मुक्तायन : निखळ जगणं Print

मुक्ता बर्वे , शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमुळात आपल्याला आयुष्यात काय हवं असतं? अभिनेत्री झाले म्हणून चांगल्या भूमिका, पुरस्कार, आर्थिक पुंजी, प्रसिद्धी बास? एवढय़ा मोठय़ा खोल आयुष्यात एवढंच शोधतेय का मी? खरं तर यश-अपयश, पैसा-प्रसिद्धी ही सगळी बायप्रॉडक्टस् आहेत, पण मला त्या सगळ्याच्या आधी एक निखळ माणूस व्हायचंय.. अगदी सत्तराव्या वर्षीसुद्धा स्वच्छ, निखळ, खळखळून हसायचंय.. आपण लहान असतो तेव्हा ‘तू मोठा झाल्यावर किंवा मोठी झाल्यावर कोण होणार?’ असा प्रश्न हमखास विचारला जातो. मग ‘मी मोठी झाले की ना विमानातली चॉकलेट देणारी एअर होस्टेस होणाराय’पासून ‘मी शाळेतल्या मधल्या सुट्टीतले ‘पेरूवाले काका होणाराय’पर्यंत काहीही उत्तरं लहान मुलांकडून मिळतात. पण माझ्या आता आता असं लक्षात आलंय की हा प्रश्न विचारताना बरेचदा मुलं काय म्हणतात हे महत्त्वाचं नसतंच मुळी. त्या मुलांना प्रश्न विचारणाऱ्या मोठय़ा माणसांच्या मनात हा प्रश्न विचारण्याच्या आधीच त्याची उत्तरंही तरळून गेलेली असतात आणि उत्तरं बहुतांश वेळेला त्या मोठय़ा माणसांना खरं तर काय व्हायला आवडलं असतं याची असतात. फार गंमतीशीर आहे ना हे? मी लहान असताना माझ्या आजीला वाटायचं की मी वकील होईन. लहानपणी माझ्या आजीची आणि माझी जाम दोस्ती होती. ती मला गोष्टी सांगायची, खाऊ द्यायची, माझ्या वयाची होऊन माझ्याशी खेळायची आणि मग मीही तिच्याशी वाट्टेल ते बोलायचे, आगोचरपणे वागायचे, अगदी तिच्याशी भांडणसुद्धा करायचे. या भांडणात माझ्यावरच्या प्रेमानं ती शांत राहायची, पण माझी टकळी चालूच. मग काय ही वादविवाद स्पर्धा मी जिंकायचे. माझ्या या अगोचरपणाचं तात्पर्य म्हणून आजीला वाटायचं की (वकील होणार आणि) मी मोठेपणीसुद्धा अशाच वादविवादात जिंकू शकेन, स्वत:चा मुद्दा समोरच्याला पटवून सांगू शकेन आणि माझा गुण मला वकील बनवेल. हे झालं आजीचं मत, पण आईला वाटायचं की मी मोठी नर्तकी होईन. दीड वर्षांची होईपर्यंत मी कधी चालण्यासाठी एक पाऊल टाकायचाही प्रयत्न केला नव्हता म्हणे.. एका जागी बसणे, खाणे, बडबड आणि फारच मूड आला तर सरकत-सरकत पुढे जाणे एवढाच माझा कार्यक्रम. पण ज्या दिवशी माझ्या पायात छोटेसे वाजणारे पैंजण घातले त्या दिवशी मी डायरेक्ट म्हणे पायऱ्या उतरून खालीच गेले. त्या पैंजणाच्या आवाजाची मला गंमत वाटली आणि खूप दिवसांपासून चालायला केलेला आळस झटकून मी धावू लागले. झालं त्या दिवशी आईनं मनात पक्क केलं की, ‘संगीत-नृत्य मुक्ताच्या अंगातच आहे. बघा ना पैंजणाच्या तालावर कशी लयीत चालतेय, मोठेपणी ही नर्तकी होणार.’ झालं इकडे  बाबांचं वेगळच. त्यांना तर वाटायचं मी इंजिनीअर होईन, कोणत्या तरी तांत्रिक शाखेत जाईन. याचं कारण फारच गमतीशीर. मला लहानपणी बाहुल्या, भांडी-कुंडी, गाडी-गाडी असल्या खेळण्यापेक्षा तुटलेल्या बॅटऱ्या, बिघडलेले रेडिओ, पॉवर गेलेले सेल, घरात पडलेल्या रंगीत वायरींचे तुकडे या असल्या वस्तूंशी खेळायला खूप आवडायचं.. त्याचं कारण माझ्यासाठी खरं तर सोपं होतं. नवीन आणलेल्या खेळण्याची तोडफोड केली की कोणी तरी ओरडायचं, पण या सगळ्या आधीच तुटलेल्या वस्तू मी परत जास्त तोडल्या तर कोणाला कळायचंही नाही, उलट हुशार-हुशार म्हणून माझे बाबा कौतुकानं बघत राहायचे. कधी कधी तर ‘छोटे वैज्ञानिक’. ‘खेळता खेळता शिक्षक’, ‘विज्ञान आपला