मुक्तायन : खुराक हवा Print

मुक्ता बर्वे - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt.. हा माझा खुराक आहे. या सगळ्याचा मी करीत असलेल्या भूमिकांशी थेट संबंध नसतो, पण माणूस म्हणून माझा आवाका मी वाढवला तर माझा दृष्टिकोन बदलेल, नव्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक असेल..
परवा नाशिकला गेले होते. कुसुमाग्रज जन्मशताब्दी सोहळा आणि मराठीदिन या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं. त्यातल्या एका कार्यक्रमात मी पण सहभागी झाले होते. कार्यक्रम होता, ‘कुसुमाग्रजांच्या कविता आणि नाटकातील निवडक उताऱ्यांचं वाचन’ कार्यक्रमाचं नाव ‘अद्वैत’ आणि सहभागी कलाकार होते मी, किशोर कदम म्हणजे कवी सौमित्र, सचिन खेडेकर आणि रीमाताई. वाचनाबरोबर काही गाणीसुद्धा त्यात सादर झाली. सगळा कार्यक्रम किशोरनेच बांधलेला, उत्तम पार पडला, पण या कार्यक्रमात कविता वाचत असताना एक गमतीशीर गोष्ट लक्षात आली.
कविता आणि नाटक जरी एकाच भाषेतले दोन वाङ्मय प्रकार असले, तरी सादरीकरणाच्या पातळीवर खूप वेगवेगळे सादर होतात. कविता वाचनाचा हा माझा अगदी पहिला-वहिला अनुभव. हातात कविता आल्या आणि मी माझ्यापरीनं तयारी सुरू केली. खूप कमी शब्दांत कधी यमकाचा वापर करून, लयबद्ध पद्धतीने तर कधी मुक्तछंदात फार मोठा आवाका सांगून जाणारा हा वाङ्मय प्रकार. त्यातल्या बऱ्याच कविता अर्थ घेऊनच माझ्यापर्यंत पोहोचल्या. काहींचा अर्थ मी सचिन, किशोर, रीमाताईंकडून समजवून घेतला. अर्थ समजला, शब्दांचे चढ-उतारही कमी-जास्त प्रमाणात ठरून गेले, सादरीकरणाच्या वेळी प्रेक्षकांची दादही मिळून गेली, कौतुकाने झालं, पण मला स्वत:ला कळलेली गोष्ट वेगळीच आहे. ‘जोगीण’ नावाची कविता जी कार्यक्रमात मी वाचली. ती मला कार्यक्रमाच्या आधी रीमाताईंनी वाचून दाखवली. ती कविता मी त्यांच्या तोंडून ऐकली आणि नि:शब्दच झाले. फार सुंदर, अर्थपूर्ण आणि कुसुमाग्रजांच्या प्रत्येक शब्दाला न्याय मिळाला, असं वाटलं मला त्यांचं वाचन ऐकून. त्यांनी जशी ती मला ऐकवली तशीच ती मी प्रेक्षकांना ऐकविण्याचा प्रयत्न केला. माझंही सादरीकरण चांगलं झालं, पण जे मी ऐकलं ते सादर नाही करू शकले..  मग माझा शोध सुरू झाला!
हे नेमकं कसं घडतं? शब्द तेच, उच्चारण तसंच, आवाजाचे चढ-उतार तसेच ठाकून-ठोकून बसवलेले, श्वासही अगदी तसेच मोजून घेतलेले, मग हा फरक पडतो कसा, तर इथे येतो तो मुद्दा म्हणजे ‘जगण्यातला अनुभव’. वरकरणी, तांत्रिकदृष्टय़ा समान वाटणारी गोष्ट जेव्हा ‘जगण्याच्या अनुभवापर्यंत पोहोचते तेव्हा गोष्टी बदलतात. इथे मुद्दा चांगल्या-वाईटाचा नसतो. मुद्दा असतो तो परिपूर्णतेचा, अनुभव समृद्धतेचा आणि मग मला एकदम आठवली मी मागे कधीतरी ऐकलेली चर्चा. ‘नटसम्राट’ नाटकाविषयीची. कोणी तरी म्हणत होतं मी सतीश दुभाषींचं ‘नटसम्राट’ बघितलंय. कोणीतरी म्हणालं मी डॉ. लागूंचं आणि कोणी म्हणालं मी यशवंत दत्तांचं. त्यावरून चर्चा रंगली आणि प्रत्येक प्रयोग आपापल्या परीनं कसा उत्तम झाला, तरी कसा वेगळा झाला असं काहीतरी चर्चेचा शेवट झाला. प्रत्येक प्रयोग चांगला झाला इथपर्यंत मला कळलं, पण प्रत्येक वेगळा झाला हे कसं शक्य आहे? लेखकांनी लिहून ठेवलेले शब्द जर तेच आहेत तर प्रयोग वेगळा कसा होऊ शकतो? इथे मुद्दा येतो तो नटाच्या जडण-घडणीचा, नटाच्या अनुभव समृद्धतेचा. त्यामुळे लक्षात आलेली पुढची गोष्ट ही की, नट म्हणून स्वत:ला सतत विविध पद्धतीने अपडेटेड ठेवलं पाहिजे. नवनवीन अनुभवांना सामोरं जायला पाहिजे.
‘नट’ हा माध्यम असतो. लिखित कलाकृती मंचित करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेतला. लिहिलेली वाक्यं जिवंत करणं म्हणजेच मला वाटतं, दिग्दर्शकाच्या मदतीने, स्वत:च्या अनुभवांच्या आधारांनी काल्पनिक घटना सत्याच्या जवळ आणणं. काम करताना बरेचदा ‘इमोशनल मेमरी’चा वापर केला जातो. म्हणजे सोप्या भाषेत नटाच्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटना, भावभावना, परिस्थिती आठवून अभिनय करीत असताना या गोष्टींचा वापर करणे. खऱ्या आयुष्यात साधम्र्य असलेल्या सुख-दु:खं, आश्चर्य आणि इतरही अनेक हावभाव काल्पनिक गोष्टींमध्ये घालणे पण जितकी वेगळी-वेगळी पात्र आपण करतो तितके अनुभव एका आयुष्यात स्वत: घेणे अशक्यच असतं आणि प्रत्येक वेळी प्रत्यक्ष अनुभवाची गरजही नसते. मग अशा वेळी आम्ही नट मंडळी आमच्या जवळच्या आसपासच्या लोकांचं अनुभवविश्व आपलंसं करतो आणि वेळ पडताच तेच अनुभव आपले म्हणून वापरतो, पण कधी त्याही पलीकडचं काहीतरी करायला लागतं, तेव्हा मात्र कल्पनाशक्तीचा वापर करावा लागतो. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही म्हण खोटी ठरते ती अभिनय करताना. दारूडय़ाच्या भूमिकेसाठी खरंच दारू पिण्याची गरज नाही किंवा चोराचा रोल मिळाला म्हणून खरंच चोरी करण्याची गरज नाही. कारण शंभरातल्या ऐंशी वेळा स्वत:च्या आयुष्यापेक्षा वेगळंच काहीतरी समोर येतं आणि अंधुक रेषांतून स्पष्ट रंगीत चित्र काढण्याची जबाबदारी अंगावर येते, पण मला परवा नाशिकच्या कार्यक्रमात कळली ती गोष्ट याच्याही थोडी पुढची होती. स्वत: न अनुभवलेली गोष्ट खऱ्यासारखी साकारणे हे झालंच, पण मग त्यात ती भूमिका कोणता नट-नटी साकारीत आहेत त्यानं खूप फरक पडतो. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी मी मघाशीही लिहिली की, यात नटाच्या अभिनय कौशल्याविषयी मला म्हणायचं नाहीये. अभिनय कौशल्याची एक किमान पातळी गृहीत धरूनच आपण पुढे बघू, तर त्या प्रत्येक नटाचं माणूस म्हणून जगणं खूप महत्त्वाचं ठरतं. केवळ अभिनयातच नाही तर कोणत्याही सादरीकरणाच्या कलेत हेच घडतं असं मला वाटतं. कवी सुधीर मोघे यांनी लिहिलेलं ‘सखी मंद झाल्या तारका..’ हे गीत सुधीर फडके आणि पं. भीमसेन जोशी दोघांनी गायलंय. शब्द तेच, चाल तशीच पण त्याचा आविष्कार वेगळा. गाणं ऐकल्यावर मिळणारा आनंद समान पातळीचा पण गाणं पोहोचविण्याची पद्धत वेगळी. संगीत नाटकातलं ऐकलेलं उदाहरणही तसंच केशवराव भोसलेंनी केलेला धैर्यधर, छोटा गंधर्वानी साकारलेला धैर्यधर वेगळा हे कसं घडतं?
(नट जसा माणूस म्हणून घडलेला असतो तसा त्याचा आविष्कार बदलतो.) म्हणजे तशी त्याची पात्राला भिडण्याची पद्धत बदलते. पात्राची परिपक्वता, प्रतिष्ठा, हळवेपणा, उत्स्फूर्तपणा हा नटाच्या परिपक्वता, प्रतिष्ठा, हळवेपणा, उत्स्फूर्तपणावर अवलंबून असतो, जरी या दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरीही संजय मोनेनी मला एकदा फार गमतीशीर उदाहरण सांगितलं होतं, ज्योतिषाविषयी. आपण भविष्य विचारायला ज्योतिषाकडे जातो. पत्रिका, हात, हस्ताक्षर विविध पद्धतींनी आपलं भविष्य बघितलं जातं. मग ज्योतिषी आपल्याला सांगतात, आयुष्य, संतती, विवाहयोग, आर्थिक समृद्धी, प्रवास योग, वाहन योग आणखीही बरंच काही. हे सगळे अंदाज ज्योतिषशास्त्राच्या आधारानेच त्याचे ठोकताळे करूनच मांडलेले असतात. त्यामुळे सगळे तर्क बरोबर असले तरी भविष्य कोण सांगते हे महत्त्वाचं असतं. कारण आपल्या मानसिक, आर्थिक, वैवाहिक परिस्थितीचं विश्लेषण करणारा ज्योतिषी स्वत: कोणत्या परिस्थितीत आहे हे महत्त्वाचं. त्याच्या अनुभवविश्वाच्या आधाराने तो आपल्या भविष्याचे भाकीत करताना म्हणजे उभं आयुष्य एका छोटय़ाशा गावात घालवलेल्या ज्योतिषाने मुंबई-कोल्हापूर किंवा नाशिक-जळगाव या प्रवासांना ‘मोठे प्रवास घडतील’ असं म्हटलं तर ते चुकीचं म्हणता येणार नाही, पण थोडक्यात या गोष्टी सापेक्ष आहेत. ज्योतिषाच्या अनुभवविश्वावर आपलं भविष्य आपल्यापर्यंत कसं पोहोचणार हे अवलंबून असतं. तसंच आहे सादरीकरणाचं, म्हणून मग नट म्हणून माझी जबाबदारी वाढते- मला मुळातच स्वत:ला थोडं मोकळं सोडावं लागतं, नवनवीन अनुभवांना सामोरे जावं लागतं, संकोच बाजूला सारावा लागतो, नवेपणा मग तो दिसण्यातला असेल, विचारांमधला असेल. दर वेळी मला सर्व गोष्टी पटल्याच पाहिजेत ही गरज नाही, पण मला कळायला हवं. खेळ, राजकारण, समाजकारण, नवे कायदे, अर्थकारण, पेट्रोलचे भाव, रिक्षाचा संप,  अजिंठा-वेरूळची लेणी, लोणार, कळीचं फुलपाखरू कसं होतं, पंजाबात गहू पिकतो, बालाजीचं देवस्थान सगळ्यात श्रीमंत आहे, असं म्हणतात, कल्पना चावला, सायना नेहवाल, क्रिकेट, फेडरर, स्टीव्ह जॉब्स, अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र, दोस्तोवस्की, सात्र्, रवींद्रनाथ टागोर.. न संपणारी यादी आहे ही.  हे सगळं मला समजलेच असं नाही, पण हे किमान माझ्या नजरेखालून, कानावरून जायला हवं, हा माझा खुराक आहे. या सगळ्याचा मी करीत असलेल्या भूमिकांशी थेट संबंध नसतो, पण माणूस म्हणून माझा आवाका मी वाढवला तर माझा दृष्टिकोन बदलेल, नव्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक असेल. मोकळेपणाने, नव्या विषयांना बघताना लपलेल्या गोष्टी स्वत: होऊन बाहेर येतात. चित्र स्पष्ट होतं. भूमिकेच्या गरजेनुसार निवड करण्याची मुभा मला असतेच, पण काही गोष्टी मला माहीतच नाहीत, असं होऊ नये. मग ती माहिती असेल, भावभावना असतील, नाहीतर संकल्पना असतील. खुराक चांगला हवा.