बोधिवृक्ष : घेण्या-देण्याचा नियम Print

दीपक चोप्रा , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

हे संपूर्ण विश्व गतिशील पद्धतीने घेण्या-देण्यावरच चालत असते. ‘घेणे आणि देणे’ हे जगातील ऊर्जाप्रवाहाचे दोन भिन्न पैलू आहेत. जे आपण मिळवू इच्छितो, तेच दुसऱ्याला देण्याच्या तत्परतेद्वारे आपण संपूर्ण विश्वातच जीवनाचा संचार करीत असतो. सफलतेचा एक आध्यात्मिक नियम म्हणजे ‘देण्याचा नियम’. त्यालाच आपण घेण्या-देण्याचा नियमही म्हणू शकतो. त्याचे कारण हे संपूर्ण ब्रह्मांडच गतिशील विनिमयावर आधारलेले आहे. या ब्रह्मांडात काहीच स्थिर नाही. तुमचे शरीरदेखील ब्रह्मांडासोबत निरंतर गतिशील आहे. या ब्रह्मांडात काहीच स्थिर नाही; म्हणूनच गतिशील आणि स्थिर विनिमयातून तुमच्या शरीरात ऊर्जा प्रवाहित होत असते. या ब्रह्मांडासोबत तुमचा मेंदूदेखील सातत्याने परस्पर गतिशील संबंध जोडून ठेवत असतो. तुमची ऊर्जा ही ब्रह्मांडाच्या ऊर्जेचेच प्रतिबिंब आहे.
जीवनप्रवाहाच्या अस्तित्वासाठी आवश्यक तत्त्वांचा आणि शक्तींचा ताळमेळ असण्याची आवश्यकता असते. त्याव्यतिरिक्त कशाचीच आवश्यकता नसते. तुमच्या जीवनातील या सर्व तत्त्वांचा ताळमेळ असणे यालाच ‘घेण्या-देण्याचा’ नियम म्हणतात. कारण तुमचे शरीर, मेंदू आणि ब्रह्मांड यांचा स्थिर आणि गतिशील विनिमय चालत असतो. ऊर्जेचा प्रवाह थांबविणे किंवा रक्ताचा प्रवाह थांबविणे या क्रियांचे उदाहरण घेतले तर लक्षात येईल की, जेव्हा रक्ताचा प्रवाह थांबविला जातो तेव्हा रक्त साचू लागते आणि ते साचलेले रक्त नंतर सडू लागते. त्यावरून लगेच लक्षात येईल की, आपल्या जीवनात आपल्याला ज्या कोणत्या गोष्टीची अभिलाषा असेल, आवड असेल किंवा ती गोष्ट मिळावी असे वाटत असेल तेच धन असते. धन असो की समृद्धी असो, ते निरंतर देण्याच्याच स्थितीत ठेवले पाहिजे.
आपले नातेसंबंधदेखील एक प्रकारच्या घेण्या-देण्यावरच आधारित असतात. आपण काही दिले तरच आपल्याला काही प्राप्त होत असते आणि प्राप्त झाल्यावरच आपण ‘देण्याला’ तयार होतो. जी वस्तू वर जाते, ती पुन्हा खाली येतच असते. त्याचप्रमाणे बाहेर जाणारी वस्तू पुन्हा आत येतच असते. प्रत्यक्षात ‘घेणे आणि देणे’ या दोन्ही क्रिया एकसारख्याच आहेत; कारण या ब्रह्मांडात ‘घेणे-देणे’ हे ऊर्जेच्या प्रवाहाचे दोन भिन्न पैलू आहेत. यापैकी कोणत्याही एका प्रवाहाला थांबविण्याचा प्रयत्न करणे याचा अर्थ निसर्गाच्या नियमांशी खेळ करणे असाच होईल.
प्रत्येक बीजामध्ये अरण्य निर्माण करण्याची क्षमता असते, हे खरे आहे; परंतु बीज सांभाळून ठेवण्यासाठी नसते. त्या बीजाला सुपीक जमिनीत पेरणे यातच समजूतदारपणा आहे. बीज जमिनीला दिले जाते. त्या ‘देण्या’मुळेच भौतिक जगताला अदृश्य ऊर्जा प्राप्त होईल. तुम्ही जितके द्याल त्याच्या मोबदल्यात तुम्हाला तितकेच मिळणार आहे. त्याचे कारण तुम्ही ब्रह्मांडाच्या प्रवाहाला आपल्या जीवनातदेखील ‘गतिमान’ करून ठेवलेले असते. जीवनात कोणतीही गोष्ट तेव्हाच दुप्पट-चौपट होऊ शकते, जी अगोदर ‘दिलेली’ असते. जी गोष्ट दिल्यामुळे वाढत नसते, ती देण्यासाठी योग्य नसते आणि घेण्यासाठीही योग्य नसते.
‘घेण्या-देण्या’मागची तुमची भावना कशी आहे, याला फार महत्त्व असते. म्हणून भावना नेहमी चांगलीच असायला पाहिजे. घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला अशा दोघांनाही आनंद वाटला पाहिजे. कसल्याही प्रकारची अट न घालता, मोकळ्या मनाने काही दिले असेल तरच अधिक प्रसन्नता वाटेल.
देण्याच्या नियमाचा अभ्यास फारच सोपा-सुलभ आहे. जर तुम्ही आनंदी राहू इच्छित असाल तर तुम्ही इतरांना अगोदर आनंदी ठेवा. जर तुम्हाला प्रेम हवे असेल तर तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल प्रेमाची भावना निर्माण करा. कोणी तुमची काळजी घ्यावी आणि तुमची प्रशंसा करावी, असे तुम्हाला वाटत असेल तर अगोदर तुम्ही इतरांची काळजी घ्यायला शिका आणि प्रशंसा करायला शिका. तुम्हाला भौतिक सुखसमृद्धी प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तुम्ही इतरांना भौतिक सुखसमृद्धी मिळविण्यासाठी साह्य़ करा. तुम्हाला स्वत:ला जे मिळावे असे वाटते ते इतरांना मिळावे, यासाठी तुम्ही मदत करा. हा सिद्धान्त व्यक्तींना आणि संस्थांना, राष्ट्रालाही समान रीतीने लागू होतो. जर तुम्ही जीवनातील सुखसमृद्धीच्या साधनांचा लाभ घेऊ इच्छित असाल तर इतरांनादेखील तोच आणि तेवढाच लाभ मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवा आणि त्यांना साह्य़ करायला हवे. देण्याची भावना असणे आणि त्यामागे शुभकामना असणे महत्त्वाचे असते. कारण तसे करण्यासाठी प्रार्थना करण्यातून जी शक्ती निर्माण होते तीच इतरांना प्रभावित करते. आपले शरीर आपल्याच ‘मूळ रूपात’ जेव्हा असते तेव्हा विश्वव्यापी ऊर्जा आणि ज्ञानाचेच ते सूक्ष्म रूप असते. जेव्हा.. तुम्ही ज्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी त्या गोष्टीचा शोध घेत असता आणि तीच गोष्ट द्यावी कशी, हे तुम्ही शिकत असता तेव्हाच.. ती क्रिया तुमच्या जीवनात अत्यधिक स्फूर्ती आणि गती निर्माण करीत असते.
देण्याच्या नियमाचे पालन करणे आणि त्या नियमानुसार जीवनात आचरण करणे यासाठी सोपा उपाय असा आहे की, सर्वात अगोदर निश्चय केला पाहिजे. जेव्हा कधी आपण कोणाच्या संपर्कात येऊ तेव्हा अगोदर त्या व्यक्तीला आपण काही ना काही अवश्य द्यायला हवे. केवळ भौतिक वस्तू दिली पाहिजे, असे मुळीच नाही. द्यायचे म्हणजे एखादे फूल दिले तरी ते देणेच होय. नुसती प्रशंसा केली तरी त्या व्यक्तीला बरे वाटेल. शुभेच्छा व्यक्त करणे, चांगले व्हावे अशी शुभकामना व्यक्त करणे हेदेखील एकप्रकारे देणेच असते. खरे म्हणजे भौतिक वस्तू देणे तेवढे महत्त्वाचे नसते. याउलट एखाद्याचे इष्टचिंतन, शुभेच्छांची अभिव्यक्ती अधिक प्रभावी, परिणामकारक असते. देण्याच्या नियमाचे अशा पद्धतीने पालन केले तर देण्याचा नियम आपण आचरणात आणला असाच अर्थ होईल.
