स्त्री समर्थ : ‘फॉरेन रिटर्न’ ताई Print

भारती गोवंडे , शनिवार, ३१ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सातवी शिकलेली ती एक साधी गृहिणी. पतीनिधनाचा धक्का सहन न होऊन वर्षभर नुसती झोपून काढणारी. सही करतानाही जिचा हात थरथरायचा ती घराबाहेर पडली आणि तिचे नेतृत्वगुण उजळून निघाले. ‘स्वयं शिक्षण प्रयोगा’च्या माध्यमातून अनेक स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभं करणाऱ्या, सात देशांत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोदावरीची ही समर्थ कहाणी... ‘‘बारा वर्षांपूर्वी मला अमरावतीला कार्यक्रमासाठी जायचं होतं. मी एवढी गोंधळून गेले होते की घरी येऊन सांगितलं, अमेरिकेला चालले आहे. माझी बहीण हसली. तिनं मला अमेरिका आणि अमरावती यातला फरक समजावून सांगितला. कधी काळी आपण अमेरिकेला जाऊ, असं त्या वेळी अजिबात वाटलं नव्हतं. पण गेल्या पाच वर्षांत अमेरिकेबरोबरच सात देशांत मला जाता आलंय. हे सारं घडलं मी ज्या संस्थेत महिलांसाठी काम करतेय त्यामुळेच!’’ हे सांगताना गोदावरी क्षीरसागर यांच्या चेहऱ्यावर आणि स्वरातही आत्मविश्वास असतो.
गोदावरी उस्मानाबाद जिल्ह्य़ातल्या तुळजापूर तालुक्यातल्या गंधोरा या गावात राहणारी. तालुक्यापासून २० किलोमीटरवरचं हे गाव इतर चार गावांसारखंच! गोदावरी गेल्या १५ वर्षांपासून ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ या स्वयंसेवी संस्थेत गावपातळीवर काम करतेय. ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ ही संस्था गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणाचं काम करत आहे. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्य़ांबरोबरच गुजरात, तामिळनाडू, बिहार आणि ओरिसा या राज्यांमध्ये ही संस्था काम करते. बचतगटाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसिक विकास साधणं हे संस्थेचं मुख्य ध्येय.
गोदावरीचं सुरुवातीचं आयुष्य तसं सर्वसामान्य ग्रामीण महिलेसारखंच गेलं. तिचे वडील शिक्षक असूनही तिचं शिक्षण सातवीपर्यंतच झालं. ग्रामीण वातावरणाप्रमाणेच गरजेशिवाय घराबाहेर ती कधी पडली नाही. जेव्हा जायची तेव्हा कोणाला तरी बरोबर घेऊनच. ग्रामीण संस्कृतीप्रमाणे लहानपणीच लग्न झालं. मुलांसह छान संसार सुरू असताना पतीचं अपघातात निधन झालं. तो धक्का इतका जबरदस्त होता की, वर्षभर ती झोपूनच होती. तिचा जीव रमावा म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला माहेरी गंधोऱ्याला परत आणलं. मोठा मुलगा साडेचार वर्षांचा आणि धाकटा तर अवघा एक वर्षांचा होता, पण त्यातही ती रमत नव्हती. तिनं बोलावं, बाहेर पडावं यासाठी तिची आई खूप धडपड करायची, पण उपयोग होत नव्हता. याच वेळी २००० मध्ये त्यांच्या गावात बचतगट तयार
व्हायला लागले. तिची आई एका बचतगटात होती. ती गटाच्या बैठकीला गोदावरीला घेऊन जाऊ लागली. सुरुवातीला बैठकीत गोदावरी नुसतीच बसायची, पण हळूहळू तिला रस वाटू लागला. बैठकीत ‘स्वयं शिक्षण प्रयोग’चे बाळासाहेब काळदाते यायचे. त्यांनी तिला खूप प्रोत्साहन दिलं. गोदावरी शिकलेली आहे. तिनं आपल्या दु:खातून बाहेर पडून काम करावं, असंही त्यांनी सांगितलं. त्याचा परिणाम होऊ लागला. गोदावरी शिकलेली असल्यानं गटाची जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आली. अल्पावधीतच गोदावरी तयार झाली. तिचा आत्मविश्वास वाढला. गावात तिने आपणहून तीन बचतगट तयार केले. तिच्यातील नेतृत्व गुण हेरून संस्थेने तिला बचतगट प्रशिक्षणास बोलवायला सुरुवात केली. तिला परिसर पातळीवरची कार्यकर्ती नेमलं. परिसर म्हणजे दहा गावांचा एक गट. महिलांचे बचतगट तयार करणं, त्यांच्या बैठका घेणं, त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करणं, त्यांचे रेकॉर्ड तपासणं अशी तिची कामं होती. विविध गावांमध्ये जात असल्याने तिथले प्रश्न समजायला लागले. ते कसे सोडवायचे याचं संस्थेकडून मार्गदर्शन मिळायला लागलं. तिच्या कामाला वेग आला. बचतगटाला अधिक अर्थसाहाय्य मिळावं यासाठी संस्थेने महिलांचे महासंघ (फेडरेशन) तयार केले. ‘तुळजापूर तालुका महासंघ’ स्थापनेत गोदावरी सक्रिय सहभागी झाली. महासंघाची ती सचिव झाली. तिच्या परिसरातील बचतगट महासंघाचं अर्थसाहाय्य वेळेवर परत करतील याची ती काळजी घेऊ लागली. याचा परिणाम म्हणजे महासंघाचं जास्तीत जास्त अर्थसाहाय्य मिळायला लागलं. तिचं काम पाहून बँकेनेही ५० बचतगटांना पाच लाखांपर्यंतचं सुरुवातीला कर्ज दिलं. बचतगटांना अर्थसाहाय्य मिळायला लागल्यावर महिलांचे व्यवसाय कसे सुरू होतील यासाठी तिने प्रयत्न केले. याच दरम्यान तिचं कामही केवळ बचतगट बनविण्यापुरतंच मर्यादित राहिलं नाही, तर महिलांचे व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, पाणी, ग्रामपंचायत, कृषी, जलस्वराज्य प्रकल्प, ग्रामस्वच्छता अभियान अशा विषयांवर गोदावरी काम करायला लागल्या. त्यांचं काम ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्य़ांमध्ये काम करते तिथेही वाढलं.
याच काळात संस्थेचं गुजरात, तामिळनाडू या राज्यांत काम सुरू झालं तसं त्या राज्यांमध्येही गोदावरीने महिलांबरोबर काम करायला सुरुवात केली. सात वर्षांत गोदावरीमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. त्या कामाला एक शिस्त आली. महिलांशी संवाद साधणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं यात गोदावरी नेहमीच पुढे राहू लागली. महिलांनाही ती जवळची वाटू लागली.
गोदावरीला पहिल्यांदा परदेशात जाण्याची संधी मिळाली २००७ मध्ये. केनियामध्ये एड्सच्या संदर्भात एक परिषद होती. ग्रामीण भागात एच.आय.व्ही.वर काम करणाऱ्या महिलांचं नेटवर्क असलेल्या ग्रुट्सची ती परिषद होती. तिथं २७ देशांतून ९० महिला प्रतिनिधी निमंत्रित होत्या. त्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं गोदावरीनं. या परिषदेत एच.आय.