स्त्री जातक : यंत्रांशी दोस्ती Print

altडॉ. अनघा लवळेकर , शनिवार, ७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रियांसाठी यंत्र हाताळणं हे जोखमीचं काम मानलं जात होतं, पण काळ बदलला तसं स्त्रियांनीही यंत्रांशी मैत्री करायला सुरुवात केली आहे. यंत्र हाताळण्यापासून दुरुस्त करण्यापर्यंत ही दोस्ती वाढते आहे.
अ नेक वर्षांपूर्वी कॉलेजविश्वातल्या मित्रमैत्रिणींसोबत एक नाटुकलं बसवलं होतं. ‘पळसाला पानं पाच!’ पाच मित्र-मैत्रिणी मिळून समुद्रकिनारी सहलीला जातात. मित्र गावात फेरफटका मारायला जातात आणि मैत्रिणी घरीच थांबतात. ‘आम्ही एकटय़ा राहणार’ असं मोठय़ा आत्मविश्वासानं मित्रांना बजावून! पण संध्याकाळ होते, अचानक दिवे जातात आणि त्या दोघी गांगरून जातात. त्यांना लक्षात येतं की, फक्त आपल्याच घरात दिवे नाहीत. तास-दोन तासानं मित्र परत येतात तेव्हा घरात गुडूप अंधार. एकजण पटकन फ्यूज बॉक्स उघडून तार काढतो, बदलतो आणि घर क्षणात उजळून निघतं. सगळी मुलं मैत्रिणींना चिडवायला लागतात, ‘फ्यूजसुद्धा साधा लावता येत नाही आणि म्हणे आम्ही एकटं राहणार बाई!’
खरंच! यंत्रांचं आणि बायकांचं इतकं शत्रुत्व असतं का? असलं तर का? आणि नसलं तर मग बहुतेक बायकांना यंत्र हाताळणं म्हणजे ‘भारीच जोखमीचं काम’ असं का वाटतं?
आपल्या मेंदूच्या रचनेत जो डावा मेंदू असतो त्याचं काम मुख्यत: तर्कबुद्धी, गणिती क्षमता, व्यवहारज्ञान, मितीचं ज्ञान अशा क्षमतांशी संबंधित असतं; तर उजव्या मेंदूचं काम मुख्यत: मानवी व्यवहार, सृजनशीलता, भावनिकता इत्यादींशी संबंधित असतं. काही संशोधनं असं सांगतात की, पुरुषांमध्ये डावा तर स्त्रियांमध्ये उजवा मेंदू अधिक कार्यक्षम  असतो. अर्थात म्हणून उलटं चित्र अजिबातच दिसत नाही असं नाही. इन्फोसिस फाऊंडेशनच्या सुधा मूर्तीना तरुणपणी टेल्कोमधील नोकरी मिळाली, ती त्यांनी जे. आर. डी. टाटांना दिलेल्या आव्हानाच्या जोरावरच. ‘मीही पुरुषांइतकीच तडफेनं, कौशल्यानं टॉप फ्लोअरवर काम करू शकते!’ हे त्यांनी निक्षून सांगितलं होतं, पण अशी उदाहरणं ४०-५० वर्षांपूर्वी फारच विरळ होती. आज विद्याशाखा म्हणून अभियांत्रिकी करणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढलेलं असलं तरी सर्वसाधारणपणे यंत्र हाताळायचं म्हटलं की, बायकांना किचकट आणि जोखमीचं वाटतं. (यंत्रांपेक्षाही जास्त किचकट- गुंतागुंतीच्या कामात त्या प्रवीण असतात तरीही!)
याचं एक मुख्य कारण म्हणजे ‘यंत्र’ हा पूर्वीपासूनच पुरुषांची मक्तेदारी असलेला प्रांत मानला जातो. सर्व नवी यंत्रं प्राधान्यानं पुरुष निर्माण करतो, हाताळतो आणि प्रस्थापित करतो, असं सर्वसामान्य चित्र आहे. त्यामुळे ‘यंत्र’ सांभाळायला ‘पुरुषी’ डोकं लागतं हा सरसकट समज आहे. वाहन चालविणाऱ्या लाखो स्त्रिया आज रस्त्यावर दिसतात, पण त्यापैकी कितीजणींनी आपल्या गाडीचं ‘टूलकिट’ उघडून त्याची ओळख करून घेतलेली असते? काही जुजबी दुरुस्ती तरी शिकून घेतलेली असते?
