स्त्री जातक : स्त्रीत्वाची ‘जोड’ ताकद Print

डॉ. अनघा लवळेकर ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संहारक विजयापेक्षा माणूस जोडत मिळविलेला विजय किती तरी जास्त अर्थपूर्ण आणि टिकणारा असतो आणि ही ताकद असते स्त्रीत्वात. ‘बाइंडिंग एजन्ट’ची ही जोडणीची भूमिका जर स्त्रियांनी आत्मसात केली आणि ती पुढच्या पिढीपर्यंत- मुलगे आणि मुलींपर्यंत पोहोचविली तर समाज-कुटुंबांच्या स्थैर्यात त्याचा महत्त्वाचा वाटा असेल!
सातवीच्या वर्गामध्ये ‘राजपूतांचा इतिहास’ शिकवीत होते. त्यात कथा होती राणी दुर्गावतीची. सोळाव्या शतकातील एक झुंजार राजपूत राणीची. मुघल शहेनशहा सलीमनं तिच्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी लाखोची फौज उभी केली होती. सर्व मार्ग अपयशाची- पारतंत्र्याचीच चाहूल देत होते. अशा प्रसंगी राणी दुर्गावतीनं एक अनोखं शस्त्र वापरलं आणि रक्ताचा एक थेंबही न सांडता आपलं राज्य वाचवलं. तिचं हे मुत्सद्दीपण इतिहासात अमर झालं. काय होतं हे शस्त्र? राणीनं एका दूतामार्फत सलीमला एक लखोटा पाठविला. त्यात लखोटय़ात होती राखी. हिंदुस्थानात सण-उत्सवांना असलेली नात्यागोत्यांची चौकट तिला उपयोगी पडली. त्या राखीबरोबर तिनं पाठविलेल्या संदेशात आपल्या ‘भाऊरायाला’ तिनं राखीला स्मरून फौजा फिरविण्याची गळ घातली होती आणि त्या स्त्रीसुलभ आर्जवी विनंतीचा अव्हेर सलीमला करवला नाही. एक मोठा नरसंहार आणि आपत्ती या छोटय़ाशा ‘जोडून घेण्यामुळे’ टळली. गोष्ट सांगत असतानाच मनात येत होते की, राणीला हे कसं सुचलं असेल? त्यात फक्त आणि फक्त डावपेचच असले तरी ते मनातल्या कुठल्या तरी प्रगल्भ जाणिवेतूनच स्फुरले असणार. संहारक विजयापेक्षा माणूस जोडून घेत मिळालेला हा विजय किती तरी जास्त अर्थपूर्ण आणि टिकणारा ठरला.
खरोखर, स्त्रीत्वातील ही एक मोठीच ताकद आहे, असं मला वाटतं. माणसा-माणसांना एकमेकांशी जोडून ठेवणं, धरून ठेवायला शिकवणं, प्रसंगी त्यासाठी स्वत:कडे कमीपणा, प्रासंगिक माघार घेणं हे स्त्रियांना सहजपणे जमतं. स्त्रियांना स्वत:च्या आणि इतरांच्या भावनांमधील चढ-उतार चटकन कळतात. माणसांनी एकमेकांना धरून राहणं किती गरजेचं असतं हेही त्यांना खूप लहानपणीच उमजतं. सामाजिक विकासात मुली खूप लहान वयापासूनच आघाडीवर असतात. सामाजिक रीतिरिवाज, वागण्या-बोलण्याचे संकेत त्या भराभर आत्मसात करतात. नाती जोडण्याची, जपण्याची ही स्वाभाविक वृत्ती जास्त स्पष्ट होते ती ‘एकटं’ राहणाऱ्या स्त्रियांच्या जीवनशैलीतून. काही कारणानं- विचारपूर्वक, स्वत:च्या चॉइसनं एखादी स्त्री एकटी राहत असली (शिक्षण, नोकरी, वैधव्य, घटस्फोट, करियरचा ध्यास) तरी ती काही ना काही पद्धतीनं माणसांशी जोडून घेत राहते. कधी शेजारणीबरोबर खरेदीला जा, कधी नात्यातल्या कुणाचा वाढदिवस घरी बोलावून  साजरा कर, पिठामिठाची (आज कदाचित वडा-पाव/ बर्गर/ पिझ्झाची..) देवाणघेवाण कर- असले उद्योग चालूच असतात. आलेल्या माणसाला आपल्या घरी ‘रमावंसं’ वाटलं पाहिजे, अशी आच असते. एकटे राहणाऱ्या पुरुषांची वृत्ती त्या मानानं खूपच वेगळी असते. ‘घर’ ही  येऊन ‘पडायची’ जागा आहे, ही सोयीस्कर दृष्टी असते. कुणी आलं तर ठीक- थोडं फार स्वागत होईलही, पण माणसं जपण्यासाठी ‘घरी’ बोलावणं वगैरे जरा अपवादानंच दिसणार! बाहेर मित्रमैत्रिणी भरपूर असतीलही, पण ती त्या त्या वर्तुळातली. एका वर्तुळाचा छेद दुसऱ्या वर्तुळाशी यायला हवा, असं पटकन घडेलच, असं नाही. उलट स्त्रिया मात्र स्वत:ला ‘ल.सा.वि.’ बनवीत आपली वेगवेगळी वर्तुळं एकमेकांमध्ये घुसविण्याची धडपड चिकाटीनं करीत राहतात.
पूर्वी जेव्हा ग्रामीण भागात किंवा शहरातही वाडे, चाळी, वाडय़ा, वस्त्या ही घरांची रचना होती तेव्हा छोटय़ा-छोटय़ा खासगी कामांची, सण-समारंभांची रूपंही स्त्रिया सहजपणे ‘सामूहिक’ करून टाकत असत. मग अडल्या-पडल्या वेळी गरजू माणूस आपल्या नात्याचा- रक्ताचा आहे किंवा नाही याची फार चिकित्सा नसायची. वाडय़ातल्या कुणाहीकडे लग्नं/ मुंज निघाली तर प्रत्येक घरचं ‘पोळपाट लाटणं’ त्या कार्यक्रमांच्या तयारीला हजर व्हायचं. डझनभर हातांनी लाडू वळले जायचे, रुखवतं तयार व्हायची. हे सगळं फक्त ‘शेजारधर्म’ म्हणून नव्हे तर यातूनच सुख-दु:खांची वाटणी होऊन नाती दृढ व्हायची. आता वाडा संस्कृती लयाला जात आहे आणि अशा ‘सामूहिक कृती’पण कमी झाल्या आहेत. तरीही इतर स्वरूपांत वेगळेपणाने स्त्रियांची ही ‘जोडणी’ची गरज आणि कौशल्य व्यक्त होतच आहे.
मी सहज विचार करीत होते की, अशा ‘जोडणी करणाऱ्या दूताला’ काय काय करावं लागत असेल? एक तर नातं जोडण्यासाठी ‘स्वत:चा पुढाकार’ ही महत्त्वाची गोष्ट असते आणि ते टिकविण्यासाठी विचार, भावना, कृतीची एकमेकांशी वाटून घेण्याची तयारी लागते. या दोन्ही गोष्टी सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांचे खास’ गुण म्हणून गणल्या जातात. (पुरुषांमध्ये ते दिसले तरी त्याला ‘स्त्रीसुलभ’ (फेमिनाइन) असंच मानलं जातं!)
जवळजवळ सर्व कौटुंबिक हिंदी चित्रपटांमध्ये ‘नातेसंबंध’ ज ोडण्याचा मक्ता स्त्री पात्रांकडेच दिलेला दिसतो. मग ते ‘लग्न जुळवणं’ असो किंवा बापलेकांच्या कडाक्याच्या भांडणात केलेली (अयशस्वी?!) मांडवली असो. (नातं तोडणाऱ्या जहांबाज बायकाही कधीमधी असतात, त्यात- पण त्या खलनायिका- म्हणजेच पर्यायानं- सामान्य स्त्रियांपेक्षा वेगळ्या असतात.) एकूण ‘पक्का जोड’ नात्यांत हवा असेल तर ‘स्त्री’ला पर्याय नाही, असं सिनेमावाल्यांचं गणित असावं.
हे ‘नातं’ जोडणं सुरुवातीला औपचारिक किंवा लग्नासारख्या ‘कायदेशीर’ गोष्टींमुळे घडत असलं तरी अनेक वेळा नंतर बाहेरची चौकट जरी गळून गेली तरीही ती नाती निभावण्याची वृत्तीसुद्धा स्त्रियांमध्ये स्वाभाविक दिसते. घटस्फोट किंवा वैधव्य आलं तरीही सासरच्यांशी संपर्क ठेवणं, त्यांच्या अडीनडीला धावणं, पुनर्विवाहानंतरही तो बंध कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जपणं स्त्रियांना आवश्यक वाटते. आपल्या सुनेला वाचविण्यासाठी प्रत्यक्ष मुलाच्या विरोधात एखादी सासू साक्ष देऊ शकते, तर जुनी नोकरी सुटली तरी आधीच्या वर्तुळातील सहकाऱ्यांना एखादी लता/ सीमा वर्षांनुवर्षे फोनवर, प्रत्यक्ष भेटून, कार्यक्रमांना निमंत्रणं देऊन जोडून ठेवीत असते. तुटू पाहणारी नाती शिवण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न स्त्री मनापासून करते. तिच्या दृष्टीनं अगदीच असह्य़ किंवा दुरुस्तीच्या पलीकडे जाण्याची वेळ येईपर्यंत ती नाना प्रकारे नातं टिकविण्याचा यत्न करते, मग भले त्यात कितीही मानसिक कुचंबणा होवो. कधी तरी नात्यातील गुंते सुटतील, अडथळे निघतील, अशी एक आशा तिच्या मनात असते. व्यसनामध्ये गुरफटलेल्या व्यक्तींच्या पत्नींचा एक गट पुण्यातील ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्रात चालतो. त्या स्त्रियांची चर्चा हेच दर्शविते. अजूनही अगदी क्षुल्लक- तात्कालिक- वरवरच्या कारणांवरून नातं तोडण्याचं धाडस स्त्रिया करीत नाहीत. परिस्थिती वेगाने बदलते आहे हे खरं, पण तरीही लग्न ठरविताना- करताना ‘ही गाजराची पुंगी आहे’ असा दृष्टिकोन जवळजवळ नसतोच!
आता हे सगळं ‘नातं जोडणं-टिकवणं’ जितकं सहज वृत्तीतून आहे असं वाटतं तितकंच ते ज्या पद्धतीनं मुली आपल्याकडे वाढतात त्यामुळेही आहेच, पण म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नाही. उलट आजच्या ‘युनिसेक्स’ जमान्यात जसं धाडस, निर्णयक्षमता, आक्रमकता, असे तथाकथित ‘पुरुषी (मस्क्युलाइन) गुण’ मुलींनी आत्मसात करणं सुरू आहे, तसंच हा ‘व्यक्ती-व्यक्तींमधील पूल बांधण्याचा’ तथाकथित ‘स्त्रीगुण’ (फेमिनाइन) मुलांमध्येही विकसित होणं आवश्यक आहे. अखेर चांगल्या गुणांची बेरीज आणि दोषांची वजाबाकी हीच ‘व्यक्तिमत्त्व विकसनाची’ खरी ओळख नाही का? तेव्हा ‘नाती जोडण्या’मधील जबाबदारी ओळखणं- त्यातील निसरडय़ा जागा (गैरफायदा घेतला जाणं, छळवणूक, फसवणूक, अन्याय, एकमेकांना खेळवणं.. इत्यादी) टाळत ही ‘बाइंडिंग एजन्ट’ची- जोडणीची भूमिका जर स्त्रियांनी आत्मसात केली आणि ती पुढच्या पिढीपर्यंत- मुलगे आणि मुलींपर्यंत पोहोचविली तर समाज-कुटुंबांच्या स्थैर्याला त्याचा महत्त्वाचा आधाराचा वाटा असेल!