स्त्री जातक : अवकाश सृजनाचा Print

डॉ. अनघा लवळेकर - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altअनेकदा स्त्रीमधील सृजनशीलपण वर्षांनुर्वष अव्यक्तच राहातं. रत्नपारखी मिळाला नाही तर त्या रत्नाची  ‘दगडात’ गणना होते. जसं बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्रानं सोपानदेव चौधरी यांनी कैक वर्षांनी आचार्य अत्र्यांना त्यांची  काव्यं ऐकवली. त्यानंतर ते अलौकिक देणं आपल्यासारख्यांसाठी खुलं झालं.. न जाणो अशा किती लपलेल्या बहिणाबाई विविध क्षेत्रांत असतील ज्यांना कधी असं अवकाश मिळालंच नाही! .. ‘हरी पॉटर’ या जगप्रसिद्ध कादंबरी मालिकेची लेखिका जे. के. रोलिंगच्या आत्मनिवेदनाचा काही भाग वाचण्यात आला. त्यात ही प्रसिद्धी मिळण्यापूर्वीच्या तिच्या आयुष्यावर बरीच टिप्पणी आहे. अर्थात तिची तिनंच केलेली. त्यात ती म्हणते, ‘मुलांची जबाबदारी माझ्यावर पडली तेव्हा मी आधी खचून गेले. मला लेखन करायचं होतं. सुचतही होतं, पण सगळ्या धबडग्यात वेळ काढायचा कसा? प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागत होता. पण जसं जमेल तसं- जमेल तिथे मी लिहिण्याची संधी घेतली. ही गोष्ट सुचत होती तेव्हा तर काही वेळा मी हॉटेलच्या बिलामागे, बसच्या तिकिटांमागेही सुचले तसे प्रसंग लिहिले आहेत!’ जे के रोलिंगच्या पुस्तकांत काही गोष्टी पटणाऱ्या, न पटणाऱ्या असल्या तरी तिच्या सर्जनशीलतेबद्दल कुणालाच शंका नाही. इतकी सुस्पष्ट कल्पनाचित्रं निर्माण करून ती सुसूत्रपणे एकामागून एक कथानकात गुंफणं सोपं नाही. अशा निर्मितीमागे सर्जनशील मनाची एक आतून उसळत येणारी, न अडवता येणारी ऊर्मी असते.
सर्जनशीलता ही एक असामान्य गुणवत्ता आहे. जेवढी सहजस्फूर्त, नैसर्गिक तेवढीच जोपासनेला अवघड. सर्जनशील निर्मिती कधी अगदी शून्यातून प्रकट होते, तर कधी असलेल्या प्रस्थापित चौकटीला आव्हान देत, ती वाकवत, मोडत नव्या रचनांना जन्म देते. अशा व्यक्तीची काही खास वैशिष्टय़ं असतात. ताजा पण मुळापासूनचा विचार, उमदेपणा, नव्याची अनिवार ओढ (पॅशन!), किंचित किंवा खूप बंडखोरी, स्वत:तच काहीसं मग्न असणं, व्यवहारात बऱ्याचदा अव्यापारेषु व्यापार (थोडक्यात भोटपणा) असणं, मनस्वीपणा, आणि आपल्या विषयात, विचारांत, निर्मितीत उत्तमतेचा (एक्सलन्स) ध्यास.. अशी ही काही ठळक- प्रतिनिधिक वैशिष्टय़ं!
स्त्रीची मूळ प्रेरणाच तसं पाहिलं तर सर्जनाशी नाळ जोडणारी (अक्षरश:) आहे. केवळ नव्या जिवाचा जन्म म्हणून नव्हे तर तिच्या-तिच्या जगण्याच्या पारंपरिक चौकटीतही तिचं हे सर्जन-प्रतिभेचा आविष्कार अगदी सहजपणे व्यक्त होत असतो. निगुतीनं लावलेली विविध प्रयोग करत वाढलेली कुंडय़ांमधली फुलझाडं असोत, बाळाच्या दुपट्टय़ावरची चित्रं असोत, स्वयंपाकघरातले पुरावापुरवीचे- नव्या नवलाचे पदार्थ असोत, जात्यावरती सुचलेल्या ओव्या असोत किंवा लग्नात लाजत-मुरकत घेतलेला उखाणा असो! ‘रंग-रूप-रस-स्पर्श-शब्द’ असं पंचज्ञानेंद्रियांनी उधळलेलं स्त्रीचं सर्जन आपल्याला सहज दिसतं. लोकगीतांतून, संस्कृतीच्या विविधांगी रूपातनं ते व्यक्तही होताना दिसतं. त्यासाठी तिला ‘लोकोत्तर प्रतिभाशाली’ म्हणून गौरवलं जातं असंही नाही, पण अत्यंत स्वाभाविकपणे तिची ही सर्जनाची धडपड अखंड चालू असते. त्यातील काहींना मग जनमान्यता, लोकमान्यताही मिळते ती त्यांच्याआधी दिलेल्या गुणवैशिष्टय़ांच्या एकत्र येण्यामुळे!
