स्त्री समर्थ : सावित्रीच्या धडपडणाऱ्या लेकी Print

altप्रा. हेमा गंगातीरकर , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कोल्हापूरमधल्या कल्पना तावडे आणि हलीमा उस्ताद. आपल्या घरात शाळा सुरू करून परिसरातल्या मुलांना सुशिक्षित करणाऱ्या. त्यासाठी अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या. सावित्रीच्या या दोन धडपडणाऱ्या सामथ्र्यवान लेकींविषयी... झोपडपट्टी आणि शिक्षण यांचा छत्तीसचा आकडा. वस्तीवर बनवलेली दारू पोहोचवणारी, चोऱ्या करायला चटावलेली, भंगार गोळा करणारी, स्वच्छतेची किमान जाणीवही नसलेली, दिवसभर किरकिरणाऱ्या भावंडांना सांभाळणारी, स्वत:च्या पोटासाठी उकिरडे शोधणारी, जगण्यासाठी रोजचाच संघर्ष करीत बालपण हरवलेली कोल्हापूर येथील राजेंद्रनगरजवळची झोपडपट्टी. कंजारभाटांची वसाहत. समाजातल्या या उपेक्षित घटकाला शिक्षणाच्या माध्यमातून उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचा विडा उचलला ज्ञानदीप विद्यामंदिराच्या कल्पना तावडे यांनी. स्वत:साठी बांधलेला बंगला सर्वस्वी शाळेला अर्पण करून रात्रंदिवस या उपेक्षित मुलांच्या शिक्षणाचा, प्रगतीचा ध्यास घेतलेल्या      कल्पना तावडे. समाजाचे टोमणे, विरोध सहन करीत चिकाटीने मुलांवर संस्कार करण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी. हरघडी नवा संघर्ष. कधी घरच्यांची विचारणा- या लष्कराच्या भाकऱ्या कशा करता भाजताय? तर दुसरीकडे ‘दारू पिणं, चोऱ्या करणं यात वंगाळ ते काय! हा कंजारभाट पालकांचा प्रश्न. दारू पोचवणारी, चोऱ्या करणारी मुलं काय शिकणार हो? समाजाचे टोमणे. घरचे, दारचे, मुले, पालक सगळ्यांचाच विरोध. पण कल्पनाताईंचे काम नेटाने सुरू.
घराच्या खोल्यांतूनच वर्ग भरत, कोणताही भपका, बडेजाव नाही. उपलब्ध साहित्य, शैक्षणिक साधने वापरत मातीच्या गोळ्यांना आकार देणे सुरू होतं. मुलांसाठी वह्य़ा-पुस्तके, गणवेश खरेदी करताना कल्पनाताई एकदम उत्साही. पुरेसे मानधन नाही, हायस्कूलला अनुदान नाही, तरीही झोकून देणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने वाटचाल सुरू. मुलांचे गणवेश घालून शाळेत येणं, अभ्यासाबरोबर रोज नवा संस्कार, स्वच्छतेच्या कल्पना रुजवत मुलांना अधिकाधिक जीवनानुभव मिळावेत यासाठी त्या प्रयत्नशील. हळूहळू मुले शाळेत रमू लागली. शिळेपाके अन्न खात मुले धडे शिकू लागली, धीटपणे बोलू लागली. स्थिर बसायला, गुरुजनांनी सांगितलेले ऐकायला शिकली. शाळेत येण्याची, शिकण्याची गोडी लागली. शाळेचे तोंड न पाहणारी, मधल्या सुट्टीत पळून जाणारी मुले आता ‘आमाला हितंच ऱ्हावावं वाटतंय, आमाला लई शिकायचंय, मोऽऽठ्ठं व्हायचंय. हितल्या बाई लई चांगल्या हाईत. आमच्याव लई माया करत्यात.’ असं गहिवरून बोलतात.
शाळेत अभ्यासाबरोबर सहली, स्पर्धा, शिबिरे होतात. नवरात्रोत्सव, गणेशोत्सवात स्वच्छता उपक्रमात मुले सहभागी होतात. होळीच्या दिवशी परिसरातील तंबाखू, गुटख्याच्या पुडय़ांचा कचरा गोळा करून त्याची होळी केली जाते. गुटखा न खाण्याची शपथ मुले घेतात. चांगल्या वर्तनाचा संकल्प करतात, कमळाबाई मोरे शिक्षण प्रसारक मंडळ, राजेंद्रनगर कोल्हापूर संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर- पहिली ते चौथी अनुदानित आहे, तर पाचवी ते दहावी विनाअनुदानित आहे. एकूण सोळा शिक्षकवृंद असून यामध्ये सहा शिक्षिका व दहा शिक्षक आहेत. दहावीचा निकाल ५० ते ६० टक्के लागतो.
चांगल्या कार्यात अडचणी येतात तसेच हातभार लावणारे पण भेटतात. अनेकांचे सहकार्य, आर्थिक पाठिंबा, जाणीवपूर्वक केले जाणारे उपक्रम, मुलांतील सुधारणा यामुळे या आगळ्यावेगळ्या झोपडपट्टीतील, दुर्लक्षित, गरीब मुलांच्या शाळेने बाळसे धरले आहे. altश्रमप्रतिष्ठा जपत शिक्षणाचे संस्कार घडविणाऱ्या कल्पना तावडे यांना कोल्हापूरच्याच माईसाहेब बावडेकर यांनी - ‘बाल सेवा पुरस्कार’, कोकण मित्र मंडळाने शिक्षण क्षेत्रातील ‘सन्माननीय व्यक्ती पुरस्कार’, पतंगराव कदम पुरस्कार, सकाळ व रोटरी यांनी दिलेला पुरस्कार, अशा पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. आज या टप्प्यावर पोहोचल्यावर झोपडपट्टीतील उपेक्षित मुलांच्या डोळ्यांत स्वाभिमानाचं, गरुडभरारीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी गेली दहा वर्षे धडपडणाऱ्या शोभनाताईंना वाटतं, माझ्या या कार्याचं वटवृक्षात रूपांतर होवो.
राजारामपुरीतील तेराव्या गल्लीत एंजल एज्युकेशन सोसायटीचे सेंट मेरी स्कूल आहे. ‘उस्ताद मंजिल’ हे हालीमाचे घर. घरात एकूण अकरा भावंडे. सहा बहिणी आणि पाच भाऊ. सगळे एका छताखाली आनंदाने राहतात आणि याच ‘उस्ताद मंजिल’ इमारतीत वरच्या मजल्यावरील बारा खोल्यांत हालीमाची शाळा भरते. होय, हालीमा ‘सेंट मेरी स्कूल’ची संस्थापक, मुख्याध्यापक, हितचिंतक आणि सर्वेसर्वा आहे. समाजात काहीजणांना मळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा नव्या, अनवट वाटेवरून जाण्याचे आकर्षण असते. ही वाट खाचखळग्यांची, अडथळ्यांची आहे हे माहीत असूनही याच वाटेवरून चालण्याची त्यांची धडपड असते. हालीमा उस्ताद या त्यापैकीच एक होत. आज स्वत:च्या घरात शाळेच्या ऑफिसमध्ये बसून जुन्या आठवणी काढताना हालीमाला बालपणीचे दिवस आठवतात..
हालीमाचा जन्म परंपरावादी मुस्लीम कुटुंबातला. घरात बुरखा पद्धत. समाजात शिक्षणाबद्दल फारशी आस्था नाही. मुलींची लग्ने लहान वयातच करून देण्याची पद्धत. या पाश्र्वभूमीवर हालीमा आणि तिच्या अन्य तीन बहिणी करीमा, शाकीरा, शरीफा या चौघीही कोल्हापुरीतील होली क्रॉस या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकल्या आहेत. त्याचे श्रेय अर्थातच हालीमाच्या पुरोगामी विचाराच्या वडिलांकडे, जमानुल्लाह उस्ताद यांच्याकडे जाते. वडील जुन्या काळातील मॅट्रिक असून ते मान्यताप्राप्त सरकारी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत. त्यांचे स्वत:चे इंग्रजी चांगले होते. घरची शेती करून व्यवसायामुळे समाजात वावरणे होई. आपल्या सर्व मुलांनी खूप शिकावे, कॉन्व्हेंटचे शिक्षण घ्यावे हा त्यांचाच आग्रह आणि त्याला हालीमाच्या आईची साथ. हालीमा सगळ्यात मोठी मुलगी. शिकण्याची हौस. लहान भावंडांना सांभाळत, आईला घरकामात मदत करत हालीमा शिकू लागली. पाठोपाठच्या बहिणी पण तिचाच कित्ता गिरवू लागल्या. घरच्या अडचणी, आईचे आजारपण, भावंडांचा सांभाळ यामुळे दहावीनंतर हालीमाचे शिक्षण थांबले. धडपडय़ा हालीमाला खूप वाईट वाटले. बरोबरच्या मैत्रिणी पुढे शिकत होत्या आणि मी मात्र घरात. चळवळ्या स्वभाव शांत बसू देईना. जयश्री शिंदे या मैत्रिणीच्या साहाय्याने तीन वर्षांच्या गॅपनंतर हालीमाने कॉलेज शिक्षण सुरू केले.  कोल्हापूरच्या सरकारी राजाराम कॉलेजमधून होम सायन्स घेऊन तिने बी.