मुक्तायन : माणसं जोडणारे सर Print

मुक्ता बर्वे ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘‘सतीश आळेकर सरांविषयी किती लिहू? हा हिमनगाच्या दर्शनी भागाचा एकअष्टमांश भाग असेल. सर आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. ललित कला केंद्र सोडून इतकी र्वष लोटली, पण आळेकर सरांशी असलेलं नातं- मग गुरू-शिष्याचं असेल, मित्राचं असेल किंवा ‘जवळचेवाले’ वाटणारं असेल, ते दृढ होत चाललंय. त्यांच्या मायेचा ओलावा वाढतच चाललाय.'' गुरूपौर्णिमेनिमित्त गुरू सतीश आळेकरांविषयी..
पावसाळा सुरू झाला की खूप वेगवेगळ्या गोष्टी आठवतात, पण प्रामुख्यानं आठवतं ते ‘पुणे विद्यापीठ’. हिरव्याकंच झाडांवर पाऊस पडला की झाडं ओलीचिंब होऊन जायची. झाडावरून गळणाऱ्या पाण्याच्या एकेक थेंबाचा टप्-टप् आवाज आणि पूर्ण विद्यापीठभर हिरवागार वास. इतक्या रम्य ठिकाणी शिकले याचं आता मला फार अप्रूप वाटतं.
खूप कमी भाग्यवान लोकांना आपला छंद शिकता येतो आणि पुढे जाऊन त्यात करिअर करता येतं. त्या काही भाग्यवान लोकांपैकी मी एक. ललित कला केंद्रातली ती देखणी, मंतरलेली तीन र्वष नट म्हणून आणि माणूस म्हणूनही माझा पाया भक्कम करून गेली. या तीन वर्षांतली माझी खरी कमाई म्हणजे नाटय़ जाणिवांबरोबरच मला मिळालेली माणसं.
त्या तीन वर्षांत मी ‘नाटक-जगले’ आणि खऱ्या जगण्यातल्या या माझ्या क्षेत्राविषयीच्या नाटकी-भ्रामक-स्वप्नाळू संकल्पनांना लांब केलं. हा आमच्या क्षेत्राकडे असं साधेपणाने बघण्याचा विचार मला आमच्या आळेकर सरांमुळे मिळाला.
सतीश आळेकर- नाटककार आळेकर, लेखक-दिग्दर्शक आळेकर, नट आळेकर, ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख आळेकर. ही सगळी बिरुदं ललित कला केंद्राच्या उंबरठय़ाबाहेर ठेवून सर आत प्रवेश करतात, आणि केंद्रातलं वातावरणही तसंच मोकळं-ढाकळं करून टाकतात.
ललित कला केंद्रातल्या प्रवेश परीक्षेला मी गेले होते. तेव्हापासूनचे सर मला आठवत आहेत. त्या वेळी मी जरा जास्तच बाळबोध होते. नाटक आवडतं, एवढाच काय तो माझा नाटय़विषयक अभ्यास, नाटय़विषयक जाणिवा. लेखी परीक्षा झाली होती. जमलेल्या सगळ्यांना एकेक करून तोंडी परीक्षेसाठी आत बोलावलं जात होतं. परीक्षा एंट्रन्स, अ‍ॅडमिशन या नुसत्या शब्दांनीसुद्धा घाबरायला होतं. पटकन आपल्या नावाचा पुकारा व्हावा आणि आपल्याला आत बोलावून काय ती एकदाची परीक्षा घेऊन टाकावी असं एकीकडे वाटत होतं, तर आपला नंबर जितका लांब जाईल तेवढं बरं, असंही वाटत होतं. तिकडेच माझ्याबरोबर परीक्षेला आलेले काही घाबरलेले जीव, त्यांच्याबरोबर काहींचे पालक, काहींचे मित्र-मैत्रिणी होते. काहीच काळात एका प्रवासाला एका गाडीतून निघालेल्या प्रवाशांची जशी ओळख होते, तशीच आमची ही ओळख झाली होती. हळूहळू कोणीतरी एकमेकांना काही खायला-प्यायला देऊ लागले, बोलू लागले. परीक्षा संपवून बाहेर पडलेले आपले अनुभव सांगू लागले. याच घाई-गडबडीत एक मध्यमवयीन, देखणे, प्रसन्न गृहस्थ लगबगीने इकडे-तिकडे जात-येत, मध्येच कोणाला तरी मदत करत होते. काही सूचना देत होते. आतल्या परीक्षेची भीती कमी करीत होते, काही माहिती सांगत होते. असतील कोणाचे तरी बाबा-काका, कोणी का असेनात, त्यांच्या बोलण्यानं आधार वाटला. माझ्या नावाचा पुकारा झाला. मी आत शिरले. मोठी मोठी मंडळी आत बसली होती. प्रश्नोत्तरे सुरू झाली. मी काहीतरी सादर करत असताना परीक्षा हॉलचं दार किलकिलं करत ते मगाचचे गृहस्थ आत येऊन चक्क परीक्षकांबरोबर खुर्चीत बसले. माझं सादरीकरण संपलं आणि मी माझ्या जागेवर बसले. अरे व्वा! आतपर्यंत पोहोच असलेले हे काका मला आता बसलेल्या, आत्ता भेटलेल्या परीक्षकांपेक्षा जास्त जवळचे होते. त्यांना बघून जरा बरं वाटलं. मग ते गृहस्थही प्रश्न विचारू लागले.. प्रश्न-उत्तरे संपली. मी तिथेच हॉलमध्ये होते. परीक्षक आपापसात चर्चा करीत होते. महेश एलकुंचवार, शुभांगी बहुलीकर, वामन केंद्रे, ‘जवळचे’वाले सद्गृहस्थ आणखी एक-दोन जण. तेवढय़ात एक जण आत डोकावला आणि म्हणाला, ‘आळेकर सर, ऑफिसात कोणीतरी आलंय भेटायला’. ‘जवळचे’वाले सद्गृहस्थ झट्दिशी उठले आणि तडक बाहेर गेले. ओ बापरे! ते ‘जवळचेवाले’ देखणे, मध्यमवयीन, सद्गृहस्थ म्हणजे  एचओडी सतीश आळेकर आहेत तर! अचानक झालेला साक्षात्कार! प्रवेश परीक्षेला ‘जवळचेवाले’ झालेले आळेकर सर कायमचेच जवळचे झाले.
खरंतर एका लेखात आळेकर सरांविषयी लिहायचं हा मी स्वत:वर केलेला अन्याय आहे. कारण सरांविषयी पुस्तक लिहिलं तरी ते कमीच पडेल. सर प्रत्येकाला आपापल्या परीनं कळतात. एखादी उत्तम कलाकृती कशी प्रत्येकजण आपापल्या परीनं बघतो आणि सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय कोणत्याही प्रांतातल्या, कोणत्याही स्तरातल्या प्रत्येकाला ती कलाकृती आपल्या कुवतीप्रमाणे जोखता येते आणि जवळची वाटते, तसंच आहे सरांचं.
अगदी विद्यापीठात टपाल पोहोचवणाऱ्या पोस्टमनकाकांपासून, आमच्या केंद्रात काम करणाऱ्या ऑफीस बॉयपासून, पार त्यांच्या समवयस्क डॉक्टर किंवा दिग्दर्शक-नाटककारांपर्यंत सगळ्यांचं आळेकर सरांवर प्रेम. प्रत्येकाला ते आपापल्या परीनं कळलेत. विद्यार्थ्यांची तर मैत्रीच होते त्यांच्याशी. कधीही खूप काही शिकवतोय असा आव नाही, कधी सल्ले नसतात; पण त्यांच्याकडे माणसाची मनं उघडण्याची ‘किल्ली’ आहे. मी कित्येक जणांना त्यांच्याकडे मन मोकळं करताना पाहिलंय आणि सरही प्रत्येकाची इत्थंभूत माहिती बाळगून असतात. अगदी आमच्याकडे काम करणाऱ्या कृष्णकांत (केके) च्या धाकटय़ा बहिणीचं गावी लग्न आहे-पासून, ते पार माझा भाऊ महिनाभरासाठी अमेरिकेला गेलाय-पर्यंत सगळं त्यांना ठाऊक असतं. तेव्हा तर आम्ही सतत आसपास वावरायचो, पण आजही- प्रत्यक्ष भेटी खूपच कमी झालेल्या असल्या तरी सर सगळ्यांबाबतीत अपडेटेड असतात.
माणसं जोडणारे सर- सरांची पुण्याई मोठी म्हणून खूप हुशार-मोठी माणसं आम्हाला बघायला-ऐकायला मिळाली. विजया मेहता, गिरीश कर्नाड, जब्बार पटेल, भक्ती बर्वे, दिलीप प्रभावळकर, सरांच्या एका शब्दावर आम्हाला भेटले. राजीव नाईक, विजय केंकरे, राजन भिसे, वामन केंद्रे, महेश एलकुंचवार, समर नखाते, ज्योती सुभाष असे कसलेले गुरू आम्हाला आळेकर सरांमुळेच मिळाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ललित कला केंद्राचा कायापालट करून टाकला. एका छोटेखानी बंगल्याचं रूपांतर बघता-बघता ‘परफॉर्मीग आर्ट सेंटर’ मध्ये झालं. चांगल्या पुस्तकांनी वाचनालय भरलं, फक्त नाटकाच्याच नाही, तर संगीत आणि नृत्याच्याही दर्जेदार कार्यशाळेचं प्रमाण वाढलं. बहुलीकर मॅडमच्या सहकार्याने ‘भीमसेन जोशी’ अध्यासनाची स्थापना झाली. मागच्या बाजूला खुला रंगमंच उभारला गेला. हे आणि अशी अनेक स्वप्नं नुसती बघण्यापेक्षा-स्वप्न पूर्ण करण्यात सरांना जास्त आनंद मिळतो.
