स्त्री समर्थ : ..उत्सुक चाकांना भुई थोडी! Print

पद्मा कऱ्हाडे ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पराकोटीचं शारीरिक अपंगत्व येऊनही, सोनाली नवांगुळने मनाला कधीच अपंगत्व येऊ दिलं नाही. अपंगत्वावर मात करत आईबाबांचं घर सोडत स्वत:च्या घरात रहायला जाण्यापासून, स्वत:ची रोजीरोटी स्वत: कमवण्यापासून इतर अपंगांच्या सोयीसाठी   झटणाऱ्या कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळची कहाणी नुसतीच प्रेरणादायी किंवा आदर्श नाही तर ‘अनंत आमुची ध्येयासक्ती..’ या पंक्तीतील दुर्दम्य आशावादाचं ते बोलकं उदाहरण आहे.
‘बालपणीचा काळ सुखाचा’ असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. खेळ, दंगामस्ती, धुडगूस, भांडणं, गावभर भटकणं, अभ्यास असं चालू असतं त्या काळात.सोनाली नवांगुळ हिचं आयुष्यही असंच. अगदी मजेत चालू होतं बत्तीस शिराळा या छोटय़ाशा गावात! सोनालीचे आईबाबा, संपदा- एक लहान बहीण आणि सोनाली असं चौकोनी कुटुंब सुखानं नांदत होतं.
सोनाली ९ वर्षांची असताना एक अपघात झाला. तिच्या पाठीवर बैलगाडी पडली आणि त्यामुळे कमरेतील व पायातील बळ तिला गमवावं लागलं. पॅराप्लेजिक झाल्यामुळे, ना कमरेखाली संवेदना, ना नैसर्गिक विधींवर नियंत्रण, अशी तिची अवस्था झाली. तिच्या आयुष्याला विचित्र कलाटणी मिळाली. उपचारांसाठी दीड वर्षे मुंबईतील हॉस्पिटलमध्येच गेली. तिथे नातेवाइकांना सोबत राहायची परवानगी नव्हती. त्यामुळे सोनाली एकटीच असे हॉस्पिटलमध्ये. सोनाली म्हणते, ‘वय वर्षे अवघं नऊ. पायाबरोबर घरही सोडावं लागण्याचा तो पहिलाच अनुभव.. न कळत्या वयातला.. सर्वाची ओळख व स्वभाव जुळण्याआधीच आपल्याला ‘असं’ झाल्यानं सोडून दिलंय नि आता आपल्याला घर नाहीच किंवा असेल तर हेच (डिस्चार्ज मिळेपर्यंत- हे कळत नव्हतं तेव्हा) असं मनाला फार दुखवून गेलं. यथावकाश रडारड संपून एकटय़ानं हॉस्पिटलमधील सर्वासोबत राहण्याची सवय लागली.’
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतल्यावर सोनालीला शाळेत जाणं शक्य नव्हतं. आई-वडील शिक्षक असल्याने त्यांची व बहिणीची शाळा चालू होती. ते तिघेही अतिशय मायेने सोनालीची काळजी घेत होते. त्यांच्या परीने सगळी मदत करीत होते, पण तरीही घर ‘अनोळखी’ वाटायला लागलं. घरीच बसून सोनाली शाळेचा अभ्यास करीत होती. फक्त परीक्षेपुरती ती शाळेत जायची. दहावीलाही असाच घरून अभ्यास करणारी सोनाली शाळेत चक्क पहिली आली! पुढे कॉलेज शिक्षण घ्यावं असं ठरवून घरच्या घरीच अभ्यास करून सोनाली इंग्रजी विषय घेऊन बी. ए. झाली.
बी.ए.च्या शेवटच्या वर्षांला असताना सोनालीच्या एका मित्राने तिला प्रश्न विचारला, ‘आई-बाबांनंतर तुझं काय?’ सोनाली म्हणाली, ‘आजवर मी टाळत असलेला प्रश्न  माझ्यासमोर थेट ठाकल्याने मी खूप अस्वस्थ झाले.’
खूप विचार करून घर ‘सोडायचा’ प्रयोग करून पाहावा, असं सोनालीनं ठरवलं. सोनाली म्हणते, ‘जिथं मी काहीच मनात येईल ते करू शकत नव्हते, ते ठिकाण सोडणं म्हणजे घर सोडणं होतं का? नाही! मी, मला मनानं ‘सुरक्षित’ ठेवणारी घर ही भावना नि माझी माणसं सोडणार होते. धाडसच होतं ते. पण ठरवलं अखेर..’
त्यानंतर सोनाली कोल्हापूरच्या ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’ या संस्थेच्या उंचगाव येथील खास अपंग व्यक्तींसाठी (शारीरिक अडचणींचा खोलात विचार करून) बांधलेल्या ‘घरौंदा’ या वसतिगृहात राहायला गेली. शारीरिक व आर्थिक स्वावलंबनाचे धडे गिरवण्यासाठी म्हणून. ही गोष्ट आहे २००० सालची!
या ठिकाणी सोनालीच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. इथे वेगवेगळी विकलांगता असणाऱ्या लहान-मोठय़ा वयाच्या ७ ते ९ मुली, सर्वसाधारणपणे एका खोलीत असत. या ठिकाणी सर्वप्रथम व्हिलचेअर वापरायला सोनाली शिकली. नैसर्गिक विधीवरील नियंत्रण शक्य नाही हे स्वीकारून डायपर व टॉयलेटला जाण्यासाठीच्या वेळापत्रकाशी दिनक्रम बांधायला ती शिकली. यात साधारण आठवडा निघून गेला. या सर्व गोष्टींत गढून गेल्यावर, आई-बाबांवाचून राहणं हा विचार कमी त्रास द्यायला लागला,’ असं सोनाली सांगते.
महिनाभरानंतर मुंबई-पुणे येथील शासकीय कामे कशी करावीत याचा अनुभव सोनालीने घेतला. त्याचप्रमाणे सहलीनिमित्तच्या रेल्वे रिझव्‍‌र्हेशनपासून, खाणे-पिणे, औषधे इ.चे नियोजन करण्याची सवयही तिने अंगी बाणवून घेतली. पुणे, मुंबई, कोकणपट्टा, गोवा, हैदराबाद, दिल्ली, ओरिसा इ. ठिकाणांपर्यंत प्रवास केला. संवेदनक्षम आणि बोलक्या स्वभावामुळे सोनालीचा अनेक माणसांशी संपर्क झाला. विविध अनुभवांनी पक्व होत असताना स्वत:ची स्वत:ला ओळख होऊ लागली. सोनाली म्हणते, ‘माझ्या पळत्या, उत्सुक चाकांना भुई थोडी झाली.’
‘हेल्पर्स’मध्ये काम करीत असतानाच, कधी वर्तमानपत्र नजरेला पडायचं. कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनात, कधी फिल्म सोसायटीमध्ये दाखविल्या गेलेल्या उत्कृष्ट कलाकृतींविषयी प्रदर्शन असल्याचे, तसेच वेगवेगळ्या चित्रपटगृहांत गाजलेले चित्रपट लागलेले, केशवराव भोसले नाटय़गृहात होणाऱ्या नाटकांच्या जाहिरातींविषयी, तसेच कवितांचे- गाण्यांचे, व्याख्यानांचे कार्यक्रम- हे सर्व वाचून, आपणही या सर्वाचा अनुभव घ्यावा, असं मनापासून तिला वाटायचं, पण वसतिगृहात राहत असल्यामुळे तेथील नियमांनुसार रितसर लेखी परवानगी घेणे, त्यासाठी आधी अर्ज करणे, सांगितलेली वेळ पाळणे ही सर्व बंधने असायचीच. शिवाय संस्थेच्या कामांव्यतिरिक्त अशा अवांतर कार्यक्रमांना सातत्याने जायला संस्था परवानगीही देत नसे. पैशांचा प्रश्न तर होताच. त्यामुळे सोनालीची फार तगमग व्हायची. विकलांगतेवर मात करून व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी सर्व सोयी वसतिगृहात होत्या, याबद्दल शंकाच नाही. पण आवडीचे वाचन, सिनेमे, उत्तम कलाकृती यांचा रसास्वाद, त्यावर मारलेल्या पोटभर गप्पा आणि त्यातील चिंतनातून साकार असं जगणं आता सोनालीला खुणावू लागलं.
सोनालीने परत एकदा धाडस- तेही डोळसपणे करायचं ठरविलं आणि वसतिगृह सोडून ‘स्वत:च्या घरात’ राहायचं ठरवलं. आई-बाबांशी त्याविषयी बोलली. खूप चर्चेअंती त्यांनी परवानगी दिली. कोल्हापुरातील शिवाजी पेठेत तळमजल्यावरील ब्लॉक घेतला. आता या ब्लॉकचे रूपांतर ‘घरात’ करावयाचे होते. एव्हाना कोल्हापुरात सोनालीला अनेक पालकमंडळी भेटली होती. सुंदर जगण्याची सोनालीची आसक्ती पाहून या सर्व पालक मंडळींनी सोनालीला हे आव्हान स्वीकारण्यास पाठिंबा दिला. सोनाली म्हणते, ‘आई-बाबा त्यांची नोकरी सोडून, तेथील जगण्याशी त्यांची जुळलेली नाळ तोडून कोल्हापूरला येऊ शकत नव्हते. माझे पंख मजबूत करून, हे घरटं माझ्या मनाच्या ताकदीनं विणणं हा आनंद मला उपभोगायचा होता.’
यासाठी नोकरी व वसतिगृह सोडण्यापूर्वी घरात योग्य असे बदल करून मगच तिथे राहायला जायचं असं सोनालीनं ठरवलं. स्वत:च्या घरासाठी टाइल्स निवडणं, खोल्यांसाठीचा रंग निवडणं, लाइटची बटणे (जमिनीपासून अडीच फुटांवर), व्हीलचेअर फिरविण्यासाठी भरपूर जागा असलेलं फोल्डिंग कमोडचं प्रशस्त टॉयलेट कम बाथरूम, तिथे सोयीच्या उंचीवर नळ, कपडय़ांसाठी बार, शिवाय बेडवर झोपूनच कपडे घालावे लागत असल्याने एक चेंजिंग स्पेस, किचनमधील ओटा, वॉशबेसिन, गॅलरीचे दार, रॅम्प, सर्व व्हीलचेअरवर बसून ऑपरेट करता येईल असे. हॉलमधील कॉम्प्युटर टेबलची उंची- सर्व काही मनासारखं व सारं काही करताना कोणाची मदत लागू नये असं सोनालीने बनवून घेतले व १५ एप्रिल २००७ ला या तिच्या घरात तिने गृहप्रवेश केला.
सोनालीचे हे घर म्हणजे, जे अपंग स्वावलंबनाने जगू शकतात, जगू इच्छितात अशांसाठी आदर्श आहे. अनेक लोक या घराला भेट देतात, फोनवरूनही सोनालीला माहिती विचारतात.
आता या स्वतंत्र घरात राहायचं तर हेल्पर्समधील काम व त्याचबरोबर अर्थार्जन बंद झालं, पण एखाद्या प्रसंगावर तो कितीही कठीण का असेना, त्यावर उपाय शोधणे ही सोनालीसारखी जिद्दी मुलगीच करू जाणे! आई-वडिलांकडून सुरुवातीला कर्ज म्हणून पैसे घेतले व कॉम्प्युटर शिकली. त्यामुळे संगणकाशी निगडित व्यावसायिक कामे सोनालीला मिळू लागली. अर्थार्जनाला सुरुवात झाली. अजून एक संधी सोनालीला, तिच्या स्वागत थोरात या मित्राने दिली. भारतातील पहिल्या नोंदणीकृत ब्रेल पाक्षिकाची ‘स्पर्शज्ञान’ची उपसंपादिका म्हणून जबाबदारी दिली गेली. सोनाली वृत्तपत्रात आधीपासून काहीबाही लिहीत होतीच. उपसंपादकपदाची जबाबदारी टाकून अधिक विश्वास दाखवला. कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनीही या कामी तिला मार्गदर्शन केलं.  २००८ साली लुई ब्रेल यांच्या द्विजन्मशताब्दीच्या मुहूर्तावर स्वागत थोरातने ‘स्पर्शज्ञान’चा दिवाळी अंकही काढला. २००९ सालचा ‘स्पर्शज्ञान’चा दिवाळी अंक ‘जंगल, पर्यावरण, प्राणी-पक्षी जीवन’ या विषयावर होता; ज्याची संपूर्ण जबाबदारी स्वागत थोरातने सोनालीवर टाकली होती. त्या अंकाला राज्यस्तरीय तीन पुरस्कार लाभले.
याशिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील (२०११) नवोदित कवींच्या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन करण्याची संधी सोनालीला मिळाली. ही संधी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी दिली.
याशिवाय सोनालीने स्वत:ला अनेक संस्थांशी जोडून घेतले आहे. उदा. कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी, बी चॅनल, देवल क्लब, कोल्हापूर महोत्सव समिती, करवीरनगर वाचन मंदिर इ. ज्या कार्यक्रमांना वसतिगृहात असताना जायला मिळत नव्हते म्हणून सोनालीची तगमग होत असे अशा खूपशा कार्यक्रमांचे नियोजन अनौपचारिकरीत्या आज सोनालीच्या घरात होणाऱ्या चर्चामधून होते. व्याख्यानमालांचे विषय व वक्ते ठरतात. अनेक नामवंत लेखिक, कलाकार, उद्योजक अशी मित्रमंडळी सोनालीला लाभलेली आहे. सोनाली त्यामुळे अतिशय बिझी असते.
सोनाली स्वत: तर स्वावलंबी झाली आहेच- सर्व दृष्टीने - पण तेवढय़ावरच समाधान मानून बसलेली नाही. तर अशा अपंग व्यक्तींसाठी कुठे कुठे व काय काय सुधारणा करणे गरजेचे आहे, याविषयीचे पत्र तिने कोल्हापूरच्या महापौरांना लिहिले होते- एक सामाजिक बांधीलकी या नात्याने. विशेषत: राजर्षी शाहू भवन, केशवराव भोसले नाटय़गृह, जिथे अनेक चांगले कार्यक्रम होतात; परंतु या ठिकाणी जाताना अपंगांना २-३ जणांची मदत घ्यावीच लागते. कारण तिथे रॅम्प नाहीत, व्हीलचेअर जाईल अशा मोठय़ा लिफ्ट नाहीत.
पराकोटीचे अपंगत्व असूनही स्वावलंबी आयुष्य जगते आहे- याचे रोल मॉडेल म्हणून ‘राजर्षी शाहू युवा पुरस्कारा’साठी सोनालीची निवड २०११ साली झाली होती. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राजर्षी शाहू भवनात पहिल्या मजल्यावर जाताना सोनालीला २-३ जणांची मदत घ्यावी लागली. (कारण तिथे अपंगांसाठी सोयी नाहीत.)म्हणूनच पुरस्कार प्रदान केल्यानंतर मानचिन्ह व पुरस्कार देण्यामागची माया व आपुलकीचा सोनालीने स्वीकार केला, पण सोबत दिलेला २० हजारांचा धनादेश सोनालीने तिथल्या तिथे अपंगांसाठी या भवनात सुधारणा करण्यासाठी देऊन टाकला. आता तिथे रॅम्प तयार झाले आहेत.
गुजरातमधील भूज येथील भूकंपानंतर तेथील अपंग लोकांना स्वावलंबनाने कसे जगायचे यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी ७ दिवसांचे एक शिबीर आयोजित केले होते. नसीमा हुरजूक यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित केले होते. त्या वेळी सोनालीही प्रशिक्षण देण्यासाठी गेली होती.
सोनालीचा हा सर्व जीवनप्रवास उलगडलेला पाहताना, ऐकताना, वाचताना खरंच थक्क व्हायला होतं. सोनाली म्हणते त्याप्रमाणे तिच्या या जीवनप्रवासात तिला अनेकांचे सहकार्य, माया, प्रेम, आपुलकी मिळाली आहे; ज्याची सुरुवात तिचे आई-बाबा, बहीण यांच्यापासून झाली आहे.
सोनाली सांगत होती, मी पॅराप्लेजिक झाल्याचे व कधीच चालू शकणार नाही हे दारुण सत्य समजल्यावर, बत्तीस शिराळ्यातील काही लोक असंही म्हणत होते की, अशा मुलीला कशाला जगवायचे? पण लोकांचे हे बोलणे आई-बाबा, बहीण यांनी कानाजवळ व मनाजवळ अजिबात येऊ दिले नाही.
इतकं पराकोटीचं शारीरिक अपंगत्व येऊनही, सोनालीने मनाला कधीच अपंगत्व येऊ दिलं नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, जिद्दीनं, परिश्रमपूर्वक आतापर्यंतचा प्रवास तिनं केला. तिच्या आत्मविश्वासाला दाद दिल्याशिवाय आपण पुढं जाऊच शकत नाही. स्वकर्तृत्वानं उजळून टाकलेलं तिचं आयुष्य म्हणूनच प्रभावी वाटतं आणि आपल्या दृष्टीचा कॅनव्हास व्यापून टाकतं.