स्त्री जातक : नेतृत्व घरातलं आणि बाहेरचं! Print

डॉ. अनघा लवळेकर ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

नेतृत्वाची मोठी खूण म्हणजे परंपरागत असलेली- रुळलेली चाकोरी ओलांडण्याचं धारिष्टय़. कुटुंबनेत्या बनणाऱ्या अनेक मैत्रिणींनी अशी कुठली ना कुठली चौकट ओलांडायचं/ मोडायचं धाडस स्वत:हून- कुणाच्याही सांगण्याची वाट न पाहता केलेलं दिसतं. ती फार मूलभूत आणि सर्वागीण क्रांती नसेल कदाचित, पण पुढच्या पिढीसाठी वाट थोडी रुंद करून ठेवण्याचं काम या धाडसामुळं नक्कीच झालेलं दिसतं.खूप खूप वर्षांपूर्वी वाचलेली, पण मनात घर करून राहिलेली कादंबरी म्हणजे म. गो. पाठक यांची ‘लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव!’ १९४८ च्या गांधीवधानंतर झालेल्या जाळपोळीत उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाला, त्या घरातील आईनं ‘लक्ष्मीबाईनं’ कसं उभं केलं- याची ती हृदयस्पर्शी कथा आहे, ज्यावर नंतर चित्रपटही निघाला.
ही कथा आठवण्याचं कारण म्हणजे ‘स्त्रियांच्या नेतृत्व गुणांबद्दल’ बोलताना मनात येणारं स्वाभाविक द्वंद्व! नेतृत्व कशाला म्हणायचं? हजारो-लाखो अनुयायी असणं हे नेतृत्वाचं एक परिमाण झालं, पण नेतृत्वाच्या व्यक्तिगुणांचा अभ्यास केला तर त्यात काय येतं? जबाबदारीची जाणीव, पुढाकार, माणसांना आपलंसं करणं, उद्दिष्ट ठरवणं, समस्या सोडविण्यात सहभाग घेणं- पुढं राहणं, इतरांवर आपल्या विचारकृतींची छाप पाडणं अशा किती तरी गोष्टी! मग सुरुवातीला उल्लेखिलेल्या ‘लक्ष्मीबाई’ त्यांच्या कुटुंबाच्या एका अर्थानं नेत्याच नव्हत्या का? केवळ ते त्यांच्या कुटुंबापुरतं मर्यादित राहिलं म्हणून त्याला एका ‘सामान्य स्त्रीचा लढा’ एवढंच विशेषण लावायचं का?
प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या, पण आपापल्या मोठय़ा कुटुंबांचं धुरिणत्व सांभाळणाऱ्या अशा ‘लक्ष्मीबाई’- खरं तर हजारो-लाखोंच्या घरात असतील. त्यातील काहींना औपचारिक रचनेतील नेतृत्व (मग ते राजकीय, सामाजिक, शासकीय असं कुठलंही असो) करायची संधी मिळते, पण बाकीच्या अप्रकाशितच राहतात, ही वस्तुस्थिती आहे.
गोनीदांच्या ‘कुण्या एकाची भ्रमणगाथा’मध्ये त्यांच्या लहानपणचा एक प्रसंग वर्णन केला आहे. सर्व कुटुंब कोकणात गेलं असताना वाटणीवरून भावंडांत काही वाद झाला. तो टिपेला पोहोचला आणि एका भावानं दुसऱ्याला ‘चिरून काढीन’ असा दम दिला. त्याच क्षणी इतका वेळ गप्प ऐकणारी गोनीदांची आई तीरासारखी उठली आणि कोपऱ्यातली कोयती उचलून तिने ‘आत्ताच उभा खापलून काढ की’ असं खणखणीत आव्हान दिलं. तिच्या या अनपेक्षित अशा रागरंगामुळे तो वाद तिथेच मिटला. त्या कसोटीच्या प्रसंगाला आईच्या पवित्र्यामुळे वेगळंच वळण मिळालं (आणि कुटुंबातील प्रमुख स्त्रियांचा त्यांना मनातून पाठिंबा होताच). त्या वादावर पडदा पडला. असा अटीतटीच्या प्रसंगातील परिणामकारक पवित्रासुद्धा नेतृत्वगुणाचंच निदर्शक आहे.
कुटुंबात एखाद्या स्त्रीनं नेतृत्व करणं हे तिच्या ‘अनुभवी’पणावर बऱ्याचदा अवलंबून असतं. कुटुंबातील पारंपरिक अधिकारशिडीवर बाई जितकी ‘सीनिअर’ तेवढी तिला नेतृत्वाची संधी जास्त, पण नुसती संधी मिळणं आणि तसं ‘व्यक्तिमत्त्व’ व्यक्त होणं यात अंतर आहे. तथाकथित वरिष्ठपद नसतानाही अनेक स्त्रिया कुटुंबाचं आणि त्यातून पुढे समाजाचंही नेतृत्व करतात, त्या त्यांच्या काही मूलभूत तर काही परिस्थितीतून निर्माण झालेल्या व्यक्तिगुणांमुळे! राजकीय क्षेत्र डोळ्यांसमोर घेतलं तर प्रसिद्धीप्रवणतेमुळे शेकडो नावं समोर येतात. इस्रायलच्या भूतपूर्व पंतप्रधान गोल्डा मायरपासून ते आज आपल्या ‘ठामपणा’मुळे गाजत असलेल्या जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मार्केलपर्यंत! (त्यात अर्थातच भारताच्या दुर्गामाँ इंदिराजी आल्याच.) तीच गोष्ट सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाचीही आहे. अगदी विकसित, संपन्न युरोप-अमेरिकी राष्ट्रांपासून तद्दन मागासलेल्या अ‍ॅफ्रो-आशियाई देशांतही अनेक स्त्रिया समर्थपणे सामाजिक चळवळींचं, परिवर्तनाचं नेतृत्व करीत असताना दिसतात. त्यातील काही सौदामिनींप्रमाणे लखलखणाऱ्या- एखाद्या घटना/ प्रसंगात तळपून गेलेल्या असतात; तर काही समईतील ज्योतीप्रमाणे संथपणे तेवत आपला प्रकाश टाकत असतात. राजकीय क्षेत्रातील नेत्या प्रामुख्यानं व्यापक क्षेत्रात वावरत असतात, तर सामाजिक क्षेत्रातील नेत्या आपापल्या कार्यक्षेत्रात काही ठोस परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असतात. कुटुंबांतर्गत नेतृत्व करणाऱ्या स्त्रियांचं कार्यक्षेत्र मर्यादित असलं तरी त्यांची त्यातील मनाची- विचारांची गुंतवणूक तितकीच उत्कट असते. कुटुंबाची सुरक्षा, आशादायी भविष्य आणि एकसंधता टिकणं हा बऱ्याचदा त्यांच्या ‘नेतृत्वा’मागची प्रेरणा असते. ग्रामीण भागातल्या, जेमतेम साक्षर असलेल्या अशा किती तरी ‘कुटुंब नेत्यांच्या’ (ज्या नंतर त्या त्या समाजगटालाही नेत्या वाटू लागल्या) कथा आता विविध निमित्तांनी प्रकाशात येत आहेत. सुगंधा ही दहावी नापास झालेली एक साधीसुधी तरुणी! कोकणातली मुलगी लग्न होऊन घाटावर आली. चारचौघींसारखीच संसार करीत वयाच्या चाळिशीला पोहोचली असताना अचानक नवऱ्याची नोकरी गेली. इतकंच नाही तर त्याने न विचारता घेतलेल्या मोठय़ा कर्जाचा बोजा अंगावर आला. हजारो जणींसारखीच ही कथा. पण सुगंधानं जिद्दीनं आल्या परिस्थितीला तोंड द्यायचं ठरवलं. कधी घराबाहेर कारणाशिवाय न पडणारी ती, पण वृत्तपत्रातील महिला बँकेची जाहिरात वाचून थेट तिथे गेली. स्वत:च्या पाककौशल्यावरच्या विश्वासावर खाद्यपदार्थाच्या गाडीसाठी कर्ज घेतलं. सर्व पारंपरिक संकोच बाजूला सारून पहाटे चार ते रात्री १० सर्व जत्रांमध्ये, उत्सवांमध्ये गाडी घेऊन बसू लागली. व्यवहार शिकून घेतले. अवघ्या पाच वर्षांत कर्ज फेडून नवऱ्याच्या कर्जाचा हप्ता बाजूला टाकून शिल्लक टाकण्याइतका व्यवसाय वाढवला. एवढंच करून ती थांबली नाही तर आपण करतोय ती गोष्ट उपयोगाची आहे, प्रतिष्ठेची आणि सन्मानाची आहे, हे कुटुंबातल्या चार इतर महिलांना पटवून त्यांनाही व्यवसायात भागीदारी दिली. आपल्याबरोबर त्यांना सक्षम बनण्याची प्रेरणा दिली.
अशा सुगंधाही आज आपल्याला जागोजागी भेटतात. त्यात काय साम्य दिसतं? तर नेतृत्वाची मोठी खूण म्हणजे परंपरागत असलेली- रुळलेली चाकोरी ओलांडण्याचं धारिष्टय़. कुटुंबनेत्या बनणाऱ्या या सगळ्या मैत्रिणींनी अशी कुठली ना कुठली चौकट ओलांडायचं/ मोडायचं धाडस स्वत:हून- कुणाच्याही सांगण्याची वाट न पाहता केलेलं दिसतं. ती फार मूलभूत आणि सर्वागीण क्रांती नसेल कदाचित, पण पुढच्या पिढीसाठी वाट थोडी रुंद करून ठेवण्याचं काम या धाडसामुळं नक्कीच झालेलं दिसतं.
नेतृत्वशैलींमध्ये साधारणपणे दोन ठळक प्रकार मानले जातात. एक असते ती ‘मानवकेंद्री’ किंवा माणसांना सांभाळून घेणारी शैली तर दुसरी असते ती ‘कार्यकेंद्री’ किंवा ‘काम झालंच पाहिजे’ असं म्हणणारी शैली. स्त्रियांच्या सर्व स्तरांवरच्या नेतृत्वात या दोन्ही शैलींचा वापर बऱ्यापैकी चातुर्यानं आणि आवश्यकतेनुसार झालेला दिसतो. मुळात स्त्री ही जास्त लोकाभिमुख असल्यामुळे, माणसांना धरून राहण्याचं महत्त्व जाणून असल्यामुळे नेतृत्वातही स्वत:च्या ऋजुगुणांचा वापर अधिक प्रमाणात करताना दिसते. आवश्यक तेथे, प्रसंगाच्या गरजेप्रमाणे कठोर गुणांचाही आश्रय घेते. म्हणून तर बहुतेक राजकीय धुरीण नेत्या स्त्रियांना त्यांच्या त्यांच्या देशात ‘ओन्ली मॅन इन द कॅबिनेट’ची उपाधी मिळालेली दिसते. नेतृत्वासाठी आवश्यक असणारं ‘अष्टावधान’ही बहुतेक स्त्रियांच्या अंगवळणी पडलेलं असतं. बहुविध भूमिका निभावताना करावा लागणारा संघर्ष, ‘स्विच ऑन- स्विच ऑफ’ तंत्र हेही त्यांनी स्वीकारलेलं असतं. कारण या सगळ्या कसरतींमधून आपण आपल्या ठरलेल्या उद्दिष्टाकडे स्वत: जात आहोत आणि इतरांनाही नेत आहोत, याचा एक आनंद असतो.
   आंध्र प्रदेशात सामाजिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या एका स्त्री कार्यकर्तीच्या आत्मकथनात तिनं म्हटलं आहे, ‘मी हा खटाटोप का करते, असा प्रश्न मला कधी कधी पडतो. कुटुंबातल्या प्रश्नांनाही मीच सोडवायचं, इतरांना सल्ले द्यायचे, त्यांच्या समस्या आपल्याच मानून तडीला न्यायच्या, त्यापलीकडच्या समाजहिताची पखालही खांद्यावर घ्यायची आणि कधी कधी त्यातून काही चांगलं घडतंय का नाही, याचीही चिंता आपणच करायची! या सगळ्याचा खूप ताण येतो, पण गंमत म्हणजे हा ताण आला की मला काम करायचा अधिक हुरूप येतो. इतक्या सगळ्यांचा विश्वास आपल्यावर असेल तर तो काहीतरी आपल्यात वेगळं आहे म्हणूनच- असं वाटतं आणि मरगळ झटकून मी पुन्हा नित्य प्रवाहात येते!’
त्यांचं हे विश्लेषण खूप सूचक आहे. स्त्रियांच्या नेतृत्वामध्ये ‘नव्यानं शिकण्यात कमीपणा न वाटण्याचा’ खूप मोठा वाटा आहे, असं दिसतं. जिथं आवश्यक तिथं कासवासारखं डोकं, पाय आत घेण्याची कलाही त्या आत्मसात करताना दिसतात. स्त्रियांना ‘भावनिक’ म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात नेतृत्व करणाऱ्या स्त्रिया (कुटुंबातील असो वा व्यापक गटातील) अत्यंत वास्तववादी, व्यवहारी पद्धतीनं (स्ट्रॅटेजिक) समस्या सोडविताना दिसतात. याचं एक छान उदाहरण एका बचत गटातील प्रमुख महिलेच्या अनुभवातून ऐकायला मिळालं. तिच्या गटातील काही जणींचे हिशेब नीट येईनात. कर्ज फेडण्यात टंगळमंगळ होऊ लागली होती. पुढच्या फेरीत कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांच्या तक्रारी वाढायला लागल्या. आता गटप्रमुख म्हणून हिच्यावर वसुलीची जबाबदारी आली. त्या दोघींच्या काही अडचणीही हिला माहीत होत्या. हिनं प्रत्येकीची वेगळी गाठ घेतली आणि सांगितलं, ‘‘बाई, तू कर्ज फेडलं नाहीस तर आपल्या गटाचं नाव जाईल. बँकेत पत जाईल. तू असं कर xxx इतके पैसे तू आज भर, तेवढेच मी माझ्याकडून भर घालते, हे तुझ्या-माझ्यात ठेव. तुला जमेल तसे वर्षभरात परत कर, पण आज गटाची पत घालवू नकोस. दुसऱ्या कुणाला मी सांगणार नाही, पण तू विश्वासानं परत कर, नाही तर घरात माझी मान अडकेल!’’
या धोरणीपणानं कर्ज वसूल झालंच, पण गट फुटता फुटता पुन्हा सांधला गेला! हेच धोरणीपण ‘कुटुंबा’चं नेतृत्व करतानाही स्त्रियांच्या कामी येताना दिसतं. मात्र त्यासाठी काही ‘किंमत’ही मोजावी लागते. कधी स्वत:ची पत पणाला लावावी लागते, तर कधी सुरक्षितता! कधी आपली प्रतिमा बदलण्याचा धोका पत्करावा लागतो, तर कधी कुटुंबातील- पारंपरिक पाश- रूढी-पद्धती बाजूला ठेवून निग्रहानं नव्या वाटा निर्मण कराव्या लागतात. अशा वेळी या कर्त्यां-नेत्या स्त्रीला जर इतर ‘स्त्रियांचं’ पाठबळ मिळालं तर तिचं ते पुढारपण अधिक झळाळून निघतं. इतकंच नव्हे तर मोठय़ा विधायक बदलांचं एक महत्त्वाचं माध्यम ठरू शकतं.
नवरात्री म्हणजे स्त्रीच्या नेतृत्वशक्तीचा उत्सव! विविध रूपांतील ‘स्त्री’च्या प्रभावी आविष्काराचा उत्सव! ‘घर ते राष्ट्र’ अशा प्रचंड व्यापक पाश्र्वभूमीवर पसरलेल्या ‘स्त्री’ नेतृत्वामागच्या काही मानसिकतांचा वेध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे! विषय खूप खोल आहे. हा लेख म्हणजे फक्त पृष्ठभागावरचा एक बुडबुडा आहे, पण त्यानिमित्तानं प्रकाशित/अप्रकाशित अशा लाखो ‘कुटुंब नेत्या’ स्त्रियांच्या कर्तृत्वाला दिलेली ही एक वंदना आहे, असं समजते!