स्त्री समर्थ : ताईगिरी Print

डॉ. प्रिया आमोद - शनिवार, ३ मार्च  २०१२
altरत्नागिरीजवळच्या आंबा घाटातील प्रवाशांसाठी रात्रभर चहा-आम्लेटची गाडी धाडसाने एकटीने चालवणाऱ्या, दिवसा शेतात राबून मुलांना सांभाळणाऱ्या ताई येडगे. शेजारच्या जंगलातील अधिकाऱ्यांना मारहाणीपासून वाचवणाऱ्या, नवऱ्याची चार ऑपरेशन्स स्वबळावर करून स्वत:चं घर बांधणाऱ्या, इतरांना आर्थिक मदत करत माणुसकीची बँक जपणाऱ्या ताई ‘आधुनिक स्त्री’ आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त खास व्यक्तिचित्र..
रत्नागिरीहून कोल्हापूरला येताना वाटेतला आंबा घाट चढून यावं लागतं. १२-१३ किलोमीटरचा हा अवघड घाट चढून आपण बाहेर येतो ते आंब्यात. रात्री-अपरात्री या वाटेवर प्रवास करणारे व्यापारी, लाकडाचे व्यापारी, पर्यटक वेडय़ावाकडय़ा वळणाचा घाट, भणभणता गार वारा अंगावर घेत चढतात आणि आंबा गावच्या स्टॅण्डजवळ असणाऱ्या एका चहाच्या गाडय़ाजवळ थांबतात. ‘ताईचा चहाचा गाडा’ म्हणून हा गाडा प्रसिद्ध आहे. घाट चढून थकलेल्या प्रवाशांना गरमागरम चहा पाजणारा हा गाडा चालवतात ताई बाबू येडगे. संपूर्ण रात्र! हाडं गोठवणारी आंब्यातली थंडी असो की, गच्च, धुवाँधार पाऊस. ताई गेली २६ वर्षे थंडी-वारा-पाऊस यांची पर्वा न करता ही चहाची गाडी एकटय़ा चालवतात.
आंबा हे छोटंसं गाव. कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर मलकापूरपासून पुढे आलं की रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या हॉटेल्स रिसॉर्टचे बोर्ड दिसायला लागतात. याच मुख्य रस्त्यावर रत्नागिरीकडे जाताना, डाव्या हाताला ताईंची छोटीशी चहाची गाडी आहे. दिवसभर ही गाडी बंद असते. संध्याकाळी सहा वाजता ताई आपली गाडी उघडतात. आंब्यात तसाही अंधार लवकर पडू लागतो. कंदिलाच्या उजेडात ताईचं काम सुरू होतं. गेली २६ वर्षे धनगर समाजातील या बाईने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चहा विक्रीतून आलेल्या पैशांवर केलेला आहे. कष्ट आणि हिमतीच्या जोरावर एक अशिक्षित स्त्री, एकटी आपल्या आयुष्याचा, नवरा- मुलांचा कसा आधार देऊ शकते याचं उदाहरण म्हणून ताईंकडे पाहावं लागेल.
ताईंचं माहेर मुडशी. रत्नागिरी जिल्ह्य़ातील साखरप्याजवळ. लहानपणीच ताईंचे आई-वडील गेले. निपुत्रिक असलेल्या चुलता-चुलतीने ताईंचा सांभाळ केला. ताई जन्मत:च धाडसी. चुलत्याकडे म्हशी होत्या. ताई सात वर्षांच्या असल्यापासून या म्हशींचं दूध घालायला आंब्यात येत. पायीच, जंगलातून अनवाणी, दुधाची मोठी किटली सांभाळत, डोंगर चढून येत. त्यावेळी दूध ५० पैसे लिटर होतं. सकाळी सात वाजता घरातून निघायचं आणि तासा-दोन तासात आंब्यात पोहोचायचं.
एकदा जंगलातून येताना त्यांना वाघ दिसला. ताईंनी यापूर्वी वाघ कधी पाहिलाच नव्हता. त्यामुळे हा वाघ आहे हेच कळलं नाही. त्या वाघाला कोल्हाच समजल्या. वाघ आपल्या वाटेने निघून गेला. मागून दूध घालायला येणाऱ्या काही लोकांना दिसला. त्यांनी ताईच्या चुलत्याला सांगितलं, पण ताई घाबरल्या नाहीत. जंगल तुडवत आंब्यात येणं सुरूच राहिलं. वयाच्या अकराव्या वर्षी ताईचं आंब्यातील बाबू येडगेंशी लग्न झालं. ताईचे पती सुरवातीला घरची शेती करत. थोडय़ा वर्षांनी ते कामासाठी मुंबईला गेले. आंब्यातल्या घरात ताई एकटय़ाच. चार लहान मुलं आणि ताई. कसेबसे राहायचे. पतीला दीडशे रुपये पगार होता. तेवढय़ा पैशात एवढय़ा जणांचं भागेना. ताई कुणा-कुणाच्या शेतावर मजुरीला जात. दिवसाला तीन रुपये मजुरी मिळायची. मुलांची आजारपणं, स्वत:च्या शेतीची कामे, यामुळे महिना भरायचा नाही. ताईंच्या नवऱ्याने त्यांना एक म्हैस घेऊन दिली. म्हैस रोज दोन लिटर दूध द्यायची. त्यावेळी दीड रुपये लिटर दूध होतं. त्यातही भागेना. ताईंना वाटलं, काही उद्योग-धंदा सुरू केला तर चार पैसे बरे मिळतील. आंब्यात येता जाता पर्यटकांच्या गाडय़ा थांबतात. आपण रात्री चहाची गाडी का सुरू करू नये? व्यवसायात कुणाची स्पर्धाही असणार नाही. दिवसा शेती-मुलांकडे लक्ष देता येईल असा विचार करून ताईंनी चहाची गाडी सुरू केली. चहा, बिस्कीट, सिगारेट आणि अंडा ऑम्लेट, अंडा भुर्जी ठेवायला सुरवात केली. सुरवातीला आंब्याची ग्रामपंचायत चहाच्या गाडीला परवाना द्यायला तयार होईना. एका बाईच्या नावे आम्ही चहागाडीचा परवाना देणार नाही, असा ग्रामपंचायतीने पवित्रा घेतला. ताई हिंमतवान, त्या म्हणाल्या, ‘ठिकाय. मालकांच्या नावाचं लायसन द्या’ आता ग्रामपंचायतीचा नाइलाज झाला. चहाची गाडी सुरू केली. संध्याकाळी पाच वाजता ताई आपलं जेवण बांधून घेऊन धनगरवाडय़ातून चालत आंब्यात यायच्या. कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात स्टोव्हवरती चहाचं आधण उकळू लागायचं. बाकी सगळी हॉटेलं संध्याकाळी बंद व्हायची. त्यामुळे जाणारे-येणारे चहा प्यायला थांबायला लागले. एका बाईला चहाच्या गाडीवर बघून चकित व्हायचे, पण बरं झालं, यावेळी चहाची सोय झाली, म्हणत जायचे. सुरवातीचे आठ दिवसच ताईंच्या मनात किंचित भीती होती. त्यानंतर ताई निर्धास्त झाल्या. रात्री मुलांना शेजारच्या घरात झोपायला पाठवत, त्यामुळे मुलांची काळजी नसायची. चहाच्या गाडय़ाखाली चारी बाजूंनी ताई पोतं लावायच्या आणि गिऱ्हाईक नसताना झोपून जायच्या. गाडीवरचा उजेड पाहून लोक थांबत, हाक मारत. गाडय़ासमोर वनखात्याचा नाका आहे. लाकडाचे व्यापारी तिथे वाहने थांबवून, चहा प्यायला ताईंच्या गाडीवर येत. वनखात्याच्या लोकांचा तुम्हाला आधार वाटत असेल असं विचारल्यावर ताई सांगतात, ‘सोबत आहे त्यांची. पन त्यानला माझा जास्त आधार वाटतो. कुनी कुनी मान्सं भांडणतंटा करत्यात, दारू पिऊन नाक्यावर दंगा करत्यात. फॉरेस्ट ऑफिसरला मी सांगून ठिवलेलं हाय, मला नुस्ता आवाज दे, माज्याजवळ दांडकच हाये ठेवलेलं. घिऊन जाते नाक्यावर. माज्यासमोर कोन थांबत न्हाई.’ ताईंचा आवाज पहाडी. बोलणं थेट, एक घाव दोन तुकडे करणारं, त्यामुळे ताईंच्या वाटय़ाला सहसा कुणी जायला बघत नाही. एकदा खाजगी दुश्मनीतून वनखात्याच्या अधिकाऱ्याला काही लोक मारायला आले, तो एकटाच होता. ताईंना लक्षात आलं काहीतरी गडबड दिसते. त्या क्षणात नाक्यात गेल्या, दोघांची गळपट्टी धरून, बडवायला सुरवात केली, मोठमोठय़ाने ओरडायला सुरवात केली. काही लोक पळत आले. आजही हा अधिकारी ताईंनी आपला जीव वाचवल्याचे ज्याला-त्याला सांगत असतो. ताईंची तडफ बघून गुंड लोकदेखील चरकतात.
उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याजवळ असलेल्या छोटय़ा-छोटय़ा धनगरवाडय़ातून महिला डोंगराचा रानमेवा विकायला आंब्याच्या मुख्य रस्त्यावर टोपली घेऊन बसतात. कुणी नवख्या  लाजत-भीत करवंदे, जांभळे, नेर्ली विकतात. काही लोक घेतलेल्या मालाचे पैसे न देताच जाऊ लागले की ताईंचा आवाज कडाडतो. ताई पुढे होऊन पैसे वसूल करून देतात. या सगळ्या बायकांना ताईंचा आधार आहे. आंब्याच्या घाटात कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर कधी  अपघात होतो, कधी चोरीमारी होते. त्यावेळी पोलिसांचा, बातमीदारांचा एकमेव सोर्स म्हणजे ताई. थंडीच्या दिवसात शेजारी शेकोटी पेटवून ठेवून ताई शेकत बसतात. कुणी दारू प्यायलेले, ताईंचा तडाखा माहीत नसलेले पर्यटक वावगं वागायला लागले तर त्यांची काही खैर नसते. दांडक्यासह ताईचा जगदंबेचा अवतार बघून असले लोक चक्क पळ काढतात.
सकाळी साडेआठ-नऊपर्यंत ताई चहाची गाडी बंद करतात. घरी येऊन सुरू होतात घरची कामं. लाकडं आणणं, स्वयंपाक, धुणं-भांडी करेपर्यंत बारा वाजतात. बारा वाजता ताई जेवून झोपायला जातात. सुरवातीच्या काळात ही झोप जेमतेम तासभर मिळायची. घरच्या शेतीवर नाचणी-भात त्या घ्यायच्या, त्यामुळे सकाळी अकराच्या पुढे शेतात जायच्या. पती मुंबईला असल्यामुळे संसाराची सगळी जबाबदारी ताईच पेलत होत्या. दोन्ही मुलं बारावीपर्यंत शिकली. आता लग्न होऊन मुंबईत काम करतात. मुली सासरी गेल्यात. ताईंचे पती आता घरीच आले आहेत. ताईंविषयी त्यांना खूप अभिमान आहे.
पंधरा वर्षांपूर्वी ताईच्या नवऱ्याचं अ‍ॅपेंडिक्सचं दुखणं उद्भवलं. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितल्यावर ताईंसमोर प्रश्न उभा राहिला तो वेळेचा. पैसे जवळ होते, कारण पहिल्यापासून ताई नियमितपणे रोज भिशी भरत असत. थोडे-थोडे करून पैसे साठले की वर्षांकाठी ते पैसे खर्च न करता बाजूला काढून ठेवत. त्यामुळे खर्चाची चिंता नव्हती, समस्या होती ती पंधरा-वीस दिवस कोल्हापुरात जाऊन दवाखान्यात रुग्णाजवळ थांबायचं कोणी? ताई जाऊन राहिल्या तर चहाची गाडी बंद ठेवावी लागेल, धंदा बंद ठेवून भागणार नव्हतं. ताईंनी कोल्हापूरच्या डॉ. कामतना विनंती केली, ‘माझ्या पेशंटची जरा देखभाल करा.’ ताईंची अडचण लक्षात घेऊन डॉक्टर, तिथल्या नर्सेस रुग्णाला ठेवून घ्यायला तयार झाले. ताई पतीला चार दिवस आधी हॉस्पिटलमध्ये दाखल करत, बाजूच्या खानावळीतून त्यांना रोज डबा मिळेल अशी व्यवस्था करत, आणि आंब्याला परत जात. ऑपरेशन दिवशी पुन्हा येत, चार दिवस पतीसोबत थांबत, बरं वाटतंय असं दिसलं, की डॉक्टरांच्या परवानगीने आंब्याला जात. पती पूर्णत: बरे होईपर्यंत हॉस्पिटलमध्ये थांबत, ताई नंतर त्यांना घरी घेऊन येत. याच पद्धतीने त्यांनी पतीची तिन्ही ऑपरेशन्स केली. चौथं बायपासचं ऑपरेशन मुंबईला नानावटीत झालं. दारिद्रय़ रेषेखालील लोकांसाठी असलेल्या योजनेतून ऑपरेशन झालं तरी वरती दोनेक लाख रुपये खर्च आला. हा खर्च ताई आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी मिळून केला. गावातले काही लोक ताईंना म्हणत, ‘कशाला दवा करते? येवडा पैसा खर्च करते नवऱ्यासाठी? मेला तर मरेना.’ ताई म्हणतात, ‘मी असल्या लोकांकडे कधी लक्ष दिलं नाही. मला माझे मालक पाहिजेत. ते असले तर मी कितीही कष्ट करून, कुठंही उभं राहू शकते.’
