शिवार : दुस्काळाला जीवदान दी Print

राजकुमार तांगडे : १६ सप्टेंबर २०१२

कधी नव्हतं एखांदा मोठ्ठा मानुस मेला की दिवस मजात जायचा.. पण रातचं मातर भेऊ वाटायचं. सावली दिसली तरी वापस आल्यासारखा वाटायचा. कव्हा मव्हा मरणाऱ्या मोठय़ा मानसाची शाळाला मिळणारी सुट्टी पाहून.. जगात मोठे मानसं कमी, का मोठय़ांची मरणाची गती कमी? त्यातली त्यात गुरुजी श्रद्धांजली वहातानी म्हणायचे, मोठी मानसं मरत नसतात.. ते नेहमी आमर असतात. म्हणून रात्री सावली दिसली तरी भेऊ वाटायचं. मेल्याले मानसं वळखीचे नसतेत ना.. आता गावात किती मोठे मोठे धोतरा-फेटय़ा-टोप्यावाले मानसं हेत. तरीबी सुट्टी नेमकी भाईरचं मेल्यावरच मिळती.. त्यांच्या मुळं.. नेमका पुढं किती दिवस असा आनंद मिळणार हे असं गुरुजीला इचारायची सोय नव्हती. गुरुजी थोडेच लाल तारखीचं कॅलिंडर हेत. बर तव्हा कॅलिंडर पहायची सोय नव्हती फक्त पंचाग अन् तेबी बाळुपंतालाच दिसत व्हतं. कोन्ही म्हणायचं चला बाळुपंतालाच पंचाग पहायला लावू. तेबी मोठाल्या भिंगाचा चष्मा लावून पहायचे. गावात तसा त्याह्य़ाला एकटय़ालाच चष्मा. तसा आजीलाबी व्हता, पण काऱ्होडीला पाणी पाजतानी हुंदाडी मारली की फुटायचा. मंग आयुष्यभर नवरदेव नवरीसारखा बळचं गाठ मारून ठूल्याला. पण त्याच्यातून बी कामापुरतंच दिसत असावं. एकादस, चतुर्थी, दोअर्थी आमुस्या बाळुदेवालाच इचारायची. पुढं पुढं म्हाईत झालं चष्मे येगयेगळ्या जातीचे आसतेत. जवळचं दिसनारे, लांबचं दिसनारे. आजीला हातापुरतंच पहायचं. हातवरच पोट तिचं.. म्हणून जवळचं दिसनाराच चष्मा लागला. बाळुदेवाला जरा दुरचं पहावा लागायचं. इतिपात आमुस्या. पाऊस. काळ गेला, पण आमच्या गावातल्या लोकायला जी हातापुरतं पहायची सवं लागली.. ती कायमची. तव्हा शाळात आसतानी जेव आनंद कोन्ही मेल्यावर मिळायचा.. तेवच आनंद आम्हाला दुस्काळात.. मिळावा का? पण आमची एक जमातच तयार झाली.. पावसाची वाट पाहून पाहून थकलेल्या डोळ्याला कव्हाशिक दुस्काळाची आस कोन्ही लावली कळलंच नाही. नकळत कोन्ही तरी अफवा उठीली दुस्काळ जाहीर करा अन् पावसावरून आमचं ध्यान दुस्काळाकडं वळलं.. वाट पाहुन पाहुन मुख्यमंत्र्यानं पांडुरंगाला अन् केंद्राला संगच साकडं घातलं.. ते दोघं बी एकमेकाची वाट पाहू लागले.. पहिल्यांदा दोघायनं इतकं तानलं की तुटतंका काय, असं झालं. पहिल्यांदा हेव शब्द याच्यासाठी वापरीतोत. खरंत असं परतेक वर्सीच होतं, पण जसं आम्हाला पुढचं दिसत न्हाई तसंच आम्हाला मागचं बी आठोत न्हाई, म्हणून आम्हाला दरवर्सीच ‘असं पहिल्यांदाच व्हायलय,’ असं वाटतं. तसं पांडुरंग अन् केंद्र याह्य़ला आपला भाग मंजी डाव्या हाताचा मळ.. पण दोघायचा बी इगु का काय तेव आडवा येतू. बरं, पांडुरंगाचं म्हणनं पटतं. कसंबी रडत पडत का व्हईना, सगळ्यायला एक्या झेंडय़ाखाली आनायची खटपट केली का नाही. बरं, तुम्हीच ठरीला पाया अन् कळस अन् वारस.. म्या त रुख्मीनीला जवळ बी येऊ दिलं न्हाई.