मी लहान असताना मला एक गोष्ट अतिशय परिणामकारक रीतीने शिकविण्यात आली होती. ती माझ्या मन:पटलावर कोरली गेली. तीच गोष्ट मी माझ्या मुलांनासुद्धा शिकविली. ती गोष्ट अशी की, जेव्हाही तुम्ही कोणाच्याही घरी जाल तेव्हा रिकाम्या हाताने जाऊ नका. कोणाला काही दिल्याशिवाय राहू नका. तुमच्यापैकी कोणी कदाचित असेही म्हणू शकेल की.. ‘‘मी दुसऱ्यांना काय बरे देऊ शकतो? जर माझ्याजवळ पुरेसे काहीच नाही तर मी देणार तरी काय?’’ पण या म्हणण्यात काही अर्थ नाही. एक अतिशय लहानसे फूलसुद्धा दिले तरी चालेल. एखादे शुभेच्छा कार्डदेखील देऊ शकता. तुम्ही ज्या व्यक्तीला ते फूल किंवा ते कार्ड द्याल तेव्हा त्या व्यक्तीला जाणवेल की तुम्ही चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्ही जेथे जात असाल आणि तेथे तुम्हाला जे कोणी भेटेल त्या व्यक्तीला तुम्ही काही ना काही तर द्यायलाच हवे. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना काही देता तेव्हा तुम्हालाही काहीतरी मिळेलच. हा नियम तसाच आहे आणि काहीसा चमत्कारिकही वाटू शकतो. जितके जास्तीतजास्त तुम्ही द्याल, तेवढा जास्तीतजास्त आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होईल. तुम्हाला जेवढेही जास्त मिळेल तेवढेच जास्त देण्याची क्षमता तुमच्यात वाढत जाईल.
आपली मूळ प्रकृतीच विपुल आणि समृद्ध आहे. आपल्याजवळ अमर्याद भांडार आहे. त्याचे कारण प्रकृतीच आपल्या आवश्यकतांची आणि इच्छांची पूर्तता करते. आपल्याजवळ कोणत्याच वस्तूची, कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. आपली मूळ प्रकृती विशुद्ध सामथ्र्य आणि अनंत शक्यतांनी युक्त आहे. म्हणूनच तुम्हाला हे माहीत असायला हवे की, तुम्हाला वारसाहक्काने फार काही मिळाले आहे. तुमच्याजवळ किती अधिक धन आहे किंवा किती कमी प्रमाणात धन आहे, हे या वेळी महत्त्वाचे नाही. कारण मूळ स्रोत ‘विशुद्ध सामथ्र्य’ आहे. आपल्या चेतनेला हे ज्ञात आहे की, आवश्यकता, प्रसन्नता, प्रेम, शांती, सहयोग आणि ज्ञान यांची पूर्तता कशी केली जाते? जेव्हा तुम्हाला कोणत्याही वस्तूची, कसल्याही गोष्टीची आवश्यकता भासेल किंवा प्राप्त करून घेण्याची इच्छा होईल तेव्हा स्वत:साठी ती इच्छा होऊनसुद्धा अगोदर तीच गोष्ट इतरांना प्राप्त व्हावी, अशी इच्छा तुम्हाला जर झाली आणि त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी अगोदर तुम्ही प्रयत्न केला तर सर्व काही सहजतेने उपलब्ध होईल.
(‘सफलतेचे सात आध्यात्मिक नियम’ या साकेत प्रकाशनच्या विद्याधर सदावर्ते यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील भाग, साभार)