बोधिवृक्ष : पैशांची काळजी सोडा Print

लुईस एल. हे ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
alt

‘जे सर्वोत्तम आहे ते मिळायला मी पूर्णपणे लायक आहे.’
वरील वाक्य तुमच्याबाबतीत खरं करायचं असेल तर खालील विधानांवर अजिबात विश्वास ठेवू नका.
पैसे झाडावर लागत नाहीत.
पैसा फार वाईट असतो आणि वाईट मार्गाला लावतो.
पैसा सैतान आहे.
मी गरीब असलो तरी प्रामाणिक आहे.
श्रीमंत माणसं लबाड असतात.
मला पैशाच्या मागे लागायचं नाही.
पैसा वाचवणं म्हणजे पैसा कमावण्यासारखंच आहे.
मेहनत केली तरच पैसा मिळतो.
असे कितीतरी गैरसमज तुम्ही करून घेतले आहेत? अशा विचारांवर विश्वास ठेवून तुम्हाला पैसा, वैभव मिळेल, असं खरंच वाटतं तुम्हाला? हे विचार फार जुने आणि संकुचित झाले आहेत. आपले वाडवडील असा विचार करीत आले म्हणून आपणही करतो. पण तुम्हाला वैभव प्राप्त करायचं असेल तर या गोष्टीवर मुळीच विश्वास ठेवू नका.
आपण वैभव प्राप्त करायला पात्र आहोत, मग कितीही अपयश येवो, यावर आपला जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत ते आपल्याला पटणारच नाही व त्यामुळे सत्यात उतरणार नाही. हे उदाहरण बघा.
एक तरुण माझ्या कार्यशाळेत काम करीत होता. एकदा तो अतिशय उत्तेजित होऊन आला, कारण त्याने ५०० डॉलर जिंकले होते. तो सारखा म्हणत होता, माझा तर विश्वासच बसत नाही. मी एवढे पैसे कधीच जिंकले नव्हते. ही प्रतिक्रिया त्याची जाणीव बदलत असल्यामुळे झाली आहे, हे आम्हाला समजत होतं; परंतु आपण या पैशाला पात्र नाही, असंच तो समजत होता. नंतर तो क्लासला आलाच नाही. त्याचा पाय अपघातामध्ये मोडला होता. त्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये ५०० डॉलर खर्च आला.
तो पुढं जायलाच घाबरत होता. श्रीमंती वैभव याला आपण लायक नाही, असंच तो समजत होता. म्हणून त्याने स्वत:ला ही शिक्षा करून घेतली.
आपण ज्याचा जास्त विचार करतो तेच खरे होते, वाढते. म्हणून तुमच्या खर्चाचा विचार जास्त करू नका. केलात तर खर्च आणखी वाढतच जाईल.
जगात इतकं आहे की, तुम्हाला पुरवण्यात कुठेही कमी पडणार नाही आणि हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. तुमच्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. ते वाढत जाईल. मी तर माझे घर, ऊन, पाऊस, प्रकाश, टेलिफोन, फर्निचर, नळ, उपकरणे, कपडे, वाहने, नोकरी, माझ्याजवळचे पैसे, माझे मित्र, स्पर्धा करण्याची, चव घेण्याची, चालण्याची क्षमता, या अद्भुत धरतीवर आनंदाने जगायला मिळतेय, या सगळ्यांबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त करीत असते.
आपला कमीपणा आणि संकुचितपणा हा गैरसमज आपण सतत बाळगत असतो म्हणूनच आपला विकास होत नाही. कोणत्या बंधनात अडकला आहात तुम्ही? दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला पैसा कमवावा असं वाटतंय का? याचा अर्थ तुम्ही बेकार आहात.
तुम्ही वैभव नाकारता आहात, असे कधीच मनात आणू नका. एखाद्या मित्राने तुम्हाला जेवायला बोलावले तर आनंदाने जा. औपचारिकपणा पाळण्यासाठी जात आहोत, असे समजू नका. एखाद्याने प्रेझेन्ट दिले तर मोकळ्या मनाने स्वीकार करा. तुम्ही स्वीकारायला तयार आहात, हे जगाला कळू द्या.
नव्यासाठी जागा करा
रेफ्रिजरेटर मोकळा करा. आधी साचवून ठेवलेलं काढून टाका. कपाट रिकामं करा. गेल्या सहा महिन्यांत जे वापरलं नाही ते सगळं काढून टाका. जे सबंध वर्षांत वापरलं नाही ते तर घराबाहेरच टाकून द्या. विकून टाका. काहीही करा.
साचलेले कपाट म्हणजे साचलेलं मन. कपाट साफ करताना मी माझं मनच साफ करीत आहे, असे समजा किंवा तसे मोठय़ाने चक्क म्हणा. निसर्गाला या सांकेतिक गोष्टी आवडतात.
जगामध्ये सगळ्यांसाठी भरपूर आहे, हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला ते वाक्य हास्यास्पद वाटलं. आपण गरीब आहोत, हा विचार आपल्या मनात इतका पक्का बसला आहे की तोच आपल्या गरिबीचं कारण आहे.

मला तर फारच राग यायचा. मी श्रीमंत नाही याला दुसरं कोणी नाही मीच कारणीभूत आहे. मी लायक नाही, मी पात्र नाही, पैसा कमावणं कठीण असतं, माझ्यात तेवढी धमक, हुशारी नाही या सगळ्या समजुतींनी मला श्रीमंत होण्यापासून मागे ओढलं आहे.
पैसा कमावणं फार सोपं आहे. कसं वाटलं हे वाक्य? त्यावर विश्वास बसतो तुमचा? चीड येते? तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात का? हे पुस्तक तुम्हाला खिडकीतून बाहेर फेकून द्यावंसं वाटतंय का? तसं असेल तर ते चांगलं लक्षण आहे. मी तुमच्या मर्मावरच बोट ठेवले म्हणायचे! ज्या ठिकाणी तुम्ही सत्याला विरोध करीत आहात अगदी तिथेच! याच ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचंय. पैशाचा ओघ स्वीकारायला आता तुम्ही तयार राहिले पाहिजे.
बिलांवर प्रेम करा
हो, मला नेमकं हेच म्हणायचंय! बिलं बघून चिडायचं आता बंद करा. पैशाची काळजी करणं आता सोडून द्या. पुष्कळांना एक तारखेला आलेली बिलं आवडत नाहीत. ही बिलं म्हणजे आपल्या देण्याच्या क्षमतेची जाणीव करून देतात. तुमची देण्याची ऐपत आहे म्हणूनच दुकानदार तुम्हाला उधार देतो आणि महिन्यानंतर मागतो.
मला तर जितकी बिलं येतील तितका आनंद होतो. मी तर त्या बिलांचे आणि लिहिलेल्या चेकचे कधी कधी हलकेसे चुंबनही घेते. तुम्ही जर उधारी चुकवताना चिडाल, तर तुमच्याकडे पैसा कधीही येणार नाही. तुम्ही आनंदाने बिलं चुकती केली तर पैशाचा ओघ दुसरीकडे जात होता तो तुमच्याकडे वळेल. पैशांना मित्र समजा. जबरदस्तीनं खिशात कोंबायची वस्तू असे समजू नका.
तुमची नोकरी, तुमचा बँकेतला अकाउन्ट किंवा तुमची गुंतवणूक किंवा तुमची बायको-मुलं ही काही तुमची हमीपत्रे नाहीत; तर या सगळ्या गोष्टी ज्याने निर्माण केल्या त्या परमेश्वराशी संपर्क साधण्याची तुमची क्षमता हीच तुमची हमी आहे.
जी बाहेर शक्ती आहे तीच माझ्यात आहे, असं मला वाटतं. या वैश्विक शक्तीकडे अमाप आणि अमर्याद असं देण्यासारखं आहे आणि आपल्याला ज्याची गरज आहे ते मिळविण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे.
फोन करताना मी नेहमी फोनला धन्यवाद देते. फोन हे पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि प्रेम व्यक्त करण्याचे एक साधन आहे, असे मला वाटते. मला जेव्हा मित्रांची, पेशन्टची जिव्हाळ्याची पत्रे येतात, मनिऑर्डर्स येतात, तेव्हा मी माझ्या पोस्ट बॉक्सचेसुद्धा आभार मानते. निरनिराळी बिलं येतात तेव्हा माझ्या पैसे देण्याच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास आहे. म्हणून मी त्यांचे आभार मानते. माझ्या दारावरच्या बेलचे आणि प्रवेशद्वाराचेदेखील आभार मानते, कारण घरात जे येणार आहे ते चांगलंच असणार आहे याची मला खात्री असते. माझं आयुष्य चांगलं आणि आनंदात जावं, असं मला वाटतं आणि ते तसं आहेच.
इतरांच्या उत्कर्षांवर जळू नका
तुमचा उत्कर्ष लवकर व्हावा, असे वाटत असेल तर दुसऱ्यांच्या उत्कर्षांवर जळू नका. ते कसे वाटेल तसा पैसा खर्च करीत आहेत, यावर टीका करू नका. त्यांच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. प्रत्येकाचे स्वत:चे असे काही कायदे किंवा नियम असतात. तुम्ही फक्त तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा. इतरांच्या श्रीमंतीचं कौतुक करा. सर्वासाठी अजून पुष्कळ आहे, हे लक्षात ठेवा.
तुम्ही झाडूवाल्याशी उद्धटपणे वागता का? तुम्ही दसरा-दिवाळीला नोकरांना इनाम द्यायचं टाळता का? ऐपत असूनही तुम्ही चिक्कू माणसाप्रमाणे एकेक पै वाचविण्यासाठी स्वस्तातली शिळी भाजी विकत घेता का? स्वस्तातला माल विकत घेता का? हॉटेलात गेल्यावर सर्वात कमी किंमत असलेली डिश मागविता का? मागणी तसा पुरवठा असा एक नियम आहे. यात मागणी प्रथम असते. जिथे मागणी असते तिथेच आधी पैसा जातो, हे लक्षात ठेवा. तुमचा उत्कर्ष पैशांवर अवलंबून नाही, तो तुमच्या उत्कर्षांच्या जाणिवेवर अवलंबून आहे. तो विचार जेवढा मनात रुजवाल तितकं जास्तीतजास्त तुम्हाला यश मिळेल.
(‘यू कॅन हील युवर लाइफ’ या साकेत प्रकाशनाच्या डॉ. अरुण मांडे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातून साभार.)