मुक्तायन : चुकलेलं गणित Print

altमुक्ता बर्वे , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सर्व साचेबद्ध, सुसूत्र आणि बरोबरच यायला हवं अशी अनिवार्यता असलेल्या या आयुष्याच्या गणितात आनंदाने चुकावं असं एवढं एकच तर गणित शिल्लक राहिलंय, ते असं घाईघाईत सोडवून टाकण्याची माझी इच्छा नाही आणि काही गणितं चुकण्यातच आनंद असतो.
रा त्रीचे पावणेबारा वाजले आहेत. रोज साधारण शूटिंग संपवून, घरी येऊन, दिवस संपवून, झोपायला एवढेच वाजतात, पण आज मला झोपता येणार नाही. ‘चतुरंग’साठीचा लेख लिहायचाय. लेखाची डेटलाइन उद्याची आहे. त्यामुळे लेख लिहिल्याशिवाय काही झोपता येणार नाही.. मी माझ्या खिडकीत बसलेय. लिहायला- वाचायला किंवा कधी-कधी घरी असेन तर जेवायलाही मी याच खिडकीत बसते. पाचव्या मजल्यावरून रस्ता, त्यावरची चालणारी माणसं, धावणाऱ्या गाडय़ा, काही घरं छोटी छोटी दिसताहेत. गंमत वाटते. खिडकीतच रेलिंगमध्ये एक मनीप्लॅंट आणि मोगरा आहे. उन्हाळ्यात मोगरा एवढा मस्त डवरलाय ना! रात्री हळूच वाहणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळकेबरोबर मोगरा हळूचकन घरभर शिरतो आणि बराच काळ दरवळत राहतो.
खिडकीच्या अगदी समोर लांब अंतरावर एका सॉफ्टवेअर कंपनीचं ऑफिस आहे. तिथली मंडळी रात्री राबत असतात. बहुतेक त्यांच्या अमेरिकी बॉसेसशी टायमिंग मॅच करत असावेत.  आसपास निजानीज झाली तरी त्या कंपनीतली मंडळी मात्र कामात असतात. एवढय़ा लांबून त्या बिल्डिंगमधली माणसं दिसणं अशक्यच, पण त्या बिल्डिंगचे दिवे मात्र लखलखत असतात. माझ्या या खिडकीत बसून लांब दिसणाऱ्या या बिल्डिंगचे ते लखलखणारे दिवे बघणं आणि मोजणं हा माझा आवडता छंद.
तर खरी गंमत अशी की, तीच बिल्डिंग, तेच दिवे, तीच मी, पण रोज दिव्यांची संख्या बदलते. आज मोजते तेवढे  उद्या ते दिवे कधीच तितके भरत नाहीत. काय होतं कोण जाणे, पण रोज एवढा वेळच नसतो की दिवे परत मोजून बघावे किंवा ते गणित चुकण्याचं कारण शोधावं, कारण सकाळी साडेसहाला सुरू केलेला दिवस साधारण रात्री साडेअकरा, पावणेबाराला संपत असतो. डोक्यात काहीच विचार, विषय डोकावत नसतात. पटकन दिवस थांबवावा आणि डोळे मिटून झोपून जावं असं वाटत असतं. घालवलेल्या दिवसाची आणि मोजायला चुकलेल्या दिव्यांची बेरीज-वजाबाकी करायला एवढा वेळच उरत नाही.
