बोधिवृक्ष : निश्चयाची महती Print

alt

एकनाथ ईश्वरन् , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
आपल्या आत्मचरित्रात संत तेरेसा यांनी एका अतिशय महत्त्वाच्या, श्रेष्ठ अशा गुणावर परत परत जोर दिलेला आहे :  निर्धार, निश्चय, इच्छाशक्ती. त्या सांगतात, ‘ज्यांच्याजवळ हा निर्धार आहे त्यांना कशालाही भिण्याचं काही कारण नाही.’
फक्त निर्धार? बस्स्, एवढंच? आपल्याला वाटतं, या एवढय़ाशा क्षुल्लक ऐहिक गुणापेक्षा अधिक भव्य-दिव्य अशा काहीतरी गोष्टीची गरज असली पाहिजे. पण जीवनाच्या सर्व शाखांमध्ये- कला, शास्त्र, विज्ञान, खेळ, मनोरंजन जिथे जिथे कोणीतरी उत्कृष्ट असं प्रावीण्य मिळवलेलं दिसून येतं तिथे तिथे एक गुण आपल्याला प्रामुख्याने नेहमीच आढळून येतो. स्वत:वरच मात करण्याची तीव्र इच्छा; अडचणींचे डोंगर उभे राहिले तरी आपलं ध्येय गाठेपर्यंत चालत राहण्याचा, काम चालू ठेवण्याचा निश्चय. अनंताचं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला याच गुणाची आवश्यकता आहे.
आध्यात्मिक मार्गावर आपली प्रगती आपल्या मनासारखी होत नसेल तर तेरेसा त्यासाठी सुचवते की, याचं कारण एकच असू शकतं की आपण आपल्या प्रयत्नांत कमी पडत आहोत, आपल्याला शक्य आहे तेवढे प्रयत्न आपण करत नाहीये. सांगण्यासाठी आपल्याजवळ सर्व प्रकारच्या सबबी तयार असतात, पण बहुतेक वेळा निर्धाराचा अभाव हेच त्याचं साधं कारण असतं.
 काही लोक काही दिवस ध्यान करतात आणि मध्येच अचानक ते सोडून देऊन काही जुन्या लाडक्या सवयींचा उपभोग घेऊ लागतात. असे लोक परत जेव्हा ध्यानाकडे वळतात तेव्हा त्यांचं मन अधिकच बंडखोर झालेलं असतं आणि मग ध्यान करत असताना त्यांना झोप लागते. म्हणून मग ते परत एकदा ध्यान करायचे थांबतात. त्यांचं मन आणि ज्ञानेंद्रियं विरोध करत असतात.
तेरेसांच्या निरीक्षणाप्रमाणे, ‘‘सुरुवात करणारे पुष्कळजण असतात, पण चिकाटीने शेवटपर्यंत जाणारे फारच थोडे. पण ही आपल्या निर्धाराची कसोटी असते.’’ संस्कृतमध्ये ‘आरंभशूर’ असा एक शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे की, काही लोक सुरुवातीला मोठा गाजावाजा करून, तुताऱ्या वाजवून एखादं काम सुरू तर करतात, पण काही काळाने असं दिसून येतं की, त्यांचा सगळा उत्साह मागच्या जिन्याने पळून गेलेला आहे. अव्याहतपणे काम करणारे लोकच ध्यानात पुढेपर्यंत जाऊ शकतात.
अर्थात, निर्धाराचं पहिलं आव्हान दररोजच आपल्यासमोर येत असतं. ‘‘आज मी माझ्या नेहमीच्या वेळेला, नेहमीच्या जागी आणि नेहमीइतकं ध्यान करायला बसू का?  की आज थोडीशी टांगच मारावी?’’ कितीतरी गोष्टी ध्यानाच्या मध्ये येऊ शकतात! तुमचा निर्धार बळकट करण्यासाठी ध्यानाच्या नियमित सरावाइतकं उपयोगी साधन दुसरं कुठलंही नाही. दररोज एका ठराविक वेळी ध्यान सुरू करून ठराविक वेळेला ते संपवणं (आजच्या दिवस थोडा कमी वेळ केलं तर काय बिघडतं वगैरे सबबी न सांगता) हे अतिशय महत्त्वाचं आहे.
कोणालाच हे सोपं किंवा सोयीस्कर वाटत नाही. प्रत्येकालाच अडचणींचा सामना करावा लागतो. कधी तुम्ही प्रवासात असता, कधी तुम्हाला सर्दी झालेली असते, कधी तुमचं मूल रडायला लागतं, कधी फोन वाजल्यामुळे मध्येच उठावं लागतं किंवा कधी कधी तुम्ही कधीच न येणाऱ्या एखाद्या फोनची वाट बघत असता.. ही यादी न संपणारी आहे. आपल्या कामाच्या परिस्थितीत बदल केल्याशिवाय काही अडचणी न सुटणाऱ्या आहेत हे मीसुद्धा कबूल करतो. पण बऱ्याचशा, आश्चर्यकारक अशा साध्या उपायांनी दूर होण्याजोग्या असतात हे आपल्या लक्षातच येत नाही. उदा. फोनचा प्लग काढून ठेवणं किंवा मूल उठायच्या वेळेच्या भरपूर आधी उठून ध्यानाला सुरुवात करणं. तुम्ही नुसतं तुमचं रोजचं ध्यान जरी नियमितपणे करू शकलात तरी तुमचा निर्धार बळकट होत चाललाय असं तुम्हाला दिसून येईल.
याउलट तुम्ही जर ध्यानाकडे दुर्लक्ष केलंत तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं मन त्याचा पुरेपूर फायदा उठवेल हे लक्षात ठेवा. भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये असं म्हटलं जातं, ‘‘एका सकाळचं ध्यान जर तुम्ही चुकवलंत तर ते भरून काढायला तुम्हाला पुढच्या सात सकाळी लागतात.’’ तुम्ही जर सात सकाळी चुकवल्यात तर काय होईल हे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर गणित करून पाहू शकता.
मनाला वळण लावण्याच्या बाबतीत पहिली गोष्ट जर मी कुठली शिकलो असेन तर ही की ध्यानाला नेहमी सर्वात अधिक महत्त्व द्यायचं. काहीही अडचणी किंवा मोह मध्ये आले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकायचं.
तेव्हा आपलं ध्यान नियमितपणे करत जा. त्यातल्या सूचना पद्धतशीरपणे पाळत चला आणि काहीही झालं तरी आपला उत्साह टिकवण्याचा प्रयत्न करा. रोज सकाळी तुम्ही जेव्हा ध्यानाला सुरुवात कराल तेव्हा नव्याने निर्धार करा.
ध्यानधारणा हा अर्थातच या सगळ्या प्रयत्नाचा एक भाग आहे. वारंवार मी असं म्हणू शकत नाही की दिवसभरात आपण जे काही करतो त्याचा आपल्या मनावर दरवेळी थेट परिणाम होत असतो. एखादा माणूस प्रामाणिक प्रयत्न करून ध्यान करतोय आणि न्याहारीच्या टेबलवर आल्यावर भांडायला लागतोय, दुपारच्या जेवणाच्या वेळी संतापाच्या भरात दणदण पावलं टाकत ऑफिसच्या बाहेर पडतोय आणि रात्रीच्या जेवणासाठी घरी जातच नाही, असं काही पाहिलं की मी गोंधळून जातो. मी त्याला स्पष्टपणे सांगतो : ‘‘मेहनतीने ध्यान करून एवढय़ा काळजीपूर्वक तू जे काही कमावलंस ते सारं आता गमावलेलं आहेस.’’ आपल्याला जर प्रगती करायची असेल तर संपूर्ण दिवसभर शांत आणि स्नेहपूर्ण राहण्याचा प्रयत्न करायला आपण शिकलं पाहिजे.
आपला दिवस जर काही कारणाने वाईट गेला असेल तर पळवाट म्हणून रात्रीच्या जेवणानंतर नाचाच्या वा इतर कार्यक्रमाला जाण्याने विशेष असा काही फरक पडत नाही. पळवाट किंवा विरंगुळा शोधायची इच्छा होणं हे अगदी नैसर्गिक आहे, पण पळायला कुठे जागाच नसते- उलट मनाचं प्रशिक्षण वाया घालवल्यामुळे तुमचा पुढचा दिवसही खराब जाण्याची शक्यता असते. त्याऐवजी कुटुंबीयांबरोबर किंवा मित्रांबरोबर बसून त्यांच्या दिवसभरातील अडीअडचणींबद्दल विचारपूस केलीत आणि अशा तऱ्हेने त्यांच्या अधिक जवळ गेलात तर त्याचा चांगला उपयोग होईल.
यासाठी शाश्वत अशा निर्धाराची गरज असते याबद्दल आत्तापर्यंत तुमची खात्री पटलीच असेल. ध्यानाच्या पहिल्या पायऱ्या कठीण असतात आणि त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणून मी इतकंच सांगेन की, जाणिवांच्या खाली खोल पोचल्यावर परिस्थिती आणखीनच कठीण होत जाते.
पण याची फळं मात्र फारच मधुर असतात. ध्यानामध्ये दररोज चमत्कार घडत असतात. ज्या लढाईमध्ये कोणत्याही मर्यादा नसतात अशा लढाईत न दिसणाऱ्या शत्रूशी तुम्हाला लढायचं असतं, पण तरीही आपण आव्हानांना तोंड द्यायला शिकतोय हे तुम्हाला समजत असतं; आपली प्रगती होतेय हे तुम्हाला जाणवत असतं. याच प्रेरणेची तुम्हाला गरज असते.
मी जेव्हा माझ्या ध्यानधारणेला सुरुवात केली तेव्हा मी काही हिमालयात, गुहेतल्या एकांतवासात वगैरे राहात नव्हतो. भारतातल्या एका मोठय़ा विद्यापीठात मी कामात व्यग्र असा प्राध्यापक होतो. माझा विषय असलेल्या साहित्यात आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मला खूप रस होता. शिवाय एका राष्ट्रीय वृत्तपत्रासाठी मी नियमितपणे एक सदर लिहीत होतो आणि आकाशवाणीवरून मोठय़ा श्रोतृवृंदासाठी भाषणेही देत होतो. मी तुम्हाला हे एवढय़ासाठीच सांगतो आहे की, आध्यात्मिक ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी समाजापासून दूर एकांतवासात जाण्याची काही गरज नसते हे तुम्हाला नीट समजावं. आरामात ध्यान करता यावं म्हणून तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या अंगाबाहेर टाकण्याची आवश्यकता नसते- वास्तविक ध्यानामुळे तुम्हाला तुमच्या जबाबदारीची अधिक चांगली जाणीव होणार असते. ध्यान म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असलेली एक कला आहे. तुम्ही कोठेही असलात- आपल्या कुटुंबीयांबरोबर, मित्रांबरोबर, तुमच्या विद्यापीठात, कार्यालयात, दवाखान्यात किंवा घरी तरी तुम्हाला त्याचे फायदे अनुभवाला येत राहातात. टॅक्सी चालवत असतानादेखील तुम्ही अनंताचा शोध घेऊ शकता.
(‘मनावर विजय’ या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वैशाली जोशी यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार.)