मुक्तायन : सुट्टीतील सायकल गँग Print

मुक्ता बर्वे - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआजची लहान मुलांची पिढी हुशार आहे, शार्प आहे, फास्ट आहे, आणि यापुढे आणखीन फास्ट होणार, त्याहून फास्ट होणार, त्याहूनही फास्ट होणार.. पुढे? असलेल्या वेगापेक्षा अधिक वेगवान, एवढाच असेल का तो बदल? कारण आताच्या पिढीनं नवं, बदलणारं, सुधारत जाणारं असं काय पाहिलंय? या मुलांच्या जन्मापासूनच त्यांना सगळंच माहितीये, सगळंच येतंय. यांच्या तुलनेत मला माझी पिढी जास्त नशीबवान वाटते.   एखाद दिवस सुट्टी मिळाली किंवा जरा निवांतपणा मिळाला की मी शांतपणे बसून मला आलेल्या ई-मेल्स चेक करते. शक्य तेवढय़ा लोकांना उत्तर पाठवते, फेसबुकवर जाते, शक्य तेवढय़ा फॅन मेसेजेसना उत्तरं पाठवते. नव्या फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करते. तर परवा अचानक मला माझ्या सातवीत शिकणाऱ्या भाचीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट येऊन पडते ना पडते तोच पाठोपाठ तिचा मेसेज आला माझ्या फोनवर. ‘हाय मावशी! मी तुला ईमेलवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे. प्लीज अ‍ॅक्सेप्ट कर. तू BBM वर असशील तर प्लीज पिन कळव आणि मी ‘हॉटसॅप’वर पण असते. मला अ‍ॅड कर, तूही ये तिकडे. Chating  करू.’ मला फारच गंमत वाटली. माझ्या सगळ्या व्हच्र्युअल (आभासी प्रतिमा) ID`S, अकाऊंट्स यावर तिला माझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. खरंतर अध्र्या तासावर राहणारी माझी भाची मला म्हणाली असती तर मी तिला घ्यायला गेले असते. आम्ही भेटलो असतो, गप्पा-दंगा-खाऊ.. पण तिला हे सगळं बालिश वाटतं. ‘ऑन लाइन चॅटिग इज अ इन थिंग.’ असं फक्त तिचंच नाही तर तिच्या आख्ख्या पिढीचं म्हणणं आहे. या लहान-लहान मुलांना कॉम्प्युटर्स, फोन्स, टॅब्स हाताळताना, त्याबद्दल बोलताना पाहिलं की कॉम्लेक्स येतो. शप्पथ!
ही पिढी हुशार आहे, शार्प आहे, फास्ट आहे, आणि यापुढे आणखीन फास्ट होणार, त्याहून फास्ट होणार, त्याहूनही फास्ट होणार.. पुढे? असलेल्या वेगापेक्षा अधिक वेगवान, एवढाच असेल का तो बदल? कारण आताच्या पिढीनं नवं, बदलणारं, सुधारत जाणारं असं काय पाहिलंय? या मुलांच्या जन्मापासूनच त्यांना सगळंच माहितीये, सगळंच येतंय. यांच्या तुलनेत मला माझी पिढी जास्त नशीबवान वाटते.
माझ्या लहानपणी, मी चिंचवडला म्हणजे पुण्यापासून अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर राहायचे. आमच्या सोसायटीत वरच्या मजल्यावर पहिला ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट टीव्ही आल्याचं मला लख्ख आठवतंय. बापरे बाप! केवढा तो मोठा सोहळा झाला होता. त्या टीव्हीची जवळपास प्रतिष्ठापनाच केली गेली. मग सोसायटीतली सर्व मंडळी जेवण आटोपून रोज संध्याकाळी नेमाने त्या टीव्हीसमोर हजेरी लावायची. बातम्या, गजरा, साप्ताहिकी, कंट्रीवाइड क्लासरूम, दुपारचे प्रादेशिक चित्रपट, हमलोग, बुनियाद.. काहीच दिवसांत आमच्या घरीसुद्धा टीव्ही आला. मे महिन्याच्या सुट्टीत सकाळच्या पहिल्या दूरदर्शनच्या चिन्हापासून रात्री बारा वाजता मुंग्या-मुंग्या दिसेपर्यंत सलग टीव्ही पाहिल्याचं आठवतंय मला! किती ते अप्रूप!
