बोधिवृक्ष : शिक्षण Print

alt

महात्मा गांधी , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
टॉलस्टॉय आश्रमामध्ये मुला-मुलींसाठी शिक्षणाची काही तरी व्यवस्था करणे आवश्यक होते. माझ्याबरोबर हिंदू, मुसलमान, पारशी व ख्रिस्ती नवयुवक होते आणि थोडय़ा हिंदू मुलीही होत्या. निराळे शिक्षक ठेवणे अशक्य होते व मला अनावश्यक वाटले. अशक्य होते, कारण लायक हिंदी शिक्षक दुर्मीळ होते आणि मिळाले तरी लठ्ठ पगार मिळाल्याखेरीज डरबनपासून २१ मैल दूर कोण कशाला येईल? माझ्यापाशी तरी पैशाचे पेव थोडेच भरलेले होते? बाहेरून शिक्षक आणणे अनावश्यकही वाटले, कारण चालू शिक्षणपद्धती मला पसंत नव्हती. योग्य पद्धती कोणती याचा मी अनुभव मिळविला नव्हता. एवढे समजत होते की, आदर्श स्थितीमध्ये खरे शिक्षण आई-बापांच्या हाताखालीच मिळणार. आदर्श स्थितीमध्ये बाह्य़ मदत कमीत कमी असली पाहिजे.
 टॉलस्टॉय आश्रम हे एक कुटुंब होते व त्यात पित्याच्या स्थानी मी होतो. अर्थात मलाच या नवयुवकांना घडविण्याची जबाबदारी यथाशक्ती उचलली पाहिजे, असा मी विचार केला. या समजुतीमध्ये पुष्कळ दोषही होते. हे नवयुवक माझ्यापाशी जन्मापासून नव्हते. प्रत्येकजण निरनिराळ्या तऱ्हेच्या वातावरणात वाढलेला होता. सगळे एका धर्माचेही नव्हते. अशा स्थितींतील मुलांचा व मुलींचा मी पिता बनलो तरी त्यांचा मी यथायोग्य सांभाळ कसा करणार? पण मी हृदयाच्या शिक्षणाला म्हणजे चारित्र्याच्या विकासाला नेहमीच प्रथम स्थान देत आलो आहे आणि चारित्र्याचे ज्ञान वाटेल त्या वयाच्या व वाटेल त्या वातावरणात वाढलेल्या मुलामुलींना, कमीजास्त प्रमाणात का होईना, पण देता येईलच, असा विचार करून मी मुलांबरोबर पित्याच्या नात्याने रात्रंदिवस राहत असे. चारित्र्य हाच त्यांच्या शिक्षणाचा पाया आहे, असे मानून मी चाललो. पाया पक्का झाला तर मुले सवड मिळेल त्याप्रमाणे बाकीचे, दुसऱ्याची मदत घेऊन किंवा स्वत:च्या बळावरही मिळवू शकतील. तरी पण अक्षरज्ञान थोडेबहुत तरी दिलेच पाहिजे हे मी समजून होतो. म्हणून वर्ग काढले आणि त्या कामी मि. कॅलनबॅक व प्रागजी देसाई यांची मदत घेतली.
शारीरिक शिक्षणाची आवश्यकता मला कळत होती, पण ते शिक्षण त्यांना सहजी मिळत होते. आश्रमात नोकर तर नव्हतेच. पायखान्यापासून स्वयंपाकघरापर्यंतची सर्व कामे आश्रमवासीयांनीच करावयाची होती. फळझाडे पुष्कळ होती. नवीन लागवड करावयाची होती. मि. कॅलनबॅकना शेतीची आवड होती. सरकारी आदर्श बगिच्यांमध्ये ते स्वत: काही दिवस शिकून आले होते. स्वयंपाकात गुंतलेल्याखेरीज इतर सर्व लहान-मोठय़ांना रोज ठरावीक वेळ बगिच्यामध्ये काम करावे लागत असे. मुलांकडून त्या कामी भरपूर मदत होई. मोठे खड्डे खणणे, झाडे तोडणे, ओझी वाहून नेणे इत्यादी कामांमध्ये त्यांची शरीरे चांगली कसून निघत. त्यांना त्या कामाची मौजही वाटे आणि ही कामे असल्यामुळे त्यांना इतर कसरत किंवा खेळ यांची आवश्यकता राहत नसे. कामाच्या बाबतीत काही विद्यार्थी किंवा कधीमधी सर्वच विद्यार्थी टंगळमंगळ करीत, आळस करीत. पुष्कळ वेळा मी तिकडे दुर्लक्ष करीत असे, कधी सक्तीनेही त्यांच्याकडून काम करून घेत असे. जेव्हा सक्ती करीत असे तेव्हा ते कंटाळत, हेही माझ्या लक्षात येई. तरी सक्तीचा प्रतिकार कोणी कधी केल्याचे स्मरत नाही. जेव्हा जेव्हा सक्ती करीत असे तेव्हा तेव्हा त्यांची समजूतही घालीत असे व त्यांच्याकडूनच कबूल करून घेत असे की, कामाच्या वेळी खेळ ही सवय बरी नव्हे. त्यांची त्या क्षणी समजूत पडे, दुसऱ्या क्षणाला विसर पडे. अशा तऱ्हेने गाडे रेटत असे; तरी पण त्यांची शरीरे मात्र कसलेली बनत होती.
आश्रमात आजार क्वचितच येई. त्याचे एक मुख्य कारण हवापाणी आणि योग्य व नियमित आहार हे होते, हे येथे नमूद केले पाहिजे. शारीरिक शिक्षणाबरोबर औद्योगिक शिक्षणाचाही उल्लेख करून टाकतो. सर्वाना काही तरी उपयुक्त धंदा शिकवावयाचा असा बेत होता. त्यासाठी मि. कॅलनबॅक ट्रॅपिस्ट मठामध्ये चपला बनविण्याचे काम शिकून आले. त्यांच्यापासून मी शिकलो आणि जी मुले हा धंदा शिकायला तयार झाली त्यांना मी शिकविले. मि. कॅलनबॅकना सुतारकामाचा थोडासा अनुभव होता आणि आश्रमात सुतारकाम जाणणारा आणखी एक जोडीदार होता. त्यामुळे ते कामही थोडेथोडे शिकविले जात असे. स्वयंपाककाम तर बहुतेक सर्व मुलांनी शिकून घेतले.
ही सर्व कामे मुलांना नवीन होती. असली कामे शिकावी लागणार असे त्यांच्या स्वप्नामध्येही नव्हते. दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदी मुलांना जे काही शिक्षण मिळे, ते फक्त अक्षरज्ञानाचेच असे. टॉलस्टॉय आश्रमामध्ये प्रथमपासूनच असा रिवाज पडलेला होता, की जे काम आम्ही शिक्षक करणार नाही ते मुलांकडूनही करवून घ्यायचे नाही. म्हणून नेहमी त्यांच्याबरोबर तेच काम करणारा एक शिक्षकही राही. त्यामुळे मुले हौसेने शिकत.
शारीरिक शिक्षण व तद्नुषंगाने कसले तरी हस्तकौशल्य शिकविण्याचे काम टॉलस्टॉय आश्रमामध्ये कशा तऱ्हेने चालविले जात असे, ते आपण पाहिले. ते काम मी स्वत:ला पूर्ण संतोष वाटेल, अशा तऱ्हेने करू शकलो नाही, हे जरी खरे असले, तरी त्या कामी थोडेसे तरी यश मिळाले, पण अक्षरज्ञान देणे कठीण पडले. त्या कामाला पुरेशी साधने माझ्यापाशी नव्हती. मला स्वत:ला इच्छा होती तेवढी फुरसत मिळेना. माझे ज्ञानही पुरेसे नव्हते. सबंध दिवसभर शारीरिक काम करून मी थकून जात असे आणि थोडासा कोठे आराम घ्यायला पाहावे त्याच वेळी वर्ग घ्यायचे असत. त्यामुळे मी ताजातवाना असण्याऐवजी त्या वेळी महाप्रयत्नाने जागा राहत असे एवढेच. सकाळचा वेळ शेती आणि गृहोद्योग यामध्ये जात असे. त्यामुळे दुपारी जेवणानंतर लगेच शाळा चालू होई. याखेरीज दुसरा कोणताही वेळ सोयीस्कर नव्हता.