पण ही सर्जनशीलता, नव्याची ऊर्मी सांभाळत, पचवणं अजिबात सोपं नाही. (सकल कलांची धात्री- ती देवी सरस्वतीसुद्धा मोरावर बसताना एक पाय खाली सोडून बसलेली असते! कुठूनतरी पट्कन संसाराची हाक येईल आणि वीणा बाजूला ठेवून झट्कन धाव घ्यावी लागेल म्हणूनच बहुधा!)
मुळात स्त्रीच्या सामाजिक स्थानाशी हे सगळं पुन्हा येऊन भिडतं, हे खरं. तिच्याभोवतीच्या आखीव चौकटी, त्यातील भूमिकांचं बांधलेपण हे सर्जनाच्या मुक्त उर्मीला काहीसं छेद देणारंही असतं. ‘माझी ही लिहायची वेळ/ हातात केव्हाही ब्रश धरायला अडचण नाही/ माझ्या नृत्य साधनेला कधीच कशाची ‘बाई म्हणून’ खीळ बसली नाही..’ असं म्हणणाऱ्या कलाकार-लेखिका अत्यंत दुर्मीळ असणार. बहुतेक वेळा ‘काहीतरी सुचणं- ते मनात उमलणं- आणि कलेतून व्यक्त होणं’ यात मूड आणि सवड यांचं प्रमाण व्यस्तच असतं.
त्यातही सर्जनाची ‘गृहकेंद्री क्षेत्रं’ जरा भाग्यवान म्हणायची. तिथे ही अडचण जरा कमी वेळा येत असणार, पण ज्या गोष्टी पठडीतल्या-चौकटीतल्या नाहीत त्यांना मात्र ‘विचारते कृती’ या प्रवासाला लागणारा वेळ गरजेपेक्षा कितीतरी जास्त असतो.
सर्जनशील व्यक्ती ही बऱ्याचदा अस्वस्थ असते. तिच्या आत कुठेतरी काहीतरी सतत घडत-मोडत असतं. विचारांना फाटे फुटत असतात. एक अनामिक तंद्री लागलेली असते. निर्मितीचा एक ध्यास- एक तडफड जाणवत असते. मग ती दिग्दर्शित करायला घेतलेल्या नाटकातील पात्रांच्या विषयी असो, एखाद्या लेखाचा मनात जुळणारा आकृतिबंध असो, एखाद्या अनुभवाची चित्रांतून व्यक्त होण्याची धडपड असो किंवा एखाद्या मूर्तीची मनातल्या डोळ्यासमोर साकारलेली रचना असो, ती प्रत्यक्षात साकार होईपर्यंतचा काळ खूप अस्वस्थतेचा असतो. डोक्यात दुसरं काही सुचत नाही. अनेक भूमिका एकाच वेळी निभावणाऱ्या ‘ती’ची मग फारच तारांबळ उडते. अशा वेळी घरातल्या व्यक्तींच्या तिच्या या ‘सर्जनकलां’कडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावर खूप काही अवलंबून असतं. माझी एक परिचित व्यावसायिक चित्रकार आहे. तिनं सुरुवातीच्या तिच्या अनुभवांबद्दल बोलताना म्हटलं, ‘एखादी कल्पना मनात घोळत असायची. पार झपाटून टाकायची. तेव्हा काही मी व्यावसायिक कामं घेत नव्हते. पण ‘सुचणं’ काही पैसा बघून थोडंच येतं? मग कणीक मळताना, लेकीला झोपवताना, आवरासावर करताना सारखं मन तिकडे ओढ घ्यायचं. वाटायचं, ब्रश हातात धरेपर्यंत टिकून राहील ना ही कल्पना, का तोपर्यंत ही धग विझून जाईल? मी जरा हातातलं काम टाकून पेंटिंग करायला गेले तर घरातल्यांना ते बोचायचं, फालतू कामात-रेघोटय़ा ओढण्यात काय वेळ घालवते संसाराकडे दुर्लक्ष करून?, असे बाण यायचे. मला ते खूप लागायचं, पण मी निर्धारानं काम करत राहिले. हात चालवत राहिले. प्रसंगी रात्री जागून, पहाटे उठून कॅनव्हास रेखाटले. मग जेव्हा मला कामं मिळालंी, पैसे मिळायला लागले, तेव्हा हा असहकार थोडा कमी झाला, पण वेळेची बोंब आहेच!’
या मैत्रिणीच्या प्रांजळ कथनातून तिची कुतरओढ लक्षात येते. आधी सर्जनाच्या हाकेला ओ द्यायची का चौकटीच्या व्यवस्थेला, हा प्रश्न नेहमीच छळत राहणार. आणि शेवटी जोपर्यंत एखाद्या गोष्टीची- निर्मितीची किंमत रोखीत होत नाही तोपर्यंत त्यावरून बाईला, त्या निर्मितीला गौणच ठेवावं लागणार का? हाही प्रश्न अनुत्तरितच!
सर्जनाच्या तडफडीची दुसरी मागणी म्हणजे भटकवणाऱ्या इतर गोष्टींपासून दूर राहण्याचा निग्रह करावा लागतो. इतर लोकांचं आपल्या व्यक्तित्वाच्या या पैलूबद्दल जे मत असेल ते निर्लेपपणे स्वीकारावं लागतं. तरच त्या मतांना न ठेचकाळता आपल्या उर्मीशी प्रामाणिक राहता येतं. संजीवनी बोकील यांची ‘मुखवटा’ ही कविता अशा एका सर्जनशील कलवंत स्त्रीच्या ‘दुभंग’ जगण्याची तगमग दाखवते. एका ठिकाणी बरसणारी कौतुकाची- सन्मानाची फुलं झेलणारी ती जेव्हा ‘चौकटीतल्या’ भूमिकेत शिरते तेव्हा तिचा तो आनंद, स्वप्रतिमा पार बदलून जाते. त्या भूमिकेच्या अपरिहार्यतेला ती शरण जाते- मनाविरुद्ध! अशा व्यक्तींचे सर्जनाचे कोंब अकाली वठण्याचीच शक्यता जास्त!
पण नेहमीच असं होतं असं नाही. अपवादात्मक का होईना पण सर्जनशील स्त्रीला तिच्या निकटवर्तीयांचं- विशेषत: पती आणि अन्य ज्येष्ठांचं सहकार्य-प्रोत्साहन आणि भक्कम आधार मिळाल्याची उदाहरणंही आहेत. फार प्रसिद्ध मूर्धस्थानी नसलेल्या पण आपल्या परीनं धडपडणाऱ्या स्त्रीला असा आधार खूप बळ देऊन जातो. अशाच दुसऱ्या एका मैत्रिणीचा फायबर ग्लासपासून विविध स्मृतिचिन्हं, ढाली, विजयचिन्हं बनवण्याचा छोटा उद्योग आहे. ‘डिझाइन’ हा तिचा खास विषय. तिची या विषयातली आवड आणि गती लक्षात घेऊन तिच्या पतीनं तिला सर्वतोपरी मदत केली. भांडवलापासून ते घराच्या बेसमेंटमध्ये जागा उपलब्ध करण्यापर्यंत. आणि ही मदत अभिमानानं- आनंदानं केली- सहजपणे- कुठलाही ‘उपकार’ केल्याच्या अभिनिवेशानं नव्हे! अशा वातावरणात सर्जनशील स्त्रीचा निर्मितीचा आनंद शतगुणित होत असेल असं मला वाटतं.
सर्जनाची आणि व्यवहाराची सांगड घालणं काही वेळा आवश्यक असतं. अशा वेळी स्त्रीला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. उत्स्फूर्तता टिकवून ठेवूनही आपली निर्मिती लोकांना भावणारी कशी होईल, या समस्येला तोंड द्यायचं असतं. अशा वेळी समविचारी-व्यावसायिक कलाकारांकडून अनुभवाचे काही किरण तिला हवे असतात. पण जर त्या कलावर्तुळात ‘स्त्री’ कलाकार म्हणून काही लोक पूर्वग्रहातून, ठाशीव लेबल लावून किंवा ठरावीक चौकटीतल्या अपेक्षा ठेवून पाहात असतील तर मग तिची कोंडी होऊ शकते.
अनेकदा स्त्रीमधील सृजनशीलपण वर्षांनुर्वष अव्यक्तच राहातं. रत्नपारखी मिळाला नाही तर रत्नाची जशी ‘दगडात’ गणना होते तसं बहिणाबाई चौधरी हे मराठी काव्यविश्वातलं एक प्रात:स्मरणीय व्यक्तिमत्त्व. पण त्यांनी रचलेली काव्य त्यांच्या पुत्रानं- सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर कैक वर्षांनी आचार्य अत्र्यांना ऐकवली. तेव्हा त्यातलं अलौकिक देणं आपल्यासारख्यांसाठी खुलं झालं. (ती छापण्याचा अत्र्यांनी आग्रह धरला.) न जाणो अशा किती लपलेल्या बहिणाबाई विविध क्षेत्रांत असतील ज्यांना कधी असं अवकाश मिळालंच नाही!
छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून स्त्रीची सृजनशीलता निरंतर व्यक्त होत असते. असलेल्या वस्तू/ रचना/ गोष्टींमध्ये उपयुक्त अशी नवी भर घालणं, टाकाऊतून टिकाऊची निर्मिती करणे, रोजच्या कामांत नवनवे प्रयोग करणं, असं कितीतरी.. अशा कणाकणानं फुलणाऱ्या प्रतिभेतूनच कधीतरी एखादी अजोड कलाकृती-निर्मिती जमून जाते. या निरंतर सर्जनशीलतेला, त्या मागच्या मनातल्या आणि प्रत्यक्षातल्या अभिव्यक्तीला सांभाळण्यासाठी, जोपासण्यासाठी योग्य ते कोंदण, वातावरण मिळो हीच या लेखामागची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटते?