शिवार :अखंड वारीचं दर्शन Print

राजकुमार तांगडे , रविवार,१० जून २०१२
पहिलं गप्पाटप्पा मारायची जागा पार, चावडी व्हतं. आता शहरात सभागृह अन् गावाकडं छपरावर, माळवदावर.. ग्रामपंचायतीच्या भिताडावर मंजी जिथं जिथं सहज रेंज येईल तिथं आगदी टावरच्या खाली बी, आमचा फड ग्रामपंचायतीच्या भिंतीवर बसल्याला आसतु-पाये मोकळे सोडले की ज्ञानीश्वरासारखं वाटतं भिंत त नाही पण तिथूनच आम्ही आख्खी दुनिया चलीतोत.. सगळ्यायचे आवाज काळी चारमधी खरतं फोनची गरजच नाही पण कान गोष्टीसाठीच फक्त लागतु. अस्या गप्पा सुरू आसतानी भिताडीवर बसल्या बसल्या फोन आला. तुमच्या सातावीस-आठ्ठावीस-तीस अस्या पंधरा-इस तारखा रिकाम्या हाईत का? तव्हा गव्हाची पेरणी चालू व्हती, मला लई मस्त पेरता येतंय. मला वाटलं, मला पेरायलाच न्याहायले कण्-पण फोन मुंबईहून व्हता. मुंबईवाले गव्हू कशाला पेरतेनं. बिचाऱ्यायला टाटा डायरेक आटा पुरीतु.. नाहीत चेनलवाल्याला मुलाखत पाह्य़जी आसनं. मी आपले आडाखे बांधीत आसतानी. तिकून सांगितल, चंद्रकांत कुलकर्णी तुकारामांवर सिनेमा करताहेत त्यातल्या त्यांच्या मित्राच्या रोलसाठी तुम्ही यावं. ‘संत तुकाराम?’ मी फोन चालू आसून बी बोलत नव्हतो. महा आजा गंगथडीचा दोनशे एक्करचा धनी तीन परस खांदल तरी काळी संपत नाही. पण घरादारावर पाणी सोडून पांडुरंगाच्या नादी लागला. बारा महिने आन्वानी पायानं खांद्यावर पताका घेऊन वारी करायचा. गावात आल्यावर घरी यायचा न्हाई. पाच घरी भाकरी माघून पारावर जायला. एक भाकर गाईला, दुसरी देवाला, एक आपुन खायचा अन् राहिल्याली परसाद म्हणून बाळ-गोपाळाला वाटायचा. त्यानं आसं घरदार सोडल्यामुळं लोक त्याला भणक्या म्हणायचे. खरतं सगळे लोक मेल्यावर सोडतेत, त्यानं जित्त्यापनी सोडलं एवढचं. तुकोबाचा भक्तच ना तेवं. पुढं चुलत्यानं वारी चालू केली, वडिलानं केली. मी बी पंढरपूरला शाळातल्या सहलीत गेलतो तव्हा मही माय म्हणली व्हती देवाला नारेळ  फोड अन् परसाद आनं. म्या नारळ घेतलं. म्हणलं पांडुरंगाच्या पायापशी फोडावं त त्या पुजाऱ्यानं मह्य़ा हातातलं नारेळ हिसकून घेतलं. मी तिथंच भांडत बसलो त पोलीस बी त्याच्या कुनच उठला अन् आमचे गुरुजीबी मलाच कातोले. मंग म्याबी खुन्नस मनात धरून भाईरच्या देवापुढचे चांगले पसाभर नारळाचे तुकडे गोळा करून आनले अन् म्हणलं जव्हरूक पुजारी अन् पोलीस तिथं हाईत तव्हरूक पंढरपूरला जायचं न्हाई. घरातचं गाथा-ज्ञानीश्वरी आसल्यानं मी आवसानं आनुन ठरीत होतो. आज्यात अन् मह्य़ात काळाचा फरकं महाभरूसा नामा-तुकावर पांडुरंगान कोणता तीर मारलाय. नामा तुकाच्या जीवावर मोठा झाला तेवं. तेव त भूछत्रीसारखा परजीवी हे. तुका सह-जिवी माणूस जातीचा.. पांडुरंग दगडाचा. पाषानाचा पण तुका शब्दाचा. विचाराचा अन् त्या तुकोबाच्या शनिमात कामं करायला मिळतं मंजी आखाडी एकादशीला मुख्यमंत्र्याबरूबर पांडुरंगाचा अभिषेक करायला मिळणं फिक्कं पडावं. साक्षात तुकोबा सोबत मह्य़ा घरच्यायचा आनंद. सुगीसारखा फुलला. आता पस्तोरची मही मेहनत पांडुरंगाच्या सात-बारावर खतीली. त्याच्या मुळचं झालं.. मी घटकात सोळाव्या शतकात गेलो. लोकं समजीतेत माघं जाणं मंजी अधुगतीचं लक्षण. पण पुढ जायचं आसनंत दोन पावलं माघं जाऊनचं उडी हानता येतीना. म्याबी नानू काहीचं केलं न्हाई. फोनवर ‘हो’च म्हणालो. ज्या तुकोबानं ऐश्वर्य, धन, दौलत पायाशी लोळतं असतानी त्याचं पायानी ठोकरलं. ज्याचं नावं घेऊन लोक लखपती झाले. ज्यांनी शब्दाला धन समजिलं. खरंच तेच शब्द इकून अनेक लोकायनं धन मिळविलं त्या महाआत्म्याचं जगणं त्याचा सवंगडी म्हणून बघायलाच नाही तं जगायला मिळणार व्हतं.. मला इचारलं, ‘मानधन किती घेनार?’ म्हणलं, ‘चंद्रकांत सरांच निमेत्रन हेव मान हे. तुकोबा मह्य़ासाठी धन हे.’ अस्या ठोक्कर गप्पा हानाय्या खरतं शेतकरी आसल्यानं स्वत:च्या मालाचा भावं ठरवायची सवं न्हाई ही त्याच्या मागची मेख. आथराय पांघरायचं दोन ड्रेस अन् शिदुरी आसी पडसी भरूनं ‘चंदू’सरांच्या दिंडीत मी सापला सामील झालो. पहाट फटफटं व्हायच्या आतला कॉलटाइम. गारव्याचे दिसं सहा-सात तापमान व्हतं. आख्या महाराष्ट्र काकडत व्हता, पण चंदूसरच्या कानाला ना मफलर ना अंगावर रग. तुकोबाच्या आईच्या तेराव्याचा कार्यक्रम आसतु. त्याच्यामुळं लई मोठा क्राऊंड व्हता. मी गेल्या गेल्या मह्य़ा हातात वाढायचं देलं. मह्य़ा अंगातल स्वेटर निघालं. मी आपलं ठरील्याप्रमाणं थडथड उडू लागलो.. मास्तर पंगतीत बसलेल्या क्राउंडला म्हणले, ‘तुकोबाच्या काळात जरकिन नव्हतं.’ मास्तरला काळ उभा करायचा व्हता.. कुणी लक्ष न देल्यानं आरडुन म्हणले, ‘थंडी ही मानसिक, हे स्वेटरच्या आधी डोक्यातली काढा.’ मनातली मनात म्हणलं, ‘आवघडच काम हे.’ दुपारा मास्तर न भूंक मानसिक हे पोटातली काढा म्हणुनी. सगळ्यायनं फटाफट स्वेटर, मफलरी काढल्या अन् महं हिवं गेलं. जर त्या दिशी मास्तर खुद मफलर सोटर घालून कामं करीत आसतं त आम्ही आख्खे चारशेच्या चारशे मानसं चदर, गोधड अंगावर घेऊन शेकत बसलो आसतोत. तेबी आख्खा हिवाळा.. शूटिंगचा उन्हाळा होऊस्तर. मास्तरचं एक गणित दिसलं नवीन. आल्याल्या नटाला कॅमीऱ्यापुढ निस्त्या मुमेंट द्यायच्या. आम्हाला तुकोबाच्या घरच्यायला वाढायचं अन् बाकीच्या क्राउडला पंगतीत जेवायचं काम होतं. कॅमीरे सेट व्हायच्या आधीच बऱ्याच जणायनं आपलं कामं चोख पार पाडलं.. क्राउडचा मुकादम चिल्डला. अ‍ॅक्शन म्हणल्याशिवाय कोन्हीच घास घ्यायचा न्हाई. चंदूसरच्या तोंडच अ‍ॅक्शन लोकायला वदन कवल घेताच वाटलं. सिनेमातली मानसं सिनेमासारखं भाईरच्या जगात वागत न्हाईत म्हणतेत. चंदूसरन जसं शूटिंगमधी परतेकाच्या जवनाकडं ध्यान देलं तसं शूटिंग संपल्यावर स्पॉट बॉयलासुद्धा जेवलास का, इचारनारा माणूस मला पहिल्याच दिसीच कळला. लाँग शॉट का काय म्हणतेत तेव व्हता. मी अन् पुर्णानंद अर्धा किलोमीटरवर आम्ही उभा असतोन माळवाटाला. मास्तर नं माईकवरून सांगितलं, ‘काटे असतील तिथं त्यांच्या पायात द्या.’ मी अन्वानी होतो. हे मह्य़ा ध्यानातच नव्हतं. दर चक्करला घरचे कसे काय हेत इचारनारा मास्तर. मला, पुर्णानंदला अन् कैलासला स्पॉट बॉय. क्राउडमधलं समजायचे. तीच ट्रिटमेंट म्हणूनं चहा, पाणी, जेवन द्यायला ढासपूस करायचे. आम्हाला वाढीत नसतं. खरतं हेव त्याह्य़चा दोस नव्हताच आम्ही दिसायलाच तसे. एकदा मला नांदेडच्या नाटय़ संमेलनात व्ही. आय. पी. पास गळ्यात आसूनबी. पि. आय.