मुक्तायन : केमिस्ट्री Print

मुक्ता बर्वे - शनिवार, २८ जानेवारी २०१२
chaturang @expressindia.com
altदोन कलाकारांमध्ये केमिस्ट्री जुळते म्हणजे नेमकं काय होतं? कलाकार हा सहकलाकार म्हणूनही कसा चांगला असावा लागतो, त्यासाठी जाणीवपूर्वक कोणते प्रयत्न करावे लागतात, नाटकात ही केमिस्ट्री दिसते कशी?
आ तापर्यंत माझ्या सुदैवाने मी ज्या नाटकांत कामं केली त्यामध्ये बहुतांश वेळा मला चांगल्याच कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. नुसते कलाकार नाही तर सहकलाकार म्हणूनही ही मंडळी फारच चांगली होती. आता तुम्हाला वाटेल की, ‘कलाकार’ आणि ‘सहकलाकार’ या दोन्हींत ‘सह’ हा शब्द सोडला तर असा मोठा काय फरक आहे? तर माझ्या मते, खूप जास्त फरक आहे. मला वाटतं, सर्व चांगले कलाकार हे नेहमीच चांगले ‘सहकलाकार’ असतातच असं नाही. कारण चांगला कलाकार होण्याकरिता लागणारे सगळे गुण तर सहकलाकारात असावेच लागतात, पण त्याच्या जोडीनं माणूस म्हणून त्याच्यामध्ये मोकळेपणा, निखळपणा, फ्लेक्झिबिलिटी, भान आणि  आत्मविश्वास असावा लागतो. इतका सर्वगुणसंपन्न सहकलाकार मागण्याची कारणं हळूहळू तुमच्या लक्षात येतीलच.
पुण्यामध्ये नाटय़शास्त्र विषयाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना शिकलेल्या काही गोष्टी फिट्ट डोक्यात बसल्यात. यामध्ये नाटकाचं चांगलं नेपथ्य कसं असावं, चांगली प्रकाशयोजना कशी असावी याबद्दल बोलताना एक गोष्ट कायम शिकविली जायची- पडदा उघडला आणि नेपथ्यानं टाळी घेतली की समजावं नेपथ्य चांगलं नाही. म्हणजे ज्या नाटकासाठी हे नेपथ्य उभं राहिलं आहे त्या नाटकाचा प्रयोग सुरू होण्याआधीच त्याच्यापुढे जाऊन जर ते प्रेक्षकांना अधिक आवडत असेल, त्यांचं लक्ष वेधून घेत असेल तर ते त्या नाटकाला पोषक ठरणार नाही आणि केवळ नेपथ्य चांगलं म्हणून संपूर्ण नाटक चांगलं ठरणार नाही, हे नक्की. हाच नियम नाटकाच्या सर्व अंगांना लागू पडतो. मग अभिनयाला का नाही? एका नटाचा अभिनय चांगला झाला म्हणून सबंध कलाकृती यशस्वी ठरत नाही. सहभागी असलेल्या सगळ्या कलाकारांनी एकमेकांचं आणि संपूर्ण कलाकृतीचं भान ठेवून काम केलं तरच पूर्ण परिणाम साधला जातो.
अभ्यास म्हणून वाचलेल्या-ऐकलेल्या अशा गोष्टी आज काम करताना जाणवत राहतात, प्रत्यक्ष घडताना दिसतात. फक्त नाटकातच नाही तर नाटक-सिनेमा-टीव्ही मालिका सगळीकडेच दिसतात.
एखादी कलाकृती प्रेक्षक उचलून धरतात तेव्हा ‘भट्टी करेक्ट जमली’ असं म्हटलं जातं. मग ही भट्टी जमली म्हणजे नेमकं काय तर कलाकृती परिपूर्ण करणारा प्रत्येक घटक तिथे योग्य प्रमाणात हजर असणं. एखाद्या चविष्ट पदार्थासारखं!
त्याच सर्व अंगांमधलं अभिनय हे एक अंग! मघाशी मी कलाकार आणि सहकलाकार याबद्दल ओझरतं बोलले. आता मला नेमकं काय म्हणायचंय ते सांगते. ‘केमिस्ट्री’ हा शब्द मी शाळेत शिकत असताना जितका वापरला नसेल तेवढा मुंबईत येऊन काम करायला लागले आणि ऐकला. ‘तुमची केमिस्ट्री वर्क झाली’, ‘तुमच्यातली केमिस्ट्री भारी आहे’ म्हणजे नेमकं काय याचा शोध घेतला आणि बऱ्याच गोष्टी हळूहळू लक्षात आल्या. लक्षात येतायत. ही जी काही ‘केमिस्ट्री’ आहे दोन कलाकारांमधली ही वर्क होण्याकरिता मुळात तुमच्यात आणि तुमच्या सहकलाकारात एक बॉण्डिंग असावं लागतं कारण पाया भक्कम असेल तरच वर उत्तम इमारतीची बांधणी होऊ शकते ना? आता त्याच्यापुढे एक मोकळेपणा, निखळपणा असावा लागतो. समोरच्या नटाचे बदलचे स्वर, शरीरभाषा याला त्या क्षणी कलाकृतीचा तोल ढळू न देता रिअ‍ॅक्ट करता आलं पाहिजे (अ‍ॅक्टिंग इज रिअ‍ॅक्टिंग). फक्त ‘मी- माझा’ असा बाणा बाळगून काहीच साध्य होऊ शकत नाही. समोरच्यानं केलेलं काम आपण निखळपणे बघू शकलो तर त्याच्यावर त्यापुढे जाऊन काहीतरी सुचू शकतं. काही देवाण-घेवाण होऊ शकते आणि लिखित वाक्यांना काही आकार येऊ शकतो. म्हणजे कागदावरच्या लेखकांनी लिहिलेल्या टू-डी वाक्यांची थ्री-डी माणसं होताना दिसतात. ही सर्व प्रक्रिया चालू असताना महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ‘भान असणं’. प्रत्येक कलाकाराला संपूर्ण कलाकृतीचं भान तर असलंच पाहिजे, पण त्या पुढे जाऊन चांगला सहकलाकार होण्यासाठी, त्या पूर्ण कलाकृतीत ‘मी’ कुठे आहे, याचं भान असलं पाहिजे. कारण अखंड कलाकृती एकसंधपणे काहीतरी सांगू पाहते. त्यातल्या प्रत्येक प्रसंगाचं काहीतरी म्हणणं असतं. त्यात बाधा न आणता, त्या प्रसंगाचा समतोल ढळू न देता तिथे कलाकारानं एकजिनसी होणं महत्त्वाचं असतं.
