स्त्री समर्थ : प्रगतीच्या वाटेवर Print

‘दीपशिखा’ प्रशिक्षणात महिलांना मार्गदर्शन करणारी प्रगती.

प्रतिभा गोपुजकर , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ती एड्सग्रस्त. नवऱ्यामुळे तो झालेला. नवरा गेला. एक मुलगा गेला आणि दुसरा मुलगाही पॉझिटिव्ह. प्रगतीला खचून चालणारच नव्हतं. तिला स्वत:बरोबर दोन मुलांची काळजी घ्यायची होती. मोलमजुरी करणारी प्रगती आता गावातल्या मुलींना प्रशिक्षित करते आहे. एवढंच नव्हे तर गावात एड्सविषयी जागृतीही करते आहे.. आयुष्याला एक सुरेख वळण देणाऱ्या, समस्येलाच हत्यार बनवणाऱ्या, एड्सग्रस्त स्त्रियांसाठी आदर्श ठरलेल्या प्रगतीविषयी.. तीप्रगती गायकवाड. मोलमजुरी करणारे घर, खाणारी चार कच्चीबच्ची. अशा कुटुंबात वाढलेली. प्रगती नववीपर्यंत शिकली, ‘मोठी’ झाली म्हणजे लग्न झालेच पाहिजे या समाजाच्या रीतीनुसार थोडय़ा अंतरावरच्या कोरंगळा गावातल्या करघेशी तिचे लग्न झाले. मुलाला मुंबईला नोकरी होती, म्हणजे छानच. रोख पसा हातात येण्याची चंगळच म्हणायची. शक्य तेवढय़ा थाटामाटात लग्न लागले.
प्रगतीचे नववीपर्यंतचे शिक्षण पांढरपेशे काम करण्यासाठी पुरेसे नव्हते. त्यामुळे माहेरप्रमाणेच येथेही मोलमजुरी सुरूच राहिली. लग्न झाल्या झाल्या वर्षभरातच तिला छान मुलगी झाली, प्रतीक्षा. नवरा मुंबईलाच होता, भिवंडीच्या फूटमिलवर कामाला होता. मग प्रगतीही मुलीला घेऊन मुंबईला आली, वर्षभर नवऱ्यासोबत राहिली आणि गावी परतली. आता तिला दुसऱ्यांदा दिवस गेले होते. मुलगा झाला तो रोहन, हा झाल्यापासून आजारीच असायचा. अशात मुंबईला नवऱ्याची तब्येतही बिघडली, तो वारंवार आजारी पडू लागला आणि गावी परतला. याच काळात रोहन वारला. त्याच्या अकाली मृत्यूचे दु:ख होतेच पण नवऱ्यासोबत एकत्र राहायला मिळाल्यामुळे प्रगती खूश होती. बिचारीला नवऱ्याच्या आजाराचे खरे स्वरूपही माहिती नव्हते आणि एकत्र राहण्यातला धोकाही. तिला तिसऱ्यांदा दिवस गेले आणि परत मुलगा झाला, तो प्रतीक. नवऱ्याच्या आजारावर गावठी उपाय चालू होते पण गुण येत नव्हता. अंगारे-धुपारेही झाले, उपयोग शून्य.
शेवटी प्रगतीच्या भावाने त्यांना लातूरला नेले, जिल्हा रुग्णालयात तपासण्या करून घेतल्या, तेव्हा कळले. तिच्या नवऱ्याला एड्स झाला आहे, शेवटची स्टेज आहे, उपचार होणे शक्यच नाही. आता प्रगतीच्या नवऱ्याला खूप वाईट वाटले. प्रगतीने स्वत:ची तपासणी करून घ्यावी म्हणून तो मागे लागला, पण नवऱ्याच्या आजाराच्या काळजीत असलेल्या प्रगतीचे कशातच लक्ष नव्हते. डॉक्टरांनी जेमतेम तीन महिने जातील असे सांगितले आणि तसेच झाले. १९९९ साली झालेले हे लग्न २००७ च्या जानेवारीत एड्सने संपुष्टात आणले.
आता भावाने जोर धरला आणि प्रगतीची, तिच्या मुलांची तपासणी करून घेतली. एचआयव्हीच्या संसर्गाच्या विळख्यातून प्रगतीची मोठी मुलगी, प्रतीक्षा बचावली होती. परंतु प्रगती आणि प्रतीक यांची चाचणी मात्र पॉझिटिव्ह आली. दोघांनाही एचआयव्हीची लागण झालेली होती. प्रगती खचून गेली. माहेरी आई-वडिलांचा आधार नव्हता, भाऊ होते पण प्रगतीला त्यांच्या संसारात जाऊन राहणे बरे वाटेना. शेवटी तिने सासरीच राहण्याचे ठरविले. स्वत:चा, मुलांचा भार कोणावर पडू नये म्हणून तिने किती काम केले, मोलमजुरी केली, झाडू बनविले, काबाडकष्टाला ती कधीच हटली नाही.
आणखी एक वर्ष उलटले आणि प्रगतीच्या आयुष्याने नवे वळण घेतले. गावात २००८ साली शोभा िशदे मॅडम आल्या, युनिसेफने चालू केलेल्या ‘दीपशिखा’ प्रशिक्षणाविषयी त्यांनी सर्वाना माहिती दिली, बोलक्या, धीट प्रगतीला त्यांनी प्रशिक्षण घेण्यास सांगितले. ही कल्पना प्रगतीला मनापासून आवडली. पण दहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षणाला जायचे तर मुलांना कोणावर सोडायचे, हा प्रश्न तिला सतावत होता. शेवटी नात्यातल्याच, शेजारी राहणाऱ्या आिलदाताईनी मुलांची जबाबदारी घेतली आणि प्रगती प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राला गेली. हे प्रशिक्षण तिला खूप आवडले. दहा दिवस ती एका अद्भुत जगात वावरत होती. दुरावलेली माया आणि प्रेम तिला येथे भरपूर मिळाले. हसत-खेळत चालणारे प्रशिक्षण, सोपी भाषा, गोष्टी, गाणी, खेळ या साऱ्यांत प्रगती मनापासून रमली. लहानपणीच, संसाराला सुरुवात करण्यापूर्वी जीवन-कौशल्ये शिकून घेणे किती आवश्यक आहे हे तिला मनोमन पटले. साध्या साध्या गोष्टी, स्वच्छता, आजार, प्रतिबंधक उपाय, आहार, मुलांची काळजी, संगोपन, स्वत:चे शरीर, त्याची निगा, लग्न म्हणजे काय हे सारे तिला येथे कळू लागले. या साऱ्याच्या अनुभवातून जाऊन जे कळले नव्हते ते या प्रशिक्षणातून तिला गवसले.
प्रगतीने गावात परतून किशोरी गट स्थापन केला. तो वर्षभर व्यवस्थित चालू होता. पुढच्या वर्षी तिने दीपशिखाचे दुसरे सत्र पूर्ण केले. तिसऱ्या वर्षीही ती प्रशिक्षणाला गेली. ग्राम सूक्ष्म नियोजन प्रक्रियाही तिने शिकून घेतली. ग्रामसभा बोलवायची, गावचा नकाशा तयार करायचा. गावातील अडचणी गावकऱ्यांनीच मांडायच्या, त्या सोडविण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायचा. ग्रामपंचायतीच्या मदतीने सरकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन या अडचणी कशा सोडविता येतील याचे बारीकसारीक मुद्दे लक्षात घेऊन नियोजन करायचे आणि कामाला लागायचे. कामाची ही पद्धतही प्रगतीला आवडली. तिच्या स्वत:मध्ये तर खूप बदल झाला आहे, हे तिलाही जाणवते. ‘आता दिल्लीला जाऊन बोलायला सांगितले तरी बोलेन.’ हे तिचेच उद्गार. तिची तडफ, आत्मविश्वास पाहून स्पर्श या ‘सहभागी प्रशिक्षण’ देणाऱ्या संस्थेने २०१० साली तिला प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम दिले.
या कामात प्रगती रमली आहे. सूक्ष्म नियोजनामध्ये साधन व्यक्ती म्हणून तिने दोन गटांबरोबर, धुळ्याला तरणीमध्ये आणि नगरला काम केले. ही प्रक्रिया तिला खूप चांगली वाटते. गावकऱ्यांनीच एकत्र येऊन आपल्या अडचणी दूर करण्याचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे हे तिला कळले आहे. गावकऱ्यांनी तयार केलेली योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होताना मात्र स्थानिक राजकारण त्यात अडथळा आणू शकेल का, ही भीती तिला सतावते. ती अधिक रमते ते दीपशिखा प्रशिक्षणात. या प्रशिक्षणाच्या चार बॅचेस तिने आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत, जवाहर, ठाणे येथे ४९ मुलींची एक; िहगोलीला ३५ मुलींची एक याप्रमाणे दोन बॅचेस आणि भंडारा, लाखणी येथे २५ मुलींची एक. या साऱ्या मुलींना दीपशिखाचे प्रशिक्षण देताना प्रगती खूप सुखावली. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला आणि शेवटी मुलींमध्ये होणारे बदल तिला भावले. सुरुवातीला बुजऱ्या, गप्प गप्प असणाऱ्या मुली स्वत:चे नावही धड सांगू शकत नाहीत पण दहा दिवसांत गाणी, गोष्टी ऐकताना त्यांच्यात हळूहळू बदल होतो, त्यांना नवीन माहिती मिळते, आयुष्याची एक नवी जाण येते.  प्रशिक्षणाच्या शेवटी स्वत:चे मनोगत सांगताना या मुली आत्मविश्वासाने बोलतात. शिक्षणाचे महत्त्व त्यांना या प्रशिक्षणातून कळून येते, अडचणींवर मात करायचा आत्मविश्वास मिळतो, जगण्याचे बळ येते आणि हे सारे त्यांच्या बोलण्या-वागण्यातून प्रतित होते.
एचआयव्ही पॉझिटिव्ह असूनही प्रगतीचा धीर सुटलेला नाही. आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह आहोत हे सांगताना ती कचरत नाही. याविषयीचा तिचा एक अनुभव ती खूप छान पद्धतीने सांगते. एकदा एक सत्र घेत असताना मुलींनी तिला विचारले की एकटीने प्रवास करताना तिला भीती वाटत नाही का? प्रगती हसली. तिने आपली एक आठवण मुलींना सांगितली. बसने प्रवास करताना कोणी एक पुरुष पाठलाग करतोय हे तिच्या लक्षात आले, न डगमगता तिने त्याच्यासमोर उभे राहून त्याला हटकले. एकटी स्त्री काय करणार, असा विचार करून बहुधा त्या पुरुषाने तिच्या अंगचटीला यायचा प्रयत्न केला. प्रगतीने आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे त्याला सांगून टाकले. तो तेथून निमूटपणे निघून गेला. असे अनुभवकथन ऐकून मुली खूपच प्रभावित झाल्या. आपण ज्या समस्येविषयी केवळ ऐकून आहोत तिचा सामना करणारी एक धाडसी महिला आपल्यासमोर आहे, नव्हे तीच आपल्याला समस्येविषयी माहितीही देते आणि या समस्येलाच आपले हत्यार बनवून स्वत:चा बचावही करते, हे त्या मुलींना चक्रावणारे होते. प्रगतीच्या या आणि अशा निर्भीड बोलण्याने ती घेत असलेली सत्रे खूप परिणामकारक होतात, तिच्या प्रशिक्षणाचा ठसा मुलींच्या मनावर खोल उमटतो.
परिस्थितीला ती शरण गेली नाही, परिस्थिती स्वीकारून तिने स्वत:चे आणि मुलांचे आयुष्य घडवायचे ठरविले आहे. दीपशिखा प्रशिक्षण पूर्ण होण्याच्या काही काळ आधी तिला समजले की सासरच्यांनी तिची फसवणूक केली. नवऱ्याला एड्स आहे हे माहीत असूनही त्यांनी तिला याची कल्पना दिली नाही. आता अर्थात या माहितीचा काहीच उपयोग नव्हता. आजूबाजूला पसरलेला अडाणीपणा, अंधश्रद्धा तिला जाणवू लागल्या. माहेरच्यांमध्येही त्या होत्याच. तिने या साऱ्यांशी संवाद साधला, मिळेल तसतशी माहिती ती कुटुंबातल्या साऱ्यांना देत राहिली. आता तिच्या जवळच्यांचे विचार बदलले आहेत. नवीन माहिती त्यांना पूर्णपणे समजली आहे. या आजाराविषयीचे खोटे समज दूर करण्याचा मनापासून प्रयत्न ती अजूनही करते आहे. संथगतीने का होईना तिच्या पदरात यश पडते आहे. बहिणीच्या गावातील कोणा एड्सग्रस्त व्यक्तीला वाळीत टाकले जाण्यापासून वाचविण्यात तिला यश आले आहे. तिच्या गावातील एक जोडपे तिसऱ्या स्टेजला आहे, मरणासन्न अवस्थेत आहे, त्यांना दिलासा देण्याचे काम ती करते आहे.
प्रगती आज केवळ अठ्ठावीस वर्षांची आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह असली तरी सध्या तरी ती प्रकृतीने ठीक आहे, तिला आजार असा नाही पण तो तिला पटकन होऊ शकतो याची तिला कल्पना आहे. आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी योग्य तो आहार ती काळजीपूर्वक घेते, स्वत:ला शक्य तेवढे सांभाळणे एवढेच तिच्या हातात आहे आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या मुलाला आणि तसे नसलेल्या मुलीला वाढविण्यासाठी तिला स्वत:ला सांभाळणे अतिशय गरजेचे आहे.
(नाव बदललेले आहे. व छायाचित्रही अस्पष्ट केले आहे.)