असो. आज काहीही झालं तरी लेख लिहिल्याशिवाय झोपायचं नाही पक्कं  ठरवलं. ताजंतवानं फ्रेश वाटावं म्हणून एक-दोन मिनिटांचा ब्रेक घेऊन एक मस्त कडक कॉफी तयार केली फेटून-फेटून आणि पुन्हा जागेवर येऊन बसलेय. लेख-लेख-लेख. या वेळेस विषयच सुचला नाही अजून लेखाला. मगाशी म्हटलं तसं ही वेळ अशी आहे ना की नवे काही विचार, विषय डोक्यातच नसतात. विचार शून्य! कॉफी पिता पिता परत एकदा चमकणारे दिवे मोजून बघावं म्हटलं.. पुन्हा तेच. आत्ताही वेगळीच भरली संख्या. मला वाटतं, डोक्यात विचार नसताना संख्या चुकण्याचा प्रश्नच येऊ नये..! आज सकाळी साडेआठला लोकेशनवर पोहोचले. माझाच सीन पहिला होता. मेकअप करून तयार झाले. लागोपाठ तीन सीन माझेच लागले असं कळलं. सगळ्या भानगडीत आमच्या नाटकाच्या निर्मात्यांनी प्रयोगासाठी विचारलेल्या तारखा नक्की करायच्या विसरलेच. त्यांचे फोन येत होते. सतत मी सीनच्या मध्ये असताना. सीनमागून सीन. लंच ब्रेकमध्ये एका सिनेमाच्या लेखक-दिग्दर्शकाला अपॉइंटमेंट दिली होती. त्यांना त्यांची फिल्म मला ऐकवायची होती. हक्काचा असा काय तो रिकामा वेळ तेवढाच- जेवणाच्या वेळेस मिळतो तो. ब्रेक झाला. मेकअप रूममध्ये पोचले तर ती मीटिंगवाली मंडळी आधीच हजर होती. त्यांना म्हटलं, जेवणार का? तर नाही म्हणाले, ‘आम्ही जेवून आलोय.’ मग काय बसलो लगेच स्क्रिप्ट ऐकायला. वाचन संपलं- थोडक्यात गोष्ट कळली, त्यांना चहा-कॉफी विचारलं. थोडक्यातच चर्चा झाली आणि दोन दिवसांनी बोलू, असं ठरवून मंडळी निघून गेली. जेवण राहिलं आज, कारण ब्रेक संपला आणि मी पुढच्या सीनसाठी तयार झाले. आज सगळ्याच सीनमध्ये मी होते. धावपळ नुसती.
‘बाप रे केवढे मिस्ड कॉल्स आहेत?’ दुबईच्या ‘ग्लोबल’ मराठी टेलीव्हिजन अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालंय, त्यांना पासपोर्ट कॉपी आणि फोटो मेल करायचेत, ते राहून जाईल या भानगडीत. तेवढय़ात माझ्याकडे काम करणाऱ्या शांता मावशींचा फोन ‘ताई, आज कणीक, भाजी, कपडय़ाची पावडर आणायला लागेल.’ सगळं कसं एकाच दिवशी घडतं? आणि प्रत्येक दिवस असाच कसा जातो?..
अरे, कुठे भरकटतेय मी? रात्रीचे बारा-वीस झालेत आणि अजूनही उद्या पाठवायच्या लेखाचा विषयसुद्धा सुचला नाहीये. आता बारा वाजून गेले म्हणजे.. खरं तर उद्या नाही- आजच द्यायचाय लेख. वाऱ्याच्या झुळकेबरोबर पुन्हा मंोगरा दरवळून गेला. मस्त तोंडावर पाणी मारावं आणि मगच बसावं लिहायला!
वा! थंड पाण्याचा शिडकावा फ्रेश करून टाकतो. एकदम लक्ष समोरच्या चमचमणाऱ्या दिव्यांकडे गेलं. म्हटलं आता लिहायला सुरुवात करण्याआधी एकदाच दिवे मोजून बघू,  मोजता-मोजताच लक्षात आलं, अरे! उद्या लाइट बिल भरण्याचा शेवटचा दिवस. उद्या सकाळीच किशनला (माझ्यासाठी काम करतो तो) पैसे देऊन ठेवते आणि लाइट आणि मोबाइल दोन्हीची बिलं भरून टाकायला सांगते. भाजी, कणीक आणि कपडय़ाची पावडर आणायची राहिली. फ्रिजवरची स्वत:च स्वत:साठीच्या निरोपांची लिहिलेली चिठ्ठी आणि त्यावरची कामाची यादी वाढतच जातेय, ही फ्रिजवरची यादी पूर्ण करते आणि मगच लेख लिहायला सुरुवात करावी म्हणते. हल्ली पाण्याचं एक काय झालंय कळत नाही. माझ्या जाण्याच्या आणि पाणी येण्याच्या वेळा अशा काही जुळल्यात म्हणता की, कैक दिवस साठवलेल्या पाण्यावरच समाधान मानावं लागतंय. लिहायला बसायचं म्हणून मी केलेली माझी आवडती प्रकाशयोजना आणि मंद आवाजात लावलेलं संगीत आता बाहेरच्या वाढत्या शांततेमुळे तीव्र आणि प्रखर वाटायला लागलंय. थोडं बारीक करावं नाही?  बंदच करावं संगीत. मला संगीत प्रचंड आवडतं. कळतं असं नाही, पण आवडतं, सकाळी उठल्यापासून घरातून बाहेर पडेपर्यंत, मग गाडीत बसल्यावर गाडीतल्या सिस्टीमवर, मग मधल्या वेळेत फोन किंवा लॅपटॉपवर आणि रात्री झोपताना आयपॉड असतोच. त्या व्यतिरिक्तच्या वेळेत माझा किंवा समोरच्या व्यक्तीचा आवाज पडतोच कानावर. गाडी एसी असल्याने काचा बंद. बाहेरचा आवाज ऐकण्याची शक्यता कमीच..