नं गचांडय़ा देत भाईर आनलं व्हतं. सांग कोन्हाची चोरून आनलीस पास म्हणून. त्याच्यामुळं बारीकसारीक अपमानाचं काही वाटत नाही. गुरुजीला स्पॉट बॉय आम्हाला आसी वागणूक देतेत कळलं तव्हा त्याह्य़नं स्पॉट बॉयपुढं आमचा ओळख परेडच केला. हे सगळे चांगले कलाकार हेत. लक्ष द्या. अवघ्या महाराष्ट्रातून गोळा केल्याले लोकं. मास्तरवर प्रेम करणारे. त काही निस्तं नाव ऐकून आल्याले पंढरीच्या वारीसारखंचं सगळे जमा झाले. आम्ही ज्या हाटेलीत उतरलो व्हतोत तिथं बाकीच्यायच्या रूममधी गरम पाण्याचा प्रॉब्लेम व्हता. आमचे कार्यकारी निर्माता जितू कुलकर्णी मंजी माणूस. त्या ह्य़च्या डोस्क्यावर केसाच्या जागी बर्फाचा लादीच दिसायची. ते, ‘तुला येत गरम पाणी.’ मी ‘हो..’. मी सगळ्यायला म्हणलं, ‘तुम्ही मह्य़ा रूममधी या.’ पुर्णानंद होता. मह्य़ा रूममधला गरम पाणी नेमकं त्याच्या येळसं संपायचं. मंग म्या महं गरम पाणी बकीटात घेऊन त्याला देल. त्यानं हात घातला.. ‘हे गरम पाणी?’ मी, ‘काय झाल?’ ‘तुमच्या  देशात ह्य़ाला गरम म्हणतेत? हे गार हे.’ खरचं ना. चंद्रभागेत पहाट खळखळणाऱ्या पाण्यात पाय बुडीला त गरम लागत इतकचं. वातावरण सगळं तुकाराममय झालतं. त्यात जितेंद्र जोशीसारख्या कविमनाचा तुकाराम. गप्पात मज्जा यायची.. आम्ही कायम ‘सेट’च्या बाजूलाच उभा. व्हॅनीटीत बसायचा समंदच नव्हता. मला एक सोध लागला व्हता. चंदूसरच्या नजराच्या टप्प्यात जर राहिलं त चंदूसर लगेच सीनमधी घेतेत.. कैलास वाघमारे हे सांगितल्यावर त्यानं लगेच चाचणी घेतली. सक्सेस. आता आयुष्यभर त्याह्य़च्या नजरेच्या टप्प्यात येईन, आसचं काम करायचं ठरील. लग्न बीन भटजीचं लावलं, म्हणून मही गाढवाहून धींड काढतेत तेव सीन व्हता. गाढवाचा मालकबी आलता. कॅमीरा लावला पण अ‍ॅक्शन म्हणल्याबगर चलायचं नाही हे गाढवाला काय माहीत. सर म्हणले, ‘राजू बस.’ मी गाढवावर बसलो की, अ‍ॅक्शन म्हणायच्या आत ते गाढवं चलायचं. गाढवाच्या मालकाला सर खवळायचे. गाढवाचा मालक मला ‘अ‍ॅक्शन म्हणायच्या आधीच कामुन बसतु? अ‍ॅक्शन म्हणल्यावर बस’ सांगायचा अन् सर मी बसल्याबगर अ‍ॅक्शन कसी म्हणतेन, प्रॉब्लेम गाढवाचा व्हता. त्याला पाठीवर वझं टाकल्या चलायची सवं होती. मला पहिल्यांदा कळलं, गाढवाचा मालक होऊनी कामुन म्हणतेत. असंच शूटिंगच्या येळस सरच्या गाडीत आलो. सरांनी दळवी सरचं नाटक केलं होतं- गांधी विरुद्ध गांधी, पण मह्य़ा शेजारचा चुकून नाटकाचं नाव चुकीचं घेऊन म्हणला, सर तुम्ही फलानं फलानं नाटक केलं ना. ते एकदम विचारधारा सोडून असलेलं नावं ऐकलं अन् सरांचा चेहरा बदलला.. ‘ते नाटकं मी कसा करीन?’ दुसऱ्याच क्षणी लक्षात आलं हेव माणूस बुरख्यातला पुरोगामी नाही. खरा पुरोगामी आहे. तुकोबाला न्याय देण्याची क्षमता-ताकद असनारा मानसाच्या पातळीवर इचार करून चमत्काराला फाट देनारा.. दासूंची गाणी अभंग झाली. दळवी सरांची लेखनी या विवेकाच्या, विचारांच्या, विद्रोहाच्या शब्दांच्या राजाला वारकऱ्यांच्या आत्म्याला.. न्याय देऊन गेली.. त्यात मह्य़ासारख्या वारकऱ्याच्या लेकराला अखंड वारीचं दर्शन घेता आलं.. आम्हा वारकऱ्यांचा तुकाबाच्या लेकरांचा.. सगळ्यांना ‘जय हारी’.