स्त्री जातक : जरूरत है.. जरूरत है.. Print

डॉ. अनघा लवळेकर - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज जिचा भारतीयांना गर्व वाटतो त्या मेरी कोमला जे यश मिळालं ते त्यामागे तिच्या पाठीवरचा तिच्या पतीचा- अन्य कुटुंबीयांचा हा आश्वासक हात आहे म्हणूनच! स्त्रियांची ही ‘जरूरत’ त्यांच्या कुटुंबीयांनी न सांगता ओळखली तर ..
विशाखा आज चक्क ऑफिसला दांडी मारून घरी आराम करणार होती. रोजच्या धावपळीनं, घरच्या- बाहेरच्या उस्तवारीनं ती थकून गेली होती. घरातील सर्व जण एकेक करत बाहेर पडल्यावर तिनं मस्तपैकी कॉफी करून घेतली आणि ‘एफएम’ लावला. जुनी गाणी ऐकणं हा तिचा खास आवडीचा विषय. किशोरकुमार आपल्या खटय़ाळ आवाजात गात होता.. ‘जरूरत है.. जरूरत है.. जरूरत है।


एक श्रीमतीकी, कलावतीकी, सेवा करे जो पती की..
जरूरत है.. जरूरत है.. सख्त जरूरत है।’
गायकानं अगदी कळकळीनं आपली ‘गरज’ गाण्यातून व्यक्त केली होती. ती किती महत्त्वाची आहे, तिच्याविना तो कसा अडचणीत येतो आहे, असं खुमासदार वर्णन ऐकताना विशाखाला गंमत वाटत होती. तिला आदल्या रात्री झालेला संवाद आठवला.
‘‘xxx नीट झालंय ना? उद्या माझी पंचाईत व्हायची!’’ नवरा.
‘‘आई, xxxच्या वाढदिवसासाठीचं ग्रीटिंग आणलंयंस का?’’ मुलगी..
‘‘हॅलो, ऑडिटसाठीची आकडेवारी जमा करण्याचं काम तुझंच आहे. उद्या न विसरता मला मेल कर.’’ सहकारी..
‘‘मला हल्ली चालताना फार त्रास होतो गं- जरा बाम लावून दे’’ सासरे..
रहदारीच्या गोंगाटातून धाडधाड आवाजांचे मिश्र कल्लोळ कानात पडावेत तसं विशाखाला वाटलं. तिच्या मनात आलं, ‘‘आपण इतक्या जणांच्या इतक्या ‘जरूरतें’ पूर्ण करायला धडपडतो आहोत, आपली ‘जरूरत’ काय आहे, हे कोण ओळखेल?’’
काय असते स्त्रियांची मानसिक गरज? स्त्री म्हणून काही मुळातच वेगळी असते, का संस्कारांमुळे तशी बनत जाते? खरं तर सर्व माणसाच्या काही मूलभूत मानसिक गरजा असतातच. अब्राहम मॅस्लो या मानसशास्त्रज्ञाने तर त्यांची पायऱ्यापायऱ्यांची एक मांडणीच केली आहे.
‘स्व’ची जाण
‘स्व’ आदर
प्रेम, आत्मीयता
सुरक्षितता
शारीरिक गरजा
 मुळातल्या शारीरिक गरजांवरच्या घर, आर्थिक स्थिरता, भविष्याची तरतूद या सुरक्षिततेच्या गरजा, त्या सगळ्यांचा आनंद घेता यावा म्हणून स्नेही-परिवार-आत्मीय लोकांच्या सहवासाची गरज, त्या सर्वामध्ये स्वत:चं स्थान पक्कं व्हावं म्हणून असलेली स्वत:बद्दलच्या विश्वासाची, आदराची गरज आणि त्याही पलीकडे स्वत:चं माणूसपण शोधण्याची ‘कोऽहं’ या सनातन प्रश्नाला उत्तर देण्याची गरज, अशी हा गरजांची चढती भाजणी आहे. ती कधी एकानंतर दुसरी अशी निर्माण होते, तर कधी एकमेकांमध्ये गुंफून येते.
यात स्त्रियांच्या गरजांच्या उतरंडीला कसं जोखता येईल? सध्या तरी बहुतांशी पहिल्या दोन किंवा तीन गरजांच्या पूर्ततेच्या चक्रात त्या अडकलेल्या दिसतात. ‘कुटुंब’ हे स्त्रियांच्या या पहिल्या तीन गरजा भागवणारं एक माध्यम म्हणून त्याकडे पाहिलं जातं. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी खरमरीतपणे म्हटलं होतं की, ‘‘लग्न हे बहुसंख्य स्त्रियांच्या उपजीविकेचं साधन आहे, हे सत्य नाही काय?’’ पन्नास वर्षांत परिस्थितीत पुष्कळ बदल झाला आहे मान्य करूनसुद्धा या ‘बुहसंख्यांच्या’ ‘अल्पसंख्य’ झाल्या असतील असं म्हणायला जीभ धजावत नाही. केवळ डोक्यावर छप्पर असावं म्हणून, सामाजिक वर्तुळातील स्थान टिकवायला ‘कुंकवाचा धनी’ असल्याचं ठासून सांगता यावं म्हणूनही अनेक जणी जगणं रेटत असताना दिसतात. त्यांच्या मूलभूत गरजाच पणाला लागलेल्या असतात, म्हणून त्यांना पुढच्या गरजा जाणवतच नाहीत, का जाणवल्या तरी त्या पुऱ्या न होण्याचं वैफल्य-नैराश्य त्यांनी आधीच स्वीकारलेलं असतं, असा प्रश्न मनात येतो.
एका विवाहपूर्व अपेक्षांच्या अभ्यासात मुला-मुलींकडून ज्या भावना व्यक्त केल्या जाताहेत त्यात ‘समजून घेणं’ ही एक महत्त्वाची गरज दोन्ही बाजूंनी तीव्रपणे व्यक्त होते आहे असं दिसलं. संख्याशास्त्रीय विश्लेषण केलं तर ही बाब इथेच संपते. स्त्री-पुरुष ‘दोघांनाही समजून घेण्याचं- भावनिक बंधाचं’ महत्त्व लक्षात आलंय असा ठोस निष्कर्ष यातून निघतो. मग तरी कुठे बिनसतं? तर जेव्हा या अभ्यासात खोलात जाऊन ‘समजून घेणं’ म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे, असं गुणात्मक विश्लेषण केलं तेव्हा असं लक्षात आलं की, ‘तो’ची ‘समजून घेणारी बायको’ ही व्याख्या आणि ‘ती’ची ‘समजून घेणारा नवरा (किंबहुना त्याचं कुटुंब!)’ ही व्याख्या यात खूपच तफावत आहे. त्याला वाटतंय की, ‘तिनं त्याच्या घरच्या सर्वाना विनाशर्त स्वीकारावं, त्याच्या घरच्या सर्व चालीरीती, संस्कार तात्काळ ‘आपलेसे’ करावेत, त्याच्या गरजा (शारीरिक-मानसिक) चटकन ओळखाव्यात, त्याच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये नित्य साथ द्यावी..’’ इत्यादी.
‘तिच्या’ समजून घेणाऱ्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा मात्र निराळ्या आहेत. वर म्हटलेल्या गोष्टीही तिच्या यादीत आहेत, पण त्यांच्या पेक्षाही प्राधान्यक्रमात वर आहेत त्या- ‘‘छोटय़ा छोटय़ा गोष्टींचं आपणहून कौतुक करणं, मनातल्या आंदोलनांची दखल घेणं, विचारांमध्ये-मतांमध्ये सहभागी करून घेणं- आपणही एक वेगळी व्यक्ती आहोत, केवळ या कुटुंबाचा एक ‘सबसेट’ नाही (हे प्रत्यक्ष एका मुलीने वापरलेले शब्द!) याची दखल घेणं - अशा अनेक अपेक्षा! मुलींना वाटतं की, या अपेक्षा पूर्ण करणारा म्हणजे ‘समजून’ घेणारा नवरा बाकीच्या अपेक्षा नक्कीच जाणून घेणारा असेल!’’
लहानपणापासूनच जर अशी ‘आश्वासक थाप’ मुलींना मिळाली आणि आश्रमांतर केल्यावरही- विवाहानंतरही ती सहजपणे दिली गेली, तर पुढच्या स्व-आदर आणि शोधाच्या गरजा मुली सक्षमपणे भागवू शकतील, पण असं होताना दिसत नाही.
माझ्या परिचयातील एक ज्येष्ठ महिला आहेत. आज त्यांचं वय सत्तरीच्या पुढे आहे. शिक्षणानं त्या डॉक्टर. पतीही त्याच व्यवसायातील. सामाजिक कामाची पाश्र्वभूमी असलेले, पण प्रचंड अहंकेंद्री आणि वर्चस्ववादी. रुग्णसेवेची स्वप्नं पाहणाऱ्या या अत्यंत ऋजू स्वभावाच्या, संवेदनशील बाईला एक दिवसही त्यांनी दवाखान्यात पाऊल ठेवू दिलं नाही. त्यांचं शिक्षण, त्यांची ऊर्जा, त्यांची स्वप्नं सर्व काही ‘अनुल्लेखानं’ कायमचं मारून टाकलं. जो काही ‘संसार’ त्यांनी केला तोही सतत धाकाखाली - कन्सल्टन्सी अंडर गायडन्स! घरातलं एखादं पातेलं किंवा पोतेरं काढून टाकण्याचा हक्कही त्यांना मिळाला नाही. त्यांचं ‘डॉक्टर’ हे बिरूद फक्त नावाच्या पाटीपुरतं राहिलं. त्या उद्वेगानं (मनात) म्हणत असतील की ते तरी कशाला ठेवलं? समाजात ‘डॉक्टर’ बायको मिरवायला? त्यांचं मागणं- त्यांची गरज जास्त होती का? एक आश्वासक हात- ‘पुढे जा’ म्हणणारा- कामात सामील करून घेणारा- देणं पतीला इतकं अशक्य होतं का.
अशा वेळी ‘अभिमान’ चित्रपट आठवतो. नायकाला वाटतं की, पत्नी आपल्याहून प्रसिद्ध होऊ इच्छित आहे, स्पर्धा करते आहे, पण खरं तर तिला हवा असतो ‘सामीलकीचा- सहजीवनाचा विश्वास!’ बहुतांश स्त्रियांची खरी मूलभूत मानसिक गरज हीच असते असं मला मनापासून वाटतं. आपण आपल्या सहचराच्या- कुटुंबाच्या जगण्याचा एक अभिन्न भाग असावं, पण काही ‘सत्व आणि स्वत्व’ राखून, असं त्यांना वाटत असतं. वेगळ्या शब्दात मांडायचं तर- ‘मैं ज्यादा नहीं माँगती!’
अनेक प्रथितयश कलाकार- साहित्यिक- राजकीय नेते- यांच्या पत्नी जेव्हा बोलत्या- लिहित्या झाल्या तेव्हा त्यांनी हीच गरज आपल्या सगळ्या विचारातून, अनुभवातून कळकळीनं मांडली आहे. त्यात नवऱ्याकडून अजाणता झालेल्या उपेक्षा- दुर्लक्षापासून ते मुद्दाम जाणीवपूर्वक केलेल्या अवहेलना आणि तुच्छतेपर्यंतच्या सर्व छटा दिसतात. स्त्रीच्या बाबतीत तिच्या क्षमता, प्रतिष्ठा, कर्तृत्व, प्रसिद्धी या साऱ्यांच्या निरपेक्ष असलेली ही गरज दिसते. त्यातील एक जण म्हणतात, ‘‘तो मुद्दाम माझ्याशी तसं वागायचा नाही, हे मला कळायचं, पण उलट वाटायचं की, कधीतरी स्वत:हून मी न सांगता- न मागता मला सुखावणारी छोटीशी गोष्ट तो का करत नाही? त्याला सुचत नाही- का सुचलं तरी ते महत्त्वाचं वाटत नाही? मग मलाच का एवढं महत्त्वाचं वाटतं त्याच्यासाठी छोटय़ा छोटय़ा गोष्टी करणं?’’ या तिच्या प्रांजळ प्रश्नाला ‘सहजीवन’ महत्त्वाचं मानणाऱ्या सर्वानीच जमेल तसं कृतीतून उत्तर द्यायला हवं असं वाटतं.
