स्त्री जातक : साचलेपणातून बाहेर Print

अनघा लवळेकर - शनिवार, २८ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमानसिकदृष्टय़ा ‘मोकळं होण्याची’ गरज प्रत्येकालाच असते. मनात साचत गेलेले विचार, भावना, सारं काही व्यक्त करण्याची गरज स्त्रियांना अधिक तीव्रपणे जाणवते.  मन मोकळे झाले नाहीतर मात्र आयुष्याचं साचलेलं, गढूळ डबकं व्हायला वेळ लागत नाही; तेव्हा मोकळ्या व्हा..
पा णवठय़ावरच्या गप्पा रंगात आल्या होत्या. सुमित्रा, पुष्पा, राणी, विद्या  सगळ्या जमल्या होत्या. राणी माहेरवाशीण तर बाकीच्या सगळ्या सासरच्या मत्रिणी. राणीच्या लग्नात तिला नटवणाऱ्या, तिच्या ‘हवं-नको’ ची काळजी वाहणाऱ्या सगळ्या वहिन्या!

‘काय राणीताई, आज गुमसुम जणू?’ सुमित्रानं काळजीनं विचारलं. ‘व्हय तर! नेहमी कसं पोपटावानी तोंड चालतया. आमच्या घरी अस्सं-आमच्या घरी तस्सं! आज का गं अशी? विद्यानंही री ओढली. जणू या प्रश्नाचीच वाट पाहत असावी तशी राणी बसल्या जागी गदगदू लागली. सगळ्या तिच्या उजवी-डावीकडे बसल्या. कळशा-हंडे ठेवले बाजूला. मग राणीचा धबधबा सुरू झाला. ‘आत्याबाई असं वागतात, नवऱ्याचं घरात लक्षच नाही- मला घरात  ‘हवं-नको ’ बघायला कुणी नाही. पाणी जरा सरलं की आत्याबाई लगी तिकडं लागतात..’ एक ना दोन हज्जार गोष्टी! सगळ्या सासुरवाशिणी एकीकडे गालात हसत होत्या, पण गालावर हात ठेवून ऐकतही होत्या. प्रत्येकीच्या घरी थोडंफार हेच चित्र होतं, पण त्यांना माहीत होतं की राणीला आत्ता फक्त ऐकणारे कान हवे होते. कारण त्यांचेही असे ‘कान’ कुठे ना कुठे होतेच ना! मनात साठलेला गाळ उपसून बाहेर पडत होता. मन मोकळं होत होतं !
ही ‘मोकळं होण्याची’ गरज प्रत्येकालाच असते. आपले विचार, मतं, भावना कुठेतरी मांडणं, व्यक्त करणं ही अगदी मूलभूत गरज आहे. ठरावीक साच्याच्या वातावरणात बहुतांश काळ घालवणाऱ्या स्त्रियांना तर ती अधिक तीव्रपणे जाणवते. विशेषत: मनातले छोटे मोठे सल, (जे घरातल्यांना फालतू, क्षुल्लक मूर्खपणाचे वाटतात) इच्छा-आकांक्षा, साधे साधे आनंदाचे, समाधानाचे अनुभव कुठे तरी कशा तरी पद्धतीने व्यक्त व्हायला बघत असतात.
काही दशकांपूर्वीपर्यंत जेव्हा ‘कुटुंब’ (तेही सासरचं!) हेच स्त्रियांचं जगण्याचं प्रमुख वर्तुळ होतं; तेव्हा या व्यक्त होण्याला घरात मर्यादा होत्या. सामाजिक संकेतांचे, कुटुंबातील सत्तास्थान यांच्या उतरंडीचे घट्ट लावलेले दरवाजे होते. म्हणून मग पाणी भरायला गेल्यावर, धुणं धुवायला गेल्यावर, बाजारच्या दिवशी घरापासून लांब जाताना, कधी हळदीकुंकू, तर कधी एकत्र केलेल्या पापडय़ा-सांडगे-शेवया अशा निमित्तांनी मुली त्या चौकटीतून हळूच माना बाहेर काढायच्या. भडभडा बोलून मोकळ्या व्हायच्या आणि नवी ‘ओझी’ वाहायला सज्ज व्हायच्या. जशी शिक्षणं वाढली, नोकरदार महिला चौकट ओलांडून बाहेर पडल्या तरी मग पाणवठय़ाची जागा लोकल, बस, ऑफिसमधले लंच ब्रेक, पार्लर्स आणि भिशी मंडळांनी घेतली. पण मूळ गरज एकच- उतू जाणारं मन वाहून जाऊ देणं! कधी बोलून, कधी पत्रानं तर कधी मेलवर तर कधी खूप खूप कामात बुडवून घेऊन!
पण असं उतू जायला येण्याइतकं मनात साठतं तरी काय? मुळात स्त्रियांचा स्वभाव थोडा अधिक भावनाप्रधान किंवा संवेदनशील असतो. सामाजिक संदेशांना चटकन प्रतिसाद द्यायला (तोही अनुकूल) लहानपणापासूनच सभोवतालचं वातावरण त्यांना शिकवीत असतं. त्यामुळे व्यक्त होण्यातही इतरांना आवडेल, पटेल, फार बोचणार नाही अशा प्रकारे भावना, विचार  मांडण्याचा एक सुप्त असा न दिसणारा दबाव त्यांच्यावर असतो. आपण काही ठरावीक पद्धतीनं व्यक्त होणं समाजाला मानवेल का? हा संभ्रम सतत मनावर असतो. त्यातून मग व्यक्त करावेसे वाटणारे, पण या तथाकथित विवेकानं रोखून धरलेले अनेक विचार, मतं, अनुभव, भावना मनाच्या गोदामात विस्कळीत भंगार साठावं आणि ते एकमेकांवर चढत जावं, अशा पद्धतीनं साठवलं जातं. हळूहळू त्याचं ओझं बनायला लागतं. हे सगळं साठलेलं पाणी मग हक्काच्या माणसांकडे जागा मागायला लागतं. ती आपल्याला हक्काची वाटणारी माणसं जर संवेदनशील असतील तर ती जागा मिळतेही. पण तसं नसेल तर मात्र मोठी पंचाईत होते. ओझं वाढत राहतं आणि मार्गातले ‘गोळे ’ तसेच राहतात. त्याचे परिणाम मग शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ लागतात. त्याची ही काही प्रातिनिधिक उदाहरणं -विभावरी समुपदेशकाच्या समोर सुन्न बसली होती. लहानपणापासून तिचं स्वप्न होतं की, आपण खूप शिकून उच्च पदावर काम करायचं. ती उत्तम गुणांनी एम.बी.ए.ची परीक्षाही उत्तीर्ण झाली. पण क्षमता असूनही केवळ आईच्या हट्टाखातर तिला लवकर बोहल्यावर चढावं लागलं. नवरा कायम फिरतीवर, एकत्र कुटुंब, पाहता पाहता बारा-पंधरा र्वष सरली. विभावरीच्या मनातली आकांक्षा दबून मरून गेली. ‘गृहिणी’ म्हणून ती कर्तबगार होतीच, पण आपण आपल्या बुद्धीचं चीज करू शकलो नाही, श्रमांनी मिळवलेल्या पदवीचा थेट वापर करू शकलो नाही, ही बोच मनात राहिलीच. ती कुठे बोलणंही शक्य नव्हतं. ‘सुख दुखतंय’ असं म्हणणारे आजूबाजूला होतेच. आता पस्तिशीला पोचल्यावर आपल्या इतर समवयस्कांची त्यांच्या-त्यांच्या कामातील तडफ, प्रगती बघून तिला खूपच नराश्य येऊ लागलं आणि समुपदेशकाकडे जायची वेळ आली.
करुणाचा नवरा विश्राम तिला चार िभतींच्या आड खूप वाईट वागवतो. दुर्लक्ष करतो, मानहानीकारक बोलतो. ती कशी useless आहे, हे पुन:पुन्हा ऐकवतो. गडगंज श्रीमंत, खानदानी माहेर-सासर असलेल्या करुणाला हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो. बाहेर प्रेमळ नवऱ्याची भूमिका निभावणाऱ्या विश्रामचा भांडाफोड करायला ती धजत नाही. दोन्ही घराण्यांच्या अब्रूवर डाग लागेल, ही भीती तिच्या मनात आहे.
हय़ा साऱ्या उदाहरणांमधली सामायिक गोष्ट म्हणजे साठलेले, तुंबलेले, त्रासदायक विचार आणि भावना! आणि हे पाणी का वाहतं होत नाही? त्याला कारण म्हणजे-पराकोटीचा संकोच (लोकांना हे चालेल का?), ‘मी’ पणा (माझ्याबद्दल इतरांना काय वाटेल?), निव्वळ आंधळेपणाने स्वीकारलेले संकेत (असं वागून कसं चालेल?) आणि अशी संधीच न घेणं (पण मोकळं व्हायचं तरी कसं?) या चार गोष्टी!
‘मोकळं होणं’ म्हणजे फक्त भडाभडा बोलणंच का? स्त्री स्वभावानुसार ते स्वाभाविकपणे जास्त चटकन होऊ शकतं. पण त्यासाठी इतरही अनेक मार्ग आहेत. अनेकदा शब्दही न बोलता नुसते अश्रू वाहू देऊनही मन मोकळं होतं.
पूर्ण श्वास भरून खच्चून ओरडल्यानं होतं, डायरी, पत्र लिहिल्यानं होतं, विनोद ऐकून-ऐकवून होतं, कलानिर्मितीतून होतं, तर कधी कधी नुसतं लांबवर निसर्गाच्या सान्निध्यात भटकूनही होतं. आपल्याला कितीही संकोच वाटला तरीही हे करणं खूप गरजेचं आहे. माझ्या एका मैत्रिणीला सामाजिक काम करताना व्यक्तींचे, परिस्थितीचे खूप ताण यायचे. ते पटकन बोलण्याइतकी ती मोकळी नव्हती. तेव्हा तिनं एक अभिनव उपाय शोधून काढला तो स्वत:च स्वत:ला पत्र लिहिण्याचा! मायना आणि सही दोन्ही स्वत:च! तिच्या मते, त्यामुळे तिचे खुपसे विचार आणि भावना योग्य प्रकारे मांडल्या गेल्या. त्या प्रक्रियेतून ती स्वत:च प्रश्न मांडणारी आणि उत्तरं देणारी झाली. या शिवाय मन रमवणारी, खूप उत्कटपणे ज्यात गुंतून जाऊ शकतो असा एखादा छंद, कौशल्य अगदी एकटय़ानं कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय अनुभवणं यातूनही बऱ्याच साचलेल्या गोष्टींचा निचरा होतो. थोडा चाकोरीबाहेर विचार केला तर आपल्याला असे कितीतरी नावीन्यपूर्ण पर्यायी प्रयोग करता करता सापडू शकतात.
‘मोकळं होणं’ म्हणजे अशा साठलेल्या भावना-विचार यांचा योग्य निचरा होणं. ‘योग्य’ शब्द महत्त्वाचा आहे. स्त्रियांच्या बाबतीत अनेकदा गॉसिप्स वा ‘गावगप्पां’ मधून इतरांवर शरसंधान करणं, चहाडय़ा करणं, नात्यांना भावनिक मार्गानं नेणं अशांतूनही साठलेल्या भावना व्यक्त होताना दिसतात. हे मोकळं होणं खरं नव्हे. विधायक तर मुळीच नव्हे, उलट त्यातून आपण अयोग्य व्यक्तींसमोर जास्त व्यक्त होणं, त्यातून आपलाच भावनिक छळ होणं, नराश्य येणं, इतरांचे गरसमज होणं हे सहज घडू शकतं.
सध्या संगणकाचा जमाना असल्यानं twitterl, kfacebook अशा साइट्सवर अनेक जण/जणी (अगदी  ग्लॅमरस क्षेत्रातल्याही) चिवचिवत असतात. यात जर तारतम्य बाळगलं नाही तर नसते वाद उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे जो ‘निचरा’ आपला खासगीपणा जपून होईल, आश्वासक मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीकडे होईल, ज्यातून निर्मितीचा आनंद मिळेल आणि खऱ्या अर्थानं निर्मळ शांत वाटेल. त्या मोकळे होण्याची वाट धरणंच श्रेयस्कर! स्वत:तील डौलदार बदलाची पहिली सुरुवात तुंबलेले, अडकलेले मनातले प्रवाह मोकळे करण्यापासूनच करावी लागते.
भरून आलेलं काळंभोर आभाळ जेव्हा धो-धो कोसळतं; तेव्हा त्या वर्षांवानंतर दिसणारं त्याचं निरभ्र, नितळ रूप आपल्याला किती प्रफुल्लित करतं, असा निरभ्रपणा आपल्या मनाला मिळावा म्हणून हे ‘मोकळं होणं’ गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं?