बोधिवृक्ष : ‘कृति’शीलता Print

जे. कृष्णमूर्ती ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

तुम्ही आम्हाला जे सांगता ते आम्हाला आचरणात कसे आणता येईल?
कृष्णमूर्ती : तुम्ही जी गोष्ट ऐकता. ती बरोबर आहे असे तुम्हाला वाटते. मग ती तुम्हाला रोजच्या जीवनात उतरावी, असे वाटू लागते. म्हणजे तुम्हाला काय ‘वाटते’ त्यात व तुम्ही काय ‘करता’ त्यात अंतर पडते, होय की नाही? तुम्ही विचार एक करता व कृती दुसरीच करता. पण तुम्ही ज्याचा विचार करता ते तुम्हाला आचरणात आणायला हवे असते; म्हणून विचार व कृती यात अशी ही तफावत पडते आणि मग ती तफावत दूर करून तुमचे विचार तुमच्या कृतीशी कसे जोडावे असे तुम्ही विचारता. आता तुम्हाला एखादी गोष्ट करावी असे खूप वाटते तेव्हा ती तुम्ही लगेच करता, होय ना? तुम्हाला बाहेर जाऊन क्रिकेट खेळायचे असेल किंवा तुम्हाला खरोखर प्रिय अशी गोष्ट करायची असेल, तेव्हा ती गोष्ट करण्याचे उपाय व साधने तुम्ही शोधून काढता. त्यावेळी, ‘‘मी हे आचरणात कसे आणू?’’ असे तुम्ही विचारीत नाही. तुम्ही ती गोष्ट प्रत्यक्षात करता, कारण तुम्ही उतावीळ असता. तुमचे सर्वस्व, तुमचे मन व हृदय त्या गोष्टीत गुंतलेले असते. पण या दुसऱ्या बाबतीत तुम्ही मोठे धूर्त झालेले आहात. तुम्ही विचार एक करता व कृती दुसरी करता. तुम्ही म्हणता- ‘‘ही फार छान कल्पना आहे आणि माझ्या बुद्धीलाही ती पटते, पण त्या बाबतीत काय ‘करावे’ ते मला माहीत नाही, तेव्हा ती आचरणात कशी आणावी ते तुम्ही मला सांगा.’’ याचा अर्थ असा की तुम्हाला खरोखर जे करायचे असते ते म्हणजे कृती लांबणीवर टाकणे, कारण तुम्हाला थोडासा हेवा करायला अजून आवडत असतो किंवा दुसरे काहीतरी करायला आवडत असते.
तुम्ही म्हणता- ‘‘इतर प्रत्येक जण हेवा करणारा आहे; मग मी तरी का करू नये?’’ आणि मग तुम्ही पूर्वीचीच वागणूक चालू ठेवता. पण तुम्हाला जर खरोखर हेवा करणे नको असले आणि एखादा नाग समोर प्रत्यक्ष दिसावा तशा प्रकारे हेवावृत्तीचे वास्तव रूपात साक्षात दर्शन तुम्ही घेऊ शकलात तर तुम्ही हेवा करीनासे होता; आणि तिथे काम झालेच म्हणून समजा. मग हेव्यातून कसे सुटावे असा तुम्ही विचारीत बसत नाही.
म्हणून एखाद्या गोष्टीतील सत्यता पाहणे महत्त्वाचे असते; ‘ती आचरणात कशी आणू’ म्हणून विचारणे महत्त्वाचे नसते. तसे विचारण्याचा अर्थ असा होतो की खरोखर तुम्ही त्यातील सत्यताच पाहिलेली नसते. रस्त्यावर तुम्हाला नाग दिसला तर ‘मी आता काय करावे’ अशी पृच्छा तुम्ही करीत नाही. नागापासून धोका आहे, याची तुम्हाला चांगली जाणीव असते आणि तुम्ही त्यापासून दूर राहाता. पण हेव्यामध्ये अभिप्रेत असणाऱ्या सर्व गोष्टींची तुम्ही खरोखर कधी तपासणीच केलेली नसते; तुमच्याजवळ त्याबद्दल कोणीही बोललेलेच नाही, तुमच्याबरोबर त्या प्रश्नात खोल शिरलेलेच नाही. ‘हेवा करू नये’ असे तुम्हाला सांगितलेले असते; पण तुम्ही कधीही हेव्याचे स्वरूप नीट निरखून पाहिलेले नाही. समाज आणि सर्व संघटित धर्म त्यावरच कसे उभारलेले आहेत, ‘कोणी तरी’ होण्याच्या इच्छेवरच कसे उभारलेले आहेत, ते तुम्ही कधी अवलोकन केलेले नाही. पण ज्या क्षणी तुम्ही हेवावृत्तीच्या अंतरंगात शिरून तिचे सत्य स्वरूप पाहता त्या क्षणी हेवावृत्ती गळून पडते.