मला असं वाटतं की, ‘अपरिचयात् भय:’ परकेपणातून आलेलं भय- हेच याच्यामागं असावं. त्याशिवाय बहुतेकींना स्त्रियांच्या प्रस्थापित असलेल्या ‘नाजूकसाजूक’ प्रतिमेशी ‘यंत्राशी असणारी दोस्ती’ ही जरा- नव्हे बरीच विरोधाभासी वाटत असणार. ‘मला नाही बाई हात काळे करून घ्यायला आवडत!’ किंवा ‘ती खाटखुट करणं मला नाही जमत.’ ‘एवढी जड जड यंत्रं काय आपण उचलायची? मग घरची पुरुष माणसं कशासाठी असतात?’ अशा प्रत्यक्ष किंवा स्वगत उद्गारांनी यंत्र हाताळण्यापासून लांब राहण्याची दक्षता घेतली जाते. सुरुवातीला दिलेल्या प्रसंगासारखं अगदी साधं रोजच्या उपयोगातलं एखादं यंत्र-तांत्रिक ज्ञानसुद्धा ‘आहेत की दुसरे बघणारे’ म्हणून दूर ठेवलं जातं.
आज खरंतर यंत्रांनीच आपला, बहुतेक शहरी माणसांचा दिवस सुरू होतो आणि मावळतो. कुठे कुठे लागतात यंत्रं? स्वयंपाकघरात तर निम्म्याहून जास्त पूर्वतयारी यंत्राच्या मदतीनं होते. अंडं फेटण्यापासून कणीक मळणं, भाजी चिरणं, बेकिंग, भात शिजवणं.. किती यादी लांबवावी? बहुतेक सर्व यंत्रं विद्युत ऊर्जेवर चालणारी, पण अनेकींना त्या उपकरणांमध्ये काही दोष निर्माण झाला, तर हातावर हात ठेवून बसावं लागतं. छोटय़ाशा स्क्रू ड्रायव्हरनं ते उघडून कनेक्टिव्हिटी वायर तपासणं आणि पुन्हा जोडणं याला पाच मिनिटंही लागत नाहीत. पण जे लहानपणी शिकलो नाही, ते आता काय येणार असं वाटून स्वस्थ बसलं जातं. मला आठवतं, आम्ही शाळेत- ज्ञानप्रबोधिनीत शिकताना सातवीच्याच वर्षी आम्हा प्रत्येकीला टेबललँपचं एक पूर्ण सर्किट लाकडी बोर्डावर तयार करण्याचा प्रयोग होता. जवळजवळ १५ दिवस तो प्रयोग आम्ही बनवत होतो. पडलेल्या सामानाच्या ढिगाऱ्यातून लागणारं सर्व सामान वेचून- ते त्या लाकडी बोर्डावर स्क्रूंच्या मदतीनं बसवून वायरी तासून प्रत्येक खिळा आणि तार ओळखीची- पक्की डोक्यात बसेपर्यंत ते केलं होतं. ‘आपण लावलेल्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा’ या आनंदामुळं ते तंत्रज्ञान झटकन आत्मसात झालं. आता नट, बोल्ट, स्क्रू ड्रायव्हर, वायर्स, कानसी, स्पॅनर परके वाटत नाहीत. एका छोटय़ाशा अनुभवसंधीचा उपयोग यंत्राबद्दलची भीती घालविण्यासाठी किती सहज झाला!
मनोरंजन हे अजून एक यंत्रजवळकीचं क्षेत्र. टी.व्ही.- रेडिओपासून ते संगणक - एमपी थ्रीपर्यंत अनेक यंत्रं आपण क्षणोक्षणी हाताळतो. ती खूपच गुंतागुंतीची इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतात, त्यामुळे तर त्यांच्याबाबतची धास्ती (बिघडण्याची) स्त्रियांना खूपच जास्त वाटते. विशेषत: ज्यांची पहिली पिढी यंत्र हाताळते अशांना तर तो रिमोट कसा वापरायचा, कुठल्या बटणाने काय होईल, एकदम चित्रात मुंग्या आल्या तर त्या आपण नीट न हाताळल्यानंच की काय, पाणीबिणी पिताना चुकून संगणकावर सांडलं तर आता ते निकामी बनणार का अशा डोक्याला मुंग्या आणणाऱ्या प्रश्नांनी भेडसावलेलं असतं. मग त्यांची पिढी क्रमांक तीन (किंवा चार)- ‘काही नाही गं आजी, तू घाबरू नकोस. हे बघ- असं असं कर- बघ किती सोप्पंय!’ असं म्हणून ती भीती थोडी घालवतात.
जसंजसं तंत्रज्ञान खुलं व्हायला लागलं, यंत्रं अधिकाधिक परिचयाची व्हायला लागली तशी बाई त्यांच्याबरोबर थोडी रुळायला लागली. ऑफिसमधला टाइपरायटर, टेलिफोनचा की बोर्ड, लॅबोरेटरीतील छोटीमोठी यंत्र हाताळणं त्या त्या शिक्षणामुळं सोपं वाटायला लागलं. यंत्र जशी आकारानं छोटी व्हायला लागली, अत्याधुनिक, सुटसुटीत व्हायला लागली तसा तिचा त्यांच्या हाताळणीबद्दलचा आत्मविश्वास वाढायला लागला. छोटेछोटे अभ्यासक्रम सुरू झाले आणि अगदी अपवादानं का होईना, पण ग्रामीण भागापर्यंत ‘मुलींनी यंत्र हाताळण्यात काही फार धोका नाही’ हा संदेश पोहोचू लागला. आज हातपंप दुरुस्ती, मोटर दुरुस्ती, ट्रॅक्टर चालविणं, कडबा कुट्टी यंत्र वापरणं, पीसीबी सर्किट्स तयार करणं अशा कामांसाठी ग्रामीण किशोरीसुद्धा सहज पुढे येऊ लागल्या आहेत. शहरात तर बहुतेक यंत्र/तंत्रज्ञान आता ‘युनिसेक्स’ (कुणीही वापरावं असं) दृष्टिकोनातून रुजतं आहे. मोटारबाईकवरून ट्रेकला जाणाऱ्या, लेथ मशीन हाताळणाऱ्या, दिवसरात्र दुचाक्या दुरुस्तीत हात काळे करणाऱ्या, बस चालविणाऱ्या (अभावानं!) आणि संगणकावर अखंड बुडालेल्या मुली दिसताहेत.
‘थोडासा रुमानी हो जाये’ चित्रपटाची ‘पुरुषी’ शिक्का बसलेली नायिका अनिता कँवर ऊर्फ चित्रपटातील बिन्नी जेव्हा जीपच्या खाली जाऊन तिची दुरुस्ती करीत असते तेव्हा त्या जीपची नाजूकसाजूक मालकीण तोऱ्यानं आणि तुच्छतेनं तिच्याकडे बघून म्हणते, ‘इस शहर की सारी लडकियाँ ऐसी ही है क्या? मर्दानी?’ आज कदाचित अशा ‘तथाकथित’ ‘मर्दानी’पणाला असं ‘विक्षिप्त’ संबोधलं जाणार नाही. याचं मुख्य कारण म्हणजे स्त्रियांची यंत्र हाताळण्यातली सहजता, आनंद, समाधान नक्कीच वाढत आहे. ‘अंगावर पडलंय’ म्हणून करण्यापेक्षा ‘आवड म्हणून’ करण्याकडे कल वाढत आहे. त्यांची उपयुक्तता समजून घेऊन ती वापरण्याचा पुढाकार आहे. आपल्या ऊर्जेचा अनेक दिशांनी वापर करता यावा म्हणून यंत्रांशी दोस्ती करून रोजची कामं गतीनं- अचूकतेनं करण्याची मनोभूमिका बनते आहे. ‘आम्ही अजून पाटय़ावरच इडली पीठ वाटतो!’ किंवा ‘मिक्सरमध्ये चिरलेल्या भाजीची चव बदलते बाई!’ असे उद्गार काढण्यापेक्षा त्या यंत्रवापरामुळे वाचलेल्या वेळात अधिक गुणवत्तेचं, समाधान देणारं काय मी करू शकते, हा विचार प्रामुख्यानं डोकावतो आहे. घरगुती उद्योगांसाठी यंत्रसामग्री आणणं, ती वापरण्यापासून दुरुस्तीपर्यंतचं तिचं सर्व बाळंतपण करणं हे तिला पूर्वीइतकं अवघड- पोचण्यापलीकडचं वाटत नाही आहे.
पण त्याच वेळी यंत्राशी दोस्ती करता-करता आपण त्यांच्या अधीन होतो आहोत का, हा विचारही स्त्रियांनी करावा असं वाटतं. ‘यंत्रांची हुकमत’ आपल्या जगण्यावर असावी की आपण आवश्यक तेवढंच सख्य त्यांच्याबरोबर ठेवूया यावर निर्णय व्हायला हवा. ‘मिक्सर बंद पडला म्हणून मी हताश होऊन माझा चटणीचा बेत रद्द करते का, पर्यायी साधनांचाही विचार करते?’ हे पाहायला पाहिजे. श्रावणात उपासाला (म्हणजेच स्व-नियंत्रणाला) महत्त्व असेल तर आठवडय़ात एक दिवस मी किंवा आम्ही सर्व यंत्रांचा उपवास करू शकतो का? प्रयत्न करायला हवा! ‘मैत्री हवी, पण आश्रय नको’ हेच धोरण स्त्रियांनी (आणि अर्थात सर्वानीच) यंत्रांच्या बाबतीत ठेवायला हवं, असं मला वाटतं. यंत्रांमुळे माझा जो वेळ वाचतो तो मी अधिक सृजनशील, मला आणि इतरांना वाढण्याची संधी देणाऱ्या कामात घालवते की नवनव्या यंत्रांच्या अधिक अधीन होते? हा प्रश्न स्वत:ला पडायला हवा. यंत्राशी मैत्री करताकरता आपल्या यांत्रिकपणावर मात करता आली तर ती मैत्री स्त्रियांसाठी मोठ्ठं वरदान ठरेल, असं वाटतं!