शिवार : इंडिया प्राइव्हेट लिमिटेड Print
alt
राजकुमार तांगडे , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘व्हय तात्या, एक्या रेल्वेच्या चाकाचा व्यास इतका.. एका मिन्टात दहा घिरके मारती, तं दहा मिन्टात किती किलूमीटर जाईन?’
तात्या - ‘जाऊ दी ना भाऊ, काय जायची तं. फक्त तिकीट सांग किती हेत? आम्हाला परवडलंतं बसू.’
तात्या चिल्डू नका ना बरं. आक्षयचं वय एक्स, बापाचं वाय; तं माईचं काय?’
तात्या- ‘आक्षयच्या बापाचा धंदा सांग काय हे; मंग काढू माईचं वय!’
‘काय हो तात्या, असं उत्तर आम्ही शाळात गुरुजीला देलं असतं तं, मानसाची कोंबडी केली असती- आम्हाला आक्षयचं वय काढता न्हाई आलं म्हणून गुरुजीनं आमच्या पाठीचे साल्टे काढले. तव्हा गुरुजी सांगतेन् तीच एक्स, वायची किंमत अन् पुढं सरकार ठरीन तीच मालाची किंमत ठरल्यामुळं आम्हाला कव्हाच किमती काढता न्हाई आल्या.

ज्याह्य़ला एक्स. वाय.च्या किमती काढता आल्या, तेच तर आमच्या मालाच्या किमती ठरीत नसतेन ना? म्हणून म्हणलं, हे गणित आपून शिकून घ्यावं. शाळातल्या गणिताचा इथं कुठं मेळ बसतू का ते बघावं. एक दाना पेरला की कव्हा हजार दाने, कव्हा दोनशे, तं कव्हा निख्खूळ बांड व्हतं धांड. त्याच्यामुळं शाळातल्या गणिताचं सूत्र संसारातले गणित सोडवायच्या उपेगाचं न्हाई तात्या.’
‘कसा बसनं? एक एक्कर नांगरट काढायला दहा लिटर डिझेल लागतं. दीड किलू ब्याच्या पिशवीला आठराशे रुपये लागतेत. ते जर मातीत पेरून बारा महिने ठुलं तर उत्पन्न किती?’
तात्या- ‘खर्चाच्या निम्मं अन् बँकीत ठेवलं असतं तं दुप्पट. असे प्रश्न आसते तर शाळात गेल्याचा पसतावा आला नसता तुम्हाला.’
‘खरंच ना तात्या, आठवीत आसतानी आम्हाला खडक शिकीला. अग्निजन्य, रूपांतरित आतलं पोटातलं. बरं, त्याची सोनूग्राफी होत न्हाई. खरं खोटं पाहायला! आगदी शाळा सुटली तरी अजूनबी आम्हाला तेव पाहायला मिळाला न्हाई. आम्हाला एकच म्हाईत- ‘पाषान’. ते फोडू फोडूच आम्ही पसा पसा पाणी काढलंय विहिरीतून. पोटातल्या खडकापरिस वरची माती सिकीली आसती नं निदान बिल्डर लोकायला ‘इटा’ तरी पाडून इकल्या आसत्या!’
तात्या पुन्हा चिल्डले. ‘झाल्या-गेल्या गोष्टी कामून उकरून काढायला?’
‘तात्या, तसं न्हाई. ते शाळातलं माघं शिकील्यालं, परत गिरवायची गरज हे. गावाचा कारभार करतानी त्याचा उपेग व्हनार हे.’
तात्या- ‘मंजी? दादा अन् गरामइकासमंत्री म्हणतेत फक्त शिकल्याल्याच मानसायलाच उभं राहाता येईन.’
तात्या- ‘अरे, मंग तू तं शिकल्याला हाई ना? तुला आजून बी कामून उभं राहाता येईना? बापाच्याच जिवावर जगतूस.’
तात्या, तुम्ही असं कुणीकडच्या कुणीकडं कनिक्शन जोडून महा आपमान करू नका. शिकन्याचा अन् सवताहाच्या पायावर उभं राहान्याचा काय समंद? ते निवडणुकीला म्हणतेत. आता दादाला म्हणा निवडणुकीला कशाला शिक्शन? सचिव आसतु ना शिकल्याला,’ तात्या.
‘तात्या, आहो सरपंचाला सही त आली पाहिजी ना.
तात्या- ‘कशाला’. रहिवाशीवर सही करून द्यायचे शंभर-शंभर रुपये घ्यायला?’
‘आहो तात्या, गाव-देश चालवायचाय प्रतिनिधीला.’
तात्या ‘गाडीखाली चलनाऱ्या कुत्र्याचा समजच निघत न्हाई. लईच घट्ट झाल्याला हाई गईरसमज. देश कोण चलीतो? अरे, आपला देस तं रामभरोसे, चाललेला हाई. खरंच, कोन्ही चालवत असतं तर नीट नसता का, चालला?’
तुम्हाला काय म्हणायचं? देशाला कोन्ही मालक न्हाई?
तात्या- हाई ना! दादा, सगळेच मालक हेत. उचलली जीभ लावली टाळाला! टोल थोडाच भरायचाय?’
‘आहो तात्या, निवडणुकीला उभं राहायला शिकशान पाहिजी. लई खोल इचार करून मांडलंय.’
‘उकंडय़ावर उगाल्याल्या भूछत्रीच्या मुळ्या किती खोल असत्यात म्हाईत हे मला! बाप-दाद्यानं भाईर देशात शिकीलं म्हणून सुचतं हे. याह्य़चे नाक पुसायला खिशातून रुमाल काढतानी बापाच्या खिशातून दहा-पाच कॉलेजच्या परवानग्या खाली पडत्यात. म्हणून वाटतं शिकनं सोपं हे.’
तात्या- ‘पण तात्या, शिकशन हे मानसाच्या परगतीसाठी, समृद्धीसाठी आवश्यक हे. जसं शिक्षण आसनं तशी परगती?’
तात्या- ‘बरुबर. ग्रामसेवक शेकडय़ानं खातो. तहसीलदार हजारानं. कलेक्टर लाखानं. आयुक्त- सचिव कोटय़ानं. रायगड उभारणारे हिरोजी इंदुलकर (इंजिनीयर) कोन्ह्य़ा शाळात गेलं ते? तुमचा उड्डानपूल तं बांधतानीच पडतू..’
‘ते सगळं आपल्या नीतिमत्तेवर हे तात्या.’
तात्या ‘मंजी शिकलं की नीतिमत्ता फिरती?’
‘तात्या, मंजी हेव निर्णय आपल्या भल्यासाठी नाही.’ तात्या- ‘फक्त आपल्या आपल्या सोईसाठी हे. मांजर, कुत्रे जव्हा गवत खातेत तव्हा आपून असं न्हाई समजायचं की शाकाहार स्वीकारून ते वारकरी संप्रादायाचे झाले. उंदरा, घुशीबद्दल पोटात माया फुटली.. पोट दुखायलं की खातेत गवत. शेतीच्या जागी दोन नंबरवर पाणी उद्योगाला द्यायचा उद्योग याह्य़नच केलता ना! इसरले का? आहो, शेतीचं काढून उद्योगाला पाणी द्यायचं ठरलं, पण इधान भवनात इरोध करायला आता एक बी गावाकडचा माणूस न्हाई. मंग काही शेतकऱ्याच्या लेकरायनं ते हानून पाडलं. तुम्ही म्हणतान, ते बी शेतकऱ्याचंच लेकरू ना? लेकरू न्हाई म्हणायचं तं नातू गितू म्हणा! आता निवडणुकीचं तसंच ‘पिल्लू सोडायलेत. हळूहळू मानसाचे अधिकार, हक्क येगयेगळं निमित्त करून काढून घ्यायचे. आता पस्तोर सगळ्यात जास्त भ्रष्टाचार शिकल्याल्या लोकायनच केलेत. आता आपल्या गावातले बापू कागदावर अंगठा टेकायच्या आत चारजनाकडून कागद वाचून घेत व्हते का नव्हते? त्याच्यामुळं उलटं गावात चार लोकायला ही इस्कीम माहीत व्हायची. अन् पाच वर्षांत. सहीबी शिकलेच ना! अनुभवाचंच शिकशन पाह्य़ची बाबा. आता मला सांग आपली तान्हू आय.टी.या. का काय त्याच्यात शिवनकाम शिकायला गेली. कागद न पेन्सिल घेऊन चाकाचं चित्र काढ, कात्रीचं काढ, टेपची लांबी मोज, बॉबीन कशाला म्हणतेत हेच गिरीत बसली. तव्हरूक आस्लमभाई चीथ आपल्या राधूला कपडे शिवता आले. आता तू म्हणशीन, पण बँकीनं कर्जतं तान्हूलाच देल नां? हो. लग्नामधी शो केस अन् ते घ्यायला कामा आलं. नवऱ्याचा सूट ठायला! ते जाऊदी. आपला दिपू एम.एस्सी. झाला. परादिशी मह्य़ासंग कोर्टात आल्ता. मला गुडघ्यानं चलता येत न्हाई. तात्या, गुडघ्यानं कव्हरूक चालता येईन. तुम्ही काय लहान बाळ हे काय? कोर्टाचा इषय निघाला म्हणून तुला वकिलासारखी शब्द फिरवायची हुलक येईन. तुला सांगतो- आपल्या एम.एस्सी. झाल्याल्या दिपूला म्हणलं ते तिथं वकीलसाहेब उभे हेत, त्याह्य़ला इकडं बोलेव. तं तेव म्हणतू- ते धोतर-खमीसवाले का? काय जाळायचं का आसं गिन्यानं गेल्यालं शिक्शन. एवढी आक्कल नसावं का? आता धोतर नं खमिसावाले वकील राह्य़लेत का? त्याला शंभर रुपये अन् रिकामी पिशवी देली तरी बजार न्हाई करता येनार. ज्या दुकानापुढं लई गर्दी आसन तिथं जाऊन खरीदी करीन. तू म्हणशीन- काय तात्या, त्याचा न शिकन्याचा काय समंध? एम.एस्सीत बजार करायला शिकीतेत का? अन् मग यड भुतऱ्याय हो, दहावी न बारावी न एम.ए.- बी.ए. झाल्याल्यायला घर चलिता येईना बेकार म्हणून लागटसारखे सरकारच्या तोंडाकडं पहातेत. गावनं देश कव्हा चलितेन रे?
आहो, पण तात्या ते शिकल्याले असले तं वाया जाईन का?’
तात्या- ‘हां, गोष्ट खरी हे. बरं, वाघ्या परादिशी सकाळी या येळाला तू काय करीत व्हतास?’
‘अं.. परादिशी.. परादिशी.’
‘सांग फट फट, बरं, काल सकाळी काय खाल्लंस? मंजी तमाखू सोडून इचारतो मी.’
‘आ.. चाभडलास ना! ए, त्वा काल खाल्ल्यालं ध्यानात न्हाई, तं काय सांग तू रे शिकन्याचं? बरं, झाक डोळे. अरे झाक. झाकले? हं, आता सांग- मह्य़ा अंगात घातल्यालं शर्ट कोणतं हं? बरं, त्याचा रंग सांग. अं.. आरे, काल खाल्ल्यालं आज लेहल्यालं कापडं जिथं आठोत न्हाई, तिथं..’
‘आहो तात्या, त्याह्य़चा हेतू चांगला हे हो. मंग इंग्रजाचा कोणता वाईट व्हता? त्याह्य़नं आपल्याकडं अस्या माळरानात रेल्वे आनली. तात्या, ती आपल्यावर ‘दया’ म्हणून न्हाई. आपला कापूस तिकडं न्याहायला. त्याह्य़नंबी शाळा सुरू केल्या. हो, बाबू मंजी कारकून तयार करायला! जरा त्याच चष्म्यातून डोकून बघ बरं. जे पैसे भरीन, फक्त तेच शाळा चलीन. जे पैसे भरीन तेच डॉक्टर- इंजिनीयर व्हईन. जे टोलनाका भरीन, तेच रोडवर चलन. जेव कर भरीन, तेच इथं राहीनं. हळूहळू सत्तेतला भाग काढून घ्यायलेत. कालपस्तोर ज्या वस्तीत शाळा नव्हती, ज्या तांडय़ावर रस्ता नाही, ज्या वाडीवर शिक्षक नव्हते राहात.. तुमच्याच मंत्रालयात.. आमच्या वाडय़ा वस्त्याच्या भविष्याच्या खुनाची सुपारी. पन्नास हजार, एक लाख घेऊन गुरुजीच्या जिल्हा बदल्या केल्या. आमचा घनश्या पिस्तुल्या चव्हान- आयुष्यभर पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरला. काल त्याला सरपंच व्हायची संधी मिळाली. शाळाची आडवी रेघ येत नाही, पण भटकंतीनं उभ्या जगाचा अनुभव कोळून पेला तेव. ह्य़ाचं वाडय़ा, वस्त्या, तांडय़ा, झोपडपट्टय़ावरची पंचविशीतली एक पिढी हे ज्याह्य़च्या नाकाजवळ शिक्षणाचा गंध ही व्यवस्था पोहचू शकली नाही. अशा ऐन उमेदीत आलेल्या पिढीला फडतूस  शिकन्याची अट घालून लोकशाही हक्कापासून पिटाळून लावायचं, लोकप्रतिनिधी नाही होऊ द्यायचं. लोकशाहीचा क्रूर खून करण्याचा कट. त्याला निवडून द्यायचं की नाही हे लोक  ठरवतीन. तुम्हाला जेलमधून निवडणूक लढवणारा चालितो.. तुमच्या मनात काहीतरी खोटं हे. उद्या तुम्ही नक्की प्रस्ताव मांडणार- बँक बॅलन्स असनारालाच मतदानाचा अधिकार. लगता है ये जहर धीरे धीरे असर दिखाना शुरू कर रहा है- ‘इंडिया प्राइव्हेट लिमिटेड की दिशा में.’