स्त्री जातक : नाळ समाजाची Print

डॉ. अनघा लवळेकर,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

समाजावर संस्कार करण्याच्या स्त्रीच्या क्षमता अफाट आहेत. तिच्यात ऊर्जाशक्तीही प्रचंड असते. गरज आहे ती प्रथम स्वत:शी व नंतर समाजाशी संवाद साधण्याची! त्यासाठी समाजाशी नाळ जोडायला हवी. नवरात्रीच्या निमित्ताने समाजातल्या याच स्त्रीशक्तींविषयी..
सुखदा काही वर्षांपूर्वीपर्यंत नोकरी-घर-नोकरी अशा चक्रात अखंड धावणारी एक प्रातिनिधिक शहरी स्त्री होती.दोन्ही ठिकाणी जमेल तेवढं उत्तम काम करण्याचा प्रयत्न करीत होती. मनात खूप तीव्र इच्छा होती की, या रहाटगाडग्यापलीकडे जाऊन काहीतरी करावं. नात्यापलीकडच्या कुणाच्या तरी जगण्यात आनंद भरावा, पण ते कसं जुळवावं ते कळत नव्हतं. आपल्याजोगतं काय काम असेल ते उमगत नव्हतं. एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून सुखदा एका व्याख्यानाला गेली. ‘मनुष्यघडणीसाठी शिक्षण’ असा त्या व्याख्यानाचा विषय होता. शाळेच्या चौकटीबाहेर मुलं कसं काय काय शिकू शकतात आणि त्यात आपण (प्रौढ) त्यांना कशी साथ देऊ शकतो, मदत करू शकतो हे फार प्रभावीपणे त्या वक्त्यांनी मांडलं. सुखदाच्या सुपीक मनात ते बी रुजलं. त्याला प्रेरणेचे अंकुर फुटले आणि त्या वक्त्यांशी संपर्क करून तिनं अगदी प्रासंगिक रूपात काही धडपड सुरू केली. मुलांना भेटायचं, बोलायचं, त्यांना एकत्र आणायचं, चांगलं वाचन करायला प्रवृत्त करायचं, त्यांच्यासाठी सुट्टीत सकस कार्यक्रम करायचे.. आणि हे  सगळं अक्षरश: शून्य अपेक्षा ठेवून! काही वेळा तर पदरालाही खार लावून! पण त्यातून मुलं बदलत होती, मोठी होता होता ‘शहाणी’पण होत होती. हे पाहूनच सुखदाला खरं ‘सुख’ मिळत होतं. घरातल्यांनी कधी फार विरोध नव्हता केला, पण फार गोंजारलंही नव्हतं. पण सुखदा सहजपणे सतत तिच्या ‘त्या’ मुलांविषयी, संस्थेच्या अन्य उपक्रमांविषयी घरात बोलत, सांगत राही. हळूहळू घरातल्या बाकीच्यांनाही कुतूहल वाटू लागलं. मुलं तिच्याबरोबर यायला लागली. नवरा- शिरीषही अधूनमधून चौकशी करण्याच्या पायरीकडून प्रत्यक्ष कार्यक्रम आखणं- पार पाडणं अशा टप्प्यांपर्यंत पोहोचला आणि मग हळूहळू इतर काही नातलग-मित्र परिवारही! एका बाईच्या मनात फुटलेल्या अंकुराची रोपटी इतर मनांमध्येही सहज रुजली, वाढायला लागली, पण त्याचं महत्त्वाचं कारण सुखदाला ‘आनंदा’पलीकडे त्या कामातून इतर कशाचीही (स्तुतीचीसुद्धा!) अपेक्षा नव्हती हेच होतं.
