शिवार : लेकीचं झाड Print

alt

राजकुमार तांगडे , रविवार , ८ जुलै २०१२
त्याच्या लेकीनं गायल्याल्या दुस्काळाच्या कवितानं टाळ्यांचा पाऊस पडला व्हता. तिला बक्षीस मिळालं व्हतं. कोन्हाला पेन, कोन्हाला वही, कोन्हाला पुस्तक, कोन्हाला कप! तं हिला झाडाचं पिल्लू! आज तिच्या माईनं रामपहारीच एक्या बळीनं दहा-पाच श्या हासाडल्या व्हत्या. आख्खा मिरूग तोंड वासून तसाच कोल्डा गेला. थेंब न्हाई. अन् हेव पांढरा धुरळ पेरणी करून घ्या, म्हणून बजाराला निघून गेला. पांढरा मंजी रंग न्हाई, बरं का! जव्हा नवऱ्याचा राग येऊन बाई रंग बदलीती तव्हा त्याला ‘पांढरा’ म्हणती. अन् दुसरा वराडा लेकीवर. ‘अन् तुला कसन्याची कविता अन् स्पर्धा आठवायली! मह्य़ासंगं पेरायला चल. (तिलाबी शेजाऱ्याच्या आधी आपलं रान पेरून काढायचं.) स्पर्धा गेली चुलीत.’ लेक- ‘पन आज शाळात बक्षीस देनार हेत.’ ‘थांब. संध्याकाळी घरी आल्यावर तुला बक्षीस खायला लावीन,’ म्हणून माय निघून गेली- पोरीच्या पोटात गोळा उठवून! खरंच जर आपल्याला पुस्तकं, पेनं, कप मिळाला अन् ते माईनं खाऊ घातला तं? उगंच झाड उगायचं! त्याच्यापरीस बक्षीस म्हणून वाटायला आनल्यालं झाड तरी वाटय़ाला यावा म्हणून पोरगी पावसाची कविता देवाला आरती गायल्यासारखी म्हणीत व्हती. अन् खरंच झालं! बक्षीस म्हणून वाटायला आनल्याले पेनं, वह्य़ा, कपं नेहमीच्या खोडीपरमानं हिच्यापासी आल्यावर उडाल्या. अन् लेकीच्या वाटय़ाला आलं- झाडं.. झाडाचं पिलू! तान्हं बाळ पाळण्यात टाकल्यावर चांदण्याकडं टुकूटुकू बघतं तसं रोपाकडं मानसाचं पिल्लू बघत व्हतं. लेकराचे पाय पाळण्यात दिसतेत म्हणतेत. पण झाडाचं अन् लेकीचं भविष्य दुसऱ्याच्या हातात आसतं. ठेवील तिथं अन् लावील तिथं राह्य़चं. असं निराकार भविष्य असल्याली लेक निरीकार झाडाकडं बघत व्हती.
पोरीला झाडाचं नवल न्हाई. झाडा-माडातच जन्म गेल्याला. कायम अंगणातल्या झाडाला वटवाघुळीवानी उलटय़ा लटकल्याल्या झोळणीतच ती मोठी झाली. तिचा बापबी झाडा-येलाला वाढीत वाढीतच मोठ्ठा झाला. मोठ्ठा मंजी राष्ट्रपती, पंतपरधान, तेंडुलकर न्हाई. वयानं लहानाचा मोठ्ठा झाला. आपल्याला जरी वाटत नसला तरी त्याच्या लेकीला तेव म्हंजी बरभांडातला सगळ्यात मोठा प्राणी वाटतु. वर्गात जराजुरा भांडणं होऊ द्या ना; लगेच म्हणती- ‘मी आमच्या दादालाच सांगन.’ तिला वाटतं- फक्त आपल्या बापाला सुळे न्हाईत. खरं तं आपला बाप वाघच हे! पोरीला बापाचं लई कौतिक. उदार तं असा, की अंगातलं धोतर फेडून द्यायला बसल्याला. पण फाटल्यालं घ्यायला भिकारी इतके गरीब राह्य़ल्याले न्हाईत. टपरीहून जव्हा पोरीला तंबाखू, बिडय़ा आनायला धाडतु, तव्हा ‘उरल्याली चिल्हर टिप म्हणून राहू दी तुला भुलाबाईला खाऊ न्यायला,’ म्हनतु. त्याला लोकायला खाऊ घालायचा लईच नाद. मंग ते तलाठी आसू, कोतवाल, न्हाई तं शेजाऱ्याचा इव्हाई. कोंबडय़ाबगर बात न्हाई. खरं तं बैलाला पंखं आसते तं ते वावरात यायला गाडीवाट मिळावं म्हणून आख्ख्या तहसीलला खाऊ घातले असते. न्हाई तरी ते इकून तरी पैसे द्यावाच लागंल. त्याच्या जागी कापून खाऊ घातले आसते तं वाट न् पुण्य दोन्ही मिळाले आसते. तेव लई मोठा दाता. सप्त्याची पट्टी आसू का धुरूडय़ाची पार्टी- ह्य़ाचं नाव सगळ्यात वर. थकबाकीदारात बी याचंच नाव वर! त्याला वरच्या नावाची इतकी सवं झाली, की गावातल्या हरएक लग्नपत्रिकात ह्य़ाचं नाव यावा म्हणून तेव सुपारी ते सरपन फोडूस्तर लग्नघरीच आसतु..