ए. केले. त्या वेळी एक विषय कच्छी टाक्यांचे विणकाम हा होता. हालीमाला कच्छी टाक्यामध्ये खूप गती होती. हालीमा आवडीने कच्छी वर्कचे कुशन कव्हर, साडी बॉर्डर, टेबल क्लॉथ, टेबल मॅट सफाईदारपणे करे. तिच्या येथील गुरू उल्का शिंदे मॅडम तिला म्हणत, ‘हालीमा, तुला माझी जागा घ्यायची आहे. तू एम.ए. कर. परंतु एम.ए. होम सायन्सची सोय त्या काळी कोल्हापुरात नव्हती. त्यासाठी औरंगाबादला जावे लागणार होते. दोन वर्षे घरापासून दूर राहून शिकण्यास आई-वडिलांची परवानगी नव्हती. पुन्हा शिक्षणात खंड, आकांक्षाचे धुमारे बंद पेटीत ठेवत हालीमाने हिंदी विषय घेऊन एम.ए. पूर्ण केले. मधल्या काळात कुठे टय़ूशन घे, कधी नोकरी कर अशी धडपड सुरू. काहीतरी करावे वाटायचे, पण नेमका मार्ग सापडत नव्हता. कोल्हापुरातील शिवानी देसाई यांच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये थोडे दिवस नोकरी केली. हालीमाचे शिकवणे विद्यार्थ्यांना आवडे. यातूनच स्वत:ची शिक्षणसंस्था असावी हा विचार सुरू झाला. हळूहळू या विचारांना मूर्त रूप मिळत गेले.
शाळेतील एका विद्यार्थ्यांचे वडील बापू पाटील आणि नवनाथ हायस्कूलचे पोहाळे सर यांच्या मार्गदर्शनातून स्वत:ची  इंग्रजी माध्यमाची शाळा सेंट मेरी स्कूल एक दिवस सुरू केली. राजारामपुरीतील सध्याचे घर ‘उस्ताद मंजिल’ १९७८ साली बांधून पूर्ण झाले. घराच्या वरच्या मजल्यावरील चार खोल्यांमध्ये परिसरातील मुलांना घेऊन प्ले ग्रुप, ज्युनिअर, सीनिअर फर्स्ट वर्गाचा श्रीगणेशा केला. धडपडय़ा स्वभाव, शिकविण्याची हौस, कष्टाची तयारी आणि नवी स्वप्ने या भांडवलावर शाळा आकार घेऊ लागली. घरच्या तीन बहिणी होत्याच. त्याही मदतीला आल्या. शाळेच्या वाढत्या इयत्तांबरोबर गरजेनुसार ट्रेंड डी.एड., बी.एड. स्टाफही घेतला. शिक्षक भरती करताना कटाक्ष एकच, शक्यतो स्त्री शिक्षिका असाव्यात आणि मुलांना शिकविण्याची तळमळ हवी. यामुळे अगदी मराठी माध्यमात शिकलेला स्टाफही घेतला. प्रयत्नांनी त्यांचे इंग्रजी सुधारले. आम्हाला कष्टाळू स्टाफ मिळाला. अनेक अडथळे, संकटे पार करत हालीमाच्या शाळेने चांगले बाळसे धरले. दहावीच्या दोन बॅचेस बाहेर पडल्या. पालकांचे समाधान, घरच्यांचे सहकार्य, प्रयोगशील सहकारी आणि हितचिंतकांचे साहाय्य यामुळे वाटचाल सुकर होत आहे. दहावीच्या मुलांना गणित, भूमिती शिकवायला इतर शाळेतील तज्ज्ञ शिक्षकांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. इंग्रजी व्याकरण शिकविण्यासाठी हालीमाच्या हितचिंतक, मैत्रीण, त्यांच्या एक पंच्याहत्तर वर्षे वयाच्या मॅडम यांना बोलावल्यानंतर आजही आनंदाने येतात. तर संस्कृतच्या पदवीधर मोघे मॅडम हिंदी, मराठीचे व्याकरण मुलांना सोपे करून शिकवतात. हालीमाची शाळा वसाहतीत आहे, परंतु येथील लोकांची आणि पालकांची त्यांना साथ आहे. शाळेला स्वत:चे ग्राऊंड नसल्याने लहान मुलांचे खेळ टेरेसवर, तर मोठे वर्ग दुसऱ्या शाळेच्या मैदानावर नेले जातात. शाळेचा निकाल शंभर टक्के असून यासाठी ‘कच्च्या’ मुलांवर विशेष प्रयत्न केले जातात. प्रत्येक घटकानंतर परीक्षा घेतली जाते. याचा फायदा मुलांना होतो. शाळेत सहल, गॅदरिंग, व्याख्याने, परिसर साक्षरता उपक्रम राबविले जातात. साधे उदाहरण म्हणजे मुलांची रेल्वे स्टेशनला भेट- टी.सी.च्या सहकार्याने प्लॅटफॉर्म, इंजिन, गार्ड, शिट्टी इ. माहिती ऐकताना मुलांना आनंद होतो.
शाळा या टप्प्यावर आली आहे. आपल्या शाळेविषयी बोलताना हलिमा  सांगते, ‘‘शाळेमध्ये मुस्लीम समाजाची मुले, त्यातही मुलींची संख्या जास्त. मुलींच्या पालकांना आमची शाळा सुरक्षित वाटते. पालकांची परिस्थिती बेताची असल्याने मुलांसाठी फी जादा आकारता येत नाही. सर्व फी एकाच वेळी जमा होत नाही. शिक्षकांना कमी वेतनात काम करावे लागते. शाळेला मोठी जागा, स्वतंत्र क्रीडांगण हवे आहे. आम्ही घरच्याच चौघी बहिणी असल्याने समजून घेतो, परंतु सहकाऱ्यांच्या भावना आमच्या लक्षात येऊनही फंड्स नसल्याने आम्ही काही करू शकत नाही.’’ हालीमाला या संपूर्ण वाटचालीतील अडथळे पण आठवतात. लहानपणी बुरख्याला केलेला विरोध. मुस्लीम स्त्री, उच्चशिक्षित, तीही अविवाहित, शिवाय शिक्षणसंस्था काढते, अडथळ्यांना पार करत पुढे जाते.. कधी कधी दमछाक होते. वडिलांनी शिक्षण दिले. परंतु ते स्वत: ‘अहले हादीस’ या कट्टर मुस्लीम संस्थेचे प्रेसिडेंट. आपल्या वागण्याने आई-वडिलांना त्रास होऊ नये हा सतत विचार करावा लागतो. त्यामुळे शाळेला जाताना बुरख्याला विरोध केला तरी धार्मिक कार्यक्रमांना जाताना ती बुरखा घालते. आई-वडिलांच्या, समाजाच्या भावना जपते. माझ्या आईला आम्हा बहिणींचा खूप अभिमान आहे. तिचा नेहमीच पाठिंबा. शिवाय माझ्या आतेबहिणी शिकल्या असून त्याही कोल्हापुरातील प्राथमिक शाळेत शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून नोकरी करतात. आई-वडिलांनी हे पाहिले असल्याने आम्हा बहिणींनाही ही संधीची कवाडे उलगडली गेली. यासाठी आम्ही स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. माझ्या यशात शाकीरा, शरीफा, करीमा यांचेही योगदान खूप मोठे आहे. आमच्या शाळेत अर्धवट शाळा सोडलेली मराठी माध्यमातील मुले पहिल्या यत्तेत प्रवेश घेतात. त्यांचे मराठी चांगले नसते, तर इंग्रजी कसे येणार. पण शाकीरा सुरुवातीचे तीन महिने अशा मुलांना वेगळा वेळ देऊन त्यांचा अभ्यास करवून घेते. शरीफा गेली दहा वर्षे पहिली ते चौथी मुलांचा अभ्यास जातीने लक्ष घालून करून घेते. कोणतीही तक्रार नाही. काही मिळवायचे असेल तर तक्रार करून कसे चालेल. घराच्या वरच्या मजल्यावरील बारा खोल्या शाळेसाठी वापरल्या जातात. सुरुवातीला आम्हा भावंडांना प्रत्येकाला स्वतंत्र खोली होती. आता खूप अ‍ॅडजेस्ट करावे लागते. परंतु शाळेतील मुलांचे हसरे चेहरे, पालकांच्या समाधानी प्रतिक्रिया आणि शाळेवरील विश्वास, शाळेचा वाढणारा लौकिक, शेजारी, शासन यांचे सहकार्य यामुळे रोजचे कष्ट, थोडाफार विरोध विसरून जातो. भविष्यात सुसज्ज इमारतीत शाळा सुरू करायची आहे. समाजाला, मुलांना खूप काही द्यायचं आहे.
परंपरावादी मुस्लीम समाजात जन्मलेल्या हालीमाचा वेगळ्या वाटेवरचा हा प्रवास. भविष्यातील स्वप्ने यशस्वी होवोत यासाठी शुभेच्छा!