स्त्री समर्थ : अखंड ऊर्जा Print

डॉ. प्रिया आमोद , शनिवार, ७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘चूल आणि मूल’ या पलीकडे विचारही न केलेली एक गृहिणी. पण पुढे ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झालेला तिचा प्रवास परदेशातील अभ्यासदौऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला.  सिंधुदुर्गातील प्रिया धुरी यांनी  गावात बायोगॅस प्रकल्प आणला आणि गावाचा चेहरामोहराच पालटून गेला. अखंड ऊर्जा असणाऱ्या प्रियाने रानबांबुळीचा कायापालट करायला सुरुवात केली आहे.. तिच्याविषयी...
विकासाची संधी मिळाली की इच्छाशक्तीच्या जोरावर एक सामान्य स्त्रीही गावाचा कायापालट कसा करू शकते याचं उदाहरण म्हणजे रानबांबुळीच्या प्रिया गोविंद धुरी. रानबांबुळी हे अडीच हजार लोकवस्तीचं, नऊ वाडय़ांचं गाव. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ओरोसपासून दीड किलोमीटरवर वसलेलं . ते प्रियाचे सासर आणि माहेरही. दहावी झाल्यानंतर प्रियाचे लग्न गावातल्याच गोविंद धुरी यांच्याशी झाले. मुले, घर या व्यतिरिक्त दुसरे जग प्रियाला माहीत नव्हतं. २००७ साली गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. महिला आरक्षणामुळे प्रियाला ग्रामपंचायत सदस्य होण्याची संधी आली. गावातील या चुणचुणीत मुलीला गावकऱ्यांनी बिनविरोध निवडून दिले. तोवर रानबांबुळीच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोणती स्त्री गेली नव्हती. प्रियाने नियमितपणे ग्रामपंचायतीत जाऊन बसायला सुरुवात केली. साहजिकच गावातल्या इतर महिला निश्िंचतपणे ग्रामपंचायतीत यायला लागल्या. प्रियाने त्यांना विविध योजनांची माहिती द्यायला सुरुवात केली. बैठकीच्या निमित्ताने प्रियाचे तालुक्याला जाणे-येणे वाढले. तिथे तिला बायोगॅसबद्दल माहिती मिळाली. आसपासच्या इतर गावातील महिलांनी बायोगॅसचे फायदे सांगितल्यावर आपल्या गावात बायोगॅस आणायचे प्रियाने नक्की केले. रानबांबुळीच्या आजूबाजूचे जंगल संपले होते. कारण मुंबई, सिंधुदुर्गच्या लोकांनी जागा विकत घेऊन घरे बांधली होती. त्यामुळे गावातील स्त्रियांना लाकूडफाटा आणायला दूर जावे लागत असे. प्रियाने बायोगॅसचा प्रस्ताव गावातील महिलांसमोरील ठेवल्यावर सुरुवातीला कुणी तयार होईना. प्रियाने बायोगॅसचे फायदे सांगितले. शेवटी पाच जणींनी तयारी दर्शवली. त्यांच्याकडे बायोगॅस बसवल्यावर मात्र महिला सुखावल्या. पूर्वी घरी कुणी पाहुणा आल्यावर लाकडे जाळून चुलीवर चहा करायला वेळ लागत असे, आता पटकन चहा होतो आणि पाहुण्यांच्या बरोबर बोलायला मिळते म्हणून खूश झाल्या. गावातील इतर जणींना बायोगॅसचे फायदे सांगू लागल्या. सगळेजण बायोगॅस लावायला लागल्यावर, दरवेळी गावाबाहेरून गवंडी आणावा लागायचा. प्रियाने गावातील गवंडय़ांना बायोगॅस बांधायचे ट्रेनिंग दिले. गावातले पैसे गावातच राहू लागले. आज रानबांबुळीमध्ये प्रत्येक घरात बायोगॅस आहे.
