मुक्तायन : ती आणि मी Print

altमुक्ता बर्वे , शनिवार , १४ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चोखंदळ भूमिकोंसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे. नाटय़-चित्रपट-दूरचित्रवाणी माध्यमात काम करीत असताना तिच्या संवेदनशील मनाने टिपलेल्या, वाचकांना अनोख्या विश्वात घेऊन जाणाऱ्या अनुभवांचे हे पाक्षिक सदर.
प्र योगाची तयारी सुरू असते. आम्ही मंडळी मेकअप रूममध्ये बसून मेकअप करीत असतो. एकीकडे कपडय़ांना इस्त्री चालू असते. रंगमंचावर सेटची ठोकाठोक, लाइट्स अ‍ॅडजस्ट करणं सुरू असतं, रंगमंचाची पूजा चालू असते. अशातच पहिली घंटा होते. चहावाला लगबगीने चहा वाटायला घेतो.

साधारण सेट उभा राहिलेला असतो. आता इस्त्री करून तयार असलेले कपडे अंगावर चढवले जातात, पडद्यामागची धावपळ हळूहळू कमी होऊ लागते. दुसरी घंटा होते आणि मग मेकअप रूममधला- बॅकस्टेजचा गलबला मागच्या अंधारात विरून जातो. सगळे प्रयोगासाठी सज्ज होतात नि तिसरी घंटा होते. लख्ख उजेडाच्या रंगमंचावर सगळ्यांचंच लक्ष केंद्रित होतं.
आणि मग येतात ती माझ्या एन्ट्रीआधीची विंगेतली अद्भुत दोन मिनिटं ‘तिच्या-माझ्या’ भेटीची. अंधाऱ्या विंगेला कापणारी एखादीच, रंगमंचावरच्या उजेडाची तिरीप तिकडे डोकावत असते. पण तिच्या-माझ्या ओळखीच्या खुणा पटायला, माझ्या एन्ट्रीआधीची त्या अंधाऱ्या-उजेडय़ा विंगेतली, ती दोन मिनिटांची धावती भेटसुद्धा पुरेशी असते. असं काय घडतं, त्या दोन मिनिटांत? तिकडे ना आम्हाला दोघींना एकमेकींशी काही बोलायचं असतं, ना काही दाखवायचं असतं, ना काही द्यायचं असतं, ना घ्यायचं असतं. पण त्या क्षणी तिकडे फक्त असायचं असतं पूर्णपणे.
नाटक कोणतंही असो, प्रयोग कितवाही असो, रंगमंच कोणताही असो, पण एन्ट्रीआधीची तिची-माझी भेट काही चुकत नाही किंवा असं म्हणता येईल की, जर तिची-माझी भेट झाली नाही तर मी पुढे प्रयोगच करू शकणार नाही, इतकी ‘ती’ महत्त्वाची. म्हणजे मी साकारीत असलेली भूमिका-पात्र-कॅरॅक्टर. जितकी वेगळी नाटकं, जितक्या वेगळ्या भूमिका, तितकी मला विंगेत भेटणारी ‘ती’ वेगळी. मला वाटतं, प्रत्येक नटाचे आणि त्याच्या पात्राचे रंगमंचावर प्रवेश करण्याआधीचे असे काही खासगी क्षण असतात. विंगेतला आरसा चोरून ते क्षण हळूच टिपत असतो. त्या अंधाऱ्या, गूढ, थंड; पण प्रसन्न. विंगेत माझ्यासाठी ‘ती’ आणि तिच्यासाठी ‘मी’ निश्चल, ठाम उभ्या असतो. काहीच क्षणात येणाऱ्या प्रयोगाच्या वादळाला अंगावर घेण्यासाठी सज्ज होत असतो.
एन्ट्रीआधीच्या, विंगेतल्या त्या दोन मिनिटांच्या अद्भुत भेटीचं मला फार आतून आकर्षण वाटतं. पडदा उघडण्याआधी, प्रयोग सुरू होण्याआधी ती वाढलेली धडधड, पोटात येणारा गोळा, माझ्या नकळत बदललेलं शरीराचं तापमान, वाढलेला श्वास आणि विंगेत माझ्या भेटीसाठी आतूर उभं असलेलं माझं ‘पात्र’. नाटक नवीन असतं तेव्हा हेच विंगेतले क्षण थोडे वेगळे असतात, नव्याचा नवखेपणा, थोडासा अनोळखीपणासुद्धा डोकावतो. बऱ्याचदा काही नव्या गोष्टी सापडतात. पण जसजशी प्रयोगसंख्या वाढते, तसं हे चाचपडणं कमी होतं आणि विंगेतल्या भेटी अधिक सुस्पष्ट आणि ठळक होऊ लागतात. वरकरणी आपल्यासारखं दिसणारं, आपल्या आवाजात बोलणारं, आपल्यासारखं वाटणारं, पण कधी कधी आपल्यालाही अचंबित करणारं हे पात्र प्रयोगाचे तीन तास जेव्हा तुमच्या बरोबरीने वावरतं तेव्हा काहीतरी वेगळीच गंमत चालू असते आतल्याआत. तुमच्या-तिच्यामध्ये एक पुसटशी किंवा तुटक तुटक असेल, पण एक लक्ष्मणरेषा नक्की असते. ती ओलांडून शक्यतो कोणी जायचं नसतं. हा नियम तिलाही आणि मलाही.
कधी कधी तर एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये लागोपाठ दोन वेगळ्याच नाटकांचे प्रयोग असतात. तेव्हाची कमाल तर विचारूच नका. त्याच विंगेत फक्त तीन तास आधी भेटलेली ‘ती’ आणि नंतरची ‘ती’ इतकी वेगळी असते, पण तरीही माझ्या तितकीच जवळची असते. लहान मुलांना जेव्हा आई आवडते का बाबा, असं विचारतात तेव्हा कसं होतं त्यांचं? त्यांना उत्तरच नाही देता येत. तसंच होतं माझंही. ही भूमिका, का ती भूमिका? असं नाहीच होत कधी. बरेचदा ही पात्र माणूस म्हणून तुम्हाला प्रगल्भ करीत असतात. नवे दृष्टिकोन देत असतात, जगायला शिकवीत असतात आणि म्हणूनच तुमचं पात्र तुम्हाला भेटतं. या अद्भुत क्षणासाठी म्हणा किंवा तुमच्या आणि तुमच्या पात्राच्या अद्वैताचा तो अमूर्त क्षण अनुभवण्यासाठी म्हणा, तुम्हाला सतत नाटक करीत राहावंसं वाटतं...