स्त्री समर्थ : भानगडवाडीचं झालं शिवाजीनगर Print

मेघा वैद्य - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altसाधारण १०० वस्तीचं ते गाव. तुटपुंज्या मजुरीमुळे कायम दारिद्रय़, त्यात दारूचं व्यसन, मग काय भांडणं, मारहाण हे रोजच चित्रं सहन करणारी भानगडवाडी स्त्रीशक्तीमुळे बदलली ती शिवाजीनगरमध्ये. बचतगटाचं दबावगटात रूपांतर करून या स्त्रीशक्तीने पुरुष मंडळींमध्ये, गावात घडवून आणलेल्या बदलाची ही कहाणी..
अनेकदा गावातल्या लोकांच्या वागणुकीवरून गावाची ओळख बनते. उदाहरणार्थ शिस्तप्रिय, वक्तशीर पुणेकर, घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे धावणारे मुंबईकर! अशीच ओळख बनली होती, रोज भानगडी आणि भांडणाऱ्या भानगडवाडीची. मात्र बचतगटाच्या माध्यमातून इथल्या स्त्रियांनी भानगडवाडीचं नुसतं नावच बदललं नाही तर सोबत लोकांची मानसिकता बदलली. सामाजिक आणि आर्थिक विकाससुद्धा साधला. त्यामुळे पूर्वीची  भानगडवाडी आता ‘शिवाजीनगर’ म्हणून ओळखली जातेय. नकाशावर शिवाजीनगर अशी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात मोलाचा वाटा आहे तो इथल्या स्त्रीशक्तीचा.
नाशिक शहरापासून जवळ असलेल्या जानोरी गावाला जाताना उजव्या हाताला शिवाजीनगर नावाची छोटीशी वस्ती लागते. वस्तीत सुमारे १०० घरं आहेत. काही वर्षांपर्यंत या वस्तीचं चित्र खूपच वेगळं होतं. झोपडपट्टीवजा घरं, मजुरीत मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांचा ताण, लागलेलं दारूचं व्यसन त्यातच सतत होणारी भांडणं, पर्यायाने बायकोला केली जाणारी मारहाण या सगळ्या गोष्टींमुळे वस्तीवर रोज भानगडी आणि भांडणं ठरलेली. मुला-मुलींच्या altशिक्षणाबद्दल प्रचंड अनास्था. मुलगा १२-१३ वर्षांचा झाला की, बापाचं बघून तोही दारू प्यायला लागे. एकूणच निरक्षरता, व्यसनाधीनता आणि प्रचंड गरिबी, अशी वस्तीची दयनीय अवस्था होती. मात्र २००५ मध्ये ‘महिला आर्थिक विकास मंडळा’ने वस्तीत बचतगटाचं काम हाती घेतलं. सुरुवातीला सहयोगिनी सुरेखा लोखंडे यांनी महिलांशी चर्चा सुरू केली. मात्र त्यांना अजिबातच प्रतिसाद मिळाला  नाही. उलट त्यांना वस्तीतून हाकलून देण्यात आलं. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. तरीही त्या रोज महिलांशी सातत्याने बोलत राहिल्या. बैठका घेतल्या. बचतगटाचं महत्त्व सांगितलं, शेवटी भानगडवाडीतल्या ११ महिला एकत्र आल्या आणि त्यांनी ‘तिरंगा’ नावाने महिला बचतगट स्थापन केला.
पहिल्यांदा त्यांनी प्रत्येकी ५० रुपयांची बचत करीत  बँकेत खातं उघडलं. बँकेकडून २० हजार रुपयांचं कर्ज घेतलं. त्यातून कोंबडीपालनाचा व्यवसाय सुरू केला. कोंबडय़ा विकत घ्यायच्या. त्यांचं नीट पालनपोषण करायचं. अंडय़ाचं उत्पादन मिळू लागलं. त्यातून त्यांनी बँकेचं कर्ज फेडलं. या व्यवसायामध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी ‘शेळीपालन’ सुरू केलं. त्यासाठी पुन्हा बँकेकडून दोन लाखांचं कर्ज घेतलं. प्रत्येकी दहा बकऱ्या-बोकड विकत घेऊन दणक्यात व्यवसायाला सुरुवात केली. बोकडाची विक्री करून त्यांना सध्या चांगला पैसा मिळतोय. साधारणपणे एक बोकड चार हजार रुपयांना विकला जातो, मात्र  बकऱ्यांची विक्री करीत नाहीत. जेणेकरून त्यांच्या जवळच्या बकऱ्या-बोकडांची संख्या सतत वाढत आहे. या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसलाय. इथल्या प्रत्येकीकडे २० शेळ्या आहेत. याशिवाय कोकरू आणि बोकडसुद्धा आहेत. एवढय़ा सगळ्या बकऱ्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी बचतगटाने एक पगारी गुराखीसुद्धा ठेवला आहे. तो रोज सगळ्या शेळ्यांना चरायला घेऊन जातो. त्याचप्रमाणे गटाने स्वत:चा मोबाईलसुद्धा घेतलाय. आता या स्त्रियांनी जमीन विकत घेण्यासाठी नियोजन सुरू केलंय. जमीन घेऊन तिथे चारा-पीक आणि शास्त्रोक्त पद्धतीने शेळीपालन करण्याचा त्यांचा मानस आहे.
altएकीकडे बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या हातात पैसा यायला लागला. त्यांचा आत्मविश्वास वाढला. मग त्यांनी वस्ती विकासात लक्ष द्यायचं ठरविलं. विशेष म्हणजे सुधारण्यासाठीच्या या लढय़ात बचतगटाच्या ‘लक्ष्मी मावशी’ सदैव आघाडीवर असतात. त्या वेळी या सर्व स्त्रिया झोपडय़ांमध्ये राहत होत्या. त्यांना स्वत:चं हक्काचं पक्कं घर नव्हतं. घरासाठी चौकशी केली असता इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरांना मंजुरी मिळाली होती. मात्र अधिकारी कामांमध्ये दिरंगाई करीत असल्याचं समजलं. घरांना मंजुरी मिळाली असतानादेखील बांधकाम करून द्यायला तयार नव्हते. मग बचतगटाने घरांसाठी लढायचं ठरविलं. ग्रामसभेत ठराव मांडून तो मंजूर करून घेतला. बीडीओ (ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर) ची भेट घेतली. तरी काही होत नव्हतं. मग गावसभा समितीला हाताशी धरून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. त्यात परिस्थिती नमूद केली आणि शेवटी वरिष्ठांकडून दबाव आणून घरांसाठीचा मार्ग मोकळा करून घेतला.
एकीच्या बळावर व्यवसाय आणि घर मिळविल्यानंतर त्यांनी घरातल्या पुरुषांना सुधरवण्यासाठी कंबर कसली. सगळ्याजणींनी एकत्र येऊन दारूबंदीसाठी लढा द्यायचं ठरवलं. यात त्यांनी जानोरी गावातल्या बचतगटांना सहभागी करून घेतलं. बचतगटांचा एक दबावगट बनवला. ग्रामपंचायतीवर दबाव टाकून दारूबंदी आणली. ‘आम्ही मार खाणार नाही आणि नवऱ्याला दारू पिऊ देणार नाही’ असा कडक पवित्रा त्यांनी घेतला. एखाद्या महिलेला नवऱ्याने मारलं की, सगळ्याजणी एकत्र येत. लक्ष्मी मावशीच्या नेतृत्वाखाली या महिलांचा मोठा मोर्चा निघे. हातात लाठय़ा-काठय़ा घेऊन या महिला पीडित महिलेच्या घरी पोहोचत. ‘तू जर बायकोला मारलं तर आम्ही तुला मारू’ अशी थेट धमकी देत. तरीसुद्धा नाही ऐकलं तर लक्ष्मी मावशीच्या काठीचा प्रसाद त्या नवरोबाला मिळे. ‘हिला तुझी गरज नाही. आम्ही तिला सांभाळू’ अशी निर्णायक भूमिका या महिला घेत. त्यामुळे साहजिक पुरुष मंडळी या ‘दबाव गटाला’ घाबरू लागले. त्यांच्या दारू पिण्यावर चांगलाच वचक बसला. सगळ्याजणींना एकत्र पाहून त्यांनाही भीती वाटू लागली. एकदा तर लक्ष्मी मावशीच्या मुलानं बायकोला मारलं. त्याचं नुक तंच लग्न झालं होतं. त्या वेळीसुद्धा लक्ष्मी मावशीनं आक्रमक भूमिका घेतली. ‘हिला मारलं तर घरातून तुला हाकलून देइन’ असा दम दिला होता. बायकोला मारल्यानं वस्तीचीसुद्धा बदनामी होते, असं समजावून सांगितलं.
एकदा बचतगटाचे आरोग्य तपासणी शिबीर सुरू होते. त्या वेळी शिबीर उधळून देण्याचा प्रकारही घडला होता. बायको बचतगटाच्या कामात सहभागी होते हे बघून नवरा चिडला. त्याने शिबीर भरलेल्या ठिकाणी येऊन दारू पिऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. शिव्या देऊ लागला. खुर्ची-टेबल आदी वस्तूंची फेकाफेकी आणि मोडतोड सुरू केली. एकूणच धिंगाणा सुरू झाला. त्या वेळी सगळ्या स्त्रियांनी मिळून त्या दारुडय़ा नवऱ्याचा चांगलाच समाचार घेतला. त्याला गावासमोर चोपून काढला. महिलांचं हे रौद्ररूप पाहून गावातली सगळी पुरुष मंडळी घाबरून गेली. आपण दारू प्यायलो तर आपलीही गत ही होईल हे त्यांच्या लक्षात आलं. वस्तीतल्या बचतगटाचं दबावगटात रूपांतर त्यांनी प्रत्यक्ष बघितलं. अशा प्रकारे वेळोवेळी बचतगटाच्या या स्त्रियांनी दबावगट बनून दारूबंदीचा लढा यशस्वी केला. दबाव तंत्राचा यशस्वी अवलंब करून भानगडवाडीचं अवघं रूप बदलून टाकलं.  आता पुरुष सुधारलेत, बायकोला मारणं सोडून दिलंय.. भांडणं थांबलीत..
शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची प्रेरणा घेऊन त्यांनी २००९ मध्ये भानगडवाडीचं नामांतर शिवाजीनगर असं केलं. तिरंगा बचतगटाने केलेली क्रांती पाहून सरकारने त्यांना ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ दिला आहे.
या सगळ्या बदलाबरोबरच बचतगटाचे वस्ती सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, कुटुंब नियोजन, सार्वजनिक शौचालय, स्त्री-भ्रूण हत्या, साक्षरता या क्षेत्रांतही कामे केली आहेत. वस्तीतल्या घरांमध्ये सतत कोणीना कोणी आजारी पडत असल्याचं लक्षात आल्यावर आरोग्य तपासणी शिबीर, एचबी कॅम्प आदी घेतले जातात. लोकांना चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता आणि चांगला आहार याचं महत्त्व सांगितलं जातं. मुला-मुलींना रोज शाळेत जाणं सक्तीचं केलंय. जर कोणी घरी थांबलं तर लक्ष्मी मावशी काठी घेऊन आल्याच हे ठरलेलं. गटातल्या सर्व महिलांनी अक्षरओळख करून घेतलीय. त्या इंग्रजी भाषेतून सह्य़ा करतात. वस्तीत जन्माला येणाऱ्या मुलींचा जन्मदिवस खास साजरा केला जातो. महिला कुटुंब नियोजनासाठी आग्रही आहेत. यंदा गटाच्या दोन महिलांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झालीय.
एकूणच या गावातली स्त्री-शक्ती मुसंडी मारत पुढे चालली आहे. स्वत:बरोबर गावाला बदलण्यासाठी धडपडणाऱ्या या स्त्रिया राजकीय सत्तेत आल्या तर नक्कीच चित्रं वेगळं दिसू शकेल, असा निष्कर्ष काढला तर चुकेल?