स्त्री जातक : उंच उंच झुला! Print

डॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

करिअरच्या ‘उंच उंच झुल्या’चा थरार अनुभवताना व्यक्ती म्हणून, कुटुंबाचा एक घटक म्हणून जमिनीशी नातं सांगणाऱ्या स्त्रीची पावलं स्थिर असावीच लागतात..
आ ज मनोरंजनाच्या साधनांनी उच्छाद मांडलेला असला तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत मोजक्याच गोष्टींसाठी ‘मनोरंजन शुल्क’ भरायला लागायचं. ‘सर्कस’ ही त्यातील एक महत्त्वाची संधी! त्यातील उच्चतम आकर्षण म्हणजे उंचावरच्या ट्रॅपिझ (लांबलचक दोरीचे झोपाळे)चे अंगावर काटा उभा करणारे खेळ. कसरतीचा तो मानबिंदूच जणू. लवलवत्या शरीराचे ते तरुण-तरुणी किती एकाग्रतेनं आपलं काम करत असायचे! एखादाच क्षण-अंदाज हुकण्याचा, पण किंमत किती जबरदस्त! उंची-अंतर-हात सोडणं, पकडण्याची वेळ, आसपासचे प्रेक्षक, सगळ्यांचं प्रतिक्षण भान ठेवायचं काम किती कष्टाचं! पण तरीही सवयीनं आणि त्या खेळात असलेल्या थराराच्या आनंदानं त्या खेळाडूंना/ कसरतपटूंना झपाटून टाकलेलं असायचं. खेळ पूर्ण झाला की होणारा जल्लोषही नक्कीच पुढच्या खेळासाठीची बेगमी ठरायचा.
ही ‘सर्कस’ आठवण्याचं कारण म्हणजे आजचं शहरी भागातल्या ‘करिअर’ करू इच्छिणाऱ्या स्त्रीचं जगणं! केवळ अर्थोत्पादन करणं आणि ‘करिअर’ करणं यात महत्त्वाचा फरक आहे. ‘करिअर’मध्ये सतत उंचावणाऱ्या तज्ज्ञतेची, क्षमतेची आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या संधी, बढत्या, पैसा/ सन्मान इत्यादींची अपेक्षा असते. त्याप्रमाणे स्वत:च्या जीवनशैली, विचारपद्धती आणि प्राधान्यांमध्येसुद्धा काही बदल करणं अपेक्षित असतं. या अर्थानं पाहिलं तर भारतात ‘करिअर करू इच्छिणाऱ्या किंवा करत असणाऱ्या स्त्रिया’- एकूण स्त्रियांच्या तुलनेत कमीच आहेत. (हळूहळू त्यांची संख्या वाढते आहे, हे नक्की!)
भारतात ‘करिअरिस्ट स्त्री’ची प्रतिमा पुढे येण्यापूर्वी १९व्या शतकाच्या अखेरीस पाश्चात्त्य देशांत ती हळूहळू पुढे आली, पण तिथेही ‘कुटुंबाची धारणा आणि मुलांचा प्रतिपाळ-संस्कार’ हेच स्त्रियांचं करिअर आहे, हा समज दीर्घकाळ रूढ होताच!
इंग्लंडमध्ये त्या काळात अभिजनवर्गातील स्त्रियांचं राहणीमान पोशाखी, फॅशनेबल असायचं. मूलभूत शिक्षणापेक्षा जनरीत-लोकरीतीचं शिक्षण स्त्रियांसाठी जास्त महत्त्वाचं गणलं जात होतं. अशा काळात पूर्वाश्रमीच्या मार्गारेट नोबल अर्थात विवेकानंद शिष्या नवोदिता यांनी 'Right of Women' (स्त्रियांचे हक्क) यावर सहा व्याख्यानांची एक मालिका गुंफली होती. त्यात त्यांनी स्त्रियांचा सेवा करण्याचा हक्क (Right to Service) आणि प्रगतीचा (Right to Progress) हक्क यावर खूपच मूलभूत विचार मांडले होते. त्या काळात ते विचार युरोपमध्येही ‘क्रांतिकारी’ वगैरे गणले गेले होते. आज पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. ‘सव्‍‌र्हिस’ (नोकरी) किंवा ‘प्रगती’ (Progress) या गोष्टी जगात बहुतांश स्त्री गटांना- निदान शहरी-निमशहरी भागात परिचयाच्या आहेत. १९३९ ते १९४५ च्या दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या भयंकर मंदीच्या झळा बसू लागल्या त्याला एक उत्तर म्हणून स्त्रियांचं थेट अर्थोत्पादन सुरू झालं ते ठराविक क्षेत्रात. ठराविक साच्यात तर होतंच, पण सदैव एक पाऊल केव्हाही मागे घेऊन घरातल्या चक्रात पुन्हा सामावलं जाता येईल याच उद्देशानं होतं. ‘स्त्रियांचं करिअर’- म्हणजेच ‘प्रस्थापित व्यक्तिमत्त्व नेतृत्व’ या दिशेचा प्रवास हा अस्वीकार्यच होता. राजकारण- समाजकारणात ज्या स्त्रिया पुढे आल्या त्यातल्या बहुतांश जणींना एक सज्जड कौटुंबिक (‘खानदानी’) पाश्र्वभूमी होती, पण स्वविकासासाठी, स्त्री म्हणून वेगळ्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार संधी सहजपणे मिळत नव्हत्या. कमलाताई सोहोनींसारख्या बुद्धिमतीला इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये संशोधक म्हणून प्रवेश मिळविण्यासाठी तत्कालीन ज्येष्ठ संशोधकांबरोबर संघर्ष करावा लागला होता. तीच गोष्ट कमीअधिक फरकानं इतर हटके क्षेत्रांमध्ये घडत होती.
हळूहळू अस्वीकाराकडून- नाइलाजाच्या स्वीकाराकडे- मान्यतेकडे- इच्छापूर्वक स्वीकाराकडे आणि आता हळूहळू प्रोत्साहनाकडे असा स्त्रीच्या ‘करिअर’कडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा प्रवास होत आला आहे. यातल्या प्रत्येक पायरीवर हजारो-लाखो स्त्रिया आहेत. धीम्या गतीने का होईना पण शेवटच्या (प्रोत्साहन) टप्प्याकडे जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे, हे दिलासादर्शकच आहे.
आता खरा कळीचा मुद्दा आहे तो ही ‘करिअर’ करू इच्छिणारी बाई स्वत: त्याकडे कसं पाहते आहे हा! त्याच्याबरोबर येणाऱ्या सर्व भल्याबुऱ्या गोष्टींना ती स्वत:च्या जगण्यात किती, कसं स्थान देते आहे हा! करिअरकडे जागरूकतेनं पाहताना ‘घराचं पाश्र्वसंगीत’ तिच्या कार्यक्षमतेत अडथळा आणतं आहे, का पूरक ठरतं आहे हा!
मानसशास्त्रात SWOT' तंत्राला खूप महत्त्व आहे. कशाचंही यथायोग्य मूल्यमापन करायचं तर त्या गोष्टीच्या बलस्थानांचा, मर्मस्थानांचा (तोटय़ांचा), असणाऱ्या संधी किंवा (फायद्याचा) धोक्यांचा विचार करणं गरजेचं असतं. एकेका विटेनं ‘करिअर’ची इमारत बांधणाऱ्या आजच्या आधुनिक स्त्रीची बलस्थानं कोणती? तर स्वत:च्या कार्यक्षेत्रामुळं निर्माण झालेली ‘स्वत:ची अशी ओळख’, क्षमतांना मिळणारा न्याय आणि कुटुंबाबाहेर विसवणारं, रुजणारं सामाजिक वर्तुळ! या साऱ्यामुळे तिची करिअर फुलवण्याची प्रेरणा टिकून राहते, पुढच्या पिढीतल्या मुलींपर्यंत ती संक्रमितही होत राहते.
