स्त्री जातक : तळ्यात-मळ्यात Print

altडॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रियांना निर्णय घेता येत नाही, किंबहुना त्यांच्यावर निर्णय घेण्याची फारशी वेळ येत नाही, असं मानलं जातं. निर्णयाच्या बाबतीत तळ्यात की मळ्यात अशी परिस्थिती येऊ न देता निर्णयाची जबाबदारी घेता येण्यासाठी तितकाच खंबीरपणा हवा..
ग ल्लीत मुलामुलींचा खेळ रंगात आला होता. राज्य घेणारी मुलगी जोरात म्हणायची, ‘तळ्यात’! सगळी मुलं लगेच जवळपासच्या निळ्या रंगाच्या वस्तूंजवळ जाऊन उभं राहायची. ती जर म्हणाली ‘मळ्यात’ तर हिरव्या रंगाच्या जागेजवळ- वस्तूजवळ पोहोचायचं. या धावपळीत ‘राज्यवाल्या’ मुलीनं जर एखाद्याच्या अंगाला हात लावला तर ती किंवा तो बाद होणार आणि राज्य घेणार हे ठरलेलं. (‘राज्य’ घेणं नकोसं वाटतं ते फक्त अशा खेळांमध्येच- अन्यथा बहुतेक वेळा जो तो दुसऱ्याचं राज्य बळकवायलाच टपलेला/ली दिसते!) या पळापळीत एक क्षण असतो तो ‘ठरवण्याचा’! कुठल्या दिशेला पळायचं, किती वेगानं पळायचं, पकडणारी व्यक्ती आपल्यापासून किती जवळ-लांब आहे. या साऱ्या अंदाजांवर ठरवायचं. क्षणात निर्णय घ्यायचा असतो. ज्याचा निर्णय जमला तो सुटला, ज्याचा चुकला तो पकडला जाणार हे नक्की.
खेळातला निर्णय तो काय तात्पुरता किंवा ‘गाजराच्या पुंगी’सारखा. पण प्रत्यक्ष आयुष्यात ‘निर्णय’ घेणं ही आपल्याला पदोपदी लागणारी एक महत्त्वाची क्षमता किंवा कौशल्यांची नाव आहे, पण ही काही आपोआप जन्मताच मिळणारी क्षमता नाही. आपल्या अनुभवांतून, विचारांतून तिला पैलू पाडत जावं लागतं. हे पैलू जर नीट पाडता आले तर निर्णय घेणं आणि त्याहीपेक्षा ते निभावणं, प्रत्यक्ष अमलात आणणं हे सोपं- कमी त्रासाचं होतं.
‘स्त्रियांची निर्णयक्षमता’ हा पूर्वीपासूनच एक मोठा वादाचा विषय आहे. ‘बायकांची अक्कल चुलीपुरती’ किंवा ‘शिकून काय बॅरिस्टर होणार आहे की काय?’ अशा मध्ययुगीन टिप्पण्या बऱ्याचशा इतिहासजमा झाल्या असल्या तरी त्यांचे ठसे पूर्ण पुसले गेलेले नाहीत.
एका कार्यशाळेत ९वी/१०वीच्या मुलामुलींना प्रश्न विचारत होते. कुठले व्यक्तिगुण स्त्रियांमध्ये जास्त आहेत, कुठले पुरुषांमध्ये ठरवायचं होतं. ‘बुद्धिमत्ता’ या गुणाला मुलांनी बरोबरीचं मानलं खरं पण ‘निर्णयक्षमता’ मात्र मुलग्यांमध्ये जास्त असं ठामपणे नोंदवलं. (हे नोंदवण्यातली मेजॉरिटी ‘मुलग्यां’ची होती!)
‘‘तुम्हाला असं का वाटतं?’’ या प्रश्नाला उत्तर देताना एक मुलगा म्हणाला, ‘‘कारण बाई, मुलींना काहीही ठरवण्याची वेळ येतेच कुठे? त्यांना सल्ले द्यायला, काय करायचं ते सांगायला किती तरी जण असतात. आम्हाला मात्र सगळे ‘एवढा मोठा झालास आणि एवढं ठरवता येत नाही का?’ असं म्हणतात. मग आम्हाला ठरवावंच लागतं.’’ त्यांचं मत जरी मला पटलं नव्हतं तरी त्या मुलाचं स्पष्टीकरण अगदीच चुकीचं नव्हतं. मग पुढचा प्रश्न भात्यातून काढला- ‘‘जेव्हा दोनपैकी एक गोष्ट ठरवायची असते, म्हणजे जेव्हा द्विधा मन होतं तेव्हा तुम्ही काय करता?’’ यावरही मुलांनी सांगितलं, ‘‘बाई, अशी वेळ फारशी येतच नाही. काय करायचं हे आम्ही आधीच ठरवलेलं असतं, पण तरी समजा वाटलंच तर कुणाला तरी विचारू, पण जे आम्हाला वाटेल तेच करू.’’ मुली त्यावर लगेच फार बोलल्या नाहीत, पण दोन सत्रांच्या मधल्या मोकळ्या वेळात दोघीतिघी जवळ येऊन म्हणाल्या, ‘‘बाई, आम्हालापण मनात ठरवलेलंच करावं असं वाटतं, पण बाकीच्यांना (म्हणजे आई-वडील, थोरली भावंडं-शिक्षक..) न विचारता कसं नक्की ठरवायचं असं वाटतं. आणि मग विचारल्यावर त्यांनी जर काही वेगळं म्हटलं तर आम्हाला ‘नाही’ म्हणता येत नाही. ते म्हणतील तेच ठरवावं लागतं.’’ त्या मुलींच्या प्रांजळ बोलण्यातून या कोडय़ाचा उलगडा झाला. ‘ठरवण्याची वेळ येणं’ म्हणजे- ‘इतरांचंच ऐकण्याची- तसाच निर्णय घेण्याची सक्ती न वाटणं!’ अच्छा! म्हणून निर्णयक्षमता स्त्रियांमध्ये ‘कमी’ असते असं या सगळ्यांना वाटतंय की काय? ज्या गटातली चर्चा मी आता सांगितली तो गट बऱ्यापैकी ग्रामीण, पुण्याजवळच्या रुर्बन भागातला होता. तेव्हा हे सहज शक्य होतं, पण शहरी भागात, सुशिक्षित, संधीचा सुकाळ असणाऱ्या स्त्रियांचं काय? तिथे ‘निर्णयक्षमतेचं’ काय होतं? असा प्रश्न मनात आलाच.
दुसऱ्या एका शिबिरात काही समवयस्क-मध्यमवयीन मैत्रिणींशी गप्पा मारत होते. तेव्हा विषय निघाला की, ‘‘असे कुठले निर्णय होते की जे घेणं आपल्याला आपल्या भोवतालच्या पुरुष व्यक्तींपेक्षा जास्त अवघड गेलं?’’ चक्क एका कागदावर प्रत्येकीला यादी करायला सांगितली. त्यातली नमुन्यांची वाक्यं म्हणजे- ‘करिअर का घर?’ , ‘लग्न कधी करायचं?’,  ‘करायचं की नाही?’,  ‘लग्नानंतर घरात साडीच हवी का ड्रेस चालेल?’,  ‘पहिलं मूल कधी होऊ द्यावं?’,  ‘घरातल्या सणवारांना रजा किती काढायच्या?’,  ‘मुलांच्या आजारपणात कामाला जावं का नाही?’,  ‘या वर्षी घराला पडदे करावेत का पुढच्या वर्षी?’,  ‘सासरच्या मंडळींना नेमके कुठले कसे आहेर द्यावेत’ इत्यादी.. यातले बरेचसे निर्णय कुटुंबातले. स्त्रियांच्या रोजच्या व्यवहारातले असूनही त्या बाबतीतही द्विधा मन:स्थिती होती तर जे आपल्या परिघाबाहेरचे, काहीसे अपरिचित अनुभव/ जबाबदाऱ्या असतील त्याबद्दलचे निर्णय घेणं स्त्रियांना अवघड जात असणार यात शंका नाही.