प्रियाने ग्रामसभा घेतल्या जाव्यात यासाठी सुरुवातीपासूनच आग्रह धरला. त्यामुळे आता नियमितपणे ग्रामसभा  होऊ लागल्या आणि महिलाही येऊ लागल्या. प्रश्न विचारू लागल्या, माहिती करून घेऊ लागल्या. माविमच्या योजनेंतर्गत गावात धोबीकट्टा बांधण्यासाठी प्रियाने पुढाकार घेतला. गावात मध्यभागी आज धोबीकट्टा आहे, त्यामुळे महिलांचा धुणे धुवायला दूर जाण्याचा त्रासही वाचला.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रिया खूप मनापासून काम करीत होती. त्याच वेळी तिला बचत गटांबद्दल माहिती मिळाली. आपल्याही गावात बचत गट तयार करायचे असे प्रियाने ठरवले. पण हे तेवढे सोपे नव्हते. बचत गटाची संकल्पना सांगण्यापासून सुरुवात करायला लागणार होती. आपले पैसे असे कुणाजवळ तरी ठेवायला द्यायला महिला तयार नव्हत्या. ‘आमका फसवतलं तुम्ही’ असे म्हणायच्या. तेव्हा प्रियाने शांतपणे त्यांना बचत गटात पैशांचा हिशेब कसा ठेवला जातो, पैसे इकडे-तिकडे जाऊ शकत नाहीत हे समजावले. त्यानंतर २००८ मध्ये ‘अष्टविनायक महिला बचत गट’ जन्माला आला, तेरा जणी, त्यामध्ये प्रतिमा जुवळेकर आणि सविता कावले या दोघी प्रौढ महिला, बाकी सगळ्या जणी तिशी-पस्तिशीच्या. प्रतिभा जुवळेकर म्हणजे प्रियाच्या आई, त्यांना सांधेदुखीचा विकार आहे. झोपून असतात. आपल्या औषधोपचाराचे पैसे आपण मिळवले पाहिजेत या जिद्दीने थोडे उठत-बसत त्या लोकरीचे रुमाल, गणपती बनवतात आणि बचत गटाकडे विक्रीसाठी देतात.
प्रियाच्या बचत गटाने सुरुवातीला खास कोकणी खाद्यपदार्थ बनवायला सुरू केले. मालवणी खाजा, कुळीथ पीठ, वडय़ाचं पीठ, घावन पीठ, मिरचींचे सांडगे, उकडय़ा तांदळाचे लाडू असे एकेक पदार्थ प्रत्येकीने वाटून घेतले आहेत. सगळ्या जणी तर हे पदार्थ विकायला बाहेर पडू शकत नाहीत. पॅकिंग, लेबलिंग असे शासनाचे ट्रेनिंग सगळ्यांनी घेतले आहे. मार्केटिंग करायला प्रिया बाहेर पडली. ‘मी आमच्या मैत्रिणींना सांगितले आहे. तुम्ही क्वालिटीचा माल तयार करा. माझे बोलणे वाया जाता कामा नये. काय आहे, गिऱ्हाईक बघून पुडी बांधावी लागते. एखादे गरीब गिऱ्हाईक आले तर त्याच्यासाठी मी पाच रुपये कमी करते. त्याच्याही तोंडात आपला माल पडला पाहिजे.’’ प्रिया विक्रेत्याच्या कौशल्याने सांगत असते, तेव्हा कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीनेही आपले पदार्थ खाल्ले पाहिजेत, अशी तळमळ त्यामागे असते. आजपर्यंत ती कुडाळ, मालवण, सिंधुदुर्ग महोत्सव, ठाणे, कोल्हापूर इथे भरलेल्या प्रदर्शनात आपल्या बचत गटाच्या मालाची विक्री करून आली आहे. अलीकडेच तिने शाासनाचा तामिळनाडूचा अभ्यासदौराही पूर्ण केला. तामिळनाडूतील अनुभव तिने ग्रामसभेत सांगितले. तिकडच्या महिला आपल्यापेक्षा खूप प्रगतीशील असल्याचा अनुभव सांगते. तिथल्या अशिक्षित स्त्रियांनी मोठमोठय़ा संस्था चालवल्या आहेत, संगणकावर त्या काम करतात, हे पाहून आपणही आणखी प्रगती करावी असे तिला वाटते.
