बोधिवृक्ष : स्वयंप्रकाशाच्या पाऊलखुणा Print

श्री.श्री.रवि शंकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
alt

अहंकार केव्हा निर्माण होतो?
*जेव्हा तुम्हाला महत्त्व मिळत नाही.
*जेव्हा तुम्हाला वाटते की तुमचे महत्त्व कमी होत आहे.
*जेव्हा तुम्हाला महत्त्व मिळते.
अहंकारामुळे जडपणा, गैरसोय, भीती, चिंता निर्माण होतात. अहंकार प्रेमाला प्रवाहित होऊ देत नाही. अहंकार म्हणजे दुरावा, आपलेपणाचा अभाव, सिद्ध करण्याची आणि अधिकार मिळविण्याची गरज. सत्याला ओळखून अहंकाराच्या पलीकडे जाता येते. ‘मी कोण आहे?’ या जिज्ञासेमुळे अहंकाराच्या पलीकडे जाता येते. जो अहंकारी आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात अवलेहना असते किंवा त्याच्याबद्दल तिरस्कार वाटतो. वास्तविक त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये करुणा किंवा दया निर्माण व्हायला पाहिजे.
अहंकाराला एक सकारात्मक बाजू आहे. अहंकारामुळे तुम्ही काम करता. मनुष्य एक तर करुणेपोटी नाही तर अहंकारापोटी काम करतो. समाजामध्ये बहुतेक काम अहंकारामुळे होते, पण सत्संगामध्ये काम प्रेमातून होते. जेव्हा तुम्ही जागृत होता आणि पाहता की काहीच सिद्ध करावयाचे नाही आणि काहीच मिळवायचे नाही तेव्हा अहंकार विरघळून जातो.
निवाडा आणि चांगली संगत
‘मत बनवू नका’, ‘निवाडा करू नका’, ‘धारणा करू नका’ (गृहीतकं वा मते नको) असे सांगितले जाते, पण तरीही रोजच्या वागण्यात अनेक धारणा निर्माण होतात. लोकांच्या कृती आणि वागण्यानुसार तुम्ही त्यांना ‘चांगले’, ‘वाईट’ या श्रेणीमध्ये टाकत असता. हे लक्षात ठेवा की, सर्व काही बदलत आहे. म्हणून धारणांना पकडून ठेवू नका, नाही तर धारणा खडकासारख्या कठीण बनतात. त्यामुळे तुम्ही स्वत: आणि इतरही दु:खी होता.
जर धारणा हवेसारख्या हलक्या, वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे असतील तर त्या सुगंध निर्माण करतात. काही वेळा धारणा दरुगधीसुद्धा निर्माण करतात. अशा वेळी तिथून दूर व्हा. धारणा इतक्या सूक्ष्म असतात, की त्या आहेत याची तुम्हाला जाणीवही होत नाही. आपण जेव्हा प्रेम आणि करुणा या अवस्थेत असतो त्या वेळी आपण धारणेपासून, मतमतांतरांपासून मुक्त असतो. तरी जगात धारणेशिवाय, गृहितकोंशिवाय काहीच चालू शकत नाही. तुम्ही ‘चांगले’ किंवा ‘वाईट’ अशी धारणा केल्याशिवाय कुठलीच कृती करू शकत नाही. बाजारात सडके सफरचंद असतील तर ते ‘चांगले नाहीत’ असे म्हणावेच लागते. तुम्ही चांगले सफरचंदच फक्त विकत घेता. पण एखादी व्यक्ती दहा वेळेस खोटे बोलली तर पुढच्या वेळी बोलताना ती खोटे बोलत आहे असे तुम्हाला वाटेल. धारणा अशा सहज बनतात.
