स्त्री समर्थ : जंगलाची राणी Print

altप्रा. सुजाता कुळकर्णी , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कर्जत तालुक्यातील एका आदिवासी पाडय़ापासून कामाला सुरुवात करून थेट दिल्लीहून आपल्या कार्याला दाद मिळवणाऱ्या ठमाताई. आदिवासी समाजाला जागृत करणं, शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं यासाठी त्या कष्ट करताहेत. आदिवासी समाजात सामूहिक विवाहाची सुरुवात करणाऱ्या, विविध जिल्ह्य़ांत वसतिगृहांचं काम पाहणाऱ्या, आदिवासी समाजाला जंगलचा राजा बनवणाऱ्या ठमाताई पवार या समर्थ व्यक्तिमत्त्वाविषयी... माळरानावर वाऱ्या-पावसाचे उद्दाम आघात झेलत एखादं रोपटं मातीत पाय रोवून उभं राहतं, वाढतं आणि तेच पुढे किलबिलणारी अनंत घरटी आपल्या कवेत सावरत थकल्या-भागल्या पांथस्थांना छायेचे तृप्त क्षण देणारा वटवृक्ष होतं. अगदी अशाच साक्षात आधारवडाची अनुभूती आपण घेतो ती ठमाताई पवारांना भेटल्यावर!
महाराष्ट्र राज्याच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या विश्वस्त मंडळावरील एक सक्रिय सभासद म्हणून ठमाताई कार्यरत आहेत. आदिवासी कातकरी समाजात जन्माला आलेल्या ठमाताईंचं रायगड जिल्ह्य़ातील कर्जत गावापासून जवळच असणारं गौरकामत गाव हे राहण्याचं ठिकाण आणि तिथून नजीकच्या अंतरावरच्या जांभिवली गावातील ‘वनवासी कल्याण आश्रम’ ही कर्मभूमी आहे.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेला, डोंगरकपारीत राहणारा, जंगलाच्या साधन-सामग्रीवरच गुजराण करणारा; पण अंधश्रद्धा, अज्ञान, अन्याय, दारिद्रय़, व्यसनाधीनता, अज्ञानाच्या गत्रेत अडकलेला असा आदिवासी समाज भारताच्या कानाकोपऱ्यात विखुरलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अस्थिर जीवनशैली, वेठबिगारी, गुन्हेगारीचा पिढय़ान् पिढय़ा माथी लागलेला कलंक यांच्या ससेमिऱ्यातून त्याची सुटका तशी अवघडच. अशा आदिवासींना भूमिहीन करू पाहणारे धनिक आणि त्यांना सुखद जीवनाची लालूच दाखवत धर्मातरासाठी प्रवृत्त करणाऱ्या धर्माध शक्ती त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालीत आहेत. ठमाताईंचं जीवन याच प्रवाहातील होतं.
वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सावत्र आईचा जाच होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं. प्रेमळ सासू आणि समजूतदार पती ही त्यांच्या आयुष्यातील जमेची बाजू; परंतु लग्नासाठी सासूबाईंनी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी कित्येक र्वष त्यांना काबाडकष्ट करावे लागले, याचं शल्य त्यांच्या मनात होतं.
कंदमुळांवर उपजीविका होईना नि खायला अन्न मिळेना, अशा अवस्थेत त्यांच्या कमवत्या सासूबाई विवेक पाटील (आजचे ‘बेळगाव तरुण भारत’चे संपादक) यांच्या घरी भांडी घासण्याचं काम करीत होत्या. एक दिवस सासूबाईंच्या पायावर पाण्याने भरलेला हंडा पडून दुखापत झाली. त्यांचं कामासाठी बाहेर पडणं अशक्य झालं. कमवतं माणूस घरात बसलं तर दिवस कसे रेटायचे, या विवंचनेत असताना विवेक पाटलांनी ठमाताईंना सासूबाईंच्या जागी काम करायला बोलावलं.
सासूबाई आणि ताईंचं नातं प्रेमळ आई आणि मुलीसारखंच. त्यांनी ताईंना प्रेमानं वाढवलं, अगदी इतर नातेवाईकांची कडवट बोलणी ऐकूनही. सासूच्या मायेच्या छायेत लाडाने वाढणाऱ्या ताईंना कष्टाच्या कामाची सवय नव्हती. सासूबाईंच्या आजारपणानं कामाची जबाबदारी अचानक ताईंवर येऊन पडली. सासऱ्यांचं छत्र हरपलेलं, पती तुटपुंजा मजुरीवर आणि त्यात पदरात दोन मुलं म्हणून धीटाई करून ताई घराबाहेर पडू लागल्या. विवेक पाटील वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकत्रे होते. त्यांच्या परिचयामुळे पुढे ताईंचा आश्रमाशी संबंध आला.
विवेक पाटलांचं कुटुंब सोलापूरला निघून गेल्यावर ताईंना आश्रमात भाकऱ्या करण्याचं काम मिळालं. गरिबीच्या चटक्यांनी पोळलेल्या ठमाताईंच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला तो वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकत्रे डॉ. गोपाळ कुंटे आणि त्यांच्या पत्नी शकुंतला कुंटे यांनी. आदिवासींच्या विकासाबाबत कार्यकर्त्यांमधील चर्चा, आश्रमाला भेट देणाऱ्या विविध मंडळींशी कुंटेकाकांच्या होणाऱ्या गप्पा, आदिवासी पाडय़ांवरच्या समस्यांबाबत कुंटे दाम्पत्याचे होणारे संवाद ठमाताईंच्या कानांवर पडत. आदिवासींच्या समस्या, त्यावरच्या उपाययोजना, त्या संदर्भातील उपक्रम या विषयांवरच्या चर्चा ताई मन लावून ऐकू लागल्या. पाडय़ांवरची घरं सुखी राहावीत म्हणून कुंटे काका-काकूंची चाललेली धडपड पाहून आपणही आपल्या समाजासाठी काही तरी केलं पाहिजे ही ऊर्मी ताईंच्या मनात निर्माण झाली.
ठमाताईंच्या कार्याला खरी सुरुवात झाली ती कुंटे काकूंच्या पोथ्या पठणाच्या आणि भजनाच्या एकमेव श्रोत्या म्हणून! आदिवासी महिलांना एकत्र आणावं, त्यांच्याशी संवाद साधावा हा खरा भजनांमागचा उद्देश होता. भजनं ऐकणारी ‘एकली बाई’ बघून कुतूहल म्हणून इतरही महिला येऊन बसू लागल्या. भजनांच्या माध्यमातून ठमाताईंना दोन हेतू साधायचे होते, एक म्हणजे शिक्षणाचं महत्त्व समजावून देणं. कारण या समाजातला तो लग्नासाठी कर्ज काढतो आणि त्याची परतफेड दोन मुलं होईपर्यंत करत असतो. त्याच्याकडूनही कर्ज फिटलं नाही तर मुलांना ते फेडण्यासाठी राबवलं जातं.
वडवू पिकतो त्यात कावळा काकतो ।
काय मागतो? पखा मागतो ।
पखा कशाला? बायकू कराया ।
बायकू कशााला? पोरं व्हायला।
पोरं कशााला? बा म्हणाया ।
नही नही पाटलाच्या येठीला ।
‘सामुदायिक विवाह’ हा त्यावरचा त्यांना सुचलेला एक उत्तम मार्ग होता. आज शासकीय मदतीने आदिवासींचे सामुदायिक विवाहाचे कार्यक्रम पार पडतात, पण त्याचं श्रेय ठमाताईंना आहे हे विसरून चालणार नाही.
जना ही ताईंच्या गौरकामत गावातील एक अपंग मुलगी. आपलं सुख-दु:ख मांडण्याचं तिचं एकमेव ठिकाण म्हणजे ताईच. जनाचं पूर्ण कुटुंब व्यसनाधीन आणि कर्जबाजारी झालं होतं. अशा वेळी तिच्या लग्नासाठी कर्ज काढणं घरच्यांना अशक्य होतं. म्हणून घरचे तिच्या लग्नाचा विषय टाळत होते. अपंग म्हणून उभं आयुष्य काढणं अवघड आणि मनाजोगा वर असला तरी लग्न होणं मुश्कील. अशा परिस्थितीत जनानं आपलं मन ताईंपाशी मोकळं केलं. ताईंनी कुंटे काकूंजवळ जनाचं दु:ख मांडलं. त्यांच्या अनुमतीने त्यांनी जनाचं लग्न आश्रमातच लावायचं ठरवलं. कुंटे काका-काकूंच्या आधारानं त्यांनी चहा, साखर, साडी, फुलं, मुंडावळी अशा वस्तू जमवल्या आणि सोहळा पार पडला. ताईंच्या रूपाने आज जनाला जिव्हाळ्याचं माहेर मिळालं आहे. यानंतर अनेक मुलींना असं जिव्हाळ्याचं माहेर ताईंनी दिलं.
मुळात कोणताही धर्म वाईट गोष्टी शिकवत नाही. धर्म म्हणजे जगण्याची
पद्धत. ज्याला त्याला आपल्या पद्धतीने जगू द्या आणि दुसऱ्याच्या धर्माचाही आदर करा, असे ताई सांगतात. कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता ठमाताईंच्या
विचारांत आधुनिकता आहे.
जीवनातल्या कटू अनुभवांप्रमाणे काही सन्मानाचे क्षणही ताईंनी अनुभवले. त्यांच्या कार्याची दखल काही समाजसेवी संस्थांनीच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारनेही घेतली. पुणे सहकारी बँकेचा कृतज्ञता व्यक्त करणारा पुरस्कार,
व्ही. शांताराम पुरस्कार, रायगड जिल्हा परिषदेचा हिरकणी पुरस्कार अशा महत्त्वपूर्ण पुरस्कारांबरोबरच अवघ्या देशाने ताईंना विनम्र अभिवादन करावं असे मानाचे
दोन पुरस्कार त्यांना मिळाले. ते म्हणजे महाराष्ट्र शासनाचा ‘आदिवासी सेवक पुरस्कार’ आणि भारत सरकारचा ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती पुरस्कार’.
तळागाळातल्या उपेक्षित घटकांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या स्त्रियांना हा पुरस्कार दिला जातो. ताई त्याच्या मानकरी होणं म्हणजे आदिवासी बांधवांच्या श्रद्धास्थानाचाच सन्मान आहे. सन्मानाने कृतार्थ वाटतं, पण ही तर माझ्या कामाची सुरुवात आहे, अजून खूप काही करायचं आहे, सन्मानाने उमेद वाढते असे त्या आवर्जून सांगतात.
पुणे, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, रायगड अशा वेगवेगळ्या जिल्ह्य़ांमधील अठरा वसतिगृहांचं काम त्या पाहतात. तिथल्या वस्त्यांमधून, पाडय़ांमधून फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतात. त्यांच्या वेदनांवर फुंकर घालताना मायेने सल्लाही देतात. उपदेश करणं सोपं आहे, पण विचार मनात रुजवणं कठीण आहे. मी उपदेश करीत नाही, मी तसं जगून दाखवते हा खूप महत्त्वाचा विचार त्या व्यक्त करतात.
लहान मुलांना शिकणं नको असतं, ती वसतिगृहातून पळून जातात. त्यांची आपल्या घराबद्दलची आणि जंगलाबद्दलची ओढ काही सुटत नाही. पण आपल्या लेकरांप्रमाणे त्यांनाही समजून घ्यावं लागतं, परत वसतिगृहात आणावं लागतं. हे कामही ताई हसतमुखाने करतात. त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्याशी केलेल्या संवादातून जाणवणारा महत्त्वाचा गुण म्हणजे संवादकौशल्य. अनेकदा या गुणामुळेच मत्त झालेले शेतमालक किंवा मुजोर वीटभट्टीमालक ताईंपुढे नमतं घेऊन बोलतात.
युवकांनी शिकावं, नोकरीधंदा करावा, संसार करावा, पण आपल्या देशाला आणि माणसांना विसरू नये हा युवा पिढीला त्या नेहमी सल्ला देतात. युवा पिढी ही आपली ताकद आहे, असे त्या मानतात. म्हणूनच ‘आपलं शरीर दुसऱ्यासाठी थोडं तरी खर्ची करावं’ असा मंत्र या पिढीला देतात.
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची चिवट वृत्ती ही आदिवासी समाजाची एक खासियत आहे. ताईंच्या स्वभावात ती कशी नसणार? आíथक आणि सामाजिकदृष्टय़ा विकलांग समाजाचं प्राक्तन बदलण्याचा त्यांनी वसा घेतला आहे. ठमाताई पवारांसारखी आदिवासी व्यक्ती जेव्हा धाडसाने हे काम स्वीकारते तेव्हा ‘जंगलचा राजा’ जागा झाला आहे याची जाणीव होते.
बामणाच्या जल्मा जाशीत
लिखू लिखू मरशी
वाण्याच्या जल्मा जाशीत
तोलू तोलू मरशी
चांभाराच्या जल्मा जाशीत
शिवू शिवू मरशी
पर
वारल्याच्या जल्मा जाशीत
जंगलचा राजा
होशी रं बाबा..
हे गाणं गाणारा आदिवासी उद्या शिक्षक, व्यावसायिक, पत्रकार किंवा कारखानदार व्हावा हे ठमाताईंचं स्वप्न आहे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्या अथक प्रयत्न करीत आहेत.
कर्जत तालुक्यातील एका आदिवासी पाडय़ापासून कामाला सुरुवात करून थेट दिल्लीहून आपल्या कार्याला दाद मिळवणाऱ्या ठमाताईंचा जीवनपट हा आदिम स्त्रीशक्ती आणि व्यवहारी जगातल्या अनुभवातून आलेलं शहाणपण यांचा विस्मयकारक आविष्कार आहे.