ते किती मोठे नाटककार, दिग्दर्शक, नट आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. पण एक उत्तम सृजनशील कलावंत असणारे आळेकर सर एक उत्तम व्यवस्थापन कौशल्य बाळगून आहेत. त्यांना त्यांच्या कौशल्याचा वापर करताना आम्ही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बघितलंय. या क्षेत्राविषयीच्या भ्रामक, भाबडय़ा, स्वप्नाळू संकल्पना आळेकर सरांमुळेच निकालात निघाल्या. एका बाजूला नाटकाची सृजनात्मक प्रक्रिया समजावणारे सर, नाटकाच्या प्रयोगाचा हिशेब घेताना ‘रिक्षाने केलेल्या प्रवासाचाही खर्च लावा रे हिशेबात’ असं आग्रहाने सांगायचे. शिक्षण संपल्यानंतर ‘मुंबई’ नामक एका मोठ्ठय़ा जायंट व्हीलमध्ये आम्हाला बसायचंय, जे कधी वर जातं-कधी खाली येतं, कधी पुन्हा वर जातं हेसुद्धा सरांमुळेच आम्हाला कळायचं. अत्यंत मार्मिक पद्धतीने, शब्दांची आतिषबाजी करीत. केंद्राच्या दारात खुर्ची टाकून बसल्याबसल्या सर कित्येकांच्या टोप्या उडवायचे. त्यांच्या या बोलण्याची मी फॅन आहे. पण या त्यांच्या मार्मिकतेला टोचणारी, समोरच्याला दुखावणारी धारदार कड कधीच आली नाही. सरांची ही मार्मिकता त्यांच्या रोजच्या जगण्यात आहेच, त्यांच्या लिखाणातही आहे. ही इज अ चार्मर.
माझ्या सुदैवाने गुरू म्हणून सर लाभलेच, पण मला त्यांच्या दिग्दर्शनात एक छोटासा एकपात्री प्रयोगही सादर करता आला. दिग्दर्शक असलेल्या सरांनी नट म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना संपृक्त केलं. एरवी गमती-गमतीत आमच्याबरोबर कँटीनमध्ये कटिंग पिणारे सर आमच्या परीक्षांच्या सादरीकरणाच्या वेळी काळजीनं येरझाऱ्या मारताना मी पाहिले आहेत. ‘सखाराम बायंडर’ नाटकाचा प्रयोग केला होता. त्यात मी ‘चंपा’ची भूमिका केली होती. त्यात एका सीनमध्ये चंपा रंगमंचावर कपडे बदलते. त्या नाटकाच्या तीनही प्रयोगाला, त्या सीनच्या वेळी विंगेत कोणी येऊ नये, नाटकाच्या प्रयोगात आम्हाला त्रास होऊ नये म्हणून सर स्वत: विंगेत थांबल्याचंही मला आठवतंय. सरांविषयी किती लिहू? हा हिमनगाच्या दर्शनी भागाचा एकअष्टमांश भाग असेल. जागेची मर्यादा लक्षात घेता सरांवर हे सदर क्रमश: चालवावं लागेल. सर हक्काचे आहेत, प्रेमाचे आहेत, आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. आम्ही कधी कधी त्यांना गृहीतही धरतो. ललित कला केंद्र सोडून इतकी र्वष लोटली, विद्यापीठातल्या पावसाळ्याच्या आठवणी जुन्या होत गेल्या, पुसट होत गेल्या, पण आळेकर सरांशी असलेलं नातं- मग गुरू-शिष्याचं असेल, मित्राचं असेल किंवा ‘जवळचेवाले’ वाटणारं असेल, ते दृढ होत चाललंय. त्यांच्या मायेचा ओलावा वाढतच चाललाय.
आजही कोणत्याही नवीन नाटकाचा प्रयोग पुण्यात होणार असेल तर सरांनी ते नाटक बघेपर्यंतच्या प्रत्येक प्रयोगात- प्रेक्षकांत चमकणारा प्रत्येक चष्मा आळेकर सरांचाच आहे, असा भास होत राहतो. नवीन नाटक असो, सिनेमा असो किंवा मालिका, सरांच्या शाबासकीची थाप पाठीवर पडेपर्यंत अपुरं-अपुरं वाटतं.
सर तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा! तुमच्या नवीन लिखाणाची वाट बघतेय.