तुम्ही मला पाशानाचं ठरीलं.. आमच्या मनाला थोडं बी लागलं नसनं का? मंजी शब्दाचं साकडं मला.. अन सोन्याचे मुकुट त्याह्य़ला. डोळे भरून मला पाहायचं म्हणतेत अन् कानं त्याह्य़च्या कुण फुकून घेतेत. का? मला व्हट अन् पोट दोन्ही हालीता येत न्हाई म्हणुन. ही दर्शन रांग मला सुधरू देत न्हाईना. पहीलं नव्हतो हो असा बांधल्याला. सगळ्यायच्या घरीच जायचो काम-धाम बुडुनी म्हणुन. पण मला दर्शनबारीत गुतून ठूलं अन् हे टिव्हीतून परतेकाच्या घरी जायले. त्याह्य़च्याच माघं लोंढे राजकीय गुरू करून घ्यायचे. आता पावसालाबी जा ना त्याह्य़च्याकडचं- पाडा म्हना बापू बाबाला पाऊस. मी बी वारीचे अ‍ॅपिसोड करून टिव्हीवर झळकणार हे. केंद्रबी तसंच म्हणतंय.. जिथं दुस्काळ पडलाय, असं घोषित करायचंय तिथं घटक पक्षाचे आमदार जास्त हेत. माप त्याह्य़च्याच झोळीत जास्त पडतंय.. एक हाती सत्ता द्या- दुस्काळ नसला पडत तरी पाडू.. केंद्र. अन् पांडुरंग लई नटलेत काय..खुशाल नटा.. त्याह्य़ला कळायला पाहीजी गावातल्या चिल्या-पिल्यायनं भर उन्हात भोंगळ्यायनं पाऊस मागीतला राव.. नामदेवचं पोरगं काल उघडं पडलं कुपोशीत म्हणुन. पोळ्याला बैलानं नळावर अंघुळ्या केल्या. (आधीच मानसाला प्यायला न्हाई) वॉशिंग सेंटरवर परोडत न्हाई म्हणले. आम्ही बी चंद्रभागा- गोदावरीवर सरकारनं बॅरेज बांधून आडील्याल्या पाण्यात १५ दिवस देव बुडीले. ते बी भोपळ्यानं आनुन. सात दिवस विणा उभा केला. सरं गाव डोळ्यात पाणी आनुन पावसासाठी याचना करीत व्हतं.. देवा, सरकार डळमळल राव, पण आभाळ नाही. मुंबईच्या लोकायच्या भेणं भेणं. शहरी लोकं लई पावरबाज; नुसत्या कांद्या वांग्यावर सरकार पाडतेत. पाऊस न्हाई पडला त सरकार पडणं, म्हणून पहिलं मुंबईत पाऊस पाडायचं ठरलं. सरकारी काम टप्प्याटप्प्यानं असतं. पहिलं मनात, मंग भाषणात, मंग आश्वासनात, मंग कागदावर अन् मंग जमिनीवर. ढगाला बी वाटलं, आता आपले कष्टाचे दिस संपनार. आपुन आपुमत्त्या पडणार. पण त्याच्यासाठी सप्टेंबर पस्तोर थांबाव लागनं. पण महाराष्ट्रात हक्काची जागा कुठंय. मुंबईत त थांबून देत नाहीत. आत्ताच बिहारी बांगलादेशीच्या वाटावर आडवे आले. हे लोकं बी लई दुटप्पी. दुसऱ्याला यायला इरोध करतेत अन् आपल्या लोकायला हार-तुरे कर्ज देऊन परदेशात पाठीतेत. सगळ्यायचेच सगळे गऱ्हाणे- आता देलीना आम्ही