मित्र- भाग १, २, ३’ वगैरे असली पुस्तकं आणून मला काय-काय वाचून दाखवायचे. तात्पर्य, मी मोठेपणी कोण होणार हे त्यांचं त्यांच्यापुरतं ठरून गेलं होतं. याउपर जाऊन माझ्या दादाला वाटायचं मी चित्रकार होणार. कारण विचारा? मुळातच लहानपणी ‘आळस’ हा स्थायीभाव असणारी मी दिवाळीच्या- मे महिन्याच्या सुट्टीत आणलेली गोष्टीची पुस्तकं वाचायचासुद्धा आळस करायचे. चंपक, चांदोबा, चाचा चौधरी, इंद्रजाल कॉमिक्स या सगळ्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात बसून मी फक्त चित्रं बघत राहायचे आणि वाचण्याऐवजी चित्रावरून ही गोष्ट काय बरं असेल हे ठरवायचं स्वत:पुरती- स्वत:साठी. पण दिसताना असं दिसायचं की मी त्या चित्रांमध्ये तासन्तास बुडून गेलेली. थोडक्यात, सांगायचं तर माझ्या प्रत्येक जवळच्या माणसाने मनोमन माझ्यासाठी एकेक क्षेत्र निवडून ठेवलं होतं आणि या सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवून मी अभिनेत्री झाले आणि माझा दादा मात्र चित्रकार (कमर्शिअल आर्टिस्ट) झाला. सगळ्यांचे अंदाज खोटे ठरले..! का सगळ्यांचंच बरोबर ठरतंय. नाही ना लक्षात येत मी काय म्हणतेय ते. बघा ना, अभिनेत्री झाले आणि एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा परवानाच मिळाला. कधी मी ‘लज्जा’ मालिकेतली तडफदार वकील असते, कधी ‘आघात’ सिनेमातली कर्तव्यनिष्ठ- सत्याच्या बाजूनं लढणारी डॉक्टर, कधी ‘अग्निहोत्र’ मालिकेतली तमाशा फडात नाचणारी, तिकडून पळून आलेली मंजुळा असते. कधी ‘सुंबरान’ सिनेमातली कर्तबगार कलेक्टर, कधी ‘जोगवा’मधली अगतिक जोगतीण, कधी ‘मुंबई-पुणे-मुंबई’तली स्थळाला नकार द्यायला आलेली ‘मुंबईची मुलगी’ कधी ‘कबड्डी-कबड्डी’ नाटकातली कबड्डीपटू, कधी ‘फायनल ड्राफ्ट’ नाटकातली कन्फ्यूज मुलगी, कधी ‘एक डाव धोबीपछाड’मधली येडी सुलक्षणा, कधी ‘हम तो तेरे आशिक है’ नाटकातली प्रेमात पडून आंतरधर्मीय लग्न करणारी रुक्साना तर कधी लग्नाचा विषय निघाला तरी नाक मुरडणारी कमर्शिअल आर्टिस्ट राधा. एकाच या जन्मी जणू, फिरूनी नवी जन्मेन मी, हरवेन मी हरवेन मी तरीही मला लाभेन मी! मला नेहमी वाटतं, ‘हाऊ लकी आय एम’ कारण मी अभिनेत्री झाले. नाही तर एकाच जन्मात इतकं वैविध्य अनुभवायची संधी मिळाली नसती ना मला. कधी मी माझ्या आजीला वाटायचं तशी वकील होते, कधी आईला वाटायचं तशी नर्तकी, कधी बाबांचं म्हणणं खरं ठरवत इंजिनीअर होते, तर कधी दादा म्हणायचा तशी चित्रकार. वरवर गमतीशीर वाटणारं, हे खोलात जाणारं प्रकरण खरं तर खूप आहे. म्हणजे वेगवेगळ्या नाटक-सिनेमा-मालिकांच्या निमित्ताने मला भेटणाऱ्या या सगळ्या माझ्या वेगवेगळ्या मैत्रिणी म्हणजे मी साकारत असलेल्या भूमिका, मला माणूस म्हणून खूप अनुभवसंपन्न करत राहतात. त्यांच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या वेगवेगळ्या आर्थिक स्तरांमधल्या, वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतल्या, शैक्षणिक पात्रता कमी-जास्त असणाऱ्या माझ्याच वयाच्या मुलींची आयुष्यं त्यातली आव्हानं मला थोडी का होईनात अनुभवायला मिळतात. म्हणजे अगदी डॉक्टरची भूमिका साकारताना, खऱ्या आयुष्यात डॉक्टर होण्यासाठीचं स्ट्रगल किंवा रात्र-रात्र जागून केलेला अभ्यास, प्रॅक्टिकल्स एवढं सगळं करताना काय काय कष्टप्रद आयुष्य असतं हे जसंच्या तसं नाही जाणवत, पण तरी डॉक्टर रुग्णासाठी जीवनदान देणारा, तारणहार, ज्याच्यावर स्वत:ची जबाबदारी सोपवून रुग्ण आणि त्याचे नातेवाईक शांतपणे झोपू शकतात. अशा नोबल प्रोफेशनमध्ये काम करणारी व्यक्ती कोणकोणत्या तणावातून जात असेल. त्याचं वैयक्तिक आयुष्य कसं असेल, व्यावसायिकदृष्टया काय काय निर्णय त्यांना घ्यायला लागत असतील हे थोडं फार तरी कळतंच. आणि मी ‘मुक्ता’ म्हणून माझ्या डॉक्टरना भेटते तेव्हा त्यांच्याबद्दलचा आदर-आपुलकी अधिक वाढते. समोरचे डॉक्टर माणूस म्हणून जास्त ओळखीचे वाटायला लागतात. फक्त डॉक्टरच नव्हे तर ज्या-ज्या  भूमिकांवर स्वार होऊन माझा प्रवास करतेय तस तशी नवनवीन दालनं माझ्यासाठी खुली होत आहेत. काही-काही काळापुरती का असेना मला ही वेगवेगळी आयुष्यं जगायला मिळत आहेत. आणि या पुढच्या आयुष्यातसुद्धा अजून काही नवीन आयुष्यं मला जगणं शिकविण्यासाठी सरसावून पुढे येत राहतील. पण हा झाला माझ्या कामाचा भाग. थोडा गमतीशीर, थोडा जबाबदारी वाढविणारा, पण माझ्या खऱ्या आयुष्याचं काय? मला वाटतं की, खऱ्या आयुष्यातही आपण विविध भूमिकाच तर जगत असतो. फरक इतकाच की अभिनेत्री म्हणून मी एखादी भूमिका साकारते तेव्हा त्या पात्राचं दिसणं, हसणं, विचार, बोलणं, वागणं, एकूणच असणं हे दुसऱ्या कोणीतरी ठरवलेलं असतं आणि खऱ्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी आपण ठरवतो, म्हणजे किमानपक्षी आपल्याला ते तसं वाटत तरी असतं. जगत असताना मुलगी, बहीण, मैत्रीण, बायको, आई खरी तर एक व्यक्ती, पण सगळ्या वेगवेगळ्या भूमिका साकारतेच की आणि प्रत्येक नात्यागणिक काही तरी शिकते. कधी चुकते, परत सावरते आणि पुन्हा तेच ‘अनुभवसंपन्न’ होत राहते. कामाच्या पातळीवर असेल किंवा वैयक्तिक आयुष्यात असेल ही सतत वेगवेगळे काही तरी करण्याची धडपड. त्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला मिळते कुठून आणि हे जे मी म्हणतेय की ‘अनुभवसंपन्न’ होणं, चुकणं त्यातून शिकणं, धडपड हे सगळं आपण का करत राहतो? मी सुरुवातीला लिहिलं तसं आपल्या लहानपणी घरातले काही तरी ठरवतात म्हणून, आपल्याला आवडलं म्हणून, दुसरं काहीच जमलं नाही म्हणून आपण मोठेपणी कोणी तरी होतो. जशी मी अभिनेत्री झाले. ती- मी कशी झाले, का झाले याची एक गमतीशीर गोष्ट आहे. ती नंतर कधी तरी सांगेन. पण.. मुळात आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवं असतं? अभिनेत्री झाले म्हणून काही चांगल्या भूमिका, काही पुरस्कार, थोडी आर्थिक पुंजी, प्रसिद्धी बास! एवढय़ा मोठय़ा खोल आयुष्यात एवढंच शोधतेय का मी? मला नेमकं काय व्हायचंय हाच विचार करत, हा लेख अर्धवट लिहून मी माझ्याच तंद्रीत शूटिंगच्या लोकेशनवर मेकपरूममध्ये बसले होते आणि समोरून माझ्याच क्षेत्रात काम करणारी मझी ७० वर्षांची ‘यंग अ‍ॅट हार्ट’ असलेली डार्लिग मैत्रीण अलका प्रधान काठी टेकत टेकत मला भेटायला, माझ्या कामाचं कौतुक करायला खूप लांबून फक्त तेवढय़ासाठीच आली होती. मला कडकडून भेटली, भरभरून बोलली, खळखळून हसली. मला हसवलं. गप्पा-टप्पा करून तितक्याच उत्साहाने लवकरच परत भेटू म्हणून निघून गेली. आणि मला माझ्या प्रश्नाच्या उत्तराच्या अगदी जवळ गेल्यासारखं वाटलं. हो! यश-अपयश, पैसा-प्रसिद्धी ही सगळी बायप्रॉडक्टस् आहेत, पण मला त्या सगळ्याच्या आधी एक निखळ माणूस व्हायचंय. अनेक अनुभव घेऊन त्यातल्या सगळ्या नको असलेल्या गोष्टी फिल्टर करून अलकासारखं अगदी सत्तराव्या वर्षीसुद्धा स्वच्छ, निखळ, खळखळून हसायचंय.