स्त्री जातक : बाईच्या मनातला ध्रुव! Print

डॉ. अनघा लवळेकर ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अशी कुठल्या तरी तथाकथित अढळपणाला धरून ठेवण्याची त्याच्या शाश्वत- स्थिर असण्याची गरज मनात घर करून बसलेली असते. त्या अढळपणाला कुणी आव्हान दिलं तर मग भावनिक संतुलन ढासळतं. या साऱ्या कोंडीतून सुटण्याचा मार्ग काय? तर मुळात ‘आपल्या मनात असा एक काल्पनिक ध्रुव आहे’ याचा आधी स्वीकार करता यायला हवा..
अथांग आकाशात कायम एकाच ठिकाणी चमकणारा, आपल्या स्थानापासून कधीही न ढळणारा तारा म्हणजे ‘ध्रुव’! आपल्यापैकी प्रत्येकानंच लहानपणापासून ध्रुवाची कहाणी ऐकलेली- वाचलेली असते. लहान वयातही स्वत्व जपणारा, अपमान सहन न होणारा, अपार कष्टांनी, दृढनिश्चयी वृत्तीनं तपश्चर्या करून देवाला स्वत:साठी अढळपद निर्माण करायला लावणारा ध्रुव! ध्रुवाची कहाणी मोठी विलक्षण आहे. सर्व असूनही दारिद्रय़ात राहावं लागणारा आणि तरीही स्वत:च्या लौकिक सुखापेक्षाही ‘जिथून मला कुणी ढकलून देणार नाही अशी जागा दे’ म्हणून आपला हट्ट पुरा करणारा ध्रुव एका वेगळ्याच मानसिकतेचा बनलेला आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाला अशी अढळपणाची आस असते. ‘अढळपद’ म्हणजे पूर्ण सुरक्षा! एक प्रकारची निश्चिंतता. ती मिळाली की ‘सुखाची’ भावना मनात येते. आपलं स्थान डळमळीत नाही, या विश्वासावरच तर माणूस प्रगतीसाठी प्रयत्न करत राहतो.
स्त्रियांच्या बाबतीतही हे खरं आहेच. पण त्यात एक छोटासा फरक आहे. स्त्रीचं समाजातलं, कुटुंबातलं स्थान हे नेहमी कुठल्या तरी संदर्भ बिंदूच्या (reference point) किंवा पुरुष व्यक्तीच्या अनुसार गेली शेकडो र्वष ठरत आलं आहे. गेल्या पन्नास वर्षांत त्यात काही फरक पडला असला तरी बहुसंख्येचं चित्र बदललेलं नाही. आपल्या नावाच्या आधी ‘कु.’ असावं ‘सौ.’ असावं की ‘श्रीमती’ असावं याची अगदी पुरेपूर चिकित्सा करणाऱ्या स्त्रिया आजही बहुसंख्येनं आहेत. (मी संपादक म्हणून काम करत असलेल्या एका द्वैमासिकात धोरण म्हणून सर्व स्त्री लेखकांची नावं आम्ही या कुठल्याही बिरुदाशिवाय छापली तेव्हा एका सुबुद्ध आणि सुप्रसिद्ध लेखिकेनं संपादक मंडळाला भरपूर धारेवर धरलं होतं!) हे ‘बिरूद’ हा बाईच्या मनातला एक लपलेला ध्रुवच आहे असं मला वाटतं. तो अर्थातच सामाजिक संस्कारातून वातावरणातून निर्माण होतो, बळकट होत जातो आणि नकळत पुढच्या पिढीकडे संक्रमित होतो. एकूण तात्पर्य म्हणजे कुठला तरी खुंटा घट्ट धरून ठेवण्याला पर्याय नाही, त्याशिवाय आपलं अस्तित्व सिद्धच होत नाही, परिपूर्ण होत नाही असा समज