवा स्निग्ध पदार्थाची गरज जास्त तेल, तूप न खाता तेलबिया खाऊन पूर्ण करायला हवी!
गरोदरपणात सर्व अन्नघटकांना महत्त्व आहे. कबरेदके ऊर्जा पुरवतात आणि ही ऊर्जा वापरून बाळाची वाढ आईच्या गर्भात होत असते. प्रथिने बाळाच्या वाढीसाठी खतपाणी पुरवतात. बाळाचे शरीर अनेक पेशीने तयार होत असते. या पेशीचे मुख्य घटक प्रथिने आहेत. स्निग्ध पदार्थ पण ऊर्जा पुरविण्याचे काम करतात. त्याचबरोबर ओमेगा बी फॅट्स बाळाची बुद्धी व नजर तीक्ष्ण करण्यात मदत करतात. यासाठीच गरोदर महिलेच्या आहारात हे सर्व अन्नघटक हवे. रोजच्या चौरस आहारात हे सर्व घटक संतुलित प्रमाणात असतात.
लोह, कॅल्शियमच्या गोळ्या गरोदर महिलेला डॉक्टर देतातच, पण आहारातूनही हे घटक असले पाहिजेत. पालेभाज्या, मांसाहार यातून भरपूर प्रमाणात लोह मिळते. म्हणून गर्भवती स्त्रीच्या आहारात पालेभाज्या, काळ्या मनुका इत्यादी घटकपदार्थ असायला हवेत. कॅल्शियम हे बाळाच्या हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर कॅल्शियममुळे गर्भारपणातील उच्च रक्तदाब नियमित करता येतो. आहारातील दूध व दुधाचे पदार्थ, जसे दही, पनीर इत्यादींमध्ये कॅल्शियम असते. हे पदार्थ नियमितपणे गर्भवती स्त्रीच्या आहारात असायला हवेत. या पदार्थातून कॅल्शियमबरोबर प्रथिनांचे प्रमाणही भरपूर मिळते. ज्या स्त्रिया मांसाहारी आहेत, त्यांना मासे खाल्ल्यास कॅल्शियम भरपूर प्रमाणात प्राप्त होते. या बरोबर फोलिक अ‍ॅसिड नावाच्या जीवनसत्त्वालाही गरोदरपणात फार महत्त्व आहे. फोलिक अ‍ॅसिड  हे सर्व भाज्या, फळे यांमध्ये असते. या कारणामुळे गर्भवती स्त्रियांच्या आहारात भाज्या, फळे फार महत्त्वाची आहेत. मोसमी भाज्या व फळे भरपूर प्रमाणात खाल्ली पाहिजेत. यामुळे होणाऱ्या बाळाचे वजन वाढण्यासही मदत होते.
गर्भारपणात अनेक स्त्रियांना बद्धकोष्ठ आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. ज्यांना अ‍ॅसिडिटीचा खूप त्रास आहे त्यांनी कमी तिखट-मसाला असलेला आहार घ्यावा. तसेच एकाचवेळेस भरपेट न खाता थोडय़ा- थोडय़ा अंतराने खावे, म्हणजे अ‍ॅसिडिटी होत नाही. पोट जड होणे, अन्न घशाशी येणे हे त्रासही होत नाहीत. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आहारात भरपूर प्रमाणात चोथा हवा. चोथा असलेले अन्न जसे, फळे, भाज्या विशेषत: पालेभाज्या, ओट्स, काळ्या मनुका, अंजीर असे पदार्थ घेतले पाहिजेत. याचबरोबर आहारात पाण्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवले पाहिजे. पाणी व इतर पातळ पदार्थ जसे सूप, ताक, शहाळ्याचे पाणी इत्यादीचा समावेश आहारात करायला हवा.
काही स्त्रियांना गरोदरपणात उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास होतो. उच्च रक्तदाब असला तर आहारातील मिठाचे प्रमाण कमी करायला हवे. वैद्यकीय सल्ला घेऊन किती मीठ खाल्ले पाहिजे, हेही जाणून घ्यायला हवे. मात्र, जास्त मीठ असलेले प्रकार जसे पापड, लोणची, फरसाण, बेकरीच्या वस्तू, फराळाचे पदार्थ हे गरोदरपणामध्ये टाळले पाहिजेत. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टर व आहारतज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार औषध व आहार घ्यायला हवा. थोडक्यात, घरचे साधे व सात्त्विक जेवण घेतले की गरोदरपणात त्रास होत नाही आणि होणाऱ्या बाळाच्या वाढीला मदत होते.