तीव्र वाटायला लागलं म्हणून म्युझिक बंद केलं आणि एकदम शांतता ऐकू आली. एकदम शांत.. मधूनच कुठून तरी किर्र किर्र असा आवाज, लांब कुठे तरी गाडी गेल्याचा आवाज, चक्क वाऱ्याची झुळूक आल्याचा आवाज आणि परत एकदा मोगरा दरवळला.. शांत-शांत. इतकं शांत की मोगऱ्याच्या दरवळण्याचासुद्धा आवाज आला मला. दरवळण्याचा आवाज? माझ्या आतला आवाजही ऐकू येऊ लागलाय आता तर! ..
पुन्हा एकदा समोरचे दिवे मोजून बघू का- आता तरी जमतंय का मला ते. असं का व्हावं? खरं तर एवढं सगळं मॅनेज करते मी माझ्या रोजच्या आयुष्यात! महिन्याचे खर्च, एफडी, रिकरिंग, शूटिंगच्या तारखा, माणसांचे पगार, गाडीचा हप्ता, ही सगळी गणितं करते की न चुकता. करते म्हणजे कौतुक नाही, सगळेच करतात. कराव्याच लागतात. आता आता तर या सगळ्या गोष्टी यंत्रवत होतात आपल्याकडून चुकायची मुभा आणि संधी दोन्हीही नसते. इथे चुकून चालणार नसतं. जबाबदाऱ्या, कमिटमेंटस् अ‍ॅम्बिशन्स, अचिव्हमेंटस् या सगळ्याच्या गदारोळात भिंगरी लागल्यासारखे धावत राहतो आपण..
एकदा वाटलं, एवढं सगळं आहे तर मग हे साधे समोरचे दिवे मोजता येऊ नयेत आपल्याला? दुसऱ्या कोणाला बोलावून मोजून घ्यावेत का हे दिवे म्हणजे नक्की मोजता येतील किंवा चक्क फोटो काढावा दिव्यांचा आणि आकडे टाकून मोजावेत फोटोवर म्हणजे नक्की कळेल दिव्यांची अचूक संख्या!
पण हे मला करायचं नाहीये. हे मला नक्की माहितीये, कारण एकदा का हा आकडा कळला की मग उद्यापासून मी इथे बसून काय करू? हेसुद्धा गणित इतक्या रूक्षपणे सोडवलं तर त्यानिमित्ताने दिवस संपतानाची शेवटची माझी हक्काची दहा मिनिटं का होईना माझ्यापासून हिरावून घेतली जातील.. सर्व साचेबद्ध, सुसूत्र आणि बरोबरच यायला हवं अशी अनिवार्यता असलेल्या या आयुष्याच्या गणितात आनंदाने चुकावं असं एवढं एकच तर गणित शिल्लक राहिलंय, ते असं घाईघाईत सोडवून टाकण्याची माझी इच्छा नाही आणि काही गणितं चुकण्यातच आनंद असतो. प्रत्येकानं हा आनंद मिळवण्यासाठी, आपापल्या खिडकीतून दिसणारे आणि मोजता न येणारे आपापले लुकलुकते दिवे शोधायचे असतात..