अशा कितीतरी ‘सुखदा’ आपल्या आजूबाजूला आपण पाहतो आणि आश्चर्यानं म्हणतो, ‘कसं बाई जमतं हिला ते सगळं? आणि मिळतं तरी काय? उगीचच लोकांची दुखणी अंगावर ओढवून घ्यायचे नस्ते उद्योग!’ खरंच आहे! ‘आपली’ आणि ‘आपल्यांची’ दुखणी निभवताना मारामार होत असते. त्यात अजून या लष्करच्या भाकऱ्या कुणी भाजाव्यात? ना त्यात मोबदला, ना काही मान-सन्मान, ना चार लोकांत प्रसिद्धी! मग तरी ‘सुखदा’सारख्या अनेकींना असं वरवर ‘आपले’ नसणाऱ्यांसाठी आपलं शरीर-बुद्धी आणि वेळ-पैसा  का खर्च करावासा वाटत असेल? ही त्यांची मुळातलीच प्रेरणा असेल का एखाद्या व्यक्तीचा- घटनेचा प्रभाव असेल?
विसाव्या शतकातल्या ज्या दोन व्यक्तींना ‘मॅन ऑफ सेंच्युरी’ म्हणून गोरविलं गेलं ते एक अल्बर्ट आइनस्टाइन आणि दुसरे महात्मा गांधी. या दोघांनीही आपल्या विचारांमध्ये मांडलं आहे की, इतरांसाठी निरपेक्षपणे काही करावं, ही माणसाची फार मूलभूत प्रेरणा आहे. जगातल्या ‘व्यवहार’वादात ती पार हरवून जाते. कधी कधी तर उलटी प्रेरणा- क्रौर्याची, हिंसेची- मनात निर्माण होते. पण ती आपल्याला सुखाकडे कधीच नेत नाही. तिकडे जायला मदत करते ती ‘निरपेक्ष साहाय्या’ची प्रेरणा! मग त्यासाठी प्रत्यक्ष आपल्याला किती का शारीरिक-मानसिक कष्ट पडेनात!
या शब्दांवर विचार करताना समाजाशी नाळ जोडून जगणाऱ्या अशा कितीतरी स्त्रिया आठवतात, ज्यांनी आपली वत्सलता फक्त रक्ताच्या लोकांसाठीच ‘आरक्षित’ करून ठेवली नाही तर जात, धर्म, देश, वंश अशा सर्व भिंतींच्या पल्याड नेली! महर्षी कर्वे यांनी  स्थापन केलेल्या ‘स्त्री शिक्षणाच्या’ कामात बाया कर्वेनी तितकीच उत्स्फूर्त आणि समरसून साथ दिली. तासन् तास वणवण हिंडून, घरोघरी जाऊन त्यांनी ‘भाऊबीज’ जमा केली, ती नंतर आपले पुतळे उभे राहावेत म्हणून थोडीच होती? पंजाबमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात ज्यांचे पालक मारले गेले अशा मुलांसाठी छप्पर तयार करणाऱ्यांना काय त्यातून लगेच काय मिळणार होतं? त्यांना फक्त समाजातल्या एका गटाचं दु:ख दिसत असणार आणि आपल्या क्षमतेनुसार त्यावर फुंकर घालता आली पाहिजे, ती घालू शकलो नाही तर आपलं समाजाबरोबरचं ‘सहजीवन’ व्यर्थ आहे, हे त्यांना मनोमन पटलेलं असणार, असं मला नक्की वाटतं.
सामाजिक बांधीलकीचं हे कमळ हळूहळू हृदयातूनच फुलावं लागतं. केवळ शाळेत ‘समाजसेवे’चे तास ठेवल्यानं किंवा मोठमोठे ‘शो’ज करून त्यातून आपल्या समाज कळवळ्याचं प्रदर्शन भरवून ते उमलत नाही. प्रतिदिन, प्रतिक्षण त्यावर आपला विचार मनात कुठेतरी चालू असावा लागतो. अन्यथा पु.लं.नी वर्णन केलेल्या ‘अतिविशाल महिला मंडळां’प्रमाणे समाज बांधीलकीची पुटं मेकअपसारखी त्वचेच्या वरच राहतात. आपला ‘स्वार्थ’ ओसरला की वाळून त्यांच्या खपल्या पडू लागतात. सुखदासारख्या एखादीला त्या आत फुलणाऱ्या कमळाची चाहूल लागते आणि मोकळ्या मनानं ती त्या ऊर्मीला व्यक्त करून जाते.