सुट्टीतला आणखीन एक आवडता कार्यक्रम म्हणजे ‘हनुमान सायकल मार्ट’मधून पन्नास पैसे तास या भावाने छोटी सायकल भाडय़ाने आणणे आणि गावभर फिरणे. एक रुपया तासवाल्या मोठय़ा सायकलवर माझा दादा, छोटय़ा सायकलवर मी आणि  आमचे मित्र-मैत्रिणी. आमची एक ‘सुट्टीतली सायकल गँग’ होती. कधीतरी सकाळीच डबे घेऊन आमची गँग निघायची. जवळच्या श्रीधरनगरच्या बागेशी सायकली लावायच्या. डबा संपवून झाला की धुवाधार खेळायचं, मातीत लोळायचं, गुडघे फुटायचे, कोपरं खरचटायची, मग तिथेच नळावर हातपाय धुऊन चिखलातही खेळून दमायला झालं की आईने दिलेल्या रुपयात एक भेळ, एक मेवाडफे म आइस्क्रीम कोन आणि वीस पैशांना तीन मिळणाऱ्या ‘चेतक गोळ्या’ घ्यायच्या आणि मौज करीत संध्याकाळच्या आत घरी परत यायचं.
पुढे पुढे टीव्हीबरोबर व्हीसीपी, व्हीसीआर आले. ते बाजारपेठेतल्या दोनच दुकानात भाडय़ाने मिळायचे. सुट्टय़ांच्या दिवसांत राजू गोलांडेच्या व्हिडीओ पार्लरमधून एकाच दिवशी तीन व्हिडीओ कॅसेट्स आणून एकापाठोपाठ एक असे तीन सिनेमे बघायचीही एक परंपरा होती आमची. एक मराठी- अशोक सराफ किंवा लक्ष्मीकांत बेर्डेचा, एक हिंदी- ऋषी कपूर, जितेंद्र किंवा अमिताभचा आणि एक इंग्लिश- ब्रूस ली किंवा जॅकी चॅनचा. एकाच दिवशी, एकाच व्हीसीआरमधून, एकाच टीव्हीमधून ही सर्व मंडळी आमच्या घरी यायची त्यामुळे हे सगळे एकमेकांच्या ओळखीचेच आहेत असे कैक दिवस मला वाटत होतं.
काडेपेटय़ा जमा करणे, वेगवेगळ्या देशांतले स्टॅम्प्स गोळा करणे, बेकमन्स ब्रेडमधून येणारे स्टिकर्स, क्रिकेट फ्लिकर्स साठवणे असे त्या काळातले आमचे छंद. काडेपेटय़ाचं वेड कमी झालं आणि पोस्टाच्या तिकिटाचं वेड लागलं. ते आणायचे कुठून? मग त्यासाठी खास पोस्टमनकाकांशी दोस्ती वाढवून, त्यांना पटवून कधी-कधी त्यांच्याकडच्या टपालातली तिकिटं आम्ही उडवायचो. काय काय धडपड त्या तिकिटांसाठी!! आमच्या घराजवळच्या एका बिल्डिंगमध्ये काही केनियाचे विद्यार्थी राहायचे. मग आमच्यातली काही माझ्यासारखी आगाऊ कार्टी त्या परदेशी मुलांना गाठून आमच्या तोडक्यामोडक्या इंग्रजीत त्यांना येणाऱ्या पत्रावरची तिकिटं मागायचो. मग आपल्याकडे असलेल्या डबल तिकिटाच्या बदल्यात दुसऱ्याकडून नवीन तिकीट घेण्याच्या वाटाघाटी चालायच्या. धमाल सगळी!
त्या काळातला आणखीन एक आवडता उद्योग म्हणजे, सुचणाऱ्या नवनवीन बिझनेस आयडियाज. आपण काहीतरी व्यवसाय करावा आणि कष्ट करणाऱ्या आपल्या आई-वडिलांना आर्थिक हातभार लावावा असं त्या वयात मला फार वाटायचं. घरातल्या उदबत्त्या पाण्यात भिजवून त्याचं अत्तर करून ते छोटय़ा छोटय़ा बाटल्यांत भरून विकायचं अशी कल्पना सुचली होती तेव्हा मला. त्यासाठी दोन अख्खे उदबत्त्यांचे पुडे तीन दिवस पाण्यात बुडवूनही ठेवले होते.. पण काय चुकलं कोणास ठाऊक? अत्तर काही झालं नाही. मग ती कल्पना मागे पडली. मग त्यानंतर सुचलेला व्यवसाय म्हणजे कचऱ्यात टाकलेल्या टय़ूबलाईट्स फोडून त्यांचा चुरा करून तो चुरा वापरून त्यापासून पतंगाचा मांजा तयार करून तो विकणे. एक मांजा फॅक्टरी सुरू करणे, अर्थातच कचऱ्यातून गोळा केलेल्या टय़ूबलाईट्स फोडण्याआधी आमच्या एका मित्राच्या वडिलांना आमची ही मांजा तयार करायची ‘नावीन्यपूर्ण’ कल्पना समजल्यामुळे त्यांनी त्या मित्राचेच थोबाड ‘फोडले’. यामुळे दुर्दैवाने ही कल्पनाही मोडीत निघाली. पण मी प्रयत्न थांबवले नाहीत.