मला मुख्य जिव्हाळ्याचा वाटतो तो ‘निर्णय’ घेण्यातला पुढाकार आणि त्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी स्त्रियांमध्ये कमी दिसते की काय हा प्रश्न! नुकतीच तिशी ओलांडलेली उच्चशिक्षित पण जाणीवपूर्वक ‘गृहिणीपण’ सांभाळणारी एक मैत्रीण एकदा भेटायला आली. तिला असं प्रामाणिकपणे वाटत होतं की, ‘‘बऱ्याचदा स्त्रिया करियरिस्ट बनण्याचा निर्णय घेतात, पण मग दुसरीकडे ‘आपण स्त्री’ म्हणून आपल्याला कामात सवलती मिळाव्यात, असा आग्रहही धरतात. त्यांची राहणी आधुनिक असते, पण मूल्यव्यवस्था पुरातनच असते. किंबहुना ती लाडाने सांभाळलेली असते. उदाहरणार्थ ‘स्त्रीदाक्षिण्य!’ स्पर्धा तर हवी पण त्याकरता करायला लागणारा आटापिटा पाहिला की मग ‘राखीव जागां’ची आठवण होते. मला हे अजिबात पटत नाही. एकदा स्पर्धेत उतरायचा निर्णय घेतला तर मग त्यातले सर्व धोके पत्करायला नकोत का? मी स्वत: गृहिणी म्हणून पूर्ण वेळ घरासाठी देण्याचा निर्णय घेतला तोही त्यातले सर्व चांगले वाईट परिणाम ध्यानात घेऊनच!’’
तिच्या प्रांजळ कथनातील तीन गोष्टी माझ्या मनाला खूपच पटल्या. ‘जबाबदारी’, ‘परिणाम’ आणि ‘विचार-आचार’ यातली सुसंगती! कुठलाही निर्णय घेताना या तिन्ही गोष्टींचा खूप खोलवर विचार करावा लागतो. निर्णयाचं स्वातंत्र्य तर हवं, पण त्याची जबाबदारी (अर्थात निर्णय चुकला/ फसला तर) मात्र दुसऱ्यावर ढकलायची खेळी करणं, त्यासाठी स्वत:कडे कमीपणा- अक्षमता असल्याचं दर्शवणं असे पर्याय कधी कधी अवलंबले जातात. एकीकडे ‘स्वावलंबन’ हा मंत्र जपायचा आणि बारीकसारीक गोष्टींमध्ये ‘भावनिक अवलंबन’ प्रतिष्ठेचं मानायचं असा पवित्रा स्त्रिया अनेकदा घेताना दिसतात. अमृता ही एका कंपनीत प्रतिष्ठित फायनान्स मॅनेजर आहे. लाखो-करोडो रुपयांचे निर्णय घेताना ती कचरत नाही, पूर्ण ऑफिसचं व्यवस्थापन करते, पण घरच्या बारीकसारीक बाबतीत मात्र ‘आईनं’ असं सांगितलंय, अमुक गोष्टीबद्दल मी एकटी नाहीच बाई ठरवणार, नवऱ्याशिवाय माझं xxx बाबतीत कसं अडूनच राहतं..’’ अशा उद्गारांनी तिचं बोलणं सजलेलं असतं. यातील ‘निर्णयाच्या वाटपाचा’ मुद्दा बाजूला ठेवला तरी आपण या गोष्टी ठरवल्या तर त्या निभावण्याची शंभर टक्के जबाबदारी. त्यातलं वाईटपण/ मोठेपण पेलावं लागेल ही सुप्त चिंता मनात कुठे असेल का?
प्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे यांच्या ‘मध्य लटपटीत’ या कथेतील नायिकेला तिची सासू म्हणते, ‘‘आमच्यापेक्षा तुमच्या पिढीचंच कठीण आहे गं बायो. आमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी इतरांनीच ठरवल्या. त्या जमून आल्या तर आपलं भाग्य आणि फिसकटल्या तर नशिबाचं दान उलटं पडलं असं आम्ही मुकाट समजून चालायचो. आता तुम्हीच तुमचं सगळं आखता, ठरवता आणि फसलं तर तळमळत बसता. सारखं ‘दही खाऊ का मही खाऊ’ करता. आमच्यासारखं मुकाटपण तुम्हाला मानवत नाही अन् आधाराचे दोरही सोडवत नाहीत!’’ कथानकातील त्या वृद्ध स्त्रीचं हे निरीक्षण फार बोलकं आहे, असं मला वाटतं. करिअर आणि कुटुंब- स्वयंनिर्णय आणि अवलंबन- धोके पत्करणं- सुरक्षित कवचात राहणं अशा ‘तळ्यात-मळ्यात’चा खेळ स्त्रिया सोयी-सवडीनुसार खेळताना दिसतात. पण त्या वेळी दोन्हीकडचे संकेत, आव्हानं, पवित्रे, व्यूहरचना वेगवेगळ्या असणार आहेत. त्याला विचारपूर्वक सामोरं गेलं पाहिजे हे विसरायला होतं. मग अडचणीच्या वेळी ‘बाई’ असल्याचं भांडवल करायचा मोह होतो.
या मानसिकतेतून जाणीवपूर्वक बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्याही अनेकजणी आहेत. चित्रपट संकलन, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात काम करणारी एकजण तिचे अनुभव सांगत होती. ‘‘सर्व झगमगाटाबरोबरच अनेक नकोशा गोष्टींनी व्यापलेलं हे क्षेत्र ‘स्त्री’ म्हणून काम करताना कसं वाटतं?’’ या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, ‘‘खरं सांगू का- आपण ‘स्त्री’ आहोत हे आपणच पूर्णपणे विसरून झोकून देऊन कुठचीही एक्स्ट्रा सवलत न मागता जेव्हा सगळ्यांबरोबर झटतो ना तेव्हाच बाकीचेही ते विसरण्याची शक्यता जास्त असते!’’
दुसरी अगदी विशीतली तरुण फ्लाइंग लेफ्टनंट तिच्या प्रशिक्षणादरम्यानचे प्रसंग सांगताना म्हणाली, ‘‘या तथाकथित पुरुषी क्षेत्रात मी जिद्दीनंच उतरले आहे. पूर्ण प्रशिक्षणादरम्यान ‘मुलगी’ म्हणून सवलत तर नाहीच, पण उलट आमचा परफॉर्मन्स सर्वसाधारण पुरुष कॅडेट्सपेक्षा सरसच आहे हे दाखवून देण्यासाठी खूप मेहनत करायला लागायची. निर्णय आमचा आहे ना मग तो तेवढय़ा जिगरबाजपणे निभवायला नको का?’’
या दोघींच्या प्रतिसादांमध्ये मला ‘तळ्यात-मळ्यात’च्या ओढाताणीची उत्तरं दिसतात. आधाराची चौकट गृहीत न धरणं, निर्णय घेण्यापूर्वी सल्लामसलत केली तरी एकदा एखादी गोष्ट ठरवली तर तिची सर्व प्रकारची जबाबदारी घेणं, ती पार पाडताना ‘स्त्री’ म्हणून उगीचच देऊ केलेल्या पॅम्परिंगला (लाडांना) कटाक्षानं लांब ठेवणं, आपले प्रश्न आपणच सोडवायचे (भावनांचा कोरडेपणा आणि पूर्ण अवलंबन या टोकांना टाळून) हे जर आपण जगवू शकलो तर मग स्त्रियांना ‘निर्णय’ घेता येत नाहीत- ‘घेतले तर निभवता येत नाहीत,’ असं म्हणायची कुणाची हिंमत आहे?