स्त्री जातक : एक अनोखं अद्वैत Print

altडॉ. अनघा लवळेकर , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘निसर्ग आणि स्त्री’ म्हणजे जणू एकमेकांचे प्रतिशब्दच वाटावेत इतके ते जवळ आहेत.स्त्रीचं सगळं जगणं निसर्गाचं लघुरूप आहे. वरवर दिसायला साधं-सरळ, पण खोलात जाऊन पाहिलं तर किती गुंतागुंतीचं! याची प्रचीती देणारा हा लेख
खूप दिवसांपूर्वी एका चित्रप्रदर्शनाला गेले होते. कला महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचं ते प्रदर्शन होतं. नवशिकी पण प्रयोगशील चित्रं होती ती. त्यातल्या दोन चित्रांनी माझं मन वेधून घेतलं होतं. एक होतं पोर्ट्रेट- एका धनगर स्त्रीचं. तिचा तो पारंपरिक पोशाख, जड दागिने, बोलका चेहरा आणि सर्वात उठून दिसणारं तिच्या कुशीतलं एक लोभस कोकरू! त्या कोकराकडे पाहणारी तिची वत्सल नजर- त्याला हळुवारपणे धरणारे आणि कुरवाळणारे तिचे हात! इतकं सजीव चित्र की जणू ती शेतभर पसरलेल्या कळपातच उभी आहे असं वाटावं.
दुसरं चित्र अमूर्त शैलीतील होतं. झाडाचा घेरदार बुंधा- डवरलेल्या फांद्या-पानांचा फुलोरा- मागे निळंभोर आकाश असावं असं वाटणारं ते चित्र- पण ते निसर्गचित्र खासच नव्हतं. त्या फांद्यांना- झाडाला असा काही आकार दिला होता, रेषा अशा सूचकतेनं वळवल्या होत्या की त्यातून ‘स्त्री’ पण व्यक्त होत होतं. झाडाच्या बुंध्यावर, खालच्या जमिनीवर असंख्य ठिपके होते. जवळून नीट पाहिलं तर ते डोळे आहेत हे कळत होतं. स्त्रियांचे डोळे! हे सगळं मागच्या आकाशात हळूहळू मिसळून गेलं होतं.
निसर्गातलं ‘स्त्री’चं अस्तित्व- तिचं त्याचं नातं हे असं अभिन्न, एकजीव असल्याची जाणीव आपल्याला पदोपदी येते. ‘निसर्ग आणि स्त्री’ म्हणजे जणू एकमेकांचे प्रतिशब्दच वाटावेत इतके ते जवळ आहेत. रामायणात ‘सीता’ ही भूमिकन्या, तर महाभारतात पृथा (कुंती) ही सुद्धा भूमीचंच नाव घेऊन आलेली. भूमीसारखीच सतेज, नवनिर्मितिक्षम, सदैव मांगल्यकारी अशीच या दोघींची वर्णनं आहेत. सीतेला पळवून नेणारा किंवा धमकावणारा एकच दशानन होता. पण निसर्गसीतेला पदोपदी पीडणारा, तिचं शोषण करणारा माणूस ‘अब्जानन’ आहे. ‘इको फेमिनिझम’ या विचारधारेत हीच मांडणी आहे. निसर्ग आणि स्त्री त्यांच्यापेक्षा सबल अशा सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच चेपले जात असतात. या गृहीतकावर ही आधारली आहे. खरंतर निर्मितीची क्षमता असणारे हे दोन घटक- पण त्यांच्या निर्मितीवर समाजव्यवस्थेचा अंकुश असतो, हे त्यातलं साधम्र्य. वंदना शिवा या मूळ भौतिकशास्त्रज्ञ, पण आज त्यांचं सगळं आयुष्य त्या ‘पर्यावरण आणि स्त्री’ यांची सांगड घालण्यात व्यतीत करताहेत.
ही आजची आधुनिक मांडणी असली तरी हे अद्वैत खूप पूर्वीपासून साहित्यातून, संगीतातून, लोकगीतातून व्यक्त झालं आहे. ‘भूमी आणि स्त्री’ या प्रा. शैला लोहिया यांच्या पुस्तकात संशोधन-अभ्यासाच्या मदतीनं हे नातं स्पष्ट केलं आहे. शेतकरी-आदिवासी स्त्रियांचं निसर्गाशी जोडलेपण त्यात जास्त वर्णिलेलं आहे.
नांगरणीपासून घरात आलेल्या दाण्या-दाण्यापर्यंत ‘बाईचा जो हात’ त्यावरून फिरत असतो तो वेगवेगळय़ा ओव्या-गीतांमधून दाखवला आहे. मुळात ‘शेती’चा शोधही स्त्रियांनीच लावला असावा, असे बरेच संदर्भ संशोधनातून दिले जाताहेत. ‘मृदुत्व’ किंवा ‘माया’ हे विशेष स्त्रीगुण या जवळिकीतून व्यक्त झालेले दिसतात. मग ती माया शेतातल्या पिकावरची असो किंवा शहरातल्या फ्लॅटमधल्या/ गाळय़ामधल्या आवर्जून जोपासलेल्या तुळशी-जाईजुईवरची असो!
स्त्रीचं रोजचं आयुष्यही निसर्गाशी थेट जोडलं गेलं आहे. निसर्ग काय म्हणतो? ‘वापरा- पुन्हा वापरा - मला परत द्या आणि पुन्हा वापरा!’ हे पुनर्वापर-पुनर्निर्माणचक्र बाईच्या विविध कामांत प्रतिबिंबित होताना दिसतं. कधी ते धुण्याचं पाणी वळवून अळवाच्या वाफ्यात जाताना दिसतं. तर कधी राहिलेल्या अन्नावर वेगवेगळे प्रयोग करून ‘टिकाऊ’ पदार्थ बनण्यात असतं. कधी लग्नातल्या साडीचा लेकीला शिवलेला ड्रेस असतो, तर कधी नारळाच्या काथ्यापासून बनणारा ‘वॉलपीस’ सजतो.. निसर्गातला ‘यथायोग्य वापराचा’ नियम ती कसोशीनं पाळत असते. निसर्गाचं रूप दर्शवणाऱ्या कितीतरी कला स्त्रियांनी विकसित केल्या आहेत. बिहारची ‘मधुबनी’ काय किंवा वारली स्त्रियांची सरळ, सुलभ चित्रलिपी काय, मातीच्या सुबक पणत्यांवरचे रेखाटन काय किंवा भरतकामातून चित्रित झालेली निसर्गचित्रं काय, त्याचाच आविष्कार!
स्त्रीचं सगळं जगणं निसर्गाचं लघुरूप आहे. वरवर दिसायला साधं-सरळ, पण खोलात जाऊन पाहिलं तर किती गुंतागुंतीचं! ‘मी काही करत नाही. घरीच असते!’ या एका वाक्यामध्ये कितीतरी ‘करणं’ दडलेलं नसतं का? वरवर ओसाड-मुरमाड दिसणाऱ्या जमिनीच्या अंगाखांद्यावरही किती प्रकारचं ‘जीवन’ फुलत बहरत असतं हे ‘ब्युटिफुल पीपल’ सारखा निसर्गसंवादी चित्रपट पाहिल्यावर लक्षात येतं.
रोजच्या व्यवहारातही निसर्गाला प्रेमानं, अलगद अनुकूल करून घेत जगण्याचा प्रयत्न स्त्री करत असते. गाईचं दूध काढतानाही एक आचळ वासरासाठी जसं मोकळं सोडायचं असतं, तसंच निसर्गातलं काहीही घेताना ओरबाडून, मुळापासून उपसायचं नाही ही भावना स्वाभाविकपणे स्त्रीला उमजू शकते. फार पूर्वी सुमित्राताई भावे यांनी दिग्दर्शित केलेला ‘सरशी’ नावाचा लघुपट या निमित्तानं आठवला. गावात सरकारकडून येणारं अनुदान नकदी पिकासाठी वापरायचं का गोबर गॅस प्लांट उभारून- लाकूड जळण वाचवून घरच्या घरी इंधन बनवायचं असा एक तिढा. पुरुषांचा कल नकदी पिकाकडे असतो. हळूहळू बायका-बायकांत चर्चा होते, एकजूट होते आणि विषय मताला पडून ‘गोबर गॅस प्लांटवर’ शिक्कामोर्तब होतं. एक चुणचुणीत परकरी पोर आपल्या झिपऱ्या सावरीत शेवटी म्हणते, ‘आन् अशा रीतीनं म्हैलांची सरशी झाली!’
ज्या कामातून, योजनेतून निसर्गासोबतच्या सहजीवनाला पाठबळ मिळतं ती स्त्रियांची स्वाभाविक प्राधान्याची गोष्ट असते. तिचे बहुतेक नेम, व्रतं, सण, निसर्गचक्राशी एकरूप होणारे असतात. म्हणून निसर्गाचं रक्षण करणाऱ्यांमध्ये वंदना शिवांसारख्या अभ्यासक, मेधा पाटकर- वंगारी मथाईंसारख्या लोकसंघटक, बिष्णोई समाजातील अनाम स्त्रियांचे हजारो हात अग्रेसर असतात, संघर्षांलाही सिद्ध होतात. विकासाचे पर्यायी-निसर्गमित्र बनवणारे मार्ग शोधायला प्रवृत्त करतात. नुकतीच एका छोटेखानी कार्यक्रमात ठाण्यातल्या एका शिक्षिकेकडून ‘शून्य कचऱ्या’ची अभिनव गोष्ट ऐकली. ज्या श्रद्धेनं आणि चिकाटीनं त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात हे साधं-सोपं व्रत पेरलं, ते ऐकून वाटलं, ‘किती सहज शक्य आहे हे!’ आणि बाईनं ठरवलं तर कुटुंबातल्या अजून काहीजणांना, ‘शून्य कचरा’ करावासा वाटेल हे नक्की!’
पण पर्यावरणाशी- निसर्गाशी असणारं हे नाळेचं नातं आजच्या प्रगतीच्या वेगामुळे तुटू पाहातंय. हे तुटलेपण स्त्रीजीवनावरही परिणाम करतंय. शंृगारासाठी ‘मेंदी’सारखे नैसर्गिक स्रोत वापरणारी स्त्री रासायनिक प्रसाधनाच्या लाटेत वाहून जात आहे. बाजारात गेल्यावर ‘कॅरी बॅग’ मागण्यासाठी हुज्जत घालून तीच कॅरी बॅग कचऱ्याच्या डोंगरात बेदरकारपणे फेकून देत आहे. अन्नाचा पुनर्वापर करण्याचं तंत्र पिढय़ान्पिढय़ा वापरणाऱ्या आपण स्त्रिया- चैनीच्या-स्टेटसच्या - भपक्याच्या नावाखाली शेकडो टनांचा अन्नकचरा निर्माण करून पृथ्वीवर ‘डंप’ करत आहोत. ‘यूज अँड थ्रो’ म्हणत थर्माकोल-प्लॅस्टिकसारख्या अविघटनशील पदार्थाना उदार आश्रय देत आहोत. ‘शिळं पाणी’ फेकून देऊन चांगल्या शुद्ध पाण्याला सांडपाण्यात बदलतो आहोत. बेसुमार डिर्टजट्स वापरून ओढे, नाले, इतकंच काय सांडपाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेजेसमध्येही न विरघळणारे विषारी थर तयार करत आहोत. सिंथेटिक कपडय़ांचे ढीग कचऱ्यात लोटतो आहोत. ‘आपलं घरकुल स्वच्छ-सुंदर (डिसेंट!)’ करताना निसर्गाचं घरकुल ओसाड आणि गलिच्छ बनवत आहोत! हे सगळं आपण थोपवू शकत नाही का? निसर्गाशी तुटती नाळ पुन्हा जोडमू शकत नाही का?
कुणी म्हणेल, स्त्रियांवरच आहे का याची जबाबदारी?हा कुठला न्याय?
हा न्याय नसेलही, पण यात ‘बदलाचा पुढाकार’ नक्कीच आहे. ‘जे जाणते असतात त्यांना दु:ख अधिक सोसावं लागतं. कारण त्या दु:खावर उतारा कसा मिळवायचा हे तेच शोधून काढू शकतात! स्त्रियांच्या संघटित प्रयत्नांनी ‘उभ्या’ बाटलीची ‘आडवी’ बाटली होऊ शकते, कोटय़वधीची उलाढाल असणारी ‘बचत अर्थक्रांती’ होऊ शकते. तर निसर्गाची बिनसलेली गाडी रुळावर का येऊ शकणार नाही? छोटय़ा छोटय़ा संकल्पांनी, निश्चयांनी, एकदिश प्रयत्नांनी ‘निसर्ग आणि स्त्रीचं अद्वैत’ पुन्हा जुळू लागेल. ‘आपण त्यासाठी तयार आहोत का?’ हा प्रश्न स्वत:ला विचारण्याची गरज आहे, इतकंच!