स्त्री जातक : सेतू संवादाचा Print

डॉ. अनघा लवळेकर - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altस्त्रियांच्या संवादी राहण्यानं मनं मोकळी होतात, नाती रुजतात, आधार मिळतो. काही वेळा वादही मिटतात. सर्वसाधारण ‘नात्यांमधील मांडवली’ हे स्त्रियांचं खास क्षेत्र असतं, पण संवादाचे हे पूल अखंड बांधत राहणाऱ्या स्त्रीला ‘स्वत:शी संवाद’ साधायलाही वेळ मिळायला हवा..
‘वाऱ्यावरची वरात’ या पु. लं.च्या प्रहसनात दोन भावांमधला एक संवाद आहे- मोठा भाऊ ‘दारू’ म्हणजे काय हे धाकटय़ाला समजावून सांगण्याच्या आटोकाट प्रयत्नात असतो. त्यात तो म्हणतो, ‘जे मादक पेय प्यायल्याने माणूस सारखा बडबड-बडबड, बडबड-बडबड करतो.. ती म्हणजे दारू..’ यावर धाकटा निरागस उत्स्फूर्तपणे विचारतो, ‘म्हणजे आपली आई का रे भाऊ’ श्रोत्यांमध्ये अर्थातच हास्यकल्लोळ!
‘स्त्रिया आणि बोलणं’ हे साहित्यातून आणि संस्कृतीतून अशाच अनेक प्रतिमांमधून व्यक्त झालेलं दिसतं. सॉक्रेटिस किंवा तुकारामांसारख्या तत्त्वज्ञानाच्या वाटय़ाला आलेल्या तोंडाळ-बडबडय़ा-कजाग बायकोच्या रूपातून किंवा कथा कीर्तनाला आलेल्या पण मागे बसून एकमेकींना घरच्या सुरस कहाण्या सांगणाऱ्या आज्यांपर्यंत अनेक उदाहरणांतून ते मांडलंय. ‘शब्द’ हे जणू स्त्रियांचंच ‘शस्त्र’ अशीच त्याची ख्याती आपण ऐकतो. साधं व्यक्त होण्यापुरतंच नव्हे तर माणसामाणसांमधले संवादाचे पूल उभे करणं-टिकविणं जोपासणं यासाठीही स्त्रियांची भूमिका कुटुंब-समाजात महत्त्वाची मानली गेली आहे.
नुसते शब्द म्हणजे संवाद नव्हे, आपल्या विचार भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत नीटसपणे पोहोचवणं म्हणजे संवाद.
१२ वर्षीय अमेयला सहलीला जाण्यासाठी आणि तिथे मजा करण्यासाठी बाबांकडून नेहमीपेक्षा थोडे जास्त पैसे हवे आहेत. कारण ऐकून बाबांची भिवई चढलेली पाहताच अमेयची कावरीबाबरी नजर आईकडे जाते आणि आई जरा समजुतीच्या स्वरात बाबाला म्हणते, ‘अरे असं काय पाहतोस? सगळे आहेत बरोबर. जाऊ दे त्याला मित्रांबरोबर. तो काही उगीच वायफळ खर्च करणार नाही, पण अडीअडचणीला असू देत जवळ. काय रे अमेय?’ बाबांची भिवई खाली येते आणि अमेय सुटकेचा नि:श्वास टाकतो.
लग्नाळू मुलामुलीनं एकमेकांना पाहण्याच्या अवघड प्रसंगात सगळेच जरा गप्प गप्प. ‘कुठून सुरुवात करावी बरं?’ हा गहन प्रश्न. स्वागत वगैरे झालेलं आणि आता ही घनघोर क्षणिक शांतता. तेवढय़ात दोन्हीपैकी कुणीतरी आई/ मावशी पटकन पुढे येऊन म्हणते, ‘त्या अमच्या-तमक्याची आणि तुमची ओळख आहे ना हो? त्या मला सांगत होत्या परवा!’ आणि बर्फ एकदम वितळतं. संवादाचा प्रवाह मोकळा होतो.
अशी कितीतरी उदाहरणं- किती प्रसंग- ज्यात स्त्रियांच्या ‘संवादी’ राहण्यानं मनं मोकळी होतात, बांध फुटतात, नाती रुजतात, आधार मिळतो, वेळ भरून निघतो आणि काही बाबतीत तर वादही मिटतात. या सगळ्याला प्रतिवाद करणारी काही उदाहरणंही असतील कदाचित, पण सर्वसाधारणपणे ‘नात्यांमधील मांडवली’ हे स्त्रियांचं खास क्षेत्र असतं, हे नक्की!
मुळात बायकांना शब्दांची- संवादाची फार हौस, भूकच म्हणाना. ‘न बोलता पाच मिनिटं शांत बसा- तेही चारचौघात’ हा कसोटी पाहायला लावणारा प्रसंग.
बायकांची शब्दांची समजही जास्त! त्यातील छटा-मंद तीव्र स्वर सर्वाची त्या घनघोर चिकित्सा करणार. ही क्षमता त्यांना मूलत:च असते, असंही संशोधनातून दिसतं. पाच वर्षांच्या मुलीला तिच्याच वयाच्या मुलापेक्षा सुमारे तिप्पट शब्द ज्ञान असतं. शब्दांचा चपखल वापर निरनिराळ्या प्रसंगात करण्याचं कौशल्यही स्त्रीकडे तुलनेनं अधिक असतं. संवादामधली स्त्रीची देहबोली, आविर्भाव खूपच उत्स्फूर्त आणि विविधरंगी असतात. नुसते चेहऱ्यावरचे हावभावच घ्या ना! स्त्रियांच्या त्वचेखाली चरबीचा थर किंचित जास्त असतो. त्यामुळे त्वचा ताणून बसलेली असते. अगदी सूक्ष्मसा बदलही त्यातून चटकन कळतो. म्हणूनच कदाचित नृत्यातील विविध भावमुद्रांमधून- विभ्रमांतून स्त्रिया कुशलतेने रसिकांशी संवाद साधू शकतात.
हे झालं या ‘संवादीपणा’ मागचं विज्ञान. पण विज्ञानाच्या पलीकडे आपण ज्या वातावरणात- भवतालात वाढतो त्याचाही मोठा प्रभाव संवादावर असतोच. स्त्रियांच्या पारंपरिक भूमिकांमध्ये ‘काळजीवाहू सरकारची’ भूमिका फारच महत्त्वाची-कळीची असते. केवळ कर्तव्यापोटी नव्हे, तर जवळच्या माणसांमध्ये स्त्रीची मनाची गुंतवणूक पण खूप मोठी असते. त्यामुळेही कदाचित ही संवादाची देवघेव सतत चालू ठेवणं तिला गरजेचं वाटतं. एखाद्या काहीशा अबोल स्वभावाच्या नवरा-मुलांच्या कुटुंबात जर स्त्रीपण तशीच असेल तर काहीसं कोरडे-कोरडेपण जाणवतं. सर्व व्यवहार थोडे यांत्रिकपणे, कर्तव्यबुद्धीने चालल्यासारखे वाटतात. अशा एका परिचित कुटुंबात मी काही कार्यक्रमानिमित्तानं गेले, तेव्हा मला त्या वातावरणातला एक अदृश्य ताण जाणवत राहिला. माझ्या स्वभावामुळे मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत होते आणि ‘हां-हूँ-खरं का? असेल!’ या पलीकडे त्या बाई- आणि ते बाकी कुटुंबीय सरकतच नव्हते. थोडय़ा वेळानं मला आपण एका मोठय़ा रेफ्रिजरेटरमध्ये बसलो आहोत आणि आपल्याभोवती आपल्याच शब्दांचा बर्फ तयार होत आहे, असं वाटायला लागलं. दुसऱ्या एका निमंत्रित बाई आल्यावर, त्यांनी बोलायला सुरुवात केल्यावर मग तो बर्फ वितळला! पण असे अपवाद थोडेच. बहुतांश बायका या बोलण्यातून दुसऱ्याच्या मनातलं कसं काढून घ्यायचं- किंवा आपल्याला हवं ते दुसऱ्याच्या मनात कसं पेरायचं यात वाकबगार असतात. खरं तर स्त्रिया चटकन रुळतात, शिकतात, पुढे जातात. जनसंपर्क अधिकारी, शिक्षक, स्वागतक, समुपदेशक, संपर्क प्रसार माध्यमं अशा अनेक ठिकाणी ‘शब्द’ आणि त्याचा संवादासाठी चपखल वापर आवश्यक असतो, जिथे स्त्रिया मोठय़ा संख्येने दिसण्यामागे त्यांची ही मूलभूत क्षमता हेसुद्धा एक कळीचं कारण आहे. याच क्षमतेचा अजून एक पैलू म्हणजे, कुठे ‘काय बोलायचं’ आणि ‘न बोलायचं’ याचा अंदाज स्त्रियांना चटकन येतो. आसपासच्या माणसांचा सारखा अदमास घेत राहिल्यानं, निरीक्षणानं त्यांना ते जमून जातं आणि अनेक नाजूक प्रसंगांत कामीही येतं.
अर्थात सर्वच ठिकाणी हे ‘संवाद कौशल्य’ किंवा ‘शब्द वापर’ चांगल्या हेतूनं, नाती जोडायला समृद्ध करायलाच वापरलं जाईल असं नाही.
कवितानं एकदा बोलायला सुरुवात केली, की तिचा धबधबा थांबायचं नावच घेत नाही. तिचा नंबर मोबाइलवर दिसला की, तिच्या मैत्रिणी ‘स्र्’९  रटर’ असा संदेश पाठवून देतात किंवा मोबाइल कानापासून लांब धरून आपलं काम पुढे चालू ठेवतात. कविताला ऐकायचं नसतंच ना! मधून मधून ‘हो-हूँ’ केलं की झालं.
त्याउलट स्वातीचं आहे. तिला तिरके टोमणे मारल्याशिवाय बोलताच येत नाही. अगदी मोजकं तोलूनमापून जे बोलणार तेही ‘सौ सुनार की-इक  लोहार की’ या स्टाइलनं आणि दुसऱ्याला ‘कुठून आपण हिच्याशी बोललो’ असं वाटायला लावणारं!
वसुधाला सतत दुसऱ्याला गृहीत धरून बोलायची सवय आहे. ‘तुला एवढं पण माहीत नाही?’ पासून ते ‘तू मला आधी कळवलं असतंस तर..’ ही तिची नेहमीची पालुपदं असतात. मग संवादाचा पूल कसा टिकणार?
स्त्रियांच्या काही टिपिकल नात्यांमधले ताणतणावही ‘संवादाच्या’ नकोशा शैलींमुळे वाढत राहतात ‘सा. सू.- म्हणजे ‘सारख्या सूचना’ आणि ‘सू. न.’ म्हणजे ‘सूचना नकोत!’ ही गाजलेली उक्ती आपल्याला माहीतच आहे. आपल्या सूचना समोरच्या व्यक्तीला खरंच आवश्यक आहेत का? त्याशिवाय इतर गोष्टींवर आपण संवाद साधतो का? सूचना न देताही शिकण्याची संधी दुसऱ्याला देता येते का? त्या ‘सूचना’ न वाटता हव्याशा टिप्स वाटतील अशा प्रकारे सांगता येतील का? याचा विचार न करताच सूचनांचा भडिमार करण्याची सवय काही स्त्रियांना असते, तिथे मग ‘तू-तू मैं मै’ सुरू व्हायला किती वेळ लागणार?
काही वेळा तर ‘नि:शब्द अबोल्याचं’ अत्यंत निर्वाणीचं आणि घातक शस्त्र बायका वापरतात. त्यामुळे संवादाचे पूल पाहता पाहता कोसळतात. लटका राग, रुसवा, तात्पुरता अबोला- रोमँटिक किंवा वरवरचा असला तरी मनात राग, दु:ख ठेवून दीर्घकाळ अबोल्याचं शस्त्र उपसल्यानं नुकसान तिचंच होत असतं, हे बऱ्याचदा कळत नाही. व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’ कादंबरीत याचा खूप सुरेख संदर्भ आला आहे. ‘खूप भांडण झालं- पत्नीनं अबोला धरला- त्या काजळी शांततेतच दोघं घराबाहेर पडले आणि त्यातला एकजण परतच आला नाही तर..?’ या विचारानं ती चिडलेली नायिका कातर होऊन पतीला म्हणते, ‘काय वाट्टेल ते झालं तरी इथून पुढे मी तुझ्याशी कधी अबोला धरणार नाही!’ संवादी राहण्यातून नात्यांच्या जवळीकतेची जी खात्री-शाश्वती मिळत राहते, ती तिच्या आवेगातून व्यक्त झालेली दिसते.
कधी कधी हा सेतू सतत बांधत राहण्याचाही ताण बाईवर येतोच! ‘सगळ्यांची मनं सांभाळायचा मक्ता काय मी एकटीनंच घेतलाय?’ अशी प्रतिक्रिया मनात उमटते. कधी ‘अगदी कुणाशी बोलू नये’ असं वाटते. शांत- निवांत बसावं, आपलं आपल्यातच असावं असं वाटतं. कुणी विचारू नये, मधे येऊ नये, प्रेमाचं सुंदर काही बोलू नये असंही वाटतं. एका मैत्रिणीच्या कुटुंबातले इतर सर्वजण काही कारणानं तिला एकटीला ठेवून गावाला गेले होते. ही अगदी बोलघेवडी. ‘कशी काय एकटी राहणार’ अशी इतर मैत्रिणींना काळजी पडली. एकीनं न राहावून फोन केला आणि विचारलं, ‘येऊ का गं पत्ते खेळायला? एकटं एकटं वाटतंय ना?’ ती म्हणाली- ‘अगं, नको येऊस. मजेत आहे, मी. खरं तर इतकं मस्त वाटतंय एकटं राहायलासुद्धा. कुणाशी उगीच सारखं तोंड वाजवायचं नाही की, उत्तरं द्यायची नाहीत. तूसुद्धा फोन करू नकोस दोन दिवस. I am enjoying my dialogue with myself.
खरंच, संवादाचे पूल आयुष्यभर बांधत-जपत राहणाऱ्या स्त्रीला ‘स्वत:शी संवाद’ करायला थोडा मोकळा, निर्वेध आणि निश्चिंत वेळ मिळावा म्हणून तिच्या अवतीभवतीचे सगळेच थोडा प्रयत्न करतील तर किती छान होईल, नाही?