एकटय़ा-दुकटय़ा ‘सुखदां’नी केलेली अशी कितीतरी समाजव्रतं आपल्याला माहीत असतात, पण जर अनेक जणींनी मिळून, आपापल्या क्षमतांची बेरीज आणि गुणाकार करून अशी ‘समाजव्रतं’ पत्करली तर? त्यासाठी असलेली चौकट मोडायची गरज नाही, पण थोडी वाकवायची तयारी नक्कीच हवी. ज्ञान प्रबोधिनीनं ‘संवादिनी’ गटाच्या माध्यमातून असा प्रयोग गेलं एक तप चालविला आहे, ज्यातून समाजातील आपल्याला भिडणाऱ्या, जाणवणाऱ्या प्रश्नांवर आपल्यापरीनं उत्तरं शोधायची धडपड अनेक मैत्रिणी एकत्र येऊन करीत आहेत आणि त्यातून स्वत:च्या विकासाला, प्रगल्भतेलाही खतपाणी मिळवीत आहेत. यात पदाधिकारी नाहीत, कुणी कुणाचं बॉस नाही, कुणी कुणाचं स्पर्धक नाही की कुणालाही ‘मी किती त्याग करते’ याचं अवडंबर करावंसं वाटत नाही. आपल्या छोटय़ाशा; पण आंतरिक प्रेरणेतून, मनापासून केलेल्या कृतीमुळे कुणाला तरी आहोत तिथून दोन पावलं पुढे येण्याचं बळ मिळावं, ज्ञान मिळावं यातच या सर्वाचा आनंद आहे. आता तर डोंबिवली, बोरिवली, सोलापूर, इचलकरंजी अशा ठिकाणीही ‘संवादिनी’ची संकल्पना रुजते आहे, आकाराला येते आहे. किशोरवयीन मुला-मुलींसाठीचा संवाद, वंचित मुलांसाठी शिक्षणपूरक उपक्रम, ‘समतोल’ द्वैमासिकातून विचारमांडणी, विद्याव्रत संस्कारातून मूल्यसंवर्धन अशा कितीतरी रचनात्मक कामांतून शेकडो स्त्रियांची नाळ समाजाशी जोडली गेली आहे, जीवनरसाचा आपापल्यापरीनं पुरवठा करीत आहे.
कधी रचनात्मक कार्यातून होणारे बदल अपुरे पडतात. अशा वेळी ‘आपद्धर्म’ म्हणून समाजाला गदगदा हलवावं लागतं. कधी लेखणीतून तर कधी चळवळीतून! कधी प्रस्थापित, स्वार्थी घटकांशी वैर ओढवून घेऊन संघर्षही करावा लागतो आणि एकटय़ादुकटय़ा स्त्रीची संवेदनशीलता त्याला पुरत नाही. तिथंही संघटित बळ लागतंच. कधी त्याला राजकीय विचारधारांची पाश्र्वभूमी असते, कधी कुठलीच एक तत्त्वप्रणाली न मानता ‘समस्यानुवर्ती’ काम असतं. अकऊहअ पासून राष्ट्रसेविका समितीपर्यंत ते नारी मुक्ती मंचापासून बचत गटांच्या महासंघापर्यंत त्यांची उदाहरणं आहेत. या सर्वामध्ये समान धागा जर काही असेल तर तो त्या त्या गटातील ‘स्त्री’ची आसपासच्या समाज गटाबद्दलची आस्था आणि त्यांच्या व्यापक हितासाठी ‘स्व-हिता’चा थोडा किंवा पूर्ण संकोच करण्याची मनाची तयारी!
समाजाशी नाळ जोडताना ही ‘मनाची तयारी’ असणं खूप गरजेचं आहे. अन्यथा मग आपलं ‘समाजभान’ आपल्याच अहंकाराचा एक भाग व्हायला वेळ लागत नाही. ज्ञान प्रबोधिनीतील एक ज्येष्ठ कार्यकर्ते नेहमी सांगतात की, ‘जे तुम्ही करता आहात ते ‘स्वान्त: सुखाय’- म्हणजे फक्त तुम्हाला आनंद वाटावा म्हणून करता हे लक्षात ठेवा. उद्या तुम्ही काम केलं नाही तर तुम्ही ज्यांच्यासाठी करता त्यांना ‘खेद’ वगैरे वाटेल अशा भ्रमात राहू नका. प्रवाह चालूच राहतात. ज्यांना त्यात बदल करावेसे वाटतात त्यांनी स्वत:च्या उडीची जबाबदारी स्वत: घ्यावी!’
स्त्रियांना अनेकदा असं काम करताना आपली कुटुंबांची प्राध्यानं, अन्य पारंपरिक अपेक्षा बाजूला ठेवाव्या लागतात. पण मग आपण जे करतो त्यात आपल्याला कायम उत्तमच प्रतिसाद मिळायला हवा, रिझल्ट्स मिळायला हवेत असं नकळत वाटू लागतं. ते कधीच वास्तवतेत येत नाही. काम उत्तम आणि प्रभावी होण्यासाठी स्वत:च्या मनोभूमिका, दृष्टिकोन यात बदल करणंही आवश्यक असतं. कधी कधी ते अपुरं पडतं. अशा वेळी चीडचीड होते. स्वत:च्या ‘त्यागा’ची परतफेड न झाल्याची खंत वाटते. हे सगळे धोक्याचे सिग्नल आहेत, असं समजायला हवं. जसं पाण्यात एक-दोनदा काठी मारल्यामुळे त्या प्रवाहाला काहीही फरक पडत नाही, सातत्यानं आणि खूप ताकदीनं त्याला फिरवलं- कोसळवलं तरच त्यातून ऊर्जा निर्माण होते, तसंच हे आहे, अस मला वाटतं. त्यासाठी आधी आपल्या मनावर ‘निरपेक्षते’चं आणि ‘स्वयंप्रेरणे’चं सिंचन पुरेसं होत आहे ना, हे सतत तपासायला हवं.
असं एक सुरेख उदाहरण मला नुकतंच कळलं. ‘संवादिनी’तील एक ज्येष्ठ मैत्रीण, अनेक र्वष निव्वळ गृहिणी म्हणून व्यतित केलेली, पण पलीकडच्या जगाची ओढ असणारी! संवादिनीच्या या एका तपाच्या वाटचालीत सोबत असलेली! त्यांच्या राहत्या कॉलनीमधील टिपिकल- ‘आमचे आम्ही’ या मानसिकतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे चिंतित होणारी! तिनं ठरवलं की, ‘या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण नवं काही रुजवूया!’ घरच्यांशी बोलून तिनं सुरुवात केली आणि खरोखर जिथे लोक ‘हाय-हॅलो’पुरतंसुद्धा एकमेकांकडे पाहत नव्हती, त्या वसाहतीत तरुण मुलींच्या मदतीनं एक सुरेख उत्सव कसा आखावा, एकत्र येण्याचा- संघटित होऊन काही कृती करण्याचा वस्तुपाठ कसा गिरवावा, याचं दर्शन तिनं सर्वाना दिलं. कशाकरिता? ‘स्वत:ला निरभ्र आनंद मिळावा म्हणून!’ सामाजिक नाळ फक्त सेवेशी, समस्येशी किंवा वाद-प्रतिवादाशी संबंधित नाही तर अशा अगदी रोजच्या जगण्यातील नातेसंबंधांशी, समूहजीवनाचे संस्कार करण्याशीही संबंधित आहे. या मैत्रिणीच्या अनुभवाच्या निमित्तानं मला ते तीव्रपणे जाणवलं. असे संस्कार करण्याच्या स्त्रीच्या क्षमता खरोखरच अफाट आहेत. त्यासाठी स्वत:शी आणि समाजाशी ‘संवाद’ करण्याची इच्छा होणं- ती ‘टिकवून धरणं’ गरजेचं आहे, असं मला वाटतं.
ज्ञान प्रबोधिनी संवादिनी संपर्क :
श्रुती पाठक - ९९३०१०२९९८ डोंबिवली
पद्मा कासर्ले - ९८६७३८३०३८ बोरिवली
अनघा लवळेकर - ९८२२५०२९९२