बोधिवृक्ष : ध्यानातली प्रगती Print

alt

एकनाथ ईश्वरन् , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
शत्रुत्वभावना, द्वेषभावना ही ध्यानाच्या आड येणारी बहुधा सर्वात गंभीर गोष्ट आहे. बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणे ही भावना वेगवेगळ्या १३५ रूपांमध्ये व्यक्त होते! आपल्या सर्वाच्या मनामध्ये त्यांची एक यादीच असते. त्यामुळेच ही भावना ओळखणं हे सुरुवातीला इतकं कठीण असतं, तिचा समाचार घेणं तर दूरचीच गोष्ट आहे. बुद्ध म्हणतो, सुदैवाने, या शत्रुत्वभावनेचा सामना करण्यासाठी आपल्याला या संपूर्ण यादीची माहिती असणं आवश्यक नसतं. आपल्याला फक्त मनाच्या आतल्या कोपऱ्यात दडलेली सवय नाहीशी करायची असते.
आपल्या इंद्रियांच्या जाणिवांप्रमाणेच मनातील या भावनाही फसफसत असतात. एखाद्याने जर आपल्या आवडीकडे दुर्लक्ष केलं किंवा तो जर आपल्या मनाप्रमाणे वागला नाही, तर आपल्या मनात एक प्रकारची अप्रसन्नता निर्माण होते. सर्वाना ही भावना चांगलीच ठाऊक आहे. प्रथम प्रथम ती पाण्यावर लिहिल्यासारखी वाहून जाते. पण जेव्हा ती वारंवार निर्माण होऊ लागते तेव्हा ती फसफसायला लागते.
आपल्याला आपल्या वाईट सवयींमधून बाहेर ओढून काढण्यासाठी बुद्ध इथे फार कडक भाषा वापरतो. तो म्हणतो, तुम्हाला एखादी व्यक्ती नावडणं ही काही तुमची मोठी हुशारी नाही. त्या व्यक्तीला दोष देण्यात काही अर्थ नाही. ती अगदी योगायोगाने तुमच्या मार्गात आडवी असलेली असते. तुमचं नावडीचं आसव तुमच्या अंतरंगातच असतं आणि ते फसफसत असतं; जे काही घडत असतं ते फक्त एवढंच.
माझी मातृभूमी असलेल्या केरळमध्ये नारळाच्या हजारो झाडांवर मधुर रस गोळा करण्यासाठी मडकी टांगून ठेवलेली दिसतात. या रसापासून फसफसणारी ताडी बनवली जाते. मडक्यांमध्ये बराच वेळ राहिल्यामुळे हा द्राव आंबतो आणि फसफसून खूप कडक, तीव्र होतो. कधीकधी कावळे चुकून तो पितात आणि मध्यरात्री कावकाव करत बसतात. आम्ही मुलं जेव्हा ही कावकाव ऐकत असू तेव्हा माझी आजी आम्हाला सांगायची, ‘अजून उठायला पुष्कळ वेळ आहे. ते कावळे झिंगल्यामुळे ओरडतायत.’ याच प्रकारचा दृष्टिकोन बुद्धाच्या सहानुभूतीपूर्ण भूमिकेमागेही असावा. तो म्हणतो, जो माणूस भयंकर चिडलेला असतो, तो स्वत: त्या रागाला जबाबदार नसतो. त्याला ‘चढलेली’ असल्यासारखाच तो असतो. त्यामुळे तो त्याचा दोष आहे असं समजू नका, त्याला समोरची गोष्टही दिसत नसते. द्वेषभावनेमुळे माणसाची अशी अवस्था होते.
मनात चालू असलेल्या या दारू गाळण्याच्या -फसफसण्याच्या- आश्चर्यकारक प्रक्रियेकडे आपण आता जरा अधिक लक्ष देऊन पाहू या. संतापाचंच उदाहरण घेऊ या. त्या झकपकीत रेस्टॉरंटमध्ये गेल्या आठवडय़ात तुमचा प्रियकर, मित्र तुम्हाला काय म्हणाला होता ते आठवतंय? किंवा अधिक नेमकं बोलायचं तर तो जे काही म्हणतोय असं तुम्हाला वाटलं होतं ते आठवतंय? संताप तुमच्या अंतर्मनात ‘गाळला’ जात असतो तोपर्यंत तुम्ही स्वत:शी परत परत एकच विचार करत असता. ‘हं, त्याला असं म्हणायचं होतं तर!’ आणि मग तुम्ही तो पुढच्या वेळी भेटेल तेव्हा त्याला काय सुनवायचं याची रंगीत तालीम करू लागता.
खरं म्हणजे अशा प्रसंगातून आपण स्वत:मध्ये, नकारात्मक विचार करण्याची आग्रही प्रवृत्ती हळूहळू विकसित करत असतो. एवढंच नाही, तर ती प्रवृत्ती नीट जोपासली जावी म्हणून नकळत आपण धडपडत असतो. एखादी व्यक्ती काय म्हणाली किंवा काय म्हणाली नाही, तिच्या मनात काय होतं किंवा नव्हतं हा खरा प्रश्न नसतो. खरा प्रश्न असतो की कोणीही आपल्याला काही म्हणालं की ते उगाळत बसण्याची प्रवृत्तीच आपण जोपासत असतो. म्हणजेच मानसिक संतुलन बिघडवण्याची सवय स्वत:ला लावून घेत असतो. तणावाच्या प्रसंगी जे सहज फुटून जाईल, ज्याचं संतुलन राहणार नाही असं आपलं व्यक्तिमत्त्व आपण बनवत असतो. एकदा का या प्रवृत्तीला तार चढली की छोटय़ा छोटय़ा निरुपद्रवी कारणांवरूनदेखील आपल्या मनाचा भडका उडू शकतो. मग आपल्याला इतरांच्या दयेवर जगण्याची वेळ येते. याबद्दल बुद्धाने केलेलं अखेरचं निदान असं आहे : आपल्याला जे काही दु:ख भोगावं लागतं, त्याला कारणीभूत इतर लोक नसतात, तर आपण स्वत:च त्याला कारणीभूत असतो.
या सवयीच्या विरुद्ध जाऊन कृती करणं हाच यावरचा उपाय आहे. इतरांना दोष देऊ नका किंवा त्यांना आरोपी बनवू नका, अशा विचारांपासूनसुद्धा दूर राहण्याचा प्रयत्न करा. थोडय़ाशा डिवचण्यामुळेही द्वेषाची दारू बाटलीच्या बाहेर सांडण्याची शक्यता असेल, तेव्हा बाटलीचं बूच घट्ट लावून टाका आणि आपला मंत्र म्हणून ते आणखी घट्ट करायचा प्रयत्न करा.
या वृत्तीचं माझ्या एका सहा वर्षांच्या मित्राने मला एक चांगलं उदाहरण घालून दिलं. त्याला खजूर खूप आवडतो, पण अंजीर काही तितकेसे आवडत नाहीत. एकदा सकाळी, घाईघाईत असताना, मी नाश्त्यामधून त्याच्यासाठी राखून ठेवलेला एक अंजीर मी त्याला दिला. माझी चूक जेव्हा माझ्या ध्यानात आली तेव्हा तो आता काय म्हणेल याबद्दल मला थोडी काळजी वाटू लागली. त्याच्या चेहऱ्यावर त्याचा नेहमीचाच विचारमग्न भाव होता. आपल्या आईकडे वळून जेव्हा तो म्हणाला, ‘मला वाटतं अंकलनी चुकून मला हे दिलं.’ तेव्हा मला अक्षरश: भरून आलं. हा एवढासा छोटा मुलगा केवढा सकारात्मक दृष्टिकोन बाळगून होता. त्याला खजूर आवडतो हे मी लक्षात ठेवायला हवं होतं हे अगदी खरं. पण त्याने जे सौजन्य दाखवलं ते म्हणजे त्याने आपणा सगळ्यांनाच घालून दिलेला धडा आहे.
एखादी व्यक्ती आपल्याशी जेव्हा तुटकपणे वागते, तेव्हा त्यात अपमान मानणं सोपं असतं. पण ही सवय अशी आहे की ती ज्या प्रकारे लागते त्याचप्रकारे सोडवताही येते. आपल्या मनापासून थोडं दूर व्हा आणि स्वत:ला विचारा, ‘चिडायचं कशाला? तो बिचारा रात्री स्वस्थ झोपला नसेल. शक्यता आहे की घाईघाईने न्याहारी करून निघताना त्याचा पाय जिन्याच्या पायऱ्यावरून घसरला असेल; या सगळ्या दुर्दैवी घटनांतून सावरण्याचा तो अजूनही प्रयत्न करत असेल. त्यामुळे आपण आणखी रागावून त्यालाच दोष देण्यात काय अर्थ आहे?’’कुठल्याही शत्रुभावनेच्या आसवापासून स्वत:चा बचाव करण्याचा मार्गही एकच आहे : कुठलीही अप्रिय स्मृती किंवा नकारात्मक विचार मनात उगाळत बसू नका. आपल्या ध्यानधारणेला जसजशी खोली येईल तसतशी आपली ही मौल्यवान क्षमता वाढत जाईल.
दयाळू बुद्धाकडे जाऊन जर तुम्ही तक्रार केलीत की, ‘‘अमकी एक व्यक्ती मला फार मनस्ताप देते.’’ तर तो कोरडेपणाने म्हणेल, ‘‘तुम्ही मला परिस्थितीचं अचूक वर्णन सांगत नाही आहात. ती व्यक्ती तुम्हाला त्रास देते म्हणून तुम्हाला मनस्ताप होतोय असं नाही, तर तुम्ही त्रास करून घेणारे आहात म्हणून तुम्हाला मनस्ताप होतोय. तुमचं मानसिक संतुलन कायम ठेवता येईल असं बघितलंत तर तुम्हाला मनस्ताप होणार नाही. ध्यानामधून मिळणाऱ्या शक्तीचा उपयोग शत्रुभावनेच्या मद्यार्काचे रूपांतर दयाळूपणाच्या दुधामध्ये करण्यासाठी करा आणि ते करत असताना नातेसंबंध तोडू नका, उलट ज्या व्यक्तींपासून तुम्हाला त्रास होतोय असं वाटेल त्यांच्याबरोबर अधिक वेळ राहण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला खूप कठीण जाणार आहे. पण ज्या व्यक्तींबरोबर अधिक वेळ राहण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात त्यांनाही ते कठीणच जाणार आहे हे ऐकून तुम्हाला कदाचित थोडं बरं वाटेल. त्यांच्या बरोबरीने राहा, त्यांना आधार द्या, निष्ठुर शेरे मारणं आणि निष्ठुर कृती करणं टाळा. सद्भाव निर्माण करण्याचा तोच एक मार्ग आहे. लोकांचे स्वार्थी हेतू न दिसण्याइतका मी काही आंधळा नाही, पण तरीही मी लोकांना कधीही टाळत नाही. मी शत्रुभावनेने माझी दृष्टी झाकोळू देत नाही, प्रेम कमी होऊ देत नाही. मी लोकांशी ठामपणे वागू शकतो; मला त्यांच्याशी कडकपणे वागावं लागण्यासारखे प्रसंगही कधी कधी येतात. पण माझा कडकपणा म्हणजे प्रेमाचा अभाव अशी गैरसमजूत कोणीही कधी करून घेत नाही.
या क्षमता माझ्याकडे जन्मजात नव्हत्या हे मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. ही सहनशीलता आणि हा शांतपणा पुष्कळ सरावानंतर; जमवून घ्यायला कठीण अशा लोकांबरोबर वावरून माझ्यामध्ये आला. संबंधात सुसंवाद साधण्याची क्षमता आपणा सर्वामध्ये सारखीच असते. बुद्धाला सर्वश्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ असं का म्हटलं जातं ते आपल्याला इथे दिसून येतं. ज्यांना वेगळं होण्याची इच्छा असते ते आपल्याला माणसं आवडू नयेत म्हणून मुद्दाम प्रयत्न करत असतात. कारण जसजशी त्यांची माणसांबद्दलची आवड कमी होत जाते तसतसे ते त्यांच्यापासून अधिक दूर जाऊ शकतात. पण सुदैवाने याच्या विरुद्ध असलेली गोष्टही तितकीच खरी आहे : आणि ती म्हणजे जितके तुम्ही लोकांना आवडून घेण्याचा प्रयत्न करता तेवढे तुम्ही त्यांच्याशी एकरूप होऊ लागता- आणि चमत्कार म्हणजे त्यामुळे ध्यानातही आपली अधिकाधिक प्रगती होत आहे असं तुम्हाला जाणवायला लागेल.
(मनावर विजय या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या वैशाली जोशी यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग,साभार)