स्त्री समर्थ : कहाणी हुरडा थालीपिठाची Print

भारती भावसार , शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altथंडीच्या मोसमात विदर्भ व मराठवाडय़ात शेकोटय़ांभोवती हुरडा पाटर्य़ा रंगतात. या काळात नगरमध्ये घरोघरी तयार होणारा पदार्थ म्हणजे हुरडा थालीपीठ. पण श्रीरामपूरच्या महिलांनी या थालीपिठाला थेट बाजारात विक्रीसाठीच आणलं. मुंबईच्या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सलग तीन र्वष नफा मिळवत हजेरी लावलेल्या आणि अगदी माधुरी दीक्षितनंही चाखलेल्या या हुरडा थालीपिठाचा लवकरच ब्रँड बनवण्याच्या त्या तयारीत आहेत. त्या हुरडा थालीपिठाची ही कहाणी.. असं म्हणतात, ‘पुरुषांना खूश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो.’ पण फक्त पुरुषांनाच नाही तर समस्त मानवजातीला हा नियम लागू पडतो! बहुधा हाच फंडा श्रीरामपूरच्या बचत गटाने हेरला असावा. दहा जणींच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हुरडय़ाच्या थालीपिठाचा जो काही बेत बनवला तो एकदम फक्कड जमला. नुकत्याच मुंबईत भरलेल्या बचत गटांच्या राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी-सरस’ प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरलं ते हेच हुरडय़ाचं थालीपीठ.
नगरमध्ये थंडी पडू लागली की हुरडा पाटर्य़ा रंगू लागतात. हुरडय़ासोबत रंगलेले गप्पांचे फड म्हणजेच थंडीचा माहोल असे घट्ट समीकरणच जणू! पण मुंबईकरांसाठी किंवा शहरातल्या लोकांना अशा हुरडा पार्टी दुर्मीळच. म्हणून तर हुरडय़ाच्या थालीपिठाचा आस्वाद चाखण्याची संधी मुंबईकरांनी भरभरून अनुभवली. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या साऱ्यांची पावले आपसूक वळायची ती हुरडा थालीपिठाच्या स्टॉलकडे..
तशी माझीही वळली. एका स्टॉलवर चार-पाच जणींचा चमू भराभरा थालीपिठं लावण्यात मग्न होता. पीठ मळण्यापासून एकसारखी गोल थालीपीठं करण्याची जबाबदारी एकीवर तर दुसरी दोन तव्यांवर एकापाठोपाठ एक थालीपीठ तयार करत होती. त्याचा खमंग वास सुटला होता. हे काम इतकं अविरत की थालीपिठं करणारा हात थांबत नव्हता की विळीवर मेथी, कोथिंबीर, पातीचा कांदा चिरणारा हात थांबत नव्हता. असा हा अविरत कामाचा धडाका, बोलण्याची जराही उसंत नाही पण त्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण अजिबात नव्हता. त्या महिलांविषयी जाणून घेण्याची इच्छा झाली. म्हणून चौकशी केली तेव्हा लक्षात आलं या महिलांनी खूप मोठी झेप घेतलेली आहे.
श्रीरामपूरच्या उक्कलगावच्या या महिला. त्यांच्या गटाचं नाव ‘ओम शांती महिला स्वयंसहायता बचत गट’. गटाची स्थापना जून २००८ सालची. गावची लोकसंख्या साडेपाच हजारांइतकी. गाव तसं अविकसितच. गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यानं घरच्या शेतात राबणं नाहीतर शेतमजुरी करणं या चाकोरीतच महिला जगत होत्या.
सरकारतर्फे २००२ सालची दारिद्रय़रेषेखालील उत्पन्न गटाची यादी जाहीर झाली. यात अनेक महिलांची नावे ‘दारिदय़रेषेखालील गटात’ आली. त्यांच्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत येणाऱ्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना तातडीची कर्ज योजना होती. पण महिला फारशा उत्सुक नव्हत्या. गावातली पुरुष मंडळीही बायकांना घराबाहेर पडायला प्रोत्साहन देणारी नव्हती.   या भागात ‘विद्या महिला कला निकेतन’नावाची एनजीओ चालवणाऱ्या विद्या अरुण क्षीरसागर यांनी गावातल्या महिलांना संघटित केलं. मग १० जणींचा मिळून बचत गट तयार झाला.
महिलांना साधं तालुक्याचं ठिकाण माहीत नव्हतं. तहसील कार्यालय असतं हेही ठाऊक नव्हतं. घरातून बाहेर पडायचं तर नवऱ्याबरोबर. त्यामुळे बचत गटातून कर्ज मिळणार, पण कर्ज काढायचं कशाला आणि कर्जबाजारी व्हायचं अडलंच काय? असा बायकांचा सूर होता. गटाची निर्मिती करण्यासाठी विद्या क्षीरसागर गावात जायच्या त्यावेळी बायका शेतावर निघून गेलेल्या असायच्या. ज्या असायच्या त्यांच्या डोक्यात काही शिरायचं नाही. तरी त्यांनी धीर धरला व तब्बल सहा बैठकांनंतर गटनिर्मितीवर सहमती झाली व त्यांनी सुस्कारा सोडला.
पण ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं’ हा प्रत्यय गटाला लवकरच आला. गट स्थापन झाला. पण गटाच्या बैठकीला महिला येईनात. घरची कामं असल्याचं कारण देत. मग बैठका दुपारच्या वेळी होऊ लागल्या. तरी तेच. मग लक्षात आलं, त्यांना घरातून विरोध होतोय. अनेकींच्या सासरच्या मंडळींशी बोलून त्यांना समजवावं लागलं, तेव्हा कुठे बैठका पार पडू लागल्या.
या गटासाठी २००९ साली नगरला भरलेलं जिल्हास्तरीय ‘साई ज्योती प्रदर्शन’  एक सोनेरी वळण ठरलं. गटातल्या बायका पहिल्यांदा गावाबाहेर पडणार होत्या. प्रदर्शनाला जाण्यासाठी घरातल्यांची मनधरणी केली. शेतीकामातून थोडी सवलत घेतली. बेत ठरला पिठलं-भाकरीचा स्टॉल लावण्याचा. विद्याताईंच्या मार्गदर्शनाखाली सारा ताफा सज्ज झाला. तोपर्यंत कधी प्रदर्शन म्हणून पाहिलं नव्हतं. ‘शेजारच्या बेलापूरसारख्या आठवडी बाजारासारखं असतं का हो प्रदर्शन? इथपासून ते किती रुपये मिळतील आपल्याला? अशा नाना प्रश्नांचा भडिमार केला गेला. खूप उत्सुकता होती महिलांना. पण त्याहीपेक्षा धाकधूक होती. एखाद्या उत्सवाला जावं तशा बायका नटून-थटून तयार झाल्या.
प्रदर्शनाचा दिवस उजाडला. पण पहिल्या दिवशी त्यांच्या स्टॉलकडे कुणी फिरकलंसुद्धा नाही. दुसरा दिवस उजाडला. खूप आशा होती पण पुन्हा कालचीच पुनरावृत्ती झाली. आता मात्र महिलांचा धीर खचला. नफा सोडाच पण पिठलं-भाकरीचा खर्च        
तरी भरून निघेल का, याची चिंता महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मग विद्याताईंनी एक युक्ती केली. तिसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी उरलेलं पिठलं आणायला सांगितलं. घरून येताना काही पिठं बायकांनी सोबत आणली होतीच. ती पिठं त्यात मिसळली व सरळ थालीपीठ थापलं. स्टॉलसमोरून जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना या थालीपिठाची चव घ्यायला सांगितलं. त्यांना इतकं पसंत पडलं की दुसऱ्या थालीपिठाची फर्माईश त्यांनी केली. अशा रीतीने फक्त ५ रुपयांच्या थालीपिठानं महिलांच्या उत्पादनाची बोहनी झाली. बघता बघता अनेक जण थालीपिठाच्या स्टॉलवर येऊ लागले. महिला आश्चर्यचकित झाल्या. खरं तर त्यांना या प्रदर्शनात जेमतेम १० हजार रुपयांचा नफा झाला. नफा फार कमी झाला व त्यांच्या उपक्रमाचा श्रीगणेशा झाला होता. या वेळेपासून त्यांच्या गटाचं नाव थालीपिठाशी जोडलं गेलं ते कायमचंच..
यानंतर २००९-१० साली नाशिकच्या विभागीय प्रदर्शनाला त्यांनी हजेरी लावली. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात त्यांना २५ हजार रुपयांचा नफा झाला. ‘साई-ज्योती’चा निव्वळ नफा १० हजार रुपये होता. त्यामुळे महिलांना हुरूप आला. गटाच्या अध्यक्षा मनीषा संजय चव्हाण या थोडय़ाफार शिकलेल्या. शिवणकामात त्यांना रस होता. म्हणून जेव्हा बचत गटाची माहिती मिळाली तेव्हा त्यांच्यासारख्या इतर जणींना त्यांनी गोळा केलं. अलका चव्हाण, शारदा देसाई याही गटात आल्या. याच सुमारास शोभा दारकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ब्रrोश्वर महिला स्वयंसाहाय्यता बचत गटही अस्तित्वात आला.
या भागात ज्वारी चांगली होते. त्यामुळे हुरडा हा या भागाचं मुख्य आकर्षण. त्यातूनच घरोघरी बनवल्या जाणाऱ्या हुरडय़ाच्या थालीपिठाचा घाट त्यांनी घातला. दुसऱ्यांदा ‘साई-ज्योती’ला जाताना त्यांची स्पेशालिटी ठेवली हुरडा थालीपीठ. तसं हा पदार्थ अनेक घरांत बनवला जातो. पण प्रत्येकीची आपली पद्धत. एका स्थानिक पदार्थाला त्याच्या ठोस पाककृतीसह सादर करण्याची आयडिया या महिलांनी प्रत्यक्षात आणली. आता नगरच्या अनेक हॉटेलात ‘हुरडा थालीपीठ’ हा सीझनल मेन्यू झाला आहे. या थालीपिठाला हा बहुमान मिळवून देण्यात या महिलांचं मोठं योगदान म्हणावं लागेल!
कोवळ्या ज्वारीची लुसलुशीत दाणेदार कणसं तोडून आणायची व शेकोटीवर भाजायची. खमंग भाजली गेल्यावर ती दळून आणायची. मग त्यात बाजरी, नाचणी, मका व थोडी ज्वारीचं पिठंही मिक्स करायचं. या पिठात चिरलेला पालक, मेथी, कोथिंबीर, पातीचा कांदा, किसलेला कोबी अशा भाज्या घालून हळद व चवीपुरतं मीठ घालायचं की तयार होतात हुरडय़ाची थालीपिठं.
आतापर्यंत या महिलांनी तीन साई ज्योती प्रदर्शनात भाग घेतलाय. सलग तीन र्वष त्या ‘महालक्ष्मी सरस’मध्ये सहभागी झाल्या आहेत. सुरुवातीला १० हजार झालेला नफा उत्तरोत्तर वाढत गेला. १० हजार रुपयांवरून १८ हजार, २५ हजार, ६० हजार असा हा नफ्याचा आलेख वाढतच गेला. या वर्षी झालेल्या ‘महालक्ष्मी सरस’ला तर त्यांना एक लाख रुपयांचा नफा झाला. थालीपिठातून इतका नफा होऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं.

महिला आता धीट झाल्या आहेत. पूर्र्वी आपला ग्रामसेवक कोण याची माहितीही नसणाऱ्या महिला आता ग्रामसभेला हटकून हजेरी लावतात. ग्रामपंचायतीच्या कारभारात त्या रस घेतात. थेट मुंबईत प्रदर्शनासाठी आल्या की हुशारीने वागतात. हिशेबात चुकत नाहीत की मुंबईतले रस्ते ओलांडताना घाबरत नाहीत. त्यांचा खंबीरपणा आता त्यांच्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या पेलण्यातही जाणवतो. आपल्या मुलीबाळींना शिकवून मोठं करण्याचं स्वप्न त्या बघतायत.
या वर्षीही त्या मुंबईला प्रदर्शनासाठी आल्या तेव्हा तब्बल २०० क्विंटलची थालीपीठ भाजणी त्यांनी आणली होती. रोजची १०-१५ हजार रुपयांची विक्री त्यांनी केलीय. ८ मार्च २०११ साली महिला दिनानिमित्त श्रीरामपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनेही त्यांच्या हुरडा थालीपिठाची चव चाखलीय, असं या महिला अभिमानाने सांगतात. ‘‘ताई ‘हम आपके’ वाल्या माधुरीने आमची थालीपिठं बेस्ट आहेत, असं म्हटलंय. आता बोला, आहेत की नाहीत आमची थालीपिठं मस्त..’’ असं एकीनं प्रचंड खूश होत सांगितलं.
तालुक्याच्या, जिल्ह्य़ाच्या प्रदर्शनात, गावोगावच्या जत्रांत थालीपिठाचे स्टॉल लावून शांत राहतील, त्या महिला कसल्या?  एका प्रदर्शनात त्यांनी तयार पिठं विकता येतात, हे पाहिलं. मग झालं, त्यांनीही हुरडा थालीपिठाची भाजणी विकायचं ठरवलं. आता महिला हुरडा थालीपीठ भाजणीचीही विक्री करतात. वर्षभर ही तयार भाजणी चांगली राहते, असा दावा त्या करतात. यासाठी महिलांनी पॅकेजिंगचं खास प्रशिक्षण घेतलं. ‘आमच्या गटाचं नाव व पुढे उत्पादनाची वैधता तारीख अशा स्वरूपात आमचं उत्पादन आम्हाला बाजारात विकायचं आहे.’  हा त्यांचा भविष्यातला उपक्रम आहे. यासाठी महिलांना त्यांचा ब्रँड बनवायचा आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचं प्रमाणपत्र मिळवण्याकामी त्या सध्या व्यस्त आहेत.  गावोगावच्या स्टॉल्समध्ये थालीपिठाच्या विक्रीतून चार पैसे मिळवणाऱ्या या महिलांना आता घरातही मान-सन्मान मिळू लागला आहे. एके काळी फक्त शेतात राबणाऱ्या बायका आता घरच्या गाई-दुधाचा व्यवसाय, शेतातलं थोडंफार काम व गटाचे दौरे सारं ताकदीनं पेलतायत.  
महिला सक्षमीकरण काय साधतं ते आता गावाचा बदललेला चेहरा बघून जाणवतंय. गावात आता एकूण १३ बचत गट स्थापन झालेत. गाव हगणदारीमुक्त होण्यासाठी महिलांनी कंबर कसलीय. गावात बहुतेक घरात आता शौचालये बांधली गेली आहेत. लवकरच त्या दारूबंदीचा ठरावही मांडणार आहेत.
आपल्या आवडीचं काम करूनही पैसे मिळवता येतात, हे आम्हाला माहीतच नव्हतं, असं शोभा दारकुंडे सांगतात. हुरडा थालीपिठाचं नाव गाजवणाऱ्या या महिलांनी स्थानिक पदार्थाला राज्यपातळीचा दर्जा मिळवून दिलाय. त्यांनी सुरुवात केली तेव्हा हाती काहीच नव्हतं. पण आज प्रत्येकीच्या डोळ्यांत खूप स्वप्नं आहेत. उद्या सुंदर असेल, ही आशा आहे.
त्यांना निरोप देताना जाणवलं की हुरडा थालीपीठ हे फक्त निमित्त होतं. महिलांमध्ये काहीतरी करण्याची जिद्द होतीच, तिला योग्य मार्ग मिळाला इतकंच ..    

तुम्हीही कळवू शकता तुमच्या गावातील सामर्थ्यवान स्त्रीची वा स्त्रियांची माहिती. बचत गटाच्या माध्यमातून असो की वैयक्तिकदृष्टय़ा कर्तृत्व गाजवलेली स्त्री असो आम्हाला कळवा. गावासाठी काही एकत्रित उपक्रम राबवले असतील तर आम्ही प्रसिद्धी देऊ तिच्या, त्यांच्या यशोगाथेला. आम्हाला कळवा- ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it