पण त्याच वेळी या प्रवासाची काही मर्मस्थानंही तिला भेडसावत असतात. वाढत्या जबाबदाऱ्या, कुटुंब आणि कार्यक्षेत्रातील अपेक्षापूर्तीच्या काळज्या, वाढता शारीरिक- मानसिक ताण, करिअरीस्ट स्त्रीकडे पाहण्याचे काही पूर्वग्रहदूषित समज या सगळ्यांचा एक ताण कळत नकळत मनावर येत असतो. त्यातून काही वेळा आपण कामावर/ कुटुंबावर कुठे अन्याय तर करत नाही आहोत ना, ही शंका मनाला कुरतडू लागते. एक प्रकारची अनिश्चितता. अज्ञात भीतीही वाटू लागते. त्याच्या जोडीला जर करिअरला कुटुंबीयांपैकी कुणाचा सुप्त किंवा उघड विरोध असेल, सतत बदलणारी वेळापत्रकं असतील, प्रवास असतील तर त्या सगळ्याचा साका मनात साठत राहतो. अशा वेळी यातल्या एकेका गोष्टीला सुटं करून तपासून पाहण्याची गरज असते. नुसत्या नोकरीपेक्षा ‘करिअर’साठी द्यावी लागणारी किंमत जास्त गुंतागुंतीची, दीर्घकालीन आणि शारीरिक-मानसिकदृष्टय़ा आव्हानात्मक असणार आहे, याची स्पष्ट जाणीव असावी लागते. मुख्य म्हणजे कुठलीही अनपेक्षित, धक्कादायक, खास करून दु:खद गोष्ट घडली की आसपासच्या बहुतांश समाजाने ‘हे आईच्या/ पत्नीच्या/ बाईच्या करिअरमागे जास्त धावण्यामुळेच बरं का!’ असा ('Blame it on' चा) ठपका ठेवण्याची भरपूर शक्यता गृहीत धरावी लागते. त्यात १०० टक्के तथ्य नसतं हे माहीत असूनही त्याचा तर्कशुद्ध प्रतिवाद करण्याची जिगर जोपासावी लागते. (अनेक सर्वेक्षणांत करिअर करणाऱ्या/ न करणाऱ्या बायका व त्यांच्या कुटुंबातील मुलांची वाढ/ व्यक्तिमत्त्व/ ताणतणाव/ विसंवाद असा अभ्यास केला जातो. मला नेहमी असा प्रश्न पडतो की, ‘करिअर करणारे आणि न करणारे पुरुष’ असा भेदही निश्चित असताना त्यांच्या संदर्भात असे अभ्यास का होत नाहीत? का ‘करिअर न करणारे पुरुष’ नाहीतच किंवा त्यांच्या करिअर करण्या न करण्याचा वर उल्लेखिलेल्या बाबीशी काही संबंधच नाही असंच गृहीत आहे?)
बऱ्याचदा अजूनही आपल्या समाजात स्त्रीचं ‘करिअर आणि कुटुंब’ हे नातं परस्परविरोधी गोष्टींचीच मागणी करणारं किंवा एकमेकांना छेद देणारं म्हणूनच पाह्य़लं जातं. कुठल्याही कौटुंबिक अडचणीच्या वेळी पहिली कुऱ्हाड पडते ती स्त्रीच्या करिअर प्रवासावर किंवा त्यातल्या तिच्या गुंतवणुकीवर! ‘अशक्य’ वाटणाऱ्या तडजोडींचा (compromises) ताण घेण्यापेक्षा तिलाही तो सुलभ पर्याय वाटतो. अशा वेळी विचार येतो की, ‘करिअर आणि कुटुंब’ परस्परपूरक होण्यासाठी फक्त ‘सुपरवुमन’ होणं हा एकच मार्ग आहे का? करिअरच्या मार्गाद्वारे स्वत:च्या आणि पर्यायाने राष्ट्राच्याही विकासात तिचं योगदान महत्त्वाचं असतं ही वस्तुस्थिती जर कुटुंबीयांनी- समाजानं नीट स्वीकारली तर ते अवघड नाही. काही ठिकाणी आग्रहपूर्वक स्वत:ला ‘स्पेस’ मिळवणं, कुटुंबातील सदस्यांपर्यंत आस्थापूर्वक त्यांच्या अडचणी, प्रासंगिक गरजा समजून घेत आपली भूमिका पोहोचवणं शक्य आहे. त्याच वेळी एकीकडे ‘करिअर’साठी स्वत:ला ‘समत्वा’च्या हक्काची भागीदार म्हणवताना (केवळ ‘स्त्री’ म्हणून) अनावश्यक सवलती घेणं- तशा अपेक्षाही न करणं, ही सगळी पथ्यंही पाळायला हवीत. आपली तज्ज्ञता, क्षमता वाढण्यासाठी, आपला ठसा उमटवण्यासाठी विधायक आणि नैतिकतेची बूज ठेवून केलेले प्रयत्न या प्रवासाची रंगत वाढवतील यात शंका नाही.
करिअरच्या ‘उंच उंच झुल्या’चा थरार अनुभवताना व्यक्ती म्हणून, कुटुंबाचा एक घटक म्हणून जमिनीशी नातं सांगणारी आपली पावलं कायम स्थिर असायला हवीत. तुम्हाला काय वाटतं?
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it