‘अष्टविनायक बचत गट’ फक्त स्वत:पुरता विचार करत नाही तर गावातील सर्वच महिलांच्या प्रश्नांचा विचार करतो. कावलेवाडीतील एका मुलीला दहावीनंतर परिचारिकेचे प्रशिक्षण घ्यायचे होते. परंतु तिचे वडील तयार नव्हते. बचत गटाने मुलीच्या घरी जाऊन तिच्या वडिलांचे मन वळवले आणि तुमच्या मुलीच्या पुढील शिक्षणाचा खर्च बचत गट करेल असे सांगितले. पुढे मुलीच्या वडिलांनी त्या मुलीला मुंबईला स्वत:च्या खर्चाने शिकायला पाठवले.
अष्टविनायक बचत गटाने गतवर्षी डिसेंबरमध्ये रवळनाथाच्या जत्रेत ‘स्त्री-भ्रूण हत्ये’च्या समस्येवर अर्धा तासाचे नाटक बसवले. मूक नाटक. या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला. आयुष्यात कधीही स्टेजवर न गेलेल्या या महिलांनी स्वत:च चर्चा करून, ठरवून हे नाटक केले. इतकेच नाही तर जेव्हा त्या दापोलीला ट्रेनिंगला गेल्या होत्या तेव्हा तिथेही हे नाटक सादर केले.
प्रिया आणि तिच्या बचत गटाने शासनाकडून कर्ज घेऊन अडीच लाख रुपयांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्येकीकडे पंचवीस कोंबडय़ा आहेत. त्यातून प्रत्येकीला महिन्याकाठी दीड-दोन हजार रुपये मिळतात. आतापर्यंत गटाने १ लाख ८० हजार रुपये फेडूनही टाकले आहेत.
आवळा कॅण्डी, नाचणीचा चिवडा, मालवणी मसाला, पपईपासून टट्री फ्रुटी असे नवे पदार्थही आता बचत गट तयार करू लागला आहे. प्रियाने खटपट करून गावातील निराधार महिलांना पेन्शन मिळवून दिली आहे. अलीकडेच शासनाने त्यांच्या बचत गटाला रेशनधान्य दुकानाची मंजुरी दिली आहे. ‘‘गावात दुकान आले तर बरे होईल. असं त्यांना वाटतंय कारण  सध्या त्यांना चार किलोमीटर दूर जाऊन पडवे येथून धान्य आणावे लागते. वीस रुपयाच्या तांदळासाठी शंभर रुपयाचा वाहन खर्च करावा लागतो. गावात जर दुकान आलं तर ते पैसे वाचतील.’’ प्रिया सांगते. तिच्या पुढाकारामुळे रानबांबुळी गावात क्रांती महिला बचत गट, पुरुषांचा रवळनाथ बचत गट सुरू झाला आहे. त्यांनी दुग्धव्यवसाय केला आहे.
प्रियाच्या या नुकत्याच सुरू झालेल्या प्रवासात पती गोविंद धुरी आपला सेंट्रिंगचा व्यवसाय सांभाळून साथ देतात. आठेक दिवसांपूर्वीच प्रियाला शासनाकडून थायलंडच्या अभ्यासदौऱ्यावर जाणार का? असे विचारण्यात आले. प्रियाच्या कर्तृत्वाचे क्षितिज आता विस्तारू लागले आहे. ‘आपल्या गावाने मागे राहता कामा नये’ या एकाच जिद्दीपायी ती कार्यरत झालेली आहे. बचत गटात पैसे दिले तर पैसे बुडतील की काय, अशी शंका घेणाऱ्या रानबांबुळीच्या महिला आज ‘आपलो पैसा खय जावचो नाय’ या विश्वासाने निर्धास्त झाल्या आहेत. प्रिया गोविंद धुरी या अखंड ऊर्जा असणाऱ्या बाईने रानबांबुळीचा कायापालट करायला सुरुवात केली आहे. आता आभाळच तिची मर्यादा बनले आहे.       

तुम्हीही कळवू शकता तुमच्या गावातील सामथ्र्यवान स्त्रीची वा स्त्रियांची माहिती. बचत गटाच्या माध्यमातून असो की वैयक्तिकदृष्टय़ा कर्तृत्व गाजवलेली स्त्री असो, आम्हाला कळवा. गावासाठी काही एकत्रित उपक्रम राबवले असतील तर आम्ही प्रसिद्धी देऊ तिच्या, त्यांच्या यशोगाथेला. आम्हाला कळवा- संपर्क - (०२२) २७६३९९३१ किंवा ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it