व्ही. बाधित काही महिला प्रतिनिधीही होत्या. परिषदेत त्यांनी आपले अनुभव सांगितले. साधारणत: या आजाराबद्दल खुलेपणानं चर्चा होत नाही. इथे तर सविस्तर चर्चा चाललेली. गोदावरीला यातून वेगळीच दिशा मिळाली. याच परिषदेत गोदावरीनं महासंघाच्या कामाची माहिती दिली. बचतगटांना अर्थसाहाय्य करणारे महासंघ महिलांच्या विविध समस्यांचं निराकरण करणारं व्यासपीठ बनलं. महिलांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, मानसिक विकास साधणारी यंत्रणा म्हणजे हे महासंघ ही संकल्पना परिषदेतल्या महिलांसाठी नवीन होती. याचाच पुढचा भाग म्हणून ग्रुट्स इंडिया कमिटीची स्थापना झाली. गोदावरी याची सचिव आहे. या कमिटीत महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, बिहार राज्यांतील महिला आहेत. या कमिटीचं गावपातळीवर आरोग्य, कृषी आणि महिला नेतृत्व विकास या विषयावर काम चालतं. यापाठोपाठच श्रीलंकेतल्या परिषदेला जाण्याची संधी गोदावरीला मिळाली. भारत आणि श्रीलंकेत बचतगटांचं काय काम चालतं यावर चर्चा झाली. श्रीलेकेतील महिला रस्त्याची कामं घेतात, सामुदायिक शेती करतात याची माहिती मिळाली. २००८ मध्ये फिलिपिन्समध्ये हुर्यो कमिशनने आपत्ती व्यवस्थापन यावर कार्यशाळा घेतली. यात साऊथ एशियातील १५ देशांचे ७० प्रतिनिधी आले होते. त्यात गोदावरी भारताची प्रतिनिधी होती. या परिषदेत गाव नकाशा आणि आपत्ती व्यवस्थापनेवर भर देण्यात आला. या परिषदेत गोदावरीने महाराष्ट्रातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील भूकंपानंतर १२०० गावांत महिलांनी केलेल्या घरबांधणी आणि दुरुस्ती-मजबुतीकरणाच्या कामाची माहिती दिली. बचतगटाच्या महिला आणि ग्रामपंचायतीच्या महिला प्रतिनिधींनी १५० गावांत काढलेल्या गावसुविधा नकाशाची माहिती दिली. २००९ मध्ये रोममध्ये अन्न सुरक्षा परिषद झाली. त्या परिषदेला जाण्याआधी दहा गावांतल्या १०० महिलांशी चर्चा केली. महिलांना चांगलं अन्न का मिळत नाही याची कारणं शोधली. महिलांचा पेरणीत सहभाग नसतो. नगदी पिकांवर भर, त्यामुळे घरासाठी लागणारं बरेच धान्य खरेदीच करावं लागतं. धान्यविक्रीचे पैसे महिलांच्या हातात पडत नाही. महिलांना मजुरी कमी मिळते. गरिबी, व्यसनाधीनता, आजार हीदेखील कारणं आहेत. हा अभ्यास गोदावरीने परिषदेत मांडला. या साऱ्या चर्चेचा फायदा संस्थेच्या कृषीविषयक कार्यक्रमाची आखणी करताना झाला. या परिषदेपाठोपाठच साऊथ एशिया गटातील देशांची नेपाळला आपत्ती व्यवस्थापन यावर परिषद झाली. श्रीलंका, अफगाण, भारत आणि नेपाळ येथील ५० महिला आल्या होत्या. यात २०० गावांमध्ये स्वनिर्माण गाव प्रकल्पात केलेल्या गावसुविधा नियोजनाची, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली. सोबतच त्सुनामीनंतर तामिळनाडूत आणि गुजरातमध्ये भूकंपानंतर महिला गटांनी केलेल्या कामाची माहिती दिली. या वेळी गावपातळीवर काम करणाऱ्या सात महिलांची एक समिती तयार झाली. यात गोदावरी भारताची प्रतिनिधी आहे. गावपातळीवर येणाऱ्या अनुभव आणि अडचणींची नियमित देवाण-घेवाण केली जाणार आहे. सातजणींमध्ये एक गोदावरी.
गोदावरीचा प्रवास थक्क करणारा आहे. कोणे एकेकाळी बस थांब्यावर हात केला तर बस थांबेल ना? नाही थांबली तर कसं? अशी काळजी करणारी गोदावरी आज दक्षिण आशिया पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतेय. २०११ मध्ये अमेरिकेला महिला परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या समितीत गोदावरी होती. ग्रामीण भागात महिलांबरोबर करत असलेल्या विविध कामांचे अनुभव मांडण्याची संधी गोदावरीला मिळाली. गोदावरीच्या आयुष्यातला हा सर्वोच्च क्षण! कोणे एकेकाळी अमरावती आणि अमेरिकेतला फरकही न समजणारी गोदावरी आज परिसरात ‘फॉरेन रिटर्न ताई’ म्हणून ओळखली जातेय. गोदावरीने आपल्या कामाला सुरुवात केली ते दु:खातून सावरण्यासाठी. कामातल्या प्रत्येक टप्प्यावर संस्थेनं मार्गदर्शन केलं. गोदावरी सांगते, ‘‘संस्थेचे उपमन्यु पाटील आणि विकास कांबळे यांनी कसं बोलायचं? काय सांगायचं? कसं उभं राहायचं इथपासून शिकवलं. त्यामुळेच आज मी अमेरिकेत ठामपणे माहिती देते.’’ संस्थेच्या लीला सोमवंशी गोदावरीच्या कामाचं कौतुक करताना म्हणतात, ‘‘गोदावरी दिलेलं काम आवडीनं करते. मला शक्य नाही, असं ती कधीच म्हणत नाही. कामचुकारपणा, लबाडी तिच्या कामात नसते. आतापर्यंत अनेक महिलांना सक्षमपणे उभे राहायला तिने मदत केली आहे.’’ गोदावरीची जिवाभावाची मैत्रीण जयश्री कदमला गोदावरीच्या परदेशवारीचा अभिमान आहे. ती सांगते, ‘‘गोदावरीला शासकीय योजनांची माहिती कशी घ्यायची त्याची कला
अवगत आहे.गोदावरीमध्ये सहन करण्याची ताकद आहे. एखाद्याने अपमान केला तरी ती तेच धरून बसत नाही. सारं विसरून कामाला लागते.’’ तर, ‘‘जयश्रीबरोबरची मैत्री ही एकमेकींचं दु:ख समजून घेण्यातून झालेली आहे. आज एखादी पिन जरी घ्यायची झाली तरी मिळून घेतो,’’ असं गोदावरी सांगते. जयश्रीकडून आर्थिक नियोजन करायला शिकल्याच गोदावरी सांगते. गोदावरी आपलं दु:ख विसरून काम करतेय हे पाहून तिच्या आईवडिलांना खूप समाधान वाटतंय.
गोदावरीच्या मोठय़ा भावाचा गोदावरीच्या कामासाठी बाहेर जायला सुरुवातीला विरोध होता. ग्रामीण भागात एकटय़ा बाईनं, तेही विधवा, कामासाठी बाहेर जाणं त्याला काळजीचं वाटायचं. पण गोदावरीच्या कामानं अनेक महिलांचं चांगलं होत आहे हे पाहून त्याचा विरोध मावळला. आपल्या बहिणीच्या कामाचा त्याला आता अभिमान वाटतो. गोदावरीच्या मुलांना तिचा खूप अभिमान वाटतो. सुरुवातीच्या काळात मुलांकडे दुर्लक्ष झाल्याची खंत गोदावरीला आहे, पण ते दु:ख उगाळत न बसता मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं गोदावरीचं स्वप्न आहे. गोदावरीला आपल्या अडाणी आईने आपण स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवलं याचा खूप अभिमान वाटतो. संस्थेच्या संचालिका प्रेमा गोपालन यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना गोदावरी सांगते, ‘‘मला जग दाखविणारी, परदेशात काळजी घेणारी ही माझी दुसरी आईच आहे.’’
गोदावरी परदेशात जिथे-जिथे बोलते ते मातृभाषेतून. ते सारं इंग्रजीतून सांगण्याची जबाबदारी संस्थेच्या नसीम शेख उचलतात. परदेश दौऱ्यात त्या मोठय़ा बहिणीसारखी काळजी घेतात, असंही गोदावरी आवर्जून सांगते. आज गोदावरी कोणाही समोर अनुभव सांगायला, प्रशिक्षण द्यायला एक तज्ज्ञ म्हणून जाते. नुकतंच तिनं आणि जयश्रीनं मुंबईत दुसऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींना एक दिवसाचं प्रशिक्षण दिलं. सुरुवातीला सहीसाठी हात थरथरणारी गोदावरी बिनधास्त कोणालाही शिकविते. भविष्यात गोदावरीला महिला आणि मुलींसाठी काम करायचं आहे. आपल्यासारख्या दु:खी महिलेला उभं करण्यासाठी संस्था पुढे आली. संस्थेच्या कामाचा हा वारसा गोदावरीला पुढे चालवायचा आहे.