दुसरा मोठा फरक पडतो तो शारीरिक गरजांचा- प्रामुख्यानं कामजीवनातील मागण्यांचा! बहुतांश स्त्रियांना सहजीवनाच्या शोधाची ती सुरुवात वाटते, आणि त्यातून पलीकडे जाऊन मानसिक नातं अधिक दृढ बनावं, जपलं जावं असं साध्य असतं. त्याउलट बहुतेक वेळा पुरुषांना कामजीवन हा सहजीवनाच्या नात्याचा शेवट किंवा उद्दिष्ट आहे असं वाटतं. शरीरानं जवळ येण्यापूर्वी मनातल्या गोष्टी कराव्यात, एक सुरेल संवाद असावा तरच शरीरमीलन खऱ्या अर्थानं आनंददायी ठरेल असं स्त्रियांना तीव्रपणे वाटतं (त्या फारच क्वचित ते बोलून दाखवत असल्या तरीही) आणि ‘शरीरं जवळ आलीच आहेत आता कसलं मनोमीलन वगैरे!’ असा रोकडा प्रश्न पुरुषांच्या भात्यात असतो. (जो ते वेळप्रसंगी ताड्कन उच्चारूनही दाखवतात!) या गुंत्यातून निसटणारी थोडी जोडपी आपल्या प्रगल्भ स्वीकारामुळे, एकमेकांच्या गरजाही तितक्याच महत्त्वाच्या मानल्यामुळे लैंगिक सहजीवनही दीर्घकाळ सानंदे अनुभवताना दिसतात.
ही आश्वासक साथ-प्रतिसाद जर अनुभवाला आले नाहीत, तर त्याचे परिणाम काय होतात? काही स्त्रिया आक्रमकपणे या गरजा मांडू पाहतात, खूप पझेसिव्ह होतात, तर काही पूर्ण समर्पण-शरणागती स्वीकारल्यासारख्या दिवस रेटत राहतात. ‘छाया आणि ज्योती’ या सुमती देवस्थळेलिखित पुस्तकात थोर पुरुषांच्या पत्नींचं व्यक्तिचित्रण आहे. त्यातील काही व्यक्तिरेखा वाचताना हे प्रकर्षांनं लक्षात येतं. कार्ल मार्क्‍सची पत्नी, अब्राहम लिंकनची पत्नी या आपल्या पतींच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ इमेजच्या छत्राखाली राहिल्या. ते लौकिक कामात थोर होतेच, पण सहजीवनात पत्नीच्या छोटय़ा-सामान्य अपेक्षा त्यांना कदाचित जाणूनच घेता आल्या नाहीत, त्याउलट साधनाताईंना घरकामात सहजपणे मदतीचा हात देणारे, प्रत्येक वेळी ‘सप्तपदी’ चालणारे, कासरावदहून ‘साधनासाठी’ पाऊल मागे घेणारे बाबा आमटे- पत्नीची ही नस ओळखू शकले- एक दीर्घ- तृप्त- आदर्शवत सहजीवन आपल्यासमोर ठेवून गेले!
कधी कधी चौकटीतल्या सहजीवनात ही अपेक्षा-गरज पूर्ण होत नाही असं वाटलं, तर स्त्रीला त्या चौकटीपलीकडेही डोकावून बघावंसं वाटतं. त्यातून क्वचित पैसा, सत्ता यांचीही ओढ लागू शकते. सुरुवातीला जाणवलेला हा सुखाचा झरा हे ‘मृगजळ’ आहे, हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो. दलदलीत पाय रुतत जावा तसं नकोशा पण न त्यागता येणाऱ्या नात्यांमध्ये ती खचत जाते. त्यातून अवैध, बेकायदेशीर- गुन्हेगारी जगाशीही सन्मुख होऊ शकते. नुकत्याच घडलेल्या राजकीय/ क्रीडा क्षेत्रातील काही घटना आपल्या डोळ्यांसमोर आहेत. तेव्हा मुळातल्या सहजीवनातील- कुटुंबातील व्यक्तींशी संवाद करण्याचे मार्ग खुंटले तर वैध-न्याय्य मार्गानं चौकटीबाहेर पडणंच श्रेयस्कर आहे असं वाटतं.
आज जिचा भारतीयांना गर्व वाटतो त्या ‘मेरी कोम’ला जे यश मिळालं ते त्यामागे तिच्या पाठीवरचा तिच्या पतीचा- अन्य कुटुंबीयांचा हा आश्वासक हात आहे म्हणूनच! स्त्रियांची ही ‘जरूरत’ त्यांच्या कुटुंबीयांनी न सांगता ओळखली तर प्रबोधिनीच्या एका पद्यात म्हटल्याप्रमाणे-
‘विशाल दृष्टी आप्तजनांची बळ देई या हाती
त्याच बळाने समाजपुरुषा समतामार्गे नेऊ..
पिढय़ापिढय़ांची दृढ चाकोरी ओलांडूनीया जाऊ..!’ असे होईल!