स्त्री समर्थ : संघर्षांचं मोल Print

altप्रतिभा गोपुजकर , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमाहेरचा आधार नाही आणि सासरच्या मंडळींची सोबत नाही, यामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्या शारदाने पुढे प्रगतीची अनेक शिखरं पार केली. बचत गटाचे काम, त्यातील सगळी लिखापट्टी, दीपशिखाचे प्रशिक्षण घेऊन किशोरी गटाचे काम, दीपशिखा प्रकल्पात  प्रेरिका म्हणून काम, ‘स्पर्श, मुंबई’ या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची ‘ट्रेनर’(प्रशिक्षक) अशा विविध भूमिका आणि घरात कर्त्यां व्यक्तीची जबाबदारी घेणाऱ्या शारदा साखरे या समर्थ स्त्रीचा हा संघर्षमय प्रवास...
लातूर जिल्ह्यातील रेणापूरपासून दहा किलो मीटर अंतरावरील खरोळा या गावी एकत्र कुटुंबात शारदाचा जन्म झाला. आजोबा-आजी, आई-वडील, तीन काका-काकू, चुलत भावंडे यांच्यासमवेत सख्खे दोन भाऊ व चार बहिणी असा मोठा परिवार होता. काका शिकलेले, नोकरी करत असल्याने त्यांना घरात खूप मान होता. त्यांची बायका-मुले सुखी, समाधानी आयुष्य जगत होते. शारदाचे आई-वडील मात्र अशिक्षित. घरची चार एकर शेती वडिलांच्या गळ्यात. घरात राहणाऱ्यांना शेतावर काम करावेच लागायचे. मुलींच्या शिक्षणाचं काहीही सोयरसुतक शारदाच्या वडिलांना नव्हते. पण आईला मात्र आपल्या मुलींनी खूप शिकावं, असं मनोमन वाटायचं. तिने शारदाला शाळेत घातलंही. शारदालाही शाळा मनापासून आवडत होती. गणिताशी तिची गट्टी जमली. वक्तृत्व स्पध्रेत भाग घेणेही तिला आवडू लागले. यातून तिच्या बुद्धिमत्तेची चुणूक जाणवून येत होती. पण शारदा सातवीची परीक्षा पास झाली आणि तिला शाळेला राम राम ठोकावा लागला.
शारदाच्या मोठय़ा बहिणीचं सुमाठाणा गावच्या मुलाशी लग्न झाले. ती पंधरा वर्षांची तर शारदा तेरा वर्षांची. लगेचच सगळ्यांचे लक्ष शारदाच्या लग्नाकडे लागले. चार मुलींची लग्ने उरकायची होती ना! लवकरात लवकर शारदाचे लग्न उरकून टाकायचे असा निर्णय थोरल्या काकांनी घेतला. एवढंच नाही तर शारदाच्या नकळत, तिला न सांगता तिचं लग्न तिच्या आत्याच्या मुलाबरोबर ठरवूनही टाकले. शारदा शाळेतून आल्यावर तिला ही बातमी कळाली. शाळेत जात असल्यानं शारदाला एवढं माहीत होतं की, मुलगी अठरा वर्षांची होण्याआधी तिचं लग्न करू नये आणि ती तर केवळ तेरा वर्षांची होती. बरं लग्नही ठरवलं तेसुद्धा तिला न आवडणाऱ्या मुलाबरोबर. तिच्या आत्याचा हा मुलगा अलीकडे त्यांच्याच घरी राहायला होता. त्या दोघांचे कधीही पटायचे नाही. आपले शिक्षण थांबणार आणि न आवडणाऱ्या मुलाबरोबर लग्न होणार असा दुहेरी घाव तिला सहन करावा लागत होता. तरी या लहान वयात नव्या साडय़ा, दागिने यांनी तिचे बालमन थोडे सुखावले.
वयाने लहान असल्यानं, लग्नानंतरही शारदा काही दिवस माहेरीच होती. रडतखडत का होईना तिची सातवीही पूर्ण झाली. आणि तिची रवानगी सासरी झाली. संसार सुरू झाला पण त्यात आनंददायी काहीच नव्हतं. शाळा बंद झाल्याने मन खिन्न झालं होतं. सासूची बोलणी आणि नवऱ्याचा मार खातच दिवस जात होते. सासरे व्यसनी, ते दारूच्या नशेतच असायचे. नवरा दिवसभर घरी बसून असायचा, त्याच्या नोकरीधंद्याचा अद्याप पत्ता नव्हता. अनेक व्यसनं असल्यामुळे कामधंदा कोण देणार? शारदा तब्बेतीने चांगली होती. तिने बारीक व्हावं, म्हणून घरात सगळे जिन्नस कडीकुलपात ठेवलेले असायचे. तिला पोटभर खायचीही चोरी होती. घरचं सारं काम आवरून तिला शेतीची कामं व मोलमजुरीही करावी लागे. इथेही चार एकर शेती होती पण माहेरच्यासारखा काकांच्या नोकरीच्या उत्पन्नाचा आधार नव्हता. पंधराव्या वर्षी दुसऱ्याच्या शेतात केलेल्या उसाच्या तोडणीची ढोर मेहनत शारदाच्या अजून पक्की स्मरणात आहे. कधी कधी अतिरेक व्हायचा अन् शारदाच्या मनात आत्महत्येचा विचार यायचा. वयाच्या सोळाव्या वर्षी तिला पहिला मुलगा झाला. त्याच्या रूपाने तिला जगण्याची नवी उमेद मिळाली. आपल्याला आयुष्यात जे जे करता आलं नाही ते ते सर्व त्याला मिळवून द्यायचं असा निश्चय तिने केला.  
तिच्या शाळेतील मुख्याध्यापकांचा, कुटवाड सरांचा तिच्यावर जीव होता. इतक्या हुशार मुलीचं आयुष्य वाया जाऊ नये, असे त्यांना मनापासून वाटत होते. मरणानं समस्या सुटू शकत नसल्याचं त्यांनी तिला परोपरी समजावलं. मग तिलाही ते पटलं. शारदाचं शिक्षण पुढे चालू राहावं म्हणून कुटवाड सरांनी खूप प्रयत्न केले. ते शारदाच्या वडिलांना भेटले तर सासरी गेलेल्या मुलीबाबत मी काही निर्णय घेणार नाही, असे सांगत तिच्या वडिलांनी कानांवर हात ठेवले. मग कुटवाड सर शारदाच्या सासऱ्यांना भेटले. शारदाला शिकविण्याचे फायदे त्यांनी तिच्या सासऱ्यांना सांगितले. शाळेत पाठवायचं नसेल तर बाहेरून परीक्षा द्यायला लावू, त्यासाठी तयारी करून घेण्याची जबाबदारी सरांनी स्वीकारली. तिला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली, कपडेलत्तेही पुरविले. त्यांच्या या उपकारांचे शारदाने पुरेपूर चीज केले. घरची कामं आवरून, घरच्या घरीच अभ्यास करून तिने दहावीची परीक्षा दिली व ७६ टक्के मिळवून यशाच्या दिशेने खरा श्रीगणेशा केला.
घरात कुणी साथ देत नव्हतं, माहेरचा भक्कम आधार नव्हता. बहिणी त्यांच्या त्यांच्या सासरी बऱ्या स्थितीत होत्या. त्या माहेरी गेल्या की त्यांची कौतुके व्हायची. शारदाला मिळणारी डावी वागणूक तिच्या डोळ्यात टिपे आणायची. माहेरच्यांनीच करून दिलेले लग्न आणि त्यांनीच दिलेली वाईट वागणूक, ‘आई जेवू घालीना..’ मग काय करणार! सासरची गाऱ्हाणी सांगणेही मुश्कील, सासू ही वडिलांची सख्खी बहीण, ते काही ऐकूनच घ्यायचे नाहीत. अशा परिस्थितीत शारदाला ‘मानव प्रेरणा संस्था’ या संस्थेने घराबाहेर पडण्याची संधी दिली. या संस्थेचे सुरेश खुलारी यांनी खूप मदत केली. त्यांनी शारदाला स्वयं साहाय्यता गटाची (एसएचजी) सदस्य करून घेतले. या गटाच्या आíथक बचतीचे हिशेब ठेवण्याचे, इतर कागदपत्रे तयार करण्याचे काम हळूहळू तिच्यावर सोपविले. शारदाने ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. सुरुवातीला शारदाला या कामाचे शंभर रुपये मिळत, पण तिच्या गरीब घराला या पशाचेही आकर्षण होते. तशी बाकी कोणाची साथ नव्हती तरी तिच्या सासऱ्यांनी आता तिला पािठबा दिला. महिलांचे सहा गट स्थापन करून देण्याचे संस्थेने दिलेले आव्हान शारदाने स्वीकारले. गावोगावी फिरून शारदाने महिलांच्या सभा घेतल्या, स्वयं साहाय्यता गटाची माहिती सांगितली आणि जिद्दीने सहाच नव्हे तर सात गट स्थापन केले. या वेळी आजूबाजूच्या गावात जाताना शारदाचे सासरे तिच्याबरोबर होते. मिळालेल्या या संधीचा फायदा घेऊन शारदा स्वयं साहाय्यता गट कार्यकर्ती म्हणून काम करू लागली. पहिल्यांदाच बाहेरचे जग पाहावयास मिळाले. तिचा पगार आता तीनशे रुपये झाला. आता घरच्यांचेच नव्हे तर तिच्या माहेरच्यांचेही डोळे उघडले. कोणताही निर्णय घेताना शारदाच्या मताचा मान राखला जाऊ लागला. आता ती आपला ‘मुलगाच’ आहे असे तिचे वडील म्हणू लागले. फक्त तीनशे रुपयांच्या नोकरीने शारदाच्या आयुष्यात किती मोठा फरक घडवून आणला.
‘एसएचजी’ कार्यकर्ती म्हणून मनापासून काम करत शारदाने खूप प्रगती केली. लवकरच ती क्षेत्र समन्वयक झाली अन् २१ गावांमध्ये काम करण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. घरात लहान मूल, त्रास देणारी सासू आणि साथ न देणारा नवरा या परिस्थितीतून बाहेर पडत तिने हे काम यशस्वी करून दाखविले. आता सासऱ्यांचे व्यसन थोडं आटोक्यात आलं होतं.सर्व प्रकारचा विरोध पत्करून शारदाने आपले काम नेटाने चालूच ठेवले.
आपलं शिक्षणाचं स्वप्नही पूर्ण करण्याचं तिने ठरवलं. कामं करता करता शिकून शारदा हिंदी विषय घेऊन बी.ए. झाली. ती स्वयं साहाय्यता गटाचे काम करत असताना बँकेच्या मॅनेजर साहेबांनी बोर्डे यांनी तिचा आवाका पाहिला. शारदा बरीचशी त्यांच्या नुकत्याच दिवंगत झालेल्या मुलीसारखीच दिसत असल्याने त्यांना तिच्याविषयी ममत्व वाटले. त्यांनी तिचं कामही पाहिलं. घरोघरी दूध पोहोचवण्याच्या महिला गटाच्या व्यवसायासाठी तिने केलेल्या कर्जासाठीच्या अर्जाचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला. सुरुवातीला तिचे काम सातत्याने तपासले आणि तिची तडफ, प्रामाणिकपणा, गटातील बायकांना सांभाळून घेण्याचा तिचा गुण हे सारे लक्षात घेऊन तिला प्रोत्साहनही दिले. कामाचा तिचा झपाटा त्यांना चांगलाच जाणवला. बचत गटाचे काम, त्यातील सगळी लिखापट्टी, दीपशिखाचे प्रशिक्षण घेऊन किशोरी गटाचे काम, घराची जबाबदारी, कर्त्यां पुरुषाच्या वरताण असणारी ही शारदाची तडफ पाहून ते फारच प्रभावित झाले. त्यांनी तिच्या गटासाठी कर्ज मंजूर केलं व गटाचा आर्थिक पाया रचला गेला. तिच्या कर्तृत्वाची कीर्ती आता आजूबाजूच्या भागात चांगलीच पसरली. राजकीय कार्यकर्त्यांना ती आपल्या पक्षात यावी असं वाटू लागलं. निवडणुका तोंडावर आल्या तसे तिने आपल्यासाठी काम करावे म्हणून वेगवेगळ्या पक्षांकडून तिला धनादेशही पाठवले जाऊ लागले. मात्र, संस्थेच्या सुरेश सरांनी इथेही तिला योग्य सल्ला दिला. समाजकार्य करताना कोणत्याही राजकीय पक्षाची ताबेदारी पत्करायची नाही, हे त्यांनी तिला छान पटवून दिले.
आता शारदाला तीन मुलगे आहेत, ते अनुक्रमे आठवीत, पाचवीत आणि तिसरीत शिकताहेत. त्यांना खूप शिकवून मोठे करणे हे आई म्हणून शारदा आपलं परम कर्तव्य मानते. सासऱ्यांनी थोडी शेती विकली होती तरी तीन एकर अजून बाकी आहे. आता तिने नवऱ्याचं मन शेतीची कामं करण्याकडे वळवलं आहे. किराणा मालाचे दुकानही सुरू केलंय. सासूला बांगडय़ांचा व्यवसाय चालू करून दिलाय. त्यामुळे घराची घडी आता व्यवस्थित बसलीय.
स्वयं साहाय्यता गटाचे काम करतानाच शारदाने दीपशिखा प्रकल्पाचे प्रशिक्षणही घेतले होते. प्रेरिका म्हणून गावातील किशोरींचा वर्गही चालविला होता. ‘स्पर्श, मुंबई’ या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची, प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी जेव्हा जाहिरात आली तेव्हा शारदाच्या मत्रिणीने, रेणुकाने तिला गळ घातली, अर्ज करायला लावला. शारदा लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली. स्पर्शच्या संचालकांनी तिची मुलाखत घेतली,  तिच्या क्षमतांची पारख करून संस्थेने तिची ‘ट्रेनर’(प्रशिक्षक) म्हणून निवड केली. या कामासाठी शारदा जेव्हा कोल्हापूरला गेली तेव्हा तिच्या मनात थोडी धाकधूक होती, पण त्या शिक्षकांनीच जेव्हा तिच्या शिकवण्याच्या पद्धतीचे कौतुक केले तेव्हा शारदामधला आत्मविश्वास आणखी वाढला.
आजमितीस शारदा वेगवेगळ्या विषयांवर शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग घेते, मग ते गावातील सूक्ष्म नियोजन असो, किशोरींसाठी दीपशिखा प्रशिक्षण असो, बालहक्कांविषयीचे प्रशिक्षण असो किंवा कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा (२००५) याबाबतचे प्रशिक्षण असो, आज शारदा लातूर जिल्हाभर फिरून काम करतेय. दोन्ही घरचा विरोध केव्हाच मावळलाय. एकेकाळी आत्महत्येचा विचार करणाऱ्या शारदाने आयुष्याला सामोरं जात स्वकर्तृत्वाच्या जोरावर, आपलं आयुष्य घडवलं. तिने दु:ख कुरवाळण्यापेक्षा इतरांनाही उभं केलं. तिच्या या संघर्षमय जीवनाचा अध्याय अनेकींना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.