लहानपणाचे खूप आवडणारे खेळ म्हणजे लोखंडी सळया घेऊन त्या पावसाळ्यात झालेल्या चिखलामध्ये रूतवत-रूतवत लांबच लांब जाणे. त्या खेळाला ‘रूत्ता-रूत्ती’ असं नाव होतं. त्याच काळात रामायण-महाभारत मालिका खूप लोकप्रिय झाल्या होत्या. मग रबरबँडच्या साहाय्याने खराटय़ाच्या काडय़ा पपईच्या झाडावर मारून त्यातून पांढरा चीक गळायला लागला की पपईरूपी राक्षसाचा ‘वध’ झाल्याचा आनंद साजरा करणे. दिवाळीत बिल्डिंगच्या अंगणात उभे केलेले मोठेच्या मोठे किल्ले, मोरया गोसावी गणपती मंदिराच्या जत्रेमध्ये विकत घेतलेल्या मातीच्या गल्ल्यात (बँक) पैसे साठवून, दिवाळीत ते फोडून कुंभारवाडय़ातून किल्ल्यावर ठेवायला मातीचे मावळे, गाई-म्हशी, गौळणी विकत घेणे, सुट्टीत गल्लीतल्या सर्व लहान मुलांनी मिळून नाटक बसवणे, आसपास चाललेल्या नव्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन गवंडीकाकांशी ओळख काढून, त्यांच्याकडून बांधकामात वापरली जाणारी लांबी मिळवणे (हल्ली कलर क्ले मिळतात हे या लांबीचच सॉफेस्टिकेटेड व्हर्जन) आणि त्यापासून वस्तू तयार करणे. गल्लीतल्या कुत्रीला पिल्लं झाली की बिल्डिंगमधल्या सगळ्या मुलांनी एकत्र येऊन त्यातलं पिल्लू पाळायचं, आपापल्या घरच्यांचा डोळा चुकवून आळीपाळीनं त्या पिल्लाची काळजी घ्यायची, त्याला खायला घालायचं, त्याचं टॉमी किंवा रॉकी असं नामकरण करायचं ही गोष्टही फार कॉमनली घडायची.
तेव्हा घराजवळ ‘शिवाजी उदय मंडळ’ नावाचं एक मैदान होतं, त्याला चहूबाजूंनी भिंत बांधली होती. मला नेहमी प्रश्न पडायचा, खरंतर आसपास एवढी मैदानं, मोकळ्या जागा आहेत, मग याच्याभोवती भिंत का बरं बांधली असेल? कालौघात बाकीच्या मोकळ्या जागांवर मोठय़ा-मोठय़ा इमारती उभ्या ठाकल्या आणि आता फक्त शिवाजी उदय मंडळाची जी काही जागा आहे तेवढीच काय ती रिकामी उरली आणि माझं उत्तर मला आपोआप मिळालं.
हळूहळू माझंही बालपण संपलं. शिक्षण-काम यानिमित्तानं चिंचवड सुटलं, पुणं सुटलं, मी मुंबईत पोहोचले. मुंबईची झाले. लहानपणीचं मोकळंढाकळं पण नि:संकोचपणे कोणत्याही ताई-दादा, काका-काकू, अनोळखी माणसांशी मारलेल्या गप्पाही संपल्या. रेडिओ, टेपरेकॉर्डरचं अप्रूप संपून सीडीजसुद्धा जुन्या झाल्या. पहिला लॅन्डलाइन फोन, कॉइन टाकून लावावा लागणारा पीसीओ, पेजर जाऊन मोबाइल फोन हातात आले. भाडय़ानं सायकली मिळणारी सायकल मार्ट्स गायब झाली. त्या जागी एसी गाडय़ा आल्या, हे आणि असे खूप बदल झाले, पण त्या बदलांच्या खुणा, ती प्रोसेस मात्र आमच्या पिढीनं अनुभवली आणि त्याबरोबर आम्ही मोठे होत गेलो.
शांत आणि मस्त आयुष्य बघता बघता गतिमान झालं. नव्या काळाचा वेग आणि लहानपणीचे हे अनुभव, मोकळेपण यांची सांगड आम्हाला घालता आली. जुन्या-नव्याचा मेळ घालता आला, त्याची मजा लुटता आली. पण हे सगळं मी माझ्या आत्ता सातवीत शिकणाऱ्या भाचीला कसं सांगू? हे अनुभव प्रत्येकानं आपले आपणच घ्यायचे असतात ना! आहे त्या वेगापेक्षा अधिक वेगवान, मग त्याहून जास्त वेगवान यापेक्षा नक्की काहीतरी जास्त या पिढीला मिळावं अशा शुभेच्छा मनोमन देऊन मी तिची FB वरची फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली.