स्त्री जातक : वर्षांचे उंबरे ओलांडताना.. Print

डॉ.अनघा लवळेकर,शनिवार,८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आयुष्य जगत असताना, वर्षांचे उंबरे ओलांडताना बदल अपरिहार्य आहे, त्याचा वेळीच अंदाज घेता आला पाहिजे, त्या बदलाला काही प्रमाणात आपण अंकितही ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे आपल्या अधीन नाही त्याचा सहज स्वीकार केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बदलांची मजाही लुटता आली पाहिजे!
‘बायकांचं वय’ हा समस्त विनोदी लेखकांच्या अत्यंत आवडीचा विषय. साधारणपणे बायकांना (काही विशिष्ट रेघेनंतर) स्वत:चं ‘खरंखुरं वय’ सांगायला फारसं आवडत नाही, असा सर्वमान्य समज आहे. मुलगी लहान असते तेव्हा तिच्या ‘मोठं’ होण्याची वाट पालक बघत असतात. या ‘मोठं होण्यातला’ लपलेला अर्थ ध्यानी आला ना! पूर्वी तर याचा साग्रसंगीत सोहळाच काही समाजगटांत साजरा केला जात असे. त्या मुलीलाही मग एकदम स्वत:तलं हे ‘बदलणं’ आतून बाहेरून भिडतं. दहाव्या / अकराव्या वर्षांपर्यंतचं अल्लडपण, खेळकरपण, उन्मुक्तता नकळत थोडी आवरती घेतली जाते. एक प्रकारचं सावधपण, जागेपण तिच्या मनात उमटू लागतं. दिसण्याबद्दलची, पोशाखाबद्दलची आवड-निवड एकदम तीव्र होते. (त्याच्यावरून आई-लेकीचे खटके तर घरोघरी उडतात..). ते वयच मुळी फुलपाखरी असतं. तारुण्याच्या उंबरठय़ावर आतलं ‘बाई’पण कळायला लागलेलं असतं. इथे काही सगळ्या ‘टप्प्यांचा हिशेब’ मांडायचा हेतू नाही, पण पुढच्या प्रत्येक वळणावर वयाचा संदर्भ येतो तो सतत तिचा ‘पुनरुत्पादनाशी निगडितच!’ दोन मुलांची आई -नातवंडांची आजी.. इत्यादी!
त्यात पुन्हा ‘वय’ ही समाजगटाच्या इतर पैलूंशीपण घट्ट जोडलेली गोष्ट आहे, हे दिसतं. शहरी-मध्यमवर्गीय, शिक्षित घरामध्ये अमृता ही एखादी ‘तिशीची’ लाडकी ‘मुलगी’ असते, तर गावाकडं सरकायला लागलो की  १८ व्या वर्षीच एखाद्या सुमनची ‘सुमनबाई’ झालेली असते, कारण ‘लग्न’ नावाच्या उंबरठय़ावरचं माप तिनं ओलांडलेलं असतं ना! शहरातल्या एखाद्या तिशीच्या ‘मुलीला’ रस्त्यावर जर कुणी ‘ओ बाई.. जरा बघून चालवा / ओ काकू- सरका जरा..’ वगैरे म्हटलं तर ती फणकारून म्हणेल, ‘‘मी काय काकूबाई दिसते का तुम्हाला?’’ तर गावात तिच्याच वयाची मुलगी हे संबोधन चटकन आपलंसं करेल. पन्नाशीच्या शहरी बाईला ‘आजी’ ही हाक अंगावर काटा आणणारी वाटते, तर ग्रामीण बाईला ती स्वत:च्या ‘मोठेपणाची’ साक्ष वाटू लागते! थोडक्यात काय- शिक्षण आणि आधुनिकतेचं वारं लागलं की शरीरानं वर्षांचे उंबरे ओलांडले तरी मनानं आपण कुठल्यातरी मधल्याच पट्टीवर रेंगाळत राहतो- नाही का?
या वर्षांच्या उंबऱ्यांची मोजदाद करताना मराठी कवितांच्या काही ओळी आपोआप ओठांवर येतात. ‘लहान माझी बाहुली..’ म्हणणारी छोटीशी पोर, ‘दादा मला एक वहिनी आण..’ असा लाडिक हट्ट करणारी किशोरी, ‘काय बाई सांगू.. कसं गं सांगू?’ हे हितगुज मैत्रिणीशी करणारी युवती, ‘नववधू प्रिया मी बावरते..’च्या उलघालीत भेटणारी नवोढा. ‘लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई..’ या अंगाईनं जोजवणारी तरुण आई, ‘या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती’ यातली कुटुंबावरची पाखर धरणारी प्रगल्भ गृहिणी, ‘थांब जरासा बाळ’ म्हणत ‘दूर निघालेल्या लेकरांना निरोप देणारी प्रौढा’ आणि शेवटी ‘चाफा बोलेना.. चाफा चालेना..’ या ओळींवर ठेच लागणारी नववृद्धा..!  ही संगीत मैफल आपापल्या गाण्याची भर घालत अजून वाढू शकते, पण किती झरझर ही चित्रं डोळ्यांसमोर तरळली ना?
मध्यमवयीन स्त्रियांच्या एका कार्यक्रमात वयाच्या एकेका टप्प्याला एकेक विशेषण बहाल करायचं होतं. त्यातून खूप सुंदर प्रवास रेखला गेला. खळखळणारं बाल्य, जोशपूर्ण विशी, कृतिप्रवण तिशी, कर्तव्यनिष्ठ चाळिशी, अनुभवसिद्ध पन्नाशी, आत्मशोधक साठी, स्थिरचित्त सत्तरी आणि मग आत्मविलोपी ऐंशी-नव्वदी-शंभरी..! कुणी म्हणेल सगळं काही अनुकूल असेल तरच ही अशी शिडी सापडेल, तर कुणी म्हणेल अशी शिडी सापडावी म्हणून स्वत:ला अनुकूल करत जावं लागेल! तुम्हाला काय वाटतं?
एक खरं आहे की, या प्रत्येक अवस्थेतून जाताना, रूळ बदलताना थोडी खडखड होणारच. मग वयाचा एकेक टप्पा पार करताना आपण एवढे हळवे का होतो? सुस्कारे का सोडतो? जुन्या वयाच्या खुणा अट्टहासानं जपण्याचा प्रयत्न का करतो? हे मला पडलेलं एक कोडं आहे.
विद्युत ही एक पंचेचाळिशीतील तज्ज्ञ इंजिनीअर आहे. नोकरीत खूप उच्च स्थानावर पोचलेली. तिची कामावरची निष्ठा वादातीत आहे, पण तिच्या एका सवयीमुळे ती सतत चर्चेचा विषय राहते. तिला तिच्या वयाचा उल्लेख कुठल्याही प्रकारे झालेला खपत नाही. आपल्याला कायम अत्यंत सतेज, नवतारुण्यातील ऊर्मीनं फसफसलेल्या युवतीसारखंच दिसलं पाहिजे, असा तिचा अट्टहास असतो. त्यासाठी ती प्रसाधनं, पोशाख यावर भरपूर खर्च करते. ऑफिसच्या कुठल्याही पार्टीत ती पतीला / मुलांना सोबत आणत नाही. (कारण मग लोकांना ‘वय’ कळेल!) तिच्या कामाच्या कौतुकापेक्षा लोकांनी तिच्या एव्हरग्रीनपणाचं कौतुक करावं असं तिला वाटतं. तसं जर झालं नाही तर ती बेचैन-अस्वस्थ होते.