असा झोकून देनारा बाप कारल्यावानी कडू माईला कामाला जुपून खडीसाखरावानी गोड बाप कशाची तडजोड करतो म्हणून बजाराला गेला व्हता. जाता जाता पोरीच्या पायाचं इतीनं माप बी घेऊन गेला व्हता. चप्पल आनतो म्हणून. तसा तिच्या अनवानी पायाचा सव्‍‌र्हे आख्खा उन्हाळाभर दर आठोडी व्हायचा. शाळा सुटल्यावर रानात जाऊन बबडय़ाला झोका द्यायच्या आटीवर! माय रोज बापावर उपसायची- ‘लालूच देऊन कशाला कामं सांगता? ती काय सरकारी डय़ुटीला हे काय? बजारात काय झाडं हेत काय?’
आज तिच्या नजरांत हे झाड व्हतं.
बजारात झाडं न्हाई. वावरात झाडं न्हाई. मंग पैशाचं झाड नेमकं हाई तरी कोन्हाच्या खिशात? पोरीला प्रश्न! हे तं नसंन? पण याचे पानं तं हिरवे हेत. मंग तं सोन्याच्या झाडाचे पानं बी हिरवेच आसतेत. दसऱ्याच्या दिशी आनलं व्हतं ना घरी! तिनं एक पान तोडून पाहिलं. चुरगळलं. खाऊन पहावा वाटलं. पण घरात कोन्हीच कव्हा पैसा खाल्ल्याला न्हाई, मंग चव कसी कळान? हे पैशाचंच झाड आसन. फक्त आपल्या बापाला त्याचा पैसा करता येत नसन. तसंच झाड घेऊन ती रानाकडं निघाली. मनात गोंधळ घेऊन. कशाला देलं आसन झाड? आपल्या अंगणात, रानात झाडाची कमी थोडीच हे? मंजी पुन्हा हे झाड लावून रानाचं ‘वन’ करायचं काय? दाट झाडं. इकडचा माणूस खरंच प्राणी हे काय? त्याह्य़नं ठेविलं तसंच राहायला.. जंगलात? आपल्याला बी वाटतं- नेमकं झाड तिनंच कामून लावायचं? तिच्या बापानं कोणतं प्रदूशन केलं? लाखानं झाडं तोडून केलेल्या चौपदरी रस्त्याहून बिचाऱ्याचे गाडी-बैलं टॅक्टर तं सोडा; पाई-पाईसुद्धा चलून न्हाई देलं. तुमच्या (पर)गतीमधी अडथळा नगं म्हणून! त्याच्या मनावर पाय ठून अधिगृहित जमिनीवर बांधलेल्या तळ्यातलं पानी झाडा-येलीला न्हाई देऊ देलं. आरक्षित केलं- बिसलरी, मिनरलच्या बाटलीत.. प्यायच्या नावाखाली. कसन्याच्या पबमधी का टबमधी पव्हायला ठुलं. त्याच्या ढगाकडं पाहून रडकुंडीला आल्याल्या डोळ्यांपुढं तुम्ही कारंजे नाचीता. त्याच्या डोळ्यांत तरी कव्हाच रगत न्हाई उतरत. कारंज्यात सोडल्याला लाल लाईट परावर्तित होऊनबी. खरंच कोणतं परदुशन केलं तेनं? त्याच्या पिढय़ान् पिढय़ाच्या सरनातून जेवढं धुपनं नसन निघालं तेवढं कंपन्या घंटय़ात फेकीत्यात. पुन्हा आडवा कुंबा. कंपनीतला माल वापरीत न्हाईत का? वापरीत आसते तं तिचा आता येळावर उपचार औषिध न्हाई मिळालं म्हणून मेला नसता. तिच्या मथाऱ्याच्या बिडीची अन् राजधानी गाडीची धुव्वा फेकायला बराबरी करता? तिच्या बापानं उपाशीपोटी घातल्यालं औतावरचं भलं, नाहीतर रातभर कामानं ताठून राती आंथरूणावर कन्हत पडल्यावर होतं का ध्वनी-प्रदूशन? तुमच्या डिस्को, डीजे, तोफा