साधं उदाहरण देते. माझ्याच ‘कबड्डी कबड्डी’ नाटकातलं! खरं तर हे नाटक आहे वडील-मुलीचं. त्यात कबड्डी या खेळाचा बॅकड्रॉप वापरून अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. एकूण सहा पात्रांचं नाटक. त्यात एक अत्यंत छोटं पात्र- कबड्डी कोचचं. अडीच तासाच्या नाटकात १० मिनिटं दिसणारं, पण त्या १० मिनिटांत महत्त्वाच्या गोष्टी बोलणारं. या नाटकात एका प्रसंगात सर्व पात्रं रंगमंचावर असताना हा कोच रंगमंचावरच्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकणी उभा राहून काही गोष्टी बोलतो आणि आम्ही इतर पात्रं फक्त शांतपणे ऐकतो. या प्रसंगात तो ‘कोच’ उत्तम अभिनयामुळे लक्षात राहतोच, पण तो बोलतो ते महत्त्वाचं आहे हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही सहकलाकार म्हणून आमच्याही खांद्यावर त्या वेळी तेवढीच असते. मी कथानायिका आणि विनय आपटे सर कथानायक आहेत (खूप जुने-जाणते आहेत) म्हणून आम्ही तिथे रंगमंचावर असताना कोचकडे दुर्लक्ष करू लागतो तर संपलंच सगळं. सगळा समतोलच ढासळेल. तेव्हा सहकलाकार म्हणून आम्हा इतर पाचही कलाकारांनी संपूर्ण कलाकृतीचं भान ठेवलं पाहिजे आणि त्या सीनपुरता त्या सीनचा नायक ‘कबड्डी कोच’ आहे, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. अर्थात आमच्या प्रयोगात ते तसं घडतं आणि प्रयोग रंगतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माणूस म्हणून आत्मविश्वास. चांगल्या सहकलाकाराला माणूस म्हणून आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं वाटतं मला. आपल्या ताटात वाढलंय तेवढंच जेवण शांतपणे, एकाग्रतेने आणि चवीचवीनं खाता यावं. म्हणजे कथानकातील मुख्य पात्र असेल, सहायक पात्र असेल, उपकथानकातलं पात्र असेल, सलग तीन तास दिसणारं असेल किंवा दोन मिनिटांत येऊन जाणारं असेल - कलाकृतीत ते पात्र कमी-जास्त महत्त्वाचं वाटलं तरी ते साकारणारा कलाकार मात्र उत्तमच असावा लागतो. म्हणजे तो आत्मविश्वासानं काम करू शकतो आणि सहकलाकार म्हणून परिपूर्ण ठरतो. म्हणजे भूमिका जास्त लांबीची की कमी लांबीची हे महत्त्वाचं नसतंच बरेचदा. तो कलाकृतीसाठी किती पूरक- गरजेचा हे महत्त्वाचं! एक मिनिट पडद्यावर येऊन पडदा व्यापून टाकणारे कलाकार मोठेच असतात, पण एकाच मिनिटात कामात तीन तासांचा अभिनय घुसवणारे नट!! कोणताही शांतचित्त, आत्मविश्वास असलेला नट ही चूक करीत नाही, असं मला वाटतं. एकपात्री प्रयोग किंवा नाटय़छटा हे प्रकार सोडल्यास साधारणपणे कोणतीही कलाकृती ही एकापेक्षा अधिक कलाकारांनी साकारलेली असते. तिथे या सर्व समतोलाचा विचार करून काम करणारा नट असेल तरच संपूर्ण कलाकृतीचा समतोल राखला जातो. अर्थात ही माझी मतं आहेत. आतापर्यंत केलेल्या कामातून आणि उत्तमोत्तम सहकलाकारांच्या सान्निध्यात आल्यामुळेच तयार झाली. त्यामुळे प्रत्येक नवीन कामात मी चांगली अभिनेत्री होण्याबरोबरच प्रयत्न करते चांगली सहअभिनेत्री होण्याचा!