विद्युतबद्दल विचार करताना मला नेहमी ‘टय़ूजडेज् विथ मॉरी’ या पुस्तकातील संवाद आठवतो. विकलांग होत मृत्यूकडे वाटचाल करणाऱ्या गुरूला त्याचा शिष्य ‘वृद्धत्वा’च्या भीतीबद्दल विचारतो, तेव्हा मॉरी (गुरू) म्हणतात- ‘‘मी ‘वयस्क प्रौढ’ होण्याचं मनापासून स्वागत करतो. ‘वय वाढणं’ म्हणजे फक्त म्हातारं होणं नव्हे तर अधिक ज्ञानी होणं, विकसित होणं पण नाही का? ज्या लोकांना सतत मागच्या वयाकडे धाव घ्यावीशी वाटते, तिथे कुठेतरी अपुरेपणाची, असमाधानाची खूण दिसते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही हेतू सापडला असेल तर तुम्ही मागे जात नाही. पुढे जाण्याची प्रबळ इच्छा तुम्हाला खेचत असते. तुम्ही जर ‘वाढत्या वयाशी’ अशी सतत लढाई करत राहिलात तर शेवटी तुमच्या ओंजळीत दु:खच उरणार, कारण ते वाढणं काही थांबणारं नाही.’
कुणाला वाटेल- की मग प्रसाधनं वापरणं, नेटकं राहणं, प्रेझेंटेबल असणं, शरीर डौलदार राहण्यासाठी प्रयत्न करणं हे चुकीचं आहे, असं म्हणायचंय की काय? तर तसं नाही, पण वाढत्या वयाच्या एकेका टप्प्यावर या सर्वाला एकेक मर्यादा (सीलिंग) येत जाणार याचा स्वीकार होणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. कितीही वय वाढलं तरी प्रसाधनांचा वापर करून अट्टहासानं तरुण भूमिका करणाऱ्या अभिनेता / अभिनेत्रीबद्दल जनमत काय असतं? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे असं सगळं करूनही ‘तरुण’ दिसलो नाही तर आपल्याला बेचैनी येते का? अस्वस्थ वाटतं का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. वाढत्या वयामध्ये आरोग्याकडे अधिक जागरूकतेनं बघायचं का फक्त प्रदर्शनीयतेकडे? ‘उष:प्रभा पागे’सारख्या एखाद्या गिर्यारोहणपटू स्वत:च्या वाढत्या वयाचा दिलखुलास स्वीकार करूनही सत्तरीत हिमालय चढू शकतात ना? पण त्यासाठी आवश्यक तो आहार-विहार त्यांनी जोपासलेला असतो.
वाढत्या वयामुळे होणाऱ्या शारीरिक बदलांचा स्वीकार हा जसा महत्त्वाचा आहे, तसंच एकेका टप्प्यावर ‘आपण काय कमावलं- काय गमावलं’ हा विचार करणंही महत्त्वाचं आहे. वेळेअभावी जे आपण करू शकलो नाही, शिकू शकलो नाही, अर्धवट सोडून द्यावं लागलं असे कितीतरी प्रयोग, छोटी छोटी उद्दिष्टं, छंद असू शकतात. त्या सगळ्याला पुन्हा स्पर्श करता येईल का? कसा? यावर विचार नक्कीच करता येईल.
वाढत्या वयामुळे एक प्रकारची भूतकाळातच रमण्याची सवय काही स्त्रियांना असते. ‘जो गेला तो सगळा सुवर्णकाळ किंवा संघर्षकाळ कसा महान होता’ आणि आज जे आहे ते किती नकोसं- खचवणारं आहे’ असा धोशा मनात उघडपणे लावला जातो. घरापलीकडचं बदलतं विश्व- बदलती आव्हानं समजून घेण्याची संधी न घेतल्यामुळेही असेल, पण एक उदासी, हताशा किंवा चिडचिडेपण अनुभवाला येतं. आजच्या नात्यांच्या वर्तुळात आपण परिघाबाहेर फेकले जातो आहोत असं वाटतं आणि मग कुठल्यातरी बळावर (आक्रमकतेच्या, कुरकुरीच्या, दुसऱ्यांच्या पाठीस लागण्याच्या पद्धती वापरून) ते परत केंद्राकडे नेण्याचाही आग्रह केला जातो. आपल्या शारीरिक क्षमता मर्यादित होत आहेत याचा खिलाडू स्वीकार न केल्यामुळे ही हताशा किंवा ‘स्व-अवमूल्यन’ वाढत जातं. कामं आनंदानं पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याऐवजी नाइलाजानं इच्छेविरुद्ध ‘एकदाची’ दिली जातात, पण त्यावरचं सुपरव्हिजन करण्याची जिद्द कायम असते. या सगळ्यामुळे कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण व्हायला वेळ लागत नाही. मग स्वत:च्या हताशेला अजून एक बळकट सबब मिळते. या चक्राला कसं थांबवणार?
काही वेळा मात्र या उंबऱ्यांना डौलदारपणे पार करणारी काही सोनपावलं दिसतात आणि त्यामागच्या त्यांच्या मानसिकतेचा शोध घ्यावासा वाटतो.
आपल्या चिरप्रसन्न आवाजानं मोहून टाकणाऱ्या आपल्या लाडक्या आशाताई भोसले. त्यांच्या अदम्य उत्साहात आणि सतत नावीन्याच्या शोधात असलेल्या वृत्तीतच ती प्रसन्नता आहे. त्यासाठी वय लपवण्याची गरज त्यांना कधी वाटली नाही आणि त्यामुळे त्यांची नजाकत आणि रसिकताही भंग पावलेली नाही.
असं प्रफुल्लपण जपणारी माझ्या मनातील दुसरी जवळची व्यक्ती म्हणजे माझी आई- डॉ. ज्योत्स्ना कुकडे. मी तिच्याकडे केवळ ‘आई’ म्हणून पाहत नाही, तर सर्व बदलांना, कालक्रमानुसार घडणाऱ्या शरीर-मनाच्या उलथापालथींना सक्षमपणे तोंड देऊन अतिशय स्थिरचित्त राहणारी- बदलत्या परिवेशाप्रमाणे स्वत:तही आवश्यक ते बदल सहजगत्या करणारी व्यक्ती म्हणून पाहते. कर्करोगाच्या गंभीर आजाराला दोनदा सामोरं जाऊनही परत आपल्या कामात तितक्याच निष्ठेनं उतरलेलं मी तिला पाहिलं आहे. वाढत्या वयामुळे बदललेल्या भूमिकांचा, नातेसंबंधातील येणाऱ्या मर्यादांचा सहज स्वीकार करताना ‘मी’पणाच्या चक्रातून तिनं स्वत:ची अलगद सुटका करून घेतली आहे.
‘हू मूव्हड् माय चीज’ या प्रसिद्ध लघुकादंबरीत बदलांना सामोरं जाण्याच्या वेगवेगळ्या विचारपद्धतींवर मार्मिक भाष्य केलेलं आहे. प्रौढत्वाकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येकीनं स्वत:ला डोळ्यांसमोर ठेवून ते वाचावं असं मला वाटतं. त्यात काही सुरेख सूत्रं दिलेली आहेत. ‘छोटय़ा-छोटय़ा / सूक्ष्म बदलांची नोंद जर सजग राहून लवकर घेता आली तर पुढे येणाऱ्या मोठय़ा बदलांना पचवण्यासाठी मदत होऊ शकते!’ म्हणजेच भराभर ऊठबस करताना गुडघे वाजायला / दुखायला लागले तर वजनावर नियंत्रण आणि रोजचा व्यायाम सुरू करण्यासाठीचा लाल दिवा समजावा! मुलांनी ‘तू मदत करायला नाही आलीस तरी चालेल’ असं म्हणायला सुरुवात केली की मुलं मोठी स्वतंत्र होऊ पाहत आहेत आणि आपण मागे सरकायचं वय झालं आहे हे ओळखावं!
तेव्हा वर्षांचे उंबरे ओलांडताना बदल अपरिहार्य आहे, त्याचा वेळीच अंदाज घेता आला पाहिजे, त्या बदलाला काही प्रमाणात आपल्या अंकितही ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे आपल्या आधीन नाही त्याचा सहज स्वीकार केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बदलांची मजाही लुटता आली पाहिजे!
‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम-
वो फिर नहीं आते..’
यातील उदास स्वर टाळून नव्या मुक्कामांच्या शोधात राहण्यासाठी प्रत्येक वयाची वेगवेगळी खुमारी आनंदानं अनुभवता यावी म्हणून या लेखाची शिदोरी!