पावसाची आशा सोडून, निदान कडकडीत दुस्काळ तरी पडावा. तेवढाच एक आशेचा किरण.. पण सरकार वाट पहातंय.. आजुन जराशी पावसाची ताडणं पडायची. येहरी तरी चांगला पाऊस पडत न्हाई.. मंग दुस्काळ तरी पडावं.. सगळंच जळाल्यावर नाही का पेटणार सगळ्यायच्याच पोटातली आग.. काय व्हईन दुस्काळ पडल्यावर, खायला नाही मिळणार.. ते तर पिकवून बी नाहीच ना मिळत.. नाही तरी तुझ्यात संप, अंदोलन करण्याची ताकद नाही.. पण आता ती संधी आली.. टाकूदी एकदा सगळ्या पिकाला माना. तुहीच मान मुरगाळणाराच्या जगन्याचा कशाला इचार करतुस.. काय ठेका घेतलाच त्वा.. हे बघ ना, घोटभर पाणी फुकट देत नाहीत. पाण्यातच हे ना मुंबई. बाटलीत भरून इकतेत. बस, आता उलटं जग, मंजी जगाला तोही किंमत कळणं.. आता पावसासाठी नाही, दुस्काळासाठी घाल साकडं पांडुरंगाला. पाऊस पडावं म्हणून भिजु घातल्याले देव उन्हात वाळतं टाकं. वीणेच्या मधुर आवाजणं पेंगुळलेल्या देवाच्या कानात वाजेव डमरू.. दुस्काळच पाह्य़जी. सगळ्यायला माहीत्ये दुस्काळ म्हणल्यावर तु म्हणशीन, ढोरं-बैलं काय खातेन?.. पण राजा बैलानं कव्हा इचार केलाय का तू काय खाशीन.. दुस्काळ पडल्यावर गुराला- चारा देनार हेत. नाही नाही त्याह्य़च्याकुन काही काम करून घेनार नाहीत. फुकट देनार छावण्यात.. अरे बैलापरिस जास्त कामं करणाऱ्या मशीन हेत त्याह्य़च्याजवळ. हां.. पण तुला खायला मिळण्यासाठी तुला कामच करावं लागन ‘हमी देतेन रोजगाराची.’ हो.. हो.. पोटभर.. लेकराबाळासगट.. कर्जाचं व्याज माफ.. हो.. हो माफ. पाणी रेल्वेनं आनु.. आत्महत्येच्या सगळ्या सवलती दुस्काळी भागाला लागु.. तू आता फक्त दु:खात सुख मानायला शिक. आपल्या देशात पुरात निवारा मिळतु.. अन् आपत्तीत आसरा.. छावन्यात जनावराबरूबर खातेनना मानसं उली-तीली पैसे. आपल्या इथं सुकाळ आसु, दुकाळ आसु, पोट भरणंच मोठी कसरत हे. मंग ते टाळूवरचं खाऊन नाहीत दाताचं पाणी गिळुन. जाय आज आनंदानं झोप त्याचं चिंतन करीत.. उद्याच दुस्काळ जाहीर होनार हे. येहरीत गेलंयच सगळं हातातोंडाला आल्याल.ं. पण तुला काही फरक नाही त्याचा. झोपतानी त्या वरच्याला एकच मेहरबानी कर म्हणा. बदबद पाऊस नकू पाडू. आमच्या दुस्काळातल्या आनंदावरून पाणी फिरायचं.. सरकारणं देल्याच्या शब्दाला घेऊन.. शब्दाचं भान दी. शेतकऱ्याला ताठ मान दी अन् दुस्काळाला जिवदान दी..