ताईंनी घर बांधलं, ‘जय साई कुंज.’ छान ऐसपैस वास्तू आहे. जागा होतीच. त्यावर साधं गवताचं घर होतं. ताईंना वाटलं मुलं मुंबईहून सुट्टीला घरी येतात, सोबत त्यांचे मित्र येतात. राहायला, जागा अपुरी पडते. २००८ साली घर बांधलं. त्या वेळी ताईंनी ज्यांना मदत केली होती त्यांनी पैसे दिले. ताई बँकेचं कर्ज काढायला गेल्या नाहीत. त्यांनी आजवर जोडलेली माणुसकीची बँक त्यांच्या मदतीला आली. पूर्वी त्यांच्या धनगरवाडय़ावर लोक मोलमजुरीला जात, हातात रोख पैसे नसत. अशा लोकांना ताई थोडी-थोडी मदत करत. ताईंच्या भाच्याकडे काही वर्षांपूर्वी डीएडला जायला पैसे नव्हते. एकरकमी पंचवीस हजार रुपये भरावयाचे होते. तो ताईंकडे आला, ताईंकडेही इतके पैसे नव्हते. त्यांनी जराही विचार न करता आपलं मंगळसूत्र, अंगठी विकून त्याच्या हातावर पैसे ठेवले. तो भाचा त्याची पत्नी शिक्षक आहेत. त्यांनी ताईंना मदत केली. असे मदतीचे हात लागून ताईंचं घर उभं राहिलं. ताईंनी सगळ्यांचे पैसे आता फेडून टाकले आहेत. गावातले लोक ताईंचं नवीन घर पाहायला येत, काही कौतुक करत, काही ईर्षां. ताई हसून सगळं कानाआड करतात.
आता त्यांचे पती घरी सगळी मदत करतात. रात्रीचे जेवणही तेच बनवून ठेवतात. ताईंनी कष्टाच्या, जिद्दीच्या जोरावर आपलं कुटुंब गरिबीतून वर आणलं. पैशाचं व्यवस्थित नियोजन केलं. ताई आज सत्तावन्न वर्षांच्या आहेत. मधुमेह झालेला आहे व हात दुखतो (जागरणामुळे), तरीही चहाची गाडी सुरू आहे. ‘बायकांनी मेहनत करावी, काटकसर करून पैसा साठवावा, आणि कुणाच्या बापाला भिऊ नये,’ असं खणखणीत आवाजात सांगणाऱ्या ताई येडगे आधुनिक ‘स्त्री’ आहेत.     
तुम्हीही कळवू शकता तुमच्या गावातील सामथ्र्यवान स्त्रीची वा स्त्रियांची माहिती. बचत गटाच्या माध्यमातून असो की वैयक्तिकदृष्टय़ा कर्तृत्व गाजवलेली स्त्री असो आम्हाला कळवा. गावासाठी काही एकत्रित उपक्रम राबवले असतील तर आम्ही प्रसिद्धी देऊ तिच्या, त्यांच्या यशोगाथेला. आम्हाला कळवा- संपर्क - (०२२) २७६३९९३१ किंवा ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it