व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकतात हे लक्षात घ्या. म्हणून धारणांना चिकटून बसू नका. तुम्हाला तुमच्या संगतीबद्दल सजग राहावे लागेल. तुमची संगत तुम्हाला वर किंवा खाली नेऊ शकते. जी संगत तुमच्यात संशय, निराशा, दोषारोपण, तक्रारी, क्रोध, भ्रम आणि इच्छा निर्माण करते, ती संगत वाईट आहे. जी संगत तुम्हाला आनंद, उत्साह, सेवा, प्रेम, विश्वास आणि ज्ञानाकडे ओढते ती संगत चांगली संगत आहे.
जेव्हा कुणी तक्रार करतो तेव्हा प्रथम तुम्ही ऐकता, नंतर मान डोलावता, नंतर सहानुभूती दाखविता आणि नंतर तुम्हीसुद्धा तक्रार करू लागता.
जीवनाचा उद्देश
सेवा करणे ही जीवनाची प्राथमिक बांधीलकी आहे. जीवनात जर भीती किंवा गोंधळ असेल तर सेवेची बांधीलकी नाही हे समजावे. ‘मी या जगात सेवा करण्यासाठी आहे’ हा विचारच ‘मी’पणा विरघळून टाकतो आणि ‘मी’पणा विरघळला की ‘चिंता’ विरघळली. तुमची सोय व्हावी किंवा तुम्हाला सुख मिळावे म्हणून काम करणे म्हणजे सेवा नव्हे. जीवनाचा मुख्य उद्देश सेवा हाच आहे.
बांधीलकी नसलेले मन दु:खी राहते. बांधीलकी असलेल्या मनालासुद्धा कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल, पण त्याच्या परिश्रमाचे चांगले फळ निश्चित मिळते.
तुम्ही जेव्हा सेवा हाच जीवनाचा उद्देश बनवता तेव्हा भय मिटते, संकल्प दृढ होतात, मन एकाग्र होते, अल्पकालीन कठीण प्रसंगानंतर दीर्घकालीन आनंद मिळतो.
यश
तुम्हाला काहीच मिळवायचे नसेल तर यशाचा प्रश्नच येत नाही. तुम्ही फक्त देण्यासाठी व सेवेसाठी आला असाल तर काही मिळविण्याचा प्रश्नच येत नाही. यश म्हणजे श्रेष्ठतेचा भाव नसणे.  जे श्रेष्ठ आहे त्याला हार नाही. यशाच्या मागे पळणारे लोक आपली मर्यादा उघड करीत असतात.
यश म्हणजे सीमोल्लंघन. सीमोल्लंघन करावयाचे असेल तर सीमा आहे हे गृहीत धरावे लागेल. सीमा गृहीत धरणे म्हणजे स्वत:ला कमी लेखणे. जर तुमच्या क्षमतेला सीमा नसतील तर यश कुठे आहे? तुम्हाला जर असीम, अमर्याद क्षेत्र मिळाले तर मग यश नाही. तुम्ही असं कधी म्हणत नाही की मी एक ग्लास पाणी पिण्यात यशस्वी झालो. कारण ते तुमच्या कुवतीच्या आत आहे, पण तुमच्या कुवतीच्या बाहेर काही केले तर तुम्ही यश मिळविले असे म्हणता.
स्वत:च्या अनंततेची जाण झाल्याबरोबर तुमची कोणतीही कृती उपलब्धी या विशेषणापासून मुक्त होईल.
जो यशस्वी झाल्याचा दावा करतो तो आपली मर्यादाही जाहीर करतो. जर आपण फारच यशस्वी आहोत असे आपल्याला वाटत असेल तर आपले सामथ्र्य आपण खूप कमी लेखत आहात. तुमच्या सर्व ‘उपलब्धी’ तुमच्यापेक्षा लहान आहेत. कोणत्याही उपलब्धींबद्दल अभिमान बाळगणे म्हणजे स्वत:ला कमी लेखणे होय.
प्रेमात पडणे
पूर्णपणे प्रेममय होणे स्फूर्ती देते, प्रेरणा देते. त्यामुळे ज्ञान वापरण्यासाठी विश्वास निर्माण होतो. अपार प्रेमात पडण्याची ओळख आहे कधीही न संपणारे हास्य. आत्म्याला ना दु:ख आहे ना मृत्यू आणि तरीही त्यामध्येच सर्व घटना घडतात. तुम्ही प्रेमात नसता तेव्हा वैराग्य सोपे आहे, पण खूप प्रेमात पडूनसुद्धा निश्चल राहणे, काळजी करणे, पण चिंतित न होणे, सातत्य असूनही चलबिचल होऊ न देणे या स्वयंप्रकाशाच्या पाऊलखुणा आहेत. तुमचे वैराग्य झाकून ठेवा, पण प्रेमाची अभिव्यक्ती करा. तुमचे वैराग्य सांगितल्याने जीवनामधला उत्साह कमी होतो आणि प्रेमाची अभिव्यक्ती न केल्यामुळे तुमचा कोंडमारा होतो.
प्रेमाचा हेतू काय आहे?
प्रेम स्वयं साध्य आहे, साधन नाही. हेतू हा नेहमीच ज्याला शेवट आहे अशाशी जोडलेला असतो. स्वयंपाकाचा हेतू खाणे हा आहे. सुखसोयींचा हेतू जगणे हा आहे. झाड फुलते, त्याचा काय हेतू असतो? प्रेम मात्र स्वत:च साध्य आहे, प्राप्ती आहे.
प्रत्येक गोष्टीचे प्रयोजन प्रेम आहे. गुरू प्रेम आहेत. गुरू अशी प्रेमज्योती पेटवतात, जी भीती, चिंता, द्वेष, लोभ, हेवा यांच्या पलीकडे असते. असे प्रेम की जे साऱ्या जगभर पसरून जाते. प्रेमाचा उद्देश काय आहे? हा प्रश्नच गैरलागू आहे. सगळ्या इच्छा आनंदासाठी असतात. इच्छेचा हाच उद्देश असतो नाही का? पण इच्छेच्या स्वरूपाबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे काय? त्याचा सरळ अर्थ आहे उद्या. आत्ता नाही. आनंद हा उद्या कधीही नसतो तो नेहमी आत्ता या क्षणी असतो.
इच्छा असतील तर तुम्ही आत्ता या क्षणी आनंदी कसे होऊ शकाल? इच्छा तुम्हाला आनंदाकडे नेतात असे तुम्हाला वाटते, पण त्या नेऊ शकत नाहीत हेच खरे आहे. म्हणून इच्छा माया आहे.
सेवा
तुम्ही दुसऱ्याची सेवा करता तेव्हा तुम्हाला जे केले ते पुरेसे केले नाही असे वाटेल, पण तुम्हाला आपण अयशस्वी झालो असे वाटणार नाही. जे केले ते कमीच आहे असे जेव्हा वाटते तीच सेवा खरी. धर्माचे कार्य माणसाला सदाचारी आणि प्रेमळ बनविणे हे आहे, तर राजकारणाचे कार्य लोकांची काळजी घेणे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे हे आहे. सच्चा राजकारणी धार्मिक असल्याशिवाय सदाचारी आणि प्रेमळ होणार नाही. आज राजकारण आणि धर्म दोन्हींमध्ये सुधारणा आवश्यक आहेत. धर्म अधिक विस्तृत पायावर उभा हवा, अधिक उदार हवा. धर्म आध्यात्मिक होऊन सर्वाना पूजेचा अधिकार दिला जावा, तसेच पूर्ण विश्वातील ज्ञानाला स्वीकारणारा हवा, तसेच राजकारण्यांनी अधिक सदाचारी आणि आध्यात्मिक बनायला हवे.
(‘आनंदाचे गुरू’ या साकेत प्रकाशनाच्या अ‍ॅड. अंकुश भालेराव यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)