त्यामागे असतो. मग कधी तो खुंटा वस्तुरूप असतो तर कधी मनुष्यरूप! घरातला ‘ओटा’ कुणाचा? हा त्या अढळपदाशी जोडलेला एक सनातन प्रश्न. माझ्या एका परिचित घरात नुकतंच लग्न होऊन आलेल्या मुलीला सासूनं सांगितलं, ‘अगं इतकी र्वष माझ्या सासूबाई होत्याच. आत्ता कुठे त्या गेल्या तेव्हा संसार माझ्या हातात आलाय. आता तू कसली म्हणून काळजी करू नकोस. मी ‘सग्गळं’ करीन. हे ऐकल्यावर आधी खूष झालेल्या सुनेला जेव्हा आपणही मुखत्यार व्हावं असं वाटायला लागलं तेव्हा तिला त्या ‘सग्गळं’ची अडचण व्हायला लागली. सासूबाईंचा ‘संसाराचा’ ध्रुव खूपच बळकट आणि प्रभावी असल्याने त्यांना त्या स्थानातच सर्वाधिक सुरक्षित वाटत होतं. ‘आपलं ‘संसारीपण’ जोपर्यंत शाबूत आहे, तोपर्यंतच या कुटुंबात आपला मान आहे, नाही तर नाही’ असा त्यांचा दृष्टिकोन होता. कधी हा ‘ध्रुव’ स्वयंपाकघराच्या रूपात, कधी ‘स्त्रीधन’ म्हणून घातलेल्या दागिन्यांच्या रूपात तर कधी नवरा, पिता किंवा मुलाच्या रूपात असतो. त्याच्याभोवती मग स्त्रीचं सगळं विश्व फिरत राहतं. समुपदेशनाच्या ज्या केसेस वृत्तपत्रांतून मांडल्या जातात, त्यातील एक टोकाची समस्या आठवते. एका तरुणीला आपल्या नवऱ्याला भेटायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल (स्त्री असेल तर विशेष) संशय येत असे. नवऱ्यानं ‘माझ्या आणि माझ्याच’ प्रत्येक गोष्टीची दखल घेतली पाहिजे, असा तिचा हट्ट होता. त्यानं घरातल्या दुसऱ्या कुणाचीही साधी चौकशी जरी केली तरी तिला प्रचंड असुरक्षित वाटायचं. आपण त्याच्या आयुष्यातून बाहेर फेकले जातो आहोत अशी भीती वाटायची. कारण ‘नवऱ्याचं १०० टक्के प्रेम / दखल’ असा तिच्या मनातला ध्रुव होता. त्यातून ही एवढी गुंतागुंत!
कधी कधी नातेसंबंधात एखाद्या छोटय़ाशा गोष्टीबद्दलही स्त्रिया अतिसंवेदनाक्षम बनतात. विशेषत: जवळकीच्या व्यक्तींबाबत ही संवेदनक्षमता, हळवेपणा खूप जास्त असतो. माझ्या निकटच्या नात्यातील एक काकू कधीच हाताला मेंदी लावत नसत. लहानपणीच्या कुतूहलानं मी सहज त्यांना विचारलं, ‘काकू तुम्ही इतकी छान मेंदी आम्हाला काढून देता, तुम्ही का नाही लावत? मी काढते नक्षी तुमच्या हातावर.’ त्यांची एरवीची प्रसन्न चर्या एकदम बदलली आणि त्या रूक्षपणे म्हणाल्या, ‘मी कधीच नाही लावत.’ ‘पण का?’ माझा निरागस, सरळ प्रश्न. सांगू की नको अशा स्वरात त्या म्हणाल्या, ‘लग्नानंतर एकदा मेंदी लावली हौसेनं तेव्हा ‘हे’ म्हणाले, गोऱ्या हातांनाच मेंदी जास्त शोभून दिसते. तेव्हापासून मी मेंदी लावणं सोडलंय.’ हळव्या संतापाचा असा वेगळाच ‘ध्रुव’ मला त्यांच्या उद्वेगात दिसला.
तर अशी कुठल्या तरी तथाकथित अढळपणाला धरून ठेवण्याची त्याच्या शाश्वत- स्थिर असण्याची गरज मनात घर करून बसलेली असते. त्या अढळपणाला कुणी आव्हान दिलं तर मग भावनिक संतुलन ढासळतं. ताण, चिडचिड, असूया, निराशा, अगतिकता किंवा आक्रमकता निर्माण होते. जगण्याची उद्दिष्टंच बदलून जातात. ‘फॅशन’ या चित्रपटात याचं एक चांगलं उदाहरण दर्शवलं आहे. ‘रूप लावण्य’ किंवा ‘तारुण्याचा प्रभाव’ हाच ध्रुव असणाऱ्या शिखरावरच्या मॉडेलला जेव्हा स्वत:चं आकर्षणमूल्य कमी झाल्यासारखं वाटतं. दुसरी कुणी आपल्या स्थानाला धक्का देते असं वाटतं तेव्हाची तिची तडफड आणि निराशेतून केलेली स्टंटबाजी- आत्महत्या- यातून हा ‘मनातला ध्रुव’ किती प्रभावी असतो हे त्यात मांडलं आहे.
अशा ‘ध्रुवाला’ शरण गेल्यामुळे आपणच स्वत:ला ‘अत्यंत दु:खी (miserable) बनवतो आहोत हे विसरून जायला होतं. त्यातून क्षमता कमी झाल्या तरी, आहोत ती भूमिका न बदलणं, दुसऱ्याची उणीदुणी काढणं, अतिशय टोकाच्या प्रतिक्रिया देणं असं घडायला लागतं.
या साऱ्या कोंडीतून सुटण्याचा मार्ग काय? तर मुळात ‘आपल्या मनात असा एक काल्पनिक ध्रुव आहे’ याचा आधी स्वीकार करता यायला हवा आणि एरवीच्या आयुष्यात ‘ध्रुव’ हा दिशादर्शक आणि निश्चयाचं प्रतीक असला तरी मनातला हा ध्रुव मात्र आपल्याला मूळ उद्दिष्टापासून भरकटवणारा आहे याचं भान यायला हवं. मनातली असुरक्षितता नक्की कशामुळे आहे, त्यातील कुठल्या गोष्टींवर मात करणं आपल्या नियंत्रणात आहे, कुठल्या नाही- हेसुद्धा शांतपणे ठरवायला हवं. परदेशी गेलेल्या मुलाची मेल  ४-५ दिवस आली नाही म्हणून ‘हा आपल्याला विसरला’ असं वाटतंय का? एखादे दिवशी घरातल्या इतर लोकांनी आपल्याला न विचारता वेगळा काही बेत आखला तर खचल्यासारखं वाटतंय का? एखादं जुनं पातेलं हरवलं तर आयुष्याची कमाई हरवल्यासारखी चिडचिड होते आहे का?- हे खरंच नीट पारखायला हवं.
स्वत:चे वेगळे ‘संदर्भ बिंदू’ (Reference point)) आपल्याला निर्माण करता यायला हवेत. जे आपला आधार बनतील, पण ‘आश्रय’ वाटण्याइतकं अवलंबित्व मनात निर्माण करणार नाहीत. मी आयुष्यात कशाला महत्त्व देते? ते माझ्या स्वत:च्या जगण्यावर किती परिणाम करतंय? मला सापळ्यात अडकायला होत नाही ना?- हे प्रश्न विचारायला हवेत.
स्त्रियांनी आपल्याच मनात जर अशा ‘विधायक- खऱ्या दिशादर्शक ध्रुवांची’ स्थापना आपण केली तर मग बाहेरच्या व्यक्ती- घटना- वस्तू यांनी डळमळल्यासारखं वाटणारं आसन आंतरिक तृप्तीनं आणि शांतीनं नित्य अढळ ठेवता येईल, असं वाटतं.