स्त्री समर्थ : कामाचा धडाका Print

धरित्री जोशी ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

राजकारणातून समाजकारणाची पताका उंचावत तिने गावाचा चेहरामोहरा पालटून टाकला. कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना गावची उपसरपंच होत तिच्यातल्या कर्तृत्वाची साक्ष दिली. महिलांमध्ये आत्मभान जागवलं, गावकऱ्यांना सन्मानानं जगायला शिकवलं. गावातले अवैध धंदे, दारूविक्री बंद पाडली. मंचरजवळच्या नागापूर येथील वैशाली पोहकर यांच्या धडाकेबाज कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस वाढतोच आहे. महिलांना विकासाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतलं तर काय साधेल, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे वैशालीताई. संधीचं सोनं करत गावाला विकासाची पहाट दाखवणाऱ्या समर्थ स्त्रीविषयी..
‘स्त्री’म्हणजे शक्तीची विविध रूपे. पुराणकाळापासूनच आपल्याकडे स्त्रीला ‘शक्ती’ संबोधले आहे. आजही स्त्रीच्या या वैविध्यपूर्ण प्रतिमा आपल्याला ठायी ठायी पाहायला मिळतात. आजही स्त्री विविध क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर कित्येकवेळा अधिक सकसपणे आपल्या कार्यक्षेत्रात चमकताना आपण पाहतो. याचे स्वाभाविक कारण असे आहे की, स्त्रीमध्ये मुळातच नैसर्गिक व्यवस्थापन कौशल्य असते. मग ते घरच्या पातळीवरचे असो वा कार्यालयीन.. गरज असते ती तिला योग्य संधी देण्याची.. तिच्यातील नैसर्गिक गुणवत्तेला वाव देण्याची.. अशाच एका स्त्री शक्तीची अनुभूती दिसते ती पुणे जिल्ह्य़ातल्या मंचर जवळील आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात. तिथल्या स्त्रीशक्तीत.
 मंचरपासून सुमारे २० कि.मी. आत वसलेले हे टुमदार गाव.. वैशाली पोहकर (पाटील) नावाची येथील हरहुन्नर तरुणी, तडफदार महिला, घरच्या शेतातील सर्व कामे ती स्वत: करते. त्याचवेळी आपल्या एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्या ती निभावते. कुणाची आई म्हणून, कुणाची सून म्हणून, कुणाची जाऊ, कुणाची वहिनी म्हणून.. या सर्व भूमिका निभावताना तिला साथ असते ती तिच्या पतीराजांची. हे सर्व सांगण्यामागचे कारण म्हणजे अशा विविध भूमिकांमधील स्त्रीने स्वत:ला सिद्ध केले आहे ते या गावची एक कार्यक्षम उपसरपंच म्हणून!
वैशालीताईंमधला कामाचा एवढा आवाका आणि अचूक निर्णयक्षमता आपल्याला थक्क करून सोडते. तसे पाहता राजकारणात प्रवेश करणाऱ्या वैशालीताई या त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील पहिल्याच व्यक्ती. त्यांच्या सासरी व माहेरी राजकीय पाश्र्वभूमी कोणाचीच नव्हती. वैशालीताईंमध्ये अंगभूत असलेले जनसंपर्काचे कौशल्य, त्यांना विविध सामाजिक प्रश्नांबद्दल असलेली जाण  त्यांच्या पतीने केव्हाच ओळखली होती. त्यामुळेच लग्नानंतरही वैशालीताईंनी गावात राबवलेल्या सामाजिक उपक्रमांना तिच्या घरच्यांची साथ होती. सामाजिक विषयाचे भान असलेली, शिक्षित महिला म्हणून गावकऱ्यांनीच २००२ मध्ये ग्रामपंचायत सभासद म्हणून वैशालीताईंना बिनविरोध निवडले. अशाप्रकारे ताईंचे या क्षेत्रात पहिले पाऊल पडले. ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच हा प्रवास काही तितका सोपा नव्हता.वैशालीताईंपुढे पहिले आव्हान होते ती गावकऱ्यांची मानसिकता बदलण्याचे. त्यासाठी त्यांनी आधी स्वतला तयार केले.
‘आपल्यासमोर उभा ठाकलेला कोणताही प्रसंग असो, कोणतेही नवे काम असो; प्रत्येक वेळी मी स्वत:लाच आव्हान देत असते. माझ्यातल्या क्षमता सिद्ध करण्यासाठी धडपडत असते..’ वैशालीताई सांगत होत्या. लग्नानंतर ताईंचे जीवन बदलून गेले. उपसरपंच पदापर्यंत जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर कामाच्या कक्षा रुंदावू लागल्या. अशा वेळी मनामध्ये सल होती ती आपण १२ वी ची परीक्षा देऊ शकलो नाही याची. मी माझ्या मनातली ही इच्छा व्यक्त केली. तेव्हा ताईंना शिक्षक म्हणाले, ‘अकरावीची परीक्षा तू ११ वर्षांपूर्वी पास झालीस, त्यानंतर पुढे एवढा काळ लोटला, आता संसाराच्या बाहेरचा व्याप संभाळून अभ्यास करणे आणि उत्तीर्ण होणे तुला शक्य होईल का?’ अशा प्रतिकूल स्थितीतही वैशालीताईंनी हे आव्हान म्हणून स्वीकारले. मग कधी स्वयंपाक करता करता, कधी शेतीतल्या खुरपण्या करता करता मुद्यांचे पाठांतर वैशालीताई करत आणि बघता बघता ताईंनी १२ वी दिली, त्या पास झाल्या.. तेही फर्स्ट क्लासमध्ये. वैशालीताई याबाबत म्हणाल्या, ‘‘मला गावातील महिलांपुढे एक वस्तुपाठ घालून द्यायचा होता. तुमच्यामध्ये तितकी दुर्दम्य इच्छा असेल, महत्त्वाकांक्षा असेल तर कितीही अडथळे असले तरी तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता.’’
 वैशालीताई ग्रामपंचायत सदस्य झाल्या त्यावेळेसही गावामध्ये महिलांनी बाहेर पडण्याची मानसिकता नव्हती. गावातील विविध सामाजिक प्रश्न, ग्रामसभा यापासून तर तेथील महिला फारच दूर होत्या. अशा स्थितीत वैशालीताई घरोघरी फिरल्या. महिलांना विश्वासात घेतले. सुरुवातीला ताईंच्या बोलण्यावर गावातील बायांचा विश्वासच बसत नसे. त्यांच्यात बदलण्याची मानसिकताच नव्हती. या महिलांना पंचायत समितीतर्फे ताईंनी शिलाई मशिन यंत्रे उपलब्ध करून दिली व त्याचे प्रशिक्षणही दिले. साहजिकच मिरची कांडप यंत्र, पिठाची गिरणी यासारखे रोजगाराचे पर्याय उपलब्ध झाले. स्वत कमावलेला पैसा या महिलांच्या हाती खेळू लागला. महिलांसाठी खास विविध बचत गटही सुरू झाले.
या सर्वामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला. महिला घराबाहेर पडू लागल्या. गावातल्या प्रश्नांमध्ये हिरीरीने भाग घेऊ लागल्या. मग वैशालीताईंच्या पुढाकाराने खास महिलांसाठीच्या ग्रामसभा, महिला मेळावे सुरू झाले. उपसरपंच झाल्यावर ताईंनी गावासाठी विविध प्रकल्प, योजना, कामे केली आहेतच. परंतु याशिवायही त्यांचे महत्त्वाचे योगदान नमूद करावेसे वाटते ते ताईंनी गावातील अवैध धंद्यांना केलेला कडाडून विरोध. याकरिता ताईंनी अक्षरश: पायपीट केली. त्यासाठी कारणही तसे घडले. वैशाली ताईंनी दारूच्या धंद्याला कडाडून विरोध केला, तेव्हा त्यांना सुरुवातीला खूप त्रास देण्याचा प्रयत्नही झाला. ही बाई-माणूस काय आम्हाला शिकवणार, म्हणून चेष्टेचाही विषय झाला. मात्र एके दिवशी वैशालीताईंनी एक चीड आणणारे दृश्य पाहिले. एकाच घरातील दोन महिला.. एक महिला दुसऱ्या महिलेला दारू प्यायला प्रोत्साहित करीत होती. या महिलेचा दारूचा धंदा होता व आपल्या घरातील बाईनेही हा धंदा करावा म्हणून दोघींचा झगडा शिगेला पोहोचलेला.. ते पाहून वैशालीताई अक्षरश: चिडून उठल्या.. गावातील महिलांना तिथे घेऊन आल्या. आपण महिलांनीच दुसऱ्या महिलेवरील अन्याय रोखला पाहिजे. तसेच अन्याय करणारी महिला असो वा पुरुष; हे अवैध धंदे बंद पाडलेच पाहिजेत.. अशी शपथच या महिलांनी गावात घेतली. त्या दिवशीपासून खऱ्या अर्थाने वैशालीबाईंच्या नेतृत्वाखाली दारूबंदीविरोधातील आंदोलनाने पुढचे पाऊल टाकले आणि पाहता पाहता या महिलांचा संपूर्ण गावामध्ये एक दबाव गट निर्माण झाला. अवैध धंदे, दारू विक्री करणाऱ्या महिला असो वा पुरुष, त्यांना अशा प्रकारचे व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले. त्याचवेळेस अशांच्या पुनर्वसनासाठी ताईंनी त्यांना पर्यायी व्यवसायाच्या वाटा उपलब्ध करून दिल्या. यामुळे गावातील अनेक कुटुंबे सावरली. व्यसनी पुरुषांमुळे महिलांच्या होणाऱ्या शोषणाला लगाम बसला आणि संपूर्ण गावावरच या संघटित महिलांचा वचक निर्माण झाला.
अशाच प्रकारे गावातील गॅसच्या काळ्या बाजाराविरोधातही ताईंनी आंदोलन छेडले आणि गॅस सामान्यांपर्यंत पोहोचवला. रेशनकार्डचे धान्य गावातील गोरगरिबांना जास्त किमतीने विकण्याचे धंदेही वैशालीताईंनी बंद केले. गावातील आदिवासींनाही रेशनकार्ड उपलब्ध करून दिले. ही आणि अशी अनेक कामे वैशालीताईंनी आपल्या गावासाठी केली आहेत. आजही तितक्याच तळमळीने त्या आपल्या गावासाठी झटत आहेत.
वैशालीताईंच्या कामाचा धडाका एखाद्या पुरुष सहकाऱ्याला लाजवणारा आहे. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत तब्बल ७ लाख रुपये रस्ते डांबरीकरणावर खर्च झाले व त्याच योजनेचा भाग म्हणून गावात बंदिस्त गटार योजना आली. यासह गावात स्मशानभूमी उभारली गेली व अहिल्यादेवी समाजमंदिराचे काम पूर्ण झाले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गावात दोन एस.टी.चे बसथांबे उभारले गेले त्यामुळे गावकऱ्यांची प्रवासाची सोय झाली.वैशालीताईंनी जातीनं लक्ष घालत प्राथमिक शाळेची नवीन सुसज्ज इमारत बांधून घेतली तर तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाळा उभारली. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच नागापूर व वळती गावाला जोडणाऱ्या मीरा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले व गावातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिराचे बांधकाम अखेरच्या टप्प्यावर आले .
विषय गावपातळीवरचा असो वा देशपातळीवरचा.. महिलांना जर निर्णयप्रक्रियेत स्थान मिळाले, तर समाजाची अधिक सकारात्मक वाढ होईल यात शंका नाही. मात्र आज पाहिले तर सर्वच राजकीय पक्षांनी महिला आरक्षण हा विषय फारसा गांभीर्याने घेतलेला अजून दिसत नाही. राजकीय नेत्यांच्या बायकांना आरक्षित जागी वर्णी लावण्यापेक्षा जर खऱ्या अर्थाने कार्यक्षम, कर्तृत्ववान महिला पुढे आल्या तरच आपण प्रगतिपथाच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे म्हणता येईल.