पुस्तकी शिक्षणासाठी अधिकात अधिक तीन तास ठेवलेले होते. शिवाय वर्गात हिंदी, तामिळ, गुजराथी व उर्दू इतक्यांचे शिक्षण द्यायचे असे. प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेतूनच शिक्षण द्यायचे असा निर्धार होता. इंग्रजीही सर्वाना शिकविले जात असे. त्याखेरीज गुजराती, हिंदू मुलांना संस्कृत व सर्वानाच हिंदीचे थोडे थोडे ज्ञान द्यायचे. इतिहास, भूगोल व अंकगणित सर्वानाच शिकवायचे असा क्रम होता. तामिळ व उर्दू शिकविण्याचे काम माझ्याकडे होते.
माझे तामिळ ज्ञान म्हणजे आगबोटीवर व तुरुंगामध्ये मिळविलेले. उर्दू लिपीचे ज्ञान आगबोटीमध्ये मिळविले होते तेवढेच आणि खास फारशी किंवा अरबी शब्दांचे ज्ञान म्हणजे मुसलमान मित्रांच्या सहवासाने मिळविता आले तेवढेच! संस्कृत हायस्कुलात शिकलो होतो तेच. गुजराती म्हणजे शाळकरी मुलांचेच. एवढय़ा भांडवलावर मी काम चालविणार; आणि माझे मदतनीस, ते तर माझ्याहूनही कमी शिकलेले! परंतु माझे देशी भाषांबद्दलचे प्रेम, शिकविण्याच्या स्वत:च्या हातोटीबद्दलचा माझा आत्मविश्वास, विद्यार्थ्यांचे अज्ञान व अज्ञानापेक्षाही अधिक अंशी त्यांच्या मनाची उदारता, यांची मला फार मदत झाली.
तामिळ विद्यार्थी दक्षिण आफ्रिकेमध्ये जन्मलेले होते व त्यामुळे त्यांना तामिळ थोडे समजत असे. लिपी तर मुळीच येत नव्हती. त्यामुळे त्यांना लिपी व व्याकरणाची मूलतत्त्वे मलाच शिकवावी लागत. ते काम सोपे होते. विद्यार्थ्यांना माहीत होते की, तामिळ बोलण्याच्या बाबतीत ते माझा सहज पराभव करू शकत होते. तामिळ जाणणारे लोक मला भेटायला येत, तेव्हा विद्यार्थीच माझे दुभाषी होत असत. तरी पण माझे गाडे ढकलत गेले, कारण मी कधी आपल्या विद्यार्थ्यांपासून स्वत:चे अज्ञान लपविण्याचा प्रयत्न केला नाही. हरेक बाबतीत मी जसा मुळात होतो तसाच तेही मला समजत होते. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाच्या बाबतीत माझे गाढ अज्ञान असताही मी त्यांचे प्रेम व आदरही कधीही हरवून बसलो नाही. साधारणपणे ही सर्व मुले निरक्षर व शाळेत न शिकलेली अशीच होती. शिकवीत असताच मला आढळून आले की, मला त्यांना शिकवायचे असे थोडेच होते. त्यांचा आळस निवारणे, ते आपण होऊन वाचीत बसतील असे करणे, त्यांच्या अभ्यासावर नजर ठेवणे, हीच कामे विशेष होती. मी एवढय़ावरच संतोष मानीत असे. म्हणून निरनिराळे विषय शिकणाऱ्या मुलांना एकाच खोलीत बसवून त्यांच्याकडून काम करवून घेणे शक्य होत असे. पाठय़पुस्तकांसाठी अनेक वेळा ओरड करण्यात येत असते, पण मला त्यांची उणीव कधीच जाणवली नाही. असलेल्या पुस्तकांचाही विशेष उपयोग केल्याचे मला स्मरत नाही. माझी अशी समजूत आहे की, शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे पाठय़पुस्तक असावे. शिक्षकांनी पुस्तकातून शिकविलेले असे फारच थोडे आज माझ्या स्मरणात राहिलेले आहे. त्यांनी स्वमुखाने शिकविले ते मात्र आजही आठवते. मुले डोळ्यांनी ग्रहण करतात, त्यापेक्षा कानांनी ऐकलेले कमी श्रमात अधिक ग्रहण करू शकतात. मुलांकडून एक तरी पुस्तक मी पुरे वाचून घेतल्याचे मला स्मरत नाही.
(२ ऑक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने त्यांनी लिहिलेल्या सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा या पुस्तकांतून साभार. प्रकाशक - नवजीवन ट्रस्ट)