अन् गाडय़ाच्या ताफा याच्या आवाजापरीस? त्याच्या रानात तयार झाल्याल्या लाकडाचा टेबल झाला. पन् तेव हातावरच भाकर खातू. तेव येसीत कव्हाच बसत न्हाई. झुंजुरकच येशीतून काढवणं गळ्यात घालून जातू.. सूर्य डोस्क्यावर घ्यायला! आपल्या कायद्यात ज्यानं करायचं त्यानंच भरायचं जरी आसलं तरी उजव्या हातानं खिसा मारला तरी बेडी डाव्या हाताला पडती. ‘तुम्ही गुन्हा करा, मी हो भोगीन सजा.’ पण आता लेकीच्या हातातल्या झाडाला कोणतं फळ येनारहे, हे माहीत नसतानी थेट रानात निघाली घेऊन. तिथं माय ‘रान’ समजून शेजाऱ्याचा बांद खिशीत व्हती. बैल राह्य़ले न्हाई ना! यंत्रानं बैलाला सुट्टी झाली; पण बाईला न्हाई. आता शेतीत बैलाचं कामच न्हाई. मधात मधात फॅड आल्तं- ज्याचं शाळात डोस्कं चलत न्हाई त्यानं शेती करावं. पण ते सगळे नापास झाले. औषीध पेऊन. शाळाचं सोपं हे- पाठाच्या खाली प्रश्न अन् प्रश्नातच उत्तर आसतंय. पण शेतीत उत्तर शोधायला भाईर फिरावं लागंतं. बबडीच्या बापासारखं. पेरणीचं उत्तर सोधायला गेलाय. बघू काय सापडतंय. बांदाच्या कडीला बी खोसनाऱ्या माईला इचारलं- ‘हे झाड कुठं लावू?’ माय जव्हा ‘लाव मह्य़ा डोस्क्यावर’ म्हणली, तव्हा लेकीला वाटलं- माय तं पंधरा-पंधरा दीस डोस्क्यावर पाणी घेत न्हाई. तिथं झाड तं सुकून जाईन. जिच्या टकुऱ्याला दुसऱ्याचं बाळातपनात केसं न्हाई राहिला, तिथं झाड? पोरीनं आखाडा ठाकलेल्या जांभळीखाली ते लावलं. तव्हा माय आल्डली- ‘अगं, ते झाडाच्या सावलीला उबदार यायचं न्हाई.’ ती पटकन् झाड अन् झोळणीतलं बाळ घेऊन सावलीच्या भाईर आली. तव्हा व्यापाऱ्याला बांदा-धुऱ्यावरचे झाड दाखवीत दाखवीत बाप येत व्हता. बाभळ, जांभळ. नदीच्या काठावर आपुमत्त्या उगाल्यालं चंदन. सौदा जुळत आलंता. फारेस्टवाले अन् तलाठय़ाचं कोन्ही संभाळायचं इथं गाडी सिलिप व्हत व्हती. आवशीध घ्यापुरती उचल आधी. मंग झाडं नेहल्यावर बाकीचे खताला. लेक पहात व्हती. माईला इचारलं, ‘आई, ते दाढीवाले आपले माया हेत? माय- ‘हो.’ लेक- ‘ते कशाला आलेत?’ माईन सांगून टाकलं- ‘झाडं तोडून न्यायला.’ ती- ‘कामून?’ माय चिल्डली. ‘मंग या रानाला खर्चापानी आपले मडं इकून लावायचं?’ लेक- ‘रान नाही देत पैसे? व्हय आई, तलाठय़ाला कामून इचारायचं? हे झाडं त्यानी लावलेत?’ माय- ‘तुपल्या आज्यानं.’ ‘आई, चंदनाचं काय करतेत?’ ‘त्वा मामाच्या इथं दिवाळीला नव्हती का ती साबन लावली? अत्तर ते बनीतेत. बडबड नकू करू. जाय त्या जांभळीखाली. लाव ते झाड.’ लेक अन् तिची सावली- आता जाणारहे! लेकीनं हातात झाडाचं पिल्लू घेतलं आणि लावायला निघाली. उद्या तुटणाऱ्या जांभळीच्या झाडाखाली. उद्याच्या पिढीला तोडायला!