‘मी ते कसे करू’ असे विचारणे ही विचारशून्य पृच्छा आहे; कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट कशी करावी ते माहीत नसते व ती करण्याची तळमळ मात्र खूप असते, तेव्हा तुम्ही त्या कामाला स्वत: हात घालता आणि लवकरच तुम्हाला त्यातील गोम कळू लागते. तुम्ही जर मागे टेकून बसलात आणि ‘लोभीपणापासून कसे सुटावे त्याचा मला व्यवहार्य उपाय सांगा,’ असे जर तुम्ही म्हणालात तर तुम्ही लोभीच राहाल. पण जर तरल मनाने तुम्ही लोभीपणाची खोल तपासणी केलीत, पूर्वग्रह न ठेवता, तुमचा जीव त्यात ओतून शोध घेतलात तर तुम्हाला लोभीपणाचे सत्य स्वरूप स्वत:लाच कळून येईल आणि तुम्हाला सत्यच मुक्त करते. मुक्तीचा उपाय सापडेल का म्हणून इकडेतिकडे पाहून तुम्ही मुक्त होणार नाही.
एखादी गोष्ट करण्याची तुमची इच्छा अगदी परिपूर्ण असली, फळाची अपेक्षा न धरता, ‘स्व’ची परिपूर्ती करण्याची ऊर्मी न ठेवता म्हणजेच भय न बाळगता- तुम्ही र्सवकषतेने जर एखादी इच्छा धरली तर तिला अडथळा येत नाही. पण तुमची इच्छा जेव्हा अपूर्ण असते, तीत विसंवाद असतो, तेव्हाच अडथळा येतो, विरोध येतो. म्हणजे असे की, एखादी गोष्ट करावीशी तर तुम्हाला वाटतच असते, पण त्याचवेळी तुम्हाला त्यात भयही वाटत असते, किंवा दुसरेच काहीतरी करावे अशी अर्धवट इच्छा तुम्हाला असते. शिवाय तुम्हाला तुमच्या इच्छा कधीतरी साकार करता येतात का? तुम्हाला हे समजते का? मी स्पष्टीकरण करतो.
माणसामाणसातील सामुदायिक संबंधांनी बनलेल्या समाजाला ‘तुम्ही र्सवकष इच्छा करावी’ हे कधी नकोच असते; कारण तसे झाले तर तुम्ही उपद्रवी ठराल, समाजाला धोकादायक ठराल. जोपर्यंत तुमच्या आकांक्षा समाजाच्या प्रस्थापित चाकोरीत बसतात, तोपर्यंत तुम्ही प्रतिष्ठित नागरिक असता. पण ज्या क्षणी तुम्हाला जीवनाला व्यापून टाकणारी एखादी इच्छा उत्पन्न होते व ती त्या चाकोरीला धरून नसते, त्या क्षणी तुम्ही धोकेबाज ठरता. म्हणून समाज नेहमी र्सवकष, मूलग्राही इच्छा करण्याला- जी इच्छा तुमच्या संपूर्ण जीवनाचे प्रकट स्वरूप असते आणि म्हणून क्रांतिकारक कृती घडवून आणणारी असते अशी इच्छा करण्याला- प्रतिबंध करण्यास टपून बसलेला असतो.
जिवाची सहज क्रिया ही कोणीतरी होण्यासाठी केलेल्या ‘क्रियेपेक्षा अजिबात वेगळी असते. सहज क्रिया ही एवढी क्रांतिकारक असते की, समाज तिला नाकारतो आणि जी कृती कोणीतरी होण्याच्या वृत्तीतून केली जाते, जी चाकोरीत बसणारी असते व म्हणून प्रतिष्ठित असते, त्याच कृतीवर आपले सारे लक्ष केंद्रित करतो. पण कोणीतरी होण्याच्या कृतीत व्यक्त होणारी कोणतीही इच्छा, ही एक प्रकारची महत्त्वाकांक्षाच असते आणि तिची कधीही पूर्ती होत नसते. लगेच नाही तर केव्हा ना केव्हा, तिला विरोध होतो, ती अडविली जाते, तिची कुचंबणा होते, ती विफल होते आणि त्या वैफल्याविरुद्ध आपण जे बंड करतो त्याने तर अधिकच उपद्रव होतो.
हा फार महत्त्वाचा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण तुम्ही मोठे झालात की तुम्हाला असे दिसून येईल की, खरोखर तुमच्या इच्छा कधीच सफल होत नसतात. सफलतेवर विफलतेची छाया पडलेली असते आणि त्यावेळी तुमच्या हृदयात आनंदगानाऐवजी रुदन चालू असते. कोणीतरी होण्याची इच्छा-मोठा माणूस होण्याची, मोठा संत होण्याची, कोणीतरी का होईना, थोर होण्याची इच्छा-कधी संपतच नाही आणि म्हणून ती कधी पुरीही होत नाही. तिची मागणी नेहमी अधिकाची असते आणि अशा इच्छेतून नेहमी मनोव्यथा, दु:ख, विपत्ती, युद्धे हीच उत्पन्न होतात. पण कोणीतरी होण्याच्या साऱ्या इच्छेपासून आपण जेव्हा मुक्त असतो तेव्हा केवळ असण्याची अशी एक अवस्था असते व तिची कृती अजिबात निराळी असते. ते केवळ अस्तित्व असते. असे ‘जे’ असते ते कालविरहित असते. ते परिपूर्तीच्या भाषेत विचार करीत नाही; त्याचे असणे हीच मुळी त्याची परिपूर्ती असते.
(संस्कृतीचा प्रश्न या ‘कृष्णमूर्ती फाऊंडेशन इंडिया’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील हा भाग, साभार)