मुक्तायन : लगीनघाई Print

altमुक्ता बर्वे, शनिवार, २४  मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रेक्षक म्हणून आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या साध्या-सोप्या-सरळ घटना टीव्ही मालिकेत शोधतो. खरं तर स्वत:लाच शोधतो. कला हे नेहमीच खऱ्या आयुष्याचं प्रतिबिंब असतं. दरवेळी भडक नाटय़मय प्रसंगांची गरज भासतेच असं नाही तर रोजच्या आयुष्यातले खरे प्रसंग महत्त्वाचे ठरतात.. चला चला चला, लग्नाला चला
सखूबाई, ठकूबाई, साळूबाई, काळूबाई
भीमाबाई, उमाबाई, ठमाबाई, रमाबाई
लग्नाला चला, लग्नाला चला
मागचा अख्खा आठवडा माझी नुसती लगीनघाई चालली होती. लगीनघाई म्हणजे शब्दश: लगीनघाईच. घरात लग्नकार्य असलं की सगळंच रुटीन बदलून जातं. एक काम का असतं? मुला-मुलीचा होकार आणि घरच्यांची पसंती आली की सुरूच होते धांदल. कितीही साधेपणाने करायचं ठरविलं तरी लग्नच ते. मुहूर्त, कार्यालय, पत्रिका, वाजंत्री, खरेद्या, जेवणाचे कॉन्ट्रॅक्टर, मेंदी, संगीत, वरात, गुरुजी, पूजा, वैदिक पद्धत की धार्मिक, दागदागिने. हजार गोष्टी. त्याहीपेक्षा महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे बजेट. नटांची अ‍ॅव्हेलेबिलिटी. त्यांच्या तारखा, सगळ्यांच्या कॉमन डेट्स. कार्यालयात मेकअप रूम तयार करणे, टेक्निकल टीमसाठी खाली जनरेटर व्हॅन, कपडे-व्हॅनिटी व्हॅन्स, सगळे सीन डिरेक्टरकडे लवकर पोहोचविण्याची जबाबदारी, कोणत्या नटाला लवकर सोडायचंय, नवऱ्या मुलाचं शूटिंग आहे, नवऱ्या मुलीचा ४ वाजता ठाण्याला प्रयोग आहे, नवऱ्या मुलाचे बाबा दुसऱ्या शूटिंगमध्ये अडकलेत, नवरीचे ऑफिसमधले बॉस भलत्याच फिल्म डबिंग करीत आहेत, नवऱ्याच्या काकूची तारीख घ्यायला प्रॉडक्शनवाला विसरला, वरमायची साडी आणि वधूपित्याचा झब्बा यांचा रंग क्लॅश होतोय. एका फ्रेममध्ये ते दिसले तर वाईट दिसेल, वधूच्या आत्यासाठी आणलेला दागिन्यांचा डबा कन्टीन्यूटीचा असून दुसऱ्या लोकेशनवर राहिलाय.. एक मिनिट एक मिनिट तुमचा गोंधळ होतोय का? का मी चुकीचं काहीतरी लिहिलंय असं वाटतंय तुम्हाला? लग्नाच्या गडबडीत खूप दमछाक होऊन मी भलतंच काहीतरी लिहिलंय असं वाटतंय ना तुम्हाला? नाही हो, निदान माझ्या लग्नाच्या बाबतीत तरी मी चुकणार नाही. अहो मागच्या आठवडय़ात ‘झी मराठी’वर चालू असलेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या माझ्या मालिकेमध्ये माझं म्हणजे मी साकारीत असलेलं पात्र चि. सौ. कां. राधा महेश देसाई हिचा विवाह चि. घनश्याम काळे याच्याशी पार पडला. काही विचारू नका. या सीरियलमधल्या एका लग्नाच्या तयारीत खऱ्या आयुष्यातल्या पाच वेगवेगळ्या जोडप्यांची लग्नं लागून बारशाचं आमंत्रण पोहोचलं असतं घरी एव्हाना!
सीरियलमधल्या लग्नात सगळ्यात धावपळ करणारी टीम म्हणजे पडद्यामागची मंडळी. या लग्नाची पत्रिका लिहिली तर ती साधारण अशी असेल -
आमचे येथे ‘झी’ कृपेकरून
इंडियन मॅजिक आय (आयएमई)ची हिट्ट मालिका ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ यामध्ये राधा आणि घनश्यामचा विवाह योजिला आहे. तरीही सर्व नटमंडळींच्या तारखा दोन महिने आधीच बुक केल्या आहेत.
कला दिग्दर्शक, ज्युनिअर आर्टिस्ट, को-ऑíडनेटर, तीन कॅमेरा सेटअप, साऊंड डिपार्टमेन्ट, कपडेपट, रंगभूषापट या सर्वानी ठरविलेल्या दिवसात, ठरविलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सतर्क राहावे, ही आग्रहाची विनंती.
आमंत्रक : निर्माते - श्रीरंग गोडबोले, दिग्दर्शक - सतीश राजवाडे, विनोद लव्हेकर
आमच्या राधा-घनाच्या लग्नाला नक्की यायचं हं! कार्यकारी निर्माते - निखिल, नितीन, कल्याणी
एका खऱ्याखुऱ्या कार्यालयात भरपूर लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा दोन दिवस पार पडत होता. खऱ्या लग्नातले मानपान आणि रुगव्या-फुसव्याची जागा इकडे तांत्रिक गडबडी आणि कन्टिन्यूटी मेन्टेन करण्याने घेतली होती. विधींसाठी होमकुंडात अग्नी पेटला आणि हॉलभर धूर पसरल्याने थोडा वेळ शूटिंग खोळंबलं. अंगावर घातलेल्या दागिन्यांच्या आवाजाने बोललेल्या संवादात अडचणी येऊ लागल्याने अंगावरचे सगळे दागिने, बांगडय़ा पारदर्शक चिकटपट्टीने चिकटविण्यात आल्या. लग्नात आमची वेशभूषाकार गीता गोडबोलेने मोठय़ा हौसेनं आम्हा सर्वजणींना नऊ वारी साडय़ा नेसवल्या. पण नंतर नंतर साधारण दर अर्धा तासाने कोणाची न् कोणाची सुटलेली नव्वारी परत नेसवण्यानं गीता आणि तिच्या दोघी असिस्टंट मेटाकुटीला आल्या होत्या. काही शॉट्समध्ये मंगळसूत्र घालायचं राहिलं म्हणून पुन्हा नव्यानं शूट करायला लागले. लग्न लागताना डोक्यावर टाकलेल्या अक्षता डोळ्यांत गेल्यामुळे डोळे लाल झाले. त्याच कार्यालयातल्या खालच्या मजल्यावर चाललेल्या एका खऱ्या लग्नाचे आवाज खूप वाढल्याने थोडा वेळ शूटिंग थांबवावे लागले. हे सगळं चालू असताना आम्हा नटमंडळींमध्ये एक उत्सवी वातावरण पसरलेलंच होतं. काहींची मंगलाष्टक म्हणण्यासाठी धावपळ चालली होती, मुलींमध्ये एकमेकींना नटविण्याची घाई चालली होती, कोणी कोणाला दागिने घालून देतंय तर कोणी नाकात नथ असताना चहा कसा प्यायचा, याचे धडे देतंय. एकीकडे मंडळी गप्पांचा कट्टा- चहाचे आग्रह, जेवणाचे ब्रेक, गजरे, फुलं, अत्तर, लांबून पाहिलं तर खरं लग्न. या सगळ्यांना कन्ट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करीत आमची दिग्दर्शकांची फौज शूटिंग करण्याचाही प्रयत्न करीत होती, आणि अखेर बघता बघता दोन दिवसांत सगळा डोलारा सांभाळीत लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. खऱ्याखोटय़ाचं हे गमतीशीर मिश्रण आम्ही सर्व मंडळी तटस्थपणे बघत होतो. त्याचा आनंद लुटत होतो. पण याची खरी गंमत मला वाटली ती शूटिंगसाठी आलेल्या खऱ्या गुरुजींनी जेव्हा मला आणि स्वप्नीलला बोलावून ‘राधा आणि घनश्याम यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा’ असं लिहिलेलं एक पुस्तक भेट दिलं तेव्हा. दोन दिवस ते आमच्याबरोबर होते. त्यांना माहीत होतं हे सगळं खोटं आहे; तरीही एक प्रेक्षक म्हणून उत्स्फूर्तपणे त्यांनी आम्हाला नाही तर त्यांच्या लाडक्या राधा-घनाला ही भेट दिली होती. ही मालिकेला त्यांनी दिलेली दाद होती.
लग्नाचा एपिसोड टेलिकास्ट (प्रदर्शित) झाला आणि आमच्या वैयक्तिक फोनवर, ई-मेलमधून, फेसबुकवरून खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचले. मालिकेचं खऱ्या-खोटय़ाचं भान विसरून प्रेक्षक मुक्तकंठानं जेव्हा कौतुक करतात, तेव्हा एक वेगळा आत्मविश्वास मिळतो. काम करताना टेलिव्हिजन बदलतंय, त्याचा दर्जा खालावतोय अशी सर्वसाधारण चर्चा सगळीकडे चालू असताना काहीतरी खरं-चांगलं-साधं करण्याचा प्रयत्न जेव्हा प्रेक्षक एवढा उचलून धरतात. तेव्हा आशेचा किरण दिसतो. तुम्हाला चांगलं बघायचंय हे लक्षात येतं. तेव्हा आम्हाला चांगलं करण्यासाठी हुरूप मिळतो, प्रेरणा (मोटिव्हेशन) मिळते. प्रेक्षक म्हणून बघताना आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या साध्या-सोप्या-सरळ घटना मालिकेत शोधतो. खरं तर स्वत:लाच शोधतो. कला हे नेहमीच खऱ्या आयुष्याचं प्रतिबिंब असतं. दरवेळी भडक नाटय़मय प्रसंगांची गरज भासत नाही तर रोजच्या आयुष्यातले खरे प्रसंग.. क्षण महत्त्वाचे ठरतात. अशा मालिकांच्या निमित्ताने तेच क्षण तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत राहू. या पुढेही तुमच्या  पाठिंब्याने व मदतीने चांगलं चालू असलेलं जपण